सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भेडशी आणि चेंदवण येथे साधनावृद्धी शिबीर

देव आणि असुर यांच्यातील युद्धात अंतिम विजय देवांचाच झाला आहे ! – सद्गुरु सत्यवान कदम

डावीकडून श्री. गजानन मुंज, सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. राजेंद्र पाटील

समाजात चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती असतात, तशाच त्या वातावरणातही असतात. चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांना सूक्ष्मातील चांगल्या, तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सूक्ष्मातील वाईट शक्तींचे साहाय्य मिळत असते. त्रेतायुगात आणि द्वापरयुगात असुरांनी देवतांना, तसेच प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण या अवतारांनाही त्रास दिला; पण देवता अन् अवतार यांनी असुरांशी युद्ध करून धर्मविजय मिळवला. आतापर्यंत झालेल्या देवासुर युद्धांत अंतिम विजय देवता, अवतार आणि देवतांचा पक्ष घेऊन लढणार्‍यांचाच झाला आहे, हा इतिहास आहे. धर्मसंस्थापनेचे, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणार्‍यांवरही सूक्ष्मातून आक्रमणे होत असतात; मात्र यामध्ये अंतिम विजय आपलाच आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चेंदवण येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री. भोई आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अनंत पिरणकर, ग्रामपंचायत चेंदवण यांनी केलेल्या सहकार्याविषयी आभार मानण्यात आले.

सावंतवाडी – सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेडशी (दोडामार्ग) आणि चेंदवण (कुडाळ) येथे नुकतेच एकदिवसीय साधनावृद्धी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात मिळालेल्या मार्गदर्शनामुळे जीवन जगण्याची योग्य दिशा मिळाली. तसेच स्वभावदोष आणि अहं यांमुळे जीवनात होणार्‍या हानीची जाणीव झाली. अशी शिबिरे सातत्याने घेण्यात यावीत, असे मत शिबिरात सहभागी झालेल्या जिज्ञासूंनी व्यक्त केले.

भेडशी येथील साधनावृद्धी शिबिराला उपस्थित जिज्ञासू

कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेंदवण क्रमांक – १ आणि दोडामार्ग तालुक्यातील श्री देव खंडोबा सभागृह, झरे-२, (सरगवे) येथे ही शिबिरे झाली. या वेळी धार्मिक कृतींमागील शास्त्र या विषयावरील ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या शिबिरात सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी वाईट शक्तींमुळे होणारा त्रास आणि त्यावरील उपाय, श्री. राजेंद्र पाटील यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व आणि श्री. गजानन मुंज यांनी जीवनातील साधनेचे महत्व अन् गुरुकृपायोगानुसार साधना या विषयांवर मार्गदर्शन केले. चेंदवण येथे ४०, तर भेडशी येथे ४८ जिज्ञासू उपस्थित होते. भेडशी येथे प्रत्येक १५ दिवसांनी (रविवार) धर्मशिक्षणवर्गासाठी एकत्र येण्याचा निर्णय उपस्थितांनी घेतला. शिबिरात आलेल्या अनुभूतीही जिज्ञासूंनी कृतज्ञताभावाने मांडल्या.

समाजव्यवस्था सुस्थितीत रहाण्यासाठी प्रत्येकाने गुणांचे संवर्धन केले पाहिजे ! – राजेंद्र पाटील

कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी जोपर्यंत स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं निर्मूलन हे काही प्रमाणात साध्य होत नाहीत, तोपर्यंत साधनेत प्रगती करणे अतिशय कठीण होते. वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती म्हणजेच ईश्‍वरप्राप्ती, हे साधनेचे ध्येय आहे.एखादी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत तेव्हाच होते, जेव्हा तिच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अत्यल्प होत जाते; म्हणून या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रचलित समाजव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार, लाचलुचपत, गुंडगिरी, स्वार्थ, अतीमहत्त्वाकांक्षा इत्यादी दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एकूण समाजव्यवस्था सुस्थितीत रहाण्यासाठी स्वत:तील दुर्गुणांचे निर्मूलन आणि गुणांचे संवर्धन करणे, हे समाजातील प्रत्येक घटकाचे आद्य कर्तव्य ठरते.

व्यष्टी आणि समष्टी साधना परस्परपूरक असल्याने दोन्हीला महत्त्व ! –  गजानन मुंज

कालमहिम्याप्रमाणे कलियुगात समष्टी साधनेला ७० टक्के, तर व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व आहे. व्यष्टी साधना करणार्‍यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी समष्टी साधना करणे आवश्यक असते, व्यष्टी साधनेच्या पायावर समष्टी साधनेची इमारत उभी रहात असल्याने समष्टी साधना करणार्‍यांनी व्यष्टी साधना करणेही आवश्यक आहे. गुरु अन् संत यांचे एकमेव कार्य म्हणजे समाजात धर्म आणि साधना यांविषयी गोडी निर्माण करून सर्वांना साधना करायला प्रवृत्त करणे अन् अध्यात्माचा प्रसार करणे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या क्षमतेप्रमाणे अध्यात्मप्रसार करायला हवा. समष्टी साधनेत ज्याला जे शक्य आहे, त्याने ते करावे. ज्याला हे दोन्ही शक्य नाही, त्याने प्रसारासाठी भित्तीपत्रके अन् कापडीफलक लावणे, माहितीपत्रके वितरित करणे, सत्संगाच्या जागेची स्वच्छता करणे, सत्संगासाठी सतरंज्या घालणे, या कार्यासाठी अर्पण गोळा करणे आदी केल्यास त्यांचीही साधना होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परिने यात सहभाग घेतला पाहिजे.

अनुभूती

शिबिरात साधिकेने सांगितलेले मनोगत आणि साधनेचा केलेला दृढ निश्‍चय !

मी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहाण्यासाठी गेले होते. तेथे मला गुरुदेवांचे दर्शन झाले नाही. मला गुरुदेवांचे दर्शन व्हावे, अशी माझी तीव्र इच्छा होती. एकदा दैनिक सनातन प्रभात वाचतांना अचानक माझा भाव जागृत झाला. माझ्या डोळ्यांसमोर अचानक निळा प्रकाश दिसला आणि गुरुदेवांचे दर्शन झाले. आश्रमदर्शनासाठी गेले असता गुरुदेवांचे दर्शन झाले नाही, ही माझी खंत ही अनुभूती देऊन गुरुदेवांनी दूर केली. मी जीवनातील ३० वर्षे वाया घालवली, याची जाणीव मला या शिबिरातून झाली. यापुढे मी साधनेसाठी मनापासून आणि तळमळीने प्रयत्न करीन.

– सौ. लक्ष्मी विठ्ठल शेळके, प्राथमिक शिक्षिका, भेडशी, दोडामार्ग.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात