(म्हणे) ‘वैभव राऊत याच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी !’ – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पोपटपंची चालूच !

अन्वेषण यंत्रणांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसतांनाही स्वतःला अन्वेषण यंत्रणांपेक्षा श्रेष्ठ समजून अशी विधाने करून समाजात तेढ निर्माण करणार्‍यांचीच अन्वेषण यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी कोणी केल्यास चूक ते काय ?

मुंबई – महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता. वैभव राऊत याच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी १० ऑगस्ट या दिवशी एका ‘ट्वीट’द्वारे केला आहे. प्रत्यक्षात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ‘या प्रकरणी काही सांगायचे असेल, तर आतंकवादविरोधी पथक पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या सांगेल’, असे स्पष्टपणे सांगूनही आव्हाड यांनी हा बिनबुडाचा आरोप केला आहे. (याविषयी आतंकवादविरोधी पथकाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसतांना आव्हाड यांना ही माहिती कुठून मिळाली, याचे अन्वेषण पोलिसांनी करावे. अशा प्रकारे सामाजिक दुही निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक)

(म्हणे) ‘पुनाळेकर यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी !’

नक्षलवाद्यांचे अधिवक्ता म्हणून गडलिंगना अटक होते, तर सनातनचे अधिवक्ता पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातील आरोपींचे उघडपणे समर्थन करतात, त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी, असे सनातनद्वेषी वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ११ ऑगस्ट या दिवशी ट्वीटद्वारे केले आहे. (अधिवक्ता पुनाळेकर हे संशयित आरोपींचे अधिवक्ता आहेत. स्वत:ची बाजू मांडण्याचा लोकशाहीने दिलेला हा हक्क आहे. लोकप्रतिनिधी असतांना आव्हाड महाशय यांना हे ठाऊक नाही का ? आव्हाड यांचे हे वक्तव्य संविधानाच्या विरोधात आहे. आव्हाड यांनी आतंकवाद्यांचे वकीलपत्र घेणार्‍यांवर कधी देशद्रोहाचा खटला भरण्याची मागणी केली आहे का ? – संपादक) 

 

(म्हणे) ‘नालासोपारा प्रकरणात सरकारने खोलात
जाऊन माहिती बाहेर काढावी !’ – जयंत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई – एखादा अल्पसंख्यांक जर बॉम्बसहित सापडला, तर मागचा पुढचा किंवा अभ्यास न करता त्याला पाकिस्तानशी किंवा एलटीटीईशी एक-दोन मिनिटांत ‘कनेक्ट’  करण्यात येते. आज सनातनच्या एका साधकाकडे अशा पद्धतीचे बॉम्ब सापडले आहेत. त्यामुळे सरकारने खोलात जाऊन या बॉम्बचा वापर कुठे करणार होते, याची सखोल माहिती काढावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. नालासोपारा येथील प्रकरणाविषयी जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सरकारच्या प्रामाणिकतेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

आपल्या देशामध्ये मालेगावचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्या सगळ्यावर पाणी फेरण्याचे काम नंतरच्या काळात झाले. (मालेगावमध्ये निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात येऊन त्यांना अनेक वर्षे निष्कारण कारागृहात खितपत पडावे लागले. हेच जयंत पाटील यांना अपेक्षित आहे का ? – संपादक) ती घटना या वेळी होऊ नये, असे पाटील यांनी सांगितले.

(म्हणे) ‘सनातन संस्था आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
यांच्या कारवायांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानेच विषवल्ली वाढली !’ – खासदार अशोक चव्हाण

संघटनांविषयी कोणताही अभ्यास नसतांना बेधडकपणे अशा प्रकारची विधाने केल्याप्रकरणी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !

मुंबई – सरकारने सनातन संस्था आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या कट्टरतावादी संघटनांच्या कारवायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच राज्यात कट्टरतेची विषवल्ली वाढली आहे, असे विधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे हे कोरेगाव–भीमा दंगलीचे मुख्य सूत्रधार असून अनेक समाजविघातक कृत्ये घडवणारे आणि दंगलीतील आरोपीही आहेत. सरकार त्यांच्या कृत्यावर पांघरूण घालून त्यांना संरक्षण देत आहे. राजकीय फायद्याचा विचार न करता सरकारने कट्टरतेची विषवल्ली मुळासकट उखडून टाकावी.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात