‘सनातन संस्थेवरील बंदीची मागणी हे जागतिक षड्यंत्र !’ – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

ठाणे, जळगाव, यवतमाळ, नंदुरबार तसेच पश्‍चिम
महाराष्ट्र येथे आंदोलनांद्वारे हिंदुत्वनिष्ठांनी पुरोगाम्यांना विचारला ‘जवाब !’

ठाणे येथील आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांचा सनातनला पाठिंबा

तपास यंत्रणांच्या अधिकार्‍यांची नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंग करा ! – आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके, कल्याण शहर उपाध्यक्ष, भाजप

पुरोग्याम्यांच्या हत्येच्या तपासात यंत्रणांनी वेळोवेळी घातलेला गोंधळ आपण पाहिला आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या तपासात यंत्रणांनी वेगवेगळ्या लोकांना आरोप म्हणून अटक केले. त्या तपासात विपर्यास दिसत आहे. यांना खरा खुनी शोधायचा आहे का, असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे अशा अधिकार्‍यांची नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंग करा तेव्हाच सत्य बाहेर येईल.

आपण सर्व जन्महिंदू न होता कर्महिंदू म्हणून सनातनसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठीशी उभे रहायला हवे ! –  गणेश पवार, हिंदुत्वनिष्ठ

रजा अकादमीचा मुंबईत मोर्चा निघाला तेव्हा तो मुस्लिम दहशतवाद आहे, असे कोणी म्हटले नाही; परंतु वैभव राऊत आणि इतर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते पकडले, तर हिंदूंना दहशवाद म्हणून संबोधले जाते. हा सर्वधर्मसमभाव आहे का, आपण सर्व जन्महिंदू न होता कर्म हिंदू म्हणून सनातन सारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठीशी उभे राहायला हवे.

क्षणचित्रे

१. गोपनीय शाखेचा एक अधिकारी फलकावरील लिखाण लिहून घेत होता.

२. नागरिक दुचाकी थांबवून स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी करत होते.

३. पाऊस असूनही आंदोलनांत नागरिक शेवटपर्यंत उपस्थित होते.

४. नागरिक थांबून विषय ऐकत होते.

५. उत्स्फूर्तपणे हिंदुद्वेषी एकांगी वृत्त प्रसिद्ध करणार्‍या काही वृत्तवाहिन्यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

६. एका पोलिसाने प्रेसनोटची मागणी करून ती घेतली.

 

पनवेल (रायगड) येथे तहसीलदारांना निवेदन

डावीकडून तहसीलदार श्री. कृष्णा पालवे, श्री. बळवंत पाठक अमिता चौहान, मागे अजयसिंग सेंगर, सौ. मोहिनी मांढरे आणि हिंदुत्वनिष्ठ

पनवेल – येथील नायब तहसीलदार श्री. कृष्णा पालवे यांना सनातन संस्थेवरील होणार्‍या अन्यायकारक बंदी आणणार्‍या मागणीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. या वेळी विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. अजयसिंग सेंगर, महाराणा ब्रिगेडच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष क्षत्राणी अमिता चौहान, रणरागिणी शाखेच्या सौ. मोहिनी मांढरे, धर्मप्रेमी श्री. अंकुश खानावकर, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी श्री. कृष्णा पालवे म्हणाले की, तुमच्या मागण्या मी वरील अधिकार्‍यांपर्यंत पोहोचवतो. या वेळी उपविभागीय अधिकारी श्री. दत्तात्रय नवले यांनाही शिष्टमंडळाने निवेदन दिले.

सनातनवरील बंदी अन्यायकारक ! – अजयसिंह सेंगर, विश्‍व हिंदु परिषद

सनातन संस्थेवर होणारी बंदीची मागणी अन्यायकारक आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत ही बंदी येऊ देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून याचा निषेध करू. सनातन संस्था सत्त्वप्रधान व्यक्ती निर्माण करण्याचे कार्य करते. तिच्यावर होणारी बंदीची मागणी निषेधार्ह आहे.

क्षत्रांनी अमिता चव्हाण म्हणाल्या, ‘‘आम्ही सर्व सनातनी आहोत. सनातनवर करण्यात येणार्‍या बंदीच्या मागणीला आमचा तीव्र विरोध आहे.’’

 

जळगाव येथे ‘घंटानाद’ आंदोलनाद्वारे विचारला ‘जवाब’ !

सनातन संस्थेवरील बंदीची मागणी हे जागतिक षड्यंत्र ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

जळगाव – कोठेही बॉम्बस्फोट, हत्या झाल्यावर  लगेच सनातनचे नाव घेतले जाते. हिंदूंना मारहाण करून खोटा कबुली जवाब नोंदवला जातो. आतापर्यंतच्या सर्व कारवायांमध्ये आतंकवाद विरोध पथकाची भूमिका आता जनतेला संशयास्पद वाटू लागली आहे. प्रत्येक वेळी नवा चेहरा पकडला जातो. अंनिसचे नक्षलवाद्यांशी संबध आहेत, त्यांच्या संस्थेतील आर्थिक घोटाळे सिद्ध होऊनही घोटाळेबाज अंनिसवर नाही, तर सनातनवर बंदीची मागणी होते, असे प्रतिपादन सनातनचे सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

खर्‍या दोषींवर कारवाई करा ! – अधिवक्ता गोविंद तिवारी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु महासभा

सनातन संस्था देश, धर्म अन् राष्ट्रहित याचे कार्य करणारी संस्था आहे. वैभव राऊतच्या समर्थनार्थ सहस्रोंच्या संख्येने मोर्चा निघाला. वैभव राऊत दोषी असता, तर एवढे लोक जमले असते का ? निर्दोषांवर नव्हे, तर खर्‍या दोषींवर कारवाई करायला हवी.

माणूस घडवणारी संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ ! – महेंद्रसिंह पाटील, प्रदेश युवा उपाध्यक्ष, करणी सेना

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसारख्या संस्था स्वार्थासाठी कधीही रस्त्यावर आलेल्या नाहीत. सनातन संस्था ही ‘माणूस घडवणारी’ संस्था आहे. संस्थेच्या समर्थनार्थ सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.

हिंदुस्थानात हिंदूंना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका ! – गणेश चौधरी, योग वेदांत समिती

अंनिसला नेहमी एकच संस्था दिसते का ? अन्य धर्मातील अंधश्रद्धा अंनिसला दिसत नाहीत का ? सनातन संस्था गंगा नदीसारखी आहे. कितीही डोंगर आड आले तरी थांबणार नाही. देशात संत, राष्ट्रपुरुष, संघटना यांवर आरोप केले जातात. हे हिंदू यापुढे सहन करणार नाहीत. आमच्या भावनांशी खेळू नका.

हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता ! – ह.भ.प. जगदीश महाराज, वारकरी संप्रदाय

आतापर्यंत अनेक निरपराध साधकांना अटक करण्यात आली आहे. संस्कृती, देव, देश आणि धर्मासाठी हिंदूंना प्रेरित करणारी संस्था म्हणून सनातन संस्थेची ओळख आहे. जेव्हा कोणी सापडत नाही, तेव्हा लगेच सनातनच्या साधकांना अटक केली जाते. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता आहे.

स्वत:तील वाईट दोष नष्ट करून मोक्षाचा मार्ग
दाखवणारी संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ ! – मोहन तिवारी, शिवसेना

जळगावमध्ये सिमीचा कार्यकर्ता सापडतो तो मात्र माफीचा साक्षीदार होतो. सनातन संस्था ही परिवाराचा उद्धार करणारी संस्था आहे. मी सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना स्वत:तील वाईट दोष नष्ट करून साधना करायला शिकलो. म्हणून आनंदाने जीवन जगू शकतो.

सनातनवर बंदीची मागणी म्हणजे धर्मद्रोह्यांचा वैचारिक आतंकवाद !
– सौ. क्षिप्रा जुवेकर, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा

या देशात ‘भारतके तुकडे होंगे’ म्हणणारे मोकाट फिरतात; मात्र धर्मप्रसार करणार्‍या सनातनवर बंदीची मागणी केली जाते, गोरक्षकांचा छळ होतो. हा साम्यवाद्यांचा वैचारिक आतंकवाद आहे, असेच म्हणावे लागेल.

या वेळी हिंदु समाज पार्टीचे श्री. कमल नागला, प्रसिद्ध व्यापारी आणि कुंभार समाज जिल्हाध्यक्ष श्री. पद्माकर शिरसाठ, स्वर्णकार कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रदीप सोनार, यांसह बजरंग दल, जय मल्हार सेना, जय श्रीराम ग्रुप आदी संघटनांचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक मोठ्या संख्येने आंदोलनाला उपस्थित होते.

 

अमरावती

सत्य नेहमीच समोर येत असल्याने सनातन संस्था निर्दोष आहे,
हे समाजाच्या समोर येईलच ! – नितीन व्यास, प्रवक्ते, भगवा सेना

अमरावती – धार्मिक कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे चुकीचे आहे. हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत गेले, तर एकदिवस हिंदू एकत्र येऊन त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध करतीलच. सत्य नेहमी समोर येते, त्याप्रमाणे सत्य कार्य करणार्‍या सनातन संस्थेची प्रामाणिकता जनतेच्या समोर येणारच आहे, असे ठाम प्रतिपादन भगवा सेनेचे प्रवक्ते नितीन व्यास यांनी केले. जयस्तंभ चौक येथे २० ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत हे आंदोलन घेण्यात आले.

आंदोलनामध्ये  सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भगवा सेना, राष्ट्रीय बजरंग दल,  श्रीराम सेना, योग वेदांत समिती यांसारख्या विविध संघटनांचे आणि संप्रदायाचे ८० धर्मप्रेमी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. ५ धर्मप्रेमी घोषणा ऐकून आंदोलनामध्ये सहभागी झाले. प्रसिद्धीमाध्यमांचा आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

२. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून २१ सहस्रांहून अधिक जणांनी आंदोलनाचा लाभ घेतला.

३. आंदोलनामध्ये रस्त्यावरील वाहतुकीचा व्यत्यय येऊ नये, यासाठी पोलिसांनी सहकार्य केले.

मी सदैव हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था
यांच्या समवेत आहे ! – मुकुल कापसे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल

हिंदुस्थानामध्ये हिंदू बहुसंख्य असून हिंदूंवर वारंवार अन्याय केला जातो. कुठल्याही घटनेत हिंदुत्वनिष्ठांवर आरोप करणे आणि त्यांना अपराधी अन् आतंकवादी घोषित करणे हा सापळाच आजकाल रचला जात आहे. सनातन संस्था अतिशय प्रामाणिकपणे हिंदुत्वाचे कार्य करते. मी नेहमीच संस्थेच्या समवेत आहे.

 

यवतमाळ

राष्ट्ररक्षणाचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणि
आतंकवादी कारवाया करणार्‍यांना मोकाट सोडायचे का ?- लक्ष्मणलाल खत्री, हिंदु महासभा

यवतमाळ – सनातन संस्था राष्ट्र आणि संस्कृती रक्षणासह समाजाला साधना करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे महत्कार्य करते. अशा संस्थेवर बंदी आणायची आणि आतंकवादी कारवाया करणार्‍यांना, समाजाला वेठीस धरणार्‍यांना मोकाट सोडायचे का ?, असा घणाघाती प्रश्‍न हिंदु महासभेचे श्री. लक्ष्मणलाल खत्री यांनी उपस्थित केला. येथील दत्त चौक येथे  धरणे आंदोलन पार पडले. या आंदोलनात हिंदु महासभा, योग वेदांत समिती, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सहभागी झाल्या. आंदोलनात ३० जण प्रत्यक्ष सहभागी झाले, तर ४०० जणांनी निवेदनावर स्वाक्षर्‍या करून अप्रत्यक्ष सहभाग घेतला. स्वाक्षर्‍या करणार्‍यांमध्ये तरुणांचा सहभाग अधिक होता.

या वेळी सनातन संस्थेच्या सौ. धनश्री देशपांडे यांनी सनातनला लक्ष्य केले जात असल्याचे सांगितले.

 

सांगली, सोलापूर आणि नगर येथेही आंदोलने

सोलापूर येथे भर पावसातही आंदोलनाला १५० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेवर केले जाणारे खोटे आरोप सहन केले जाणार नाहीत, असे मत भाजपचे माजी विरोधी पक्षनेते रामचंद्र जन्नू यांनी व्यक्त केले. सांगली येथे आंदोलनाची अनुमती मिळवण्यासाठी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे श्री. अंकुश गोडसे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. कृष्णा यादव हेही हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत पोलीस ठाण्यात उपस्थित होते. आंदोलनाला १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. नगर येथेही आंदोलन पार पडले.

 

नाशिक

नाशिक – सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने नाशिकचे उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अंनिसवाले, शासन आणि पोलीस यांनाच या प्रश्‍नांविषयी ‘जवाब दो’ असे विचारण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती वैशाली कातकडे, सनातन संस्थेच्या सौ. ज्योती पंडित, मालेगाव येथील गोरक्षक संदीप वाघ, श्री. शिवाजी उगले हे उपस्थित होते.

 

नंदुरबार

सनातन संस्थेला पूर्णपणे पाठिंबा आहे ! – रविभाई, योग वेदांत सेवा समिती

आमचा सनातन संस्थेला पूर्णपणे पाठिंबा आहे. सनातनवर बंदी येणार म्हणजे एक प्रकारे हिंदु धर्मावरती हा मोठा आघातच आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी यास संघटित होऊन विरोध केला पाहिजे.

सनातन संस्था ही हिंदुत्वासाठी झटणारी संस्था ! – दिलीप ढाकणे-पाटील प्रखर हिंदुत्वनिष्ठ

सनातन संस्थेने हिंदु राष्ट्रासाठी पहिल्यांदा आवाज उठवला. सनातन संस्था ही निरपेक्षपणे हिंदुत्वासाठी झटत आहे आणि तिचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन समिति विरोध करत आहे. सनातन संस्था ही बॉम्बस्फोट किंवा आतंकवादी कारवाया करू शकत नाही; कारण की ती सर्व हिंदूंना धर्मशास्त्र शिकवते. अंनिससारख्यांना हे डोईजड होते. त्यामुळेच ते सनातनवर बंदी घालण्याची भाषा करत आहेत.

सनातनने अंनिसचे घोटाळे बाहेर काढले म्हणून सनातनची
अपकिर्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे ! – डॉ नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समिती

सनातन संस्थेवर बंदीची भाषा करणे आणि कोणी सापडला तरी उठसूट सनातन किंवा हिंदु जनजागृती समिती यांवर आरोप करणे, हे आता ‘मीडिया ट्रायल’ झालेले आहे. जगामध्ये भगवा आतंकवाद नावाची गोष्ट अस्तित्वात नसतांना ‘भगवा आतंकवाद’ आहे आणि असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे घोटाळे बाहेर काढले. म्हणून सनातनची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरे मारेकरी सोडून आता चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रयत्न करत आहेत; पण सनातन म्हणजे नित्यनूतन आहे आणि ते चिरकालीन सत्य आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही !

शेवटी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात