हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधनेचे बळ आवश्यक ! – कु. कृतिका खत्री

विषय मांडतांना कु. कृतिका खत्री

इंदूर (मध्यप्रदेश) – हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर आघात होत आहेत. लव्ह जिहादची समस्या अधिक गंभीर आहे. याचे मूळ कारण धर्मशिक्षणाचा अभाव आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याबरोबर साधनेचे बळ आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनी साधना केली पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या देहली येथील प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी येथे केले. येथील आर्य समाज मंदिरात अखिल भारत हिंदू महासभेकडून एका छोट्या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अखिल भारत हिंदू महासभेच्या इंदूर येथील महिला संघटक श्रीमती मालती गौड आणि हिंदु  जनजागृती समितीच्या उज्जैन येथील कार्यकर्त्या श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी येथे मार्गदर्शन केले. हिंदूंमध्ये शौर्य गाजवण्याची कमतरता नाही; मात्र त्यासाठी हिंदूंना तेे जागृत करणे आवश्यक आहे, असे श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले. या वेळी येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून राष्ट्र अन् धर्म यांविषयी जागृती करणारे फलक आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात