गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक बोलवण्यासाठी भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा पुढाकार !

निवेदन स्वीकारतांना उजवीकडे डॉ. अनिल बोंडे

अमरावती – लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात सध्या अनेक अपप्रकार चालू झालेले आहेत. हे सर्व अपप्रकार टाळून आदर्श गणेशोत्सव चालू करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी या तालुक्यांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक बोलवण्याची सूचना भाजपचे मोर्शी येथील आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी संबंधित कार्यकर्ते आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांना दिली.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने अमरावती येथील त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे, समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे आणि सनातन संस्थेचे श्री. हेमंत खत्री उपस्थित होते.

या वेळी सर्व विषय ऐकून घेतल्यावर आमदार डॉ. बोंडे म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेळी मंडपात मद्यपान करणे, मद्यपान करून मिरवणुकीत नाचणे, मोठ्या मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवणे, बलपूर्वक गुलाल उधळणे, महिलांची छेडछाड करणे, मंडपात अन् मिरवणुकीत डिजे (कर्णकर्कष ध्वनीवर्धक) वाजवणे, खर्चिक विद्युत रोषणाई करणे आदी अपप्रकार टाळून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यायला हवा. मंडळांनी गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक वारकरी दिंडीप्रमाणे काढायला हवी. आतापासून असे हे प्रयत्न चालू केल्यास काही वर्षांनी निश्‍चित मंडळांमध्ये सकारात्मक पालट दिसेल. तसेच जी मंडळे आदर्श उत्सव साजरा करतील, त्यांना आपण पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करू. जेणेकरून आदर्श उत्सव साजरे करण्याला प्रोत्साहन मिळेल.

ते पुढे म्हणाले की –

१. या वेळी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून हौद न बांधता तो निधी शाडूच्या गणेशमूर्तींच्या निर्मिती करणार्‍या मूर्तीकारांना अनुदान म्हणून द्यावा. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनवण्यात येऊ नये, तसेच जलाशय आणि तलावात लोखंडी तारेच्या जाळीने सिद्ध केलेली दगडी भिंत बांधून त्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. कागदी लगद्यापासून निर्मिलेल्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने त्यावर बंदी आणली आहे; मात्र शासनाने त्याची कार्यवाही न केल्यामुळे आजही मोठ्या प्रमाणावर कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती बाजरात विक्रीसाठी आणल्या जात आहेत. त्या संदर्भात कारवाई करण्यासाठी शासनाला भाग पाडावे, अशा मागण्यांची दोन निवेदने समितीच्या वतीने आमदार डॉ. अनिल बोंडे यांना देण्यात आली. त्यावर त्यांनी या संदर्भात अमरावती महानगरपालिका आयुक्त आणि शासनाला पत्र लिहू, असे सांगितले.

या वेळी सनातननिर्मित सात्त्विक आणि शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तीचे छायाचित्र पाहिल्यावर आमदार डॉ. बोंडे म्हणाले, ही मूर्ती खूपच छान आहे. अशा मंदिर सरकारीकरणाच्या संदर्भात ते म्हणाले की, आज शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त श्री. शिवशंकर पाटील यांच्यासारखे नि:स्पृहपणे आणि सेवाभाव वृत्तीने कार्य करणार्‍या प्रामाणिक लोकांची आवश्यकता आहे. सरकारच्या कह्यात मंदिरे गेल्यावर तेथे भ्रष्टाचार निश्‍चितपणे होणारच आहे. जे शासकीय लोक विविध लोककल्याणकारी आणि समाजहिताच्या योजनांचे पैसे खाऊन भ्रष्टाचार करतात, ते मंदिरांचेही पैसे खाणारच.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात