सातारा येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि करंजे ग्रामस्थ यांच्या वतीने ‘हिंदुत्व सन्मान मोर्चा’ !

सुधन्वा गोंधळेकर यांच्यावरील अन्याय्य
कारवाई आणि सनातन संस्थेवरील संभाव्य बंदी यांच्या विरोधात
सहस्रो वारकरी रस्त्यावर उतरतील ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

  • ३ जिल्ह्यांतील २५ गावे आणि १९ हून अधिक संघटनांचे कार्यकर्ते मिळून १ सहस्रहून अधिक हिंदूंचा सहभाग !

  • नास्तिकतावादी डॉ. दाभोलकर यांच्या कर्मभूमीत आस्तिकतावादी हिंदूंचे संघटन !

सातारा – छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणेच आपणालाही हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत प्रयत्न करायचे आहेत. डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त पुरोगाम्यांना खुष करण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. अंनिसचे शाम मानव यांची जर नार्को चाचणी केली, तर दाभोलकरांचे खरे मारेकरी सापडतील. सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधन्वा गोंधळेकर यांच्यावरील पोलीस कारवाई ही अन्यायकारक आहे. तसेच या घडामोडींमुळे सनातन संस्थेवर टीका होऊन बंदीची मागणी केली जात आहे; मात्र शासनाने हे लक्षात ठेवावे की, सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात सहस्रो वारकरी रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी चिपळूण येथील महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी दिली.

सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि करंजे ग्रामस्थ यांच्या वतीने २५ ऑगस्टला शहरातून ‘हिंदुत्व सन्मान मोर्चा’ काढण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, समर्थभक्त पू. शहाजीबुवा रामदासी, हिंदु एकता आंदोलनाचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. विनायक पावसकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे श्री. पंडितदादा मोडक, विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, बजरंग दलाचे श्री. धनंजय देशमुख, वाई येथील प्रखर धर्माभिमानी श्री. काशिनाथ शेलार, प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विवेक भोसले, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, करंजे पेठेतील ग्रामस्थ श्री. दत्तात्रय देवकर, श्री. युवराज ओतारी, श्रीमती प्रगती डोंगरे, सौ. गीतांजली गोंधळेकर (श्री. सुधन्वा गोंधळेकर यांच्या धर्मपत्नी) आदी मान्यवर आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १ सहस्रहून अधिक कार्यकर्ते अन् धर्माभिमानी उपस्थित होते.

 

सातारा – मुंबई ‘एटीएस्’ने धर्माभिमानी श्री. सुधन्वा गोंधळेकर यांना अन्यायकारक अटक केली आहे. श्री. सुधन्वा हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असून त्यांनी जिल्ह्यात नेहमीच संवैधानिक मार्गाने जनजागृती केली आहे. यामुळे श्री. सुधन्वा रहात असलेल्या करंजे पेठेतील नागरिक आज सुधन्वा गोंधळेकर यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मुंबई ‘एटीएस्’ने हिंदुत्वनिष्ठांना केलेली अटक ही कायदाबाह्य आहे. त्यामुळे समाजाचा मुंबई ‘एटीएस्’वरील संशय बळावला आहे. यापूर्वी मालेगाव बाँबस्फोटामध्येही साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनाही षड्यंत्रपूर्वक अडकवल्याची उदाहरणे आहेत. तरी वरील सर्व गोष्टी पहाता निष्पाप श्री. सुधन्वा गोंधळेकर यांना सन्मानाने मुक्त करावे. श्री. गोंधळेकर यांची ‘मिडिया ट्रायल’द्वारे होत असलेली मानहानी थांबवावी, अशी मागणी मोर्च्याद्वारे करण्यात आली.

पुणे येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. पंडितदादा मोडक, झेंडेवाडीचे सरपंच श्री. समीर झेंडे, श्री. रामदास मोडक, शिवसेना विभागप्रमुख श्री. सुभाष गायकवाड हे आदल्या रात्री निरोप मिळूनही मोर्च्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले.

मोर्च्यात सातारावासियांचा उत्स्फूर्त सहभाग !

नगरपालिकेशेजारील आनंदवाडी दत्तमंदिर येथून मोर्च्यास प्रारंभ झाला. ‘एटीएस् का षड्यंत्र – नही सहेंगे । नही सहेंगे ।’, ‘आम्ही सारे सनातन-सनातन’ अशा घोषणांनी मोर्चेकर्‍यांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्च्यात सहभागी युवक-युवतींनी ‘सुधन्वा गोंधळेकर यांची अन्याय्य अटक रहित करा’, ‘सच्चा धर्माभिमानी सुधन्वा गोंधळेकर’, ‘सनातनवर बंदीची मागणी हे पुरोगामी ढोंग’, ‘दाभोलकरांचे खरे मारेकरी पकडण्यापेक्षा सनातन बंदीमध्ये अंनिसला रस का ?’, असे फलक हातात धरून निषेध व्यक्त केला. या वेळी श्री. सुधन्वा गोंधळेकर यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, सातारा, कराड, वाई, वडूज, खटाव, कोरेगाव, रहिमतपूर तसेच आजूबाजूच्या २५ हून अधिक गावांतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. या मोर्च्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.

सनातन संस्थेवर संभाव्य बंदीच्या विरोधातील षड्यंत्राला कडाडून विरोध !

सनातन संस्था आणि तिचे साधक गेल्या दोन दशकांहून अधिक काळ निःस्पृहपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार करून समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी जागृत करत आहेत. असे असूनही सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संघटनांवर नाहक बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा कडाडून विरोध केला जाईल, अशी चेतावणी मोर्चाद्वारे देण्यात आला. सनातन संस्था, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा पुरोगाम्यांच्या हत्यांशी कोणताही संबंध नाही. आजवर कोणत्याच अन्वेषण यंत्रणेने या प्रकरणांमध्ये एकाही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नाव घेतलेले नाही, असे विचार मान्यवरांनी व्यक्त करून सनातन संस्थेस जाहीर पाठिंबा व्यक्त केला. अशा प्रकारे अन्याय्य बंदी घालण्याचा प्रयत्न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली.

मोर्च्यात सहभागी संघटना

करंजे पेठ ग्रामस्थ, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ, वारकरी संप्रदाय, योग वेदांत सेवा समिती,  समर्थ संप्रदाय, जगदंब प्रतिष्ठान, पुणे, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा, प्रतापगड उत्सव समिती, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा, हिंदू एकता आंदोलन, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, अष्टपैलू व्यायाम मंडळ, वर्णे, तालिम संघ, अंगापूर, १४ मावळे प्रतिष्ठान जांब, महाराज प्रतिष्ठान नागठाणे, श्रीमंगल मारुती गणेशोत्सव मंडळ तसेच अन्य गणेशोत्सव मंडळे, दुर्गोत्सव मंडळे आणि भजनी मंडळे, सातारा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहस्रोंच्या संख्येने सहभागी झाले.

पाठीशी उभे रहाणार्‍यांप्रती कृतज्ञ आहे ! – सुनील घनवट

या कठीण काळातही आपण सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, त्याविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. सध्या महाराष्ट्रात पुरोगाम्यांना खूष करण्यासाठी राष्ट्रभक्तांचा बळी दिला जात आहे. ब्राह्मण आणि मराठा यांच्यात वाद निर्माण करून मतपेढी वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कितीतरी घोटाळ्यात सापडतात, बाँबस्फोटात सापडतात तर राष्ट्रवादीवरही बंदी घालणार का ?

पोलिसांच्या विनंतीचा मान राखून बोलण्याचे टाळणार्‍या सौ. गीतांजली गोंधळेकर !

सौ. गीतांजली गोंधळेकर (श्री. सुधन्वा गोंधळेकर यांच्या धर्मपत्नी) यांनी समारोपाच्या वेळी म्हणाल्या, ‘‘आम्हाला दिलेल्या पाठिंब्याविषयी आभार ! पोलिसांनी मला न बोलण्यासाठी सांगितले आहे. पोलिसांच्या विनंतीचा मान राखत मी बोलण्याचे टाळत आहे; मात्र योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मी निश्‍चित बोलेन.’’

सातारा पोलिसांची अरेरावी !

श्री. सुधन्वा गोंधळेकर यांचे छायाचित्र असलेला १० बाय १० फूट फ्लेक्स बोर्ड मोर्चासाठी बनवण्यात आला होता; मात्र पोलिसांनी तो लावू नये, असे आयोजकांना बोलावून सांगितले. या वेळी पोलिसांना विनंती करूनही पोलीस ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. पोलिसांनी हा फ्लेक्स मोर्चा होईपर्यंत स्वत:च्या कह्यात ठेवला.

क्षणचित्रे

१. श्री. सुधन्वा गोंधळेकर यांच्या संपर्कातील शेकडो महाविद्यालयीन युवक, करंजे ग्रामस्थ, सहकारी शेकडोंच्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते.

२. मोर्चा शिवतीर्थावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

३. मोर्चासाठी केंद्रीय अन्वेषन विभाग, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, राज्य गुप्तवार्ता विभाग, साध्या पोशाखातील पोलीस असा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मोर्चा लवकर संपवण्यासाठी पोलीस सूचना करत होते.

४. मोर्च्याचा प्रारंभ शंखनाद करून झाला.

५. मोर्चा चालू असतांनाच पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना ‘नोटीसा’ बजावल्या.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

१. श्री. विनायक पावसकर, हिंदु एकता आंदोलन : पोलिसांची कारवाई अन्याय्य आहे. कुणालातरी पकडून आतंकवादी घोषित करण्याची त्यांना घाई आहे. पुरोगामी संघटनांच्या दबावाला बळी पडून कारवाई करणे दुर्दैवी !

२. श्री. जितेंद्र वाडेकर, विश्‍व हिंदु परिषद, शहरमंत्री : सरकारने हिंदूंना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली आहे. २०१३ पासून सहस्रोे निर्दोष साधकांची चौकशी केली. स्वत:वरील संकट टळण्यासाठी तर हे केले जात नाही ना ?

३. समर्थभक्त पू. शहाजीबुवा रामदासी : पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येला मणिहार घालण्याचा प्रकार पोलीस करत आहेत. सनातनची मानहानी केली गेली, तरी हिंदुत्वनिष्ठ सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

४. श्री. काशिनाथ शेलार, हिंदुत्वनिष्ठ : हिंदु कार्यकर्त्यांच्या चौकशीपेक्षा पोलिसांनी जितेंद्र आव्हाड, कोळसे-पाटील, दाभोलकर परिवाराची चौकशी करावी. प्रत्येक तालुक्यात ‘हिंदुत्व सन्मान मोर्चा’ काढला जाईल.

५. श्री. दत्तात्रय देवकर, ग्रामस्थ : सुधन्वाला मी लहानपणापासून ओळखतो. तो असे कधीच करणार नाही. तो निर्दोष असून योग्य वेळ आल्यानंतर न्यायालयच त्याची निर्दोष मुक्तता करेल !

६. श्रीमती प्रगती डोंगरे, ग्रामस्थ : सुधन्वा उच्च विद्याविभूषित असून त्याने गावातील गणेशमंडळे एकत्रित केली. युवकांमधील वाद मिटवले. शाळांना संगणकीय साहित्य दिले. गावातील ६० हून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तो असे करूच शकत नाही. या अन्याय्य कारवाईचा समस्त करंजे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.

७. श्री. विवेक भोसले, प्रतापगड उत्सव समिती : पोलिसांची मनमानी चालू आहे. हिंदुत्वनिष्ठ आणि संघटना यांना गोवण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटना सनातनच्या पाठीशी आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात