सनातन संस्थेला अडकवण्यामागे मोठे षड्यंत्र; मात्र शिवसेना सनातनच्या पाठीशी ! – खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेना, अमरावती

खासदार आनंदराव अडसूळ (सर्वांत डावीकडे) यांना निवेदन देतांना डावीकडून श्री. अरविंद पानसरे,श्री. नीलेश टवलारे आणि श्री. हेमंत खत्री

अमरावती – सध्या चालू असलेल्या सर्व घडामोडी पाहिल्यावर सनातन संस्थेला अडकवण्यामागे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. मी स्वतः पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सनातनवर बंदीची कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती करणार आहे. तसेच सनातन संस्थेसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटना कोणताही राजकीय उद्देश न ठेवता नि:स्पृहपणे कार्य करत आहेत. खरेतर अशा संस्थांना हिंदुत्वनिष्ठ शासनाने साहाय्य करण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः खासदार म्हणून, तसेच आमचा शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे अमरावती जिल्ह्यातील खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री श्री. आनंदराव अडसूळ यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीच्या वेळी बोलत होते.

या वेळी सनातन संस्थेचे अमरावती येथील श्री. हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समितीचे महराष्ट्र प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे, समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे आणि समितीचे प्रसिद्धीसेवक श्री. जय देशमुख या वेळी उपस्थित होते. या वेळी खासदार श्री. अडसूळ यांना ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बंदी आणण्यात येऊ नये’, या विषयीचे निवेदन आणि अन्य पुरावे दिले.

या वेळी समितीचे प्रवक्ते श्री. पानसरे यांनी खासदार महोदयांना माहिती देतांना सांगितले, ‘‘सध्या नालासोपारा आणि पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि संस्थेचे साधक यांना नाहक गोवले जात आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्यापूर्वी आपचे नेते आशिष खेतान यांनी ट्वीट करून माहिती दिली होती, म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांना आधीच माहिती देऊन सनातनची अपकीर्ती करण्याची संधी दिली. डॉ. दाभोलकर खटल्यात आधीच्या आरोपींची नावे वेगळी आणि आता पकडलेले आरोपी निराळे आहेत. इतकेच नव्हे, तर मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्णय देतांना सनातन संस्थेला जाणीवपूर्णक गोवण्यासाठी प्रथम माहिती अहवाल (एफ्आयआर्) सिद्ध करण्यात आल्याचे म्हटले आहे.’’

यावर खासदार श्री. अडसूळ म्हणाले, ‘‘हे मोठे षड्यंत्र आहे. खरे हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या सत्ताधारी भाजपने साहाय्य करायला हवे; मात्र सनातनला साहाय्य होतांना दिसत नाही. तुमच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांमुळे धर्माचे कार्य चालू आहे. हिंदुत्वनिष्ठ पक्षांना बळ मिळत आहे. शासनाने तुम्हाला साहाय्य करायला हवे, यासाठी मी प्रयत्न करीन. तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नि:स्पृहपणे करत असल्यामुळे तुम्हाला हा लढा द्यावा लागणार आहे; मात्र आम्ही तुमच्या समवेत आहोत. आमचा शिवसेना पक्षही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. तुमच्या बाजूने लढण्यासाठी आम्ही सदैव सिद्ध आहोत.’’

सनातनवर बंदी घालण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचा संशय ! – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सनातन संस्थेचे साहित्य मी वाचले आहे. मी सनातनच्या प्रमुखांना भेटून कार्य जाणून घेतले. ही संस्था हिंदु धर्माच्या रक्षणासाठी उत्तम कार्य करत आहे. सनातनचे साधकांना घडवले आणि त्यांच्या जीवनात एक प्रकारचे अनुशासन निर्माण केले, हे प्रशंसनीय आहे. हिंदु धर्मातील परंपरांचे रक्षण करण्याचे कार्य करतांना त्या परंपरांवर आघात करणार्‍यांचा प्रतिवादही त्यांना करावा लागतो. हा प्रतिवाद त्यांनी नेहमीच वैचारिक स्तरावर केला आहे. हेही प्रशंसनीय आहे. ‘गुन्ह्यांचे कठोर अन्वेषण केले पाहिजे. त्यांना घटनेनुसार शिक्षाही केली पाहिजे’, असेच सनातन संस्थेच्या पदाधिकार्‍यांचेही म्हणणे आहे. ‘धर्मप्रसाराचे कार्य घटनेनुसारच केले पाहिजे’, हे सर्व सनातनलाही मान्य असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. ‘गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहिजे’, ‘हत्येचे अन्वेषण जलद गतीने व्हावे’, अशी मागणी करूनही हिंदूंचे प्रेरणास्रोत बनलेल्या सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी केली जाते, यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र कार्यरत असल्याचा संशय येतो. सनातन संस्था एक आध्यात्मिक धारणा असलेली, अत्यंत राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्राचे मूळ असलेल्या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध असलेली संस्था आहे. त्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीचा मी विरोध करतो.

सनातन अयोग्य कृत्य मुळीच करणार नाही !
– पू. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी सेना

पू. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते

केवळ सनातनकडे बोट दाखवून अन्वेषणाची दिशा
भरकटवली जात आहे ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे, मुंबई

‘डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या अन्वेषणात सत्य पुढे येतच नाही किंबहुना सनातनच्याच लोकांकडे बोट दाखवून सत्य भरकटवले जात आहे. हत्येच्या मागे कोणाचातरी काहीतरी स्वार्थ असतो. ‘तो स्वार्थ आर्थिक असू शकतो’, या दृष्टीनेही विचार प्रथम केला जातो. तसा विचार दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांच्या अन्वेषणात केलेला नाही. त्यामुळे अन्वेषणाची दिशा भरकटते. तसे न होता योग्य रितीने संशोधन करून ‘हत्या खरेच कोणी केली’ याचा शोध लावला पाहिजे. वस्तुत: हत्या होते, त्यामागे मृत्यूमुळे इतरांना होणारा आर्थिक लाभ, वैचारिक मतभेद आणि परस्परांविषयी असलेला तिरस्कार (संबंधित व्यक्तीचे घरातील अस्तित्व नकोस वाटणारे कौटुंबिक माणूसही असू शकते) अशी ३ कारणे असतात. पोलिसांनी याचा विचार करून अन्वेषण योग्य पद्धतीने केले पाहिजे. ‘सनातन संस्थेकडे बोट दाखवून बाकीच्या संशोधनाचे मार्गच बंद करणे, ही संशोधनाची पद्धत चुकीची आहे’, असे मला ठामपणे वाटते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात