सी.बी.आय.ने संभाजीनगरमधून अटक केलेले सचिन अंधुरे यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी !

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरण

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) संभाजीनगरमधून श्री. सचिन अंधुरे (वय ३० वर्षे) यांना १८ ऑगस्टला अटक केली. त्यांना १९ ऑगस्टला सीबीआयच्या विशेष न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना २६ ऑगस्टपर्यंत म्हणजे ७ दिवसांची सीबीआय कोठडीत ठोठावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश अर्चना मुजुमदार यांनी हा निर्णय दिला. केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिवक्ता विजयकुमार ढाकणे यांनी, तर संशयित अंधुरे यांच्या बाजूने अधिवक्ता प्रकाश साळशिंगीकर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. केंद्रीय अन्वेषण विभागाने १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती; परंतु अधिवक्ता प्रकाश साळशिंगीकर यांनी केलेल्या युक्तीवादामुळे त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. या वेळी न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा ठेवण्यात आला होता.

वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होत असलेल्या वृत्तांनुसार आतंकवादविरोधी पथकाने हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना घरात स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी संशयित म्हणून अटक केली आहे. त्यांच्यातील शरद कळसकर यांनी चौकशीच्या वेळी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची स्वीकृती दिली होती, असा दावा आतंकवादविरोधी पथकाने केला आहे. यातून पुढे आतंकवादविरोधी पथकाने संभाजीनगर येथून सचिन अंधुरे यांना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कह्यात घेतले आणि हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण गुन्हा यंत्रणेकडे असल्याने आतंकवादविरोधी पथकाने अंधुरे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कह्यात दिले. यानंतर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने १८ ऑगस्ट या दिवशी अंधुरे यांना अटक केली. अंधुरे यांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने केला आहे, तर डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणार्‍याला पाच वर्षांनंतर अटक केल्याचा दावा आतंकवादविरोधी पथकाने केला आहे.

अधिवक्ता प्रकाश साळशिंगीकर यांनी केलेल्या युक्तीवादातील काही प्रमुख सूत्रे

१.  डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या संदर्भातील दोषारोपपत्रात ‘सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्यापैकी कुणीतरी गोळी झाडली’, असे म्हटले आहे. याचा पुरावा म्हणून प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार छायाचित्र रेखाटण्यात आली असून त्यावर त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. असे असतांना श्री. सचिन अंधुरे यांना करण्यात आलेली अटक अनाकलनीय आहे.

२. श्री. अंधुरे यांचा या प्रकरणात कसा सहभाग आहे, याविषयी रिमांड ऑर्डरवर एक ओळही नमूद करण्यात आलेली नाही.

३. न्यायालयात आणतांना श्री. अंधुरे यांच्याशी बोलतांना ‘सी.बी.आय.ने कागदपत्रांच्या संचावर त्यातील मजकूर न दाखवता त्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या आहेत’, असे त्यांनी सांगितले. यावरून ‘सी.बी.आय पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे’, असे लक्षात येते.

अन्य सूत्रे

१. न्यायालयात आणतांना श्री. सचिन अंधुरे पुष्कळ दबावाखाली वाटत होते.

२. अंधुरे यांना न्यायालयासमोर आणतांना काळा बुरखा घालून आणण्यात आले. न्यायालयातही तो बुरखा काढण्यात आला नाही.

श्री. सचिन अंधुरे यांच्याविषयी प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होत असलेली माहिती

आतंकवादविरोधी पथकाने नुकत्याच अटक केलेल्यांपैकी शरद कळसकर यांच्या चौकशीत श्री. सचिन अंधुरे यांचे नाव पुढे आल्याचे म्हटले जात आहे. श्री. अंधुरे हे निराला बाजारमध्ये कापडाच्या दुकानात ‘अकाऊंटंट’ म्हणून काम करतात. पत्नी आणि लहान मुलीसमवेत ते कुंवारफल्ली येथे रहात होते. श्री. अंधुरे यांच्या फेसबूक खात्यावरून ते हिंदुत्वनिष्ठ असल्याचे स्पष्ट होते. श्री. अंधुरे हे शांत स्वभावाचे असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. ‘ते मीतभाषी आहेत आणि नियमित भाडे देत असत’, असे त्यांच्या घरमालकांनी म्हटले आहे. ‘सचिन ‘स्लिपर सेल’सारखी भूमिका बजावत होता’, असे आंतकवादविरोधी पथकाने म्हटले आहे.

अवैध शस्त्रसाठ्याच्या प्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीचा दाभोलकरांच्या हत्येत हात असल्याची कबुली त्याने दिली आहे, असेही आतंकवादविरोधी पथकाच्या वतीने सांगण्यात येत आहे. श्री. अंधुरे यांना नोटीस पाठवून कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यासही आतंकवादविरोधी पथक विसरलेले नाही.

गेली पाच वर्षे विविध अन्वेषण यंत्रणा दाभोलकर हत्येप्रकरणी अन्वेषण करत होत्या. गेल्या ५ वर्षांत अनुमाने १० आरोपींची नावे तरी पुढे आली होती. पोलिसांनी कह्यात घेतलेल्या एकाच बंदुकीने सर्व पुरोगाम्यांच्या हत्या कशा काय झाल्या, असाही प्रश्‍न या निमित्ताने पुढे येत आहे.

‘हत्या प्रकरणी वापरलेली दुचाकी, पिस्तूल आणि कपडे हे नष्ट करण्यासाठी दिले कि आरोपींनीच ते नष्ट केले ?’, ‘दुचाकी आणि पिस्तूल पुरवले कुणी ?’, ‘डॉ. वीरेंद्र तावडे यांनी त्यांची दुचाकी पनवेलहून पुण्याला नेली होती ती हीच आहे का ?’, याचे अन्वेषण चालू आहे.

जालना येथून शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना ए.टी.एस्.ने घेतले कह्यात !

जालना येथून शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. श्रीकांत पांगारकर (वय ४१ वर्षे) यांनाही महसूल कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानाहून आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) कह्यात घेतले आहे. श्री. श्रीकांत पांगारकर यांना कह्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी ‘आमचा मुलगा गुन्हा करू शकत नाही. त्याला उगाच बलपूर्वक अटक करण्यात आली आहे’, असे म्हटले आहे.

सचिन अंधुरे यांना दबावामुळे अडकवले गेले आहे !
– अधिवक्ता प्रकाश साळशिंगीकर, सचिन अंधुरे यांचे अधिवक्ता

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सारंग अकोलकर आणि विनय पवार ही दोन नावे आतापर्यंत घेण्यात येत होती. सीबीआयने सचिन अंधुरे यांना अटक केल्यावर ‘हाही त्या प्रकरणात आहे’, असे म्हटले आहे. या हत्येच्या प्रकरणात ‘३ लोकांनी गोळ्या झाडल्या’,  असे म्हटलेले नाही, तर ‘दुचाकीवर दोन जण होते’, असे या खटल्यात म्हटले आहे. त्यामुळे ‘हा खटला पूर्णपणे खोटा आहे’, असे आमचे म्हणणे आहे. अन्वेषण यंत्रणेला २० ऑगस्टपर्यंतची मुदत असल्याने दबावामुळे अंधुरे यांना अडकवले गेले आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात मारेकरी आणि पिस्तुले
पालटत आहेत, हे मोठे गूढ ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

नालासोपारा प्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आली. ‘त्या तिघांपैकी एक आणि सचिन अंधुरे दुसरा, असे डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी आहेत’, असे पोलीस यंत्रणा सांगत आहे. पूर्वी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना तुम्ही मारेकरी म्हणत होता, त्यांची छायाचित्रेही तुम्ही ओळखली होती, मग त्याचे काय झाले ? ‘अनेकांनी पवार आणि अकोलकर यांची छायाचित्रे ओळखली’, असे म्हणता.

त्या आणि आताच्या आरोपींच्या छायाचित्रांमध्ये काही साधर्म्य आहे का, हे वाहिन्यांवर दाखवा. ‘पसार आरोपी कुठे आहेत ?’, असा मला जाब विचारता. सर्व आरोपींची छायाचित्रे तुमच्या समोर आहेत. जर पूर्वीच्या आरोपींना ओळखले होते, तर हे नवीन चेहरे कुठून आले, हे गुढ उकलत नाही. तेे मारेकरी नव्हते, तर खरे मारेकरी कोण ? या प्रकरणात चेहरा आणि पिस्तुले पालटत जातात. हे काय कळत नाही.

अंधुरे यांना अटक केल्यानंतर अधिवक्ता पुनाळेकर यांनी विविध वाहिन्यांकडे याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले

१. दाभोलकर कुटुंबीय माझ्या अटकेची मागणी करत आहेत. जर आता अटक करण्यात आलेले हे दोघे मारेकरी असतील, तर पूर्वीचे कोण होते ? दाभोलकर कुटुंबियांनी माझी क्षमा मागितली पाहिजे. त्यांनी माझी अपकीर्ती केली आहे.

२. कोणाला तरी पकडायचे आणि त्याला सनातनशी जोडायचे, हे कोणते लागेबांधे आहेत ? अगोदर सनातनच्या लोकांना पकडले होते.

३. आता अटक करण्यात आलेले दोघे खरोखर मारेकरी असतील, तर गेली ५ वर्षे जे काही भयानक झाले आहे, पसार आरोपींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, त्याचे दायित्व मुक्ता दाभोलकर घेणार का ?

४. जर मारेकरी पवार आणि अकोलकर हे दोघे होते, तर आता हे दोघे कुठून आले ?

५. दाभोलकर कुटुंबियांनी स्वतः ‘डिटेक्टिव्ह’ बनून महापाप केले आहे. तो गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा पुरोगामी आणि पत्रकार यांनीही केला आहे.

६. आम्ही डॉ. दाभोलकर यांचे भ्रष्टाचार उघड केले म्हणून हे होत आहे. आतापर्यंत सनातनच्या अनेक साधकांची नावे यात गोवण्यात आली.

७. मध्यंतरी पोलीस यंत्रणा आणि पुरोगामी यांनी ‘ड्रग’ची ‘थेअरी’ सांगितली. (सनातनच्या आश्रमात अमली पदार्थ सापडल्याचा झालेला आरोप) संभाजीनगर कुठे आणि पनवेल आश्रम कुठे ? सचिन अंधुरे सनातनच्या आश्रमात जाऊन ड्रग घेत होता का ? कशाशीही काहीही संबंध जोडत आहात. अधिकार्‍यांनी उच्च न्यायालयाला खूष करण्यासाठी हे चुकीचे रिपोर्ट दिले आहेत. याचा तपासकामाशी संबंध नाही. याचाही अधिकार्‍यांना जाब विचारला पाहिजे. ही प्रसारयंत्रणा म्हणजेे दाभोलकर कुटुंबियांचे ‘गोबेल्स टेक्निक’ आहे. यात अन्य तथाकथित विचारवंत सहभागी आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात