संपूर्ण व्यवस्था हिंदुविरोधी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘एबीपी माझा’ या वाहिनीवरील संध्याकाळच्या
सत्रातील ‘पुन्हा भगवा दहशतवाद ?’ या विषयावरील चर्चासत्र

हिंदुत्वनिष्ठांना नाहक त्रास देण्याचाच हा प्रयत्न ! – सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सुनील घनवट

मुंबई – आतापर्यंत पोलिसांच्या कारवाया पहाता त्यातून हिंदुत्वनिष्ठांना नाहक त्रास देण्याचाच प्रयत्न असल्याचे लक्षात येते. श्री. वैभव राऊत यांनी गोरक्षणासाठी संविधानिक मार्गांनी लढा दिला. असा प्रामाणिक कार्यकर्ता असतांना पोलिसांनी रात्री अपरात्री केलेली कारवाई संशयास्पद वाटते. आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी कारवाईसाठी आले; मात्र श्री. राऊत यांच्या कुटुंबियांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. मालेगाव बॉबस्फोट प्रकरणातही हिंदुत्वनिष्ठ निर्दोष असतांना त्यांना अडकवण्यात आले होते. त्यामुळे श्री. राऊत यांची अटक म्हणजे मालेगावची पुनरावृत्तीच वाटते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ‘एबीपी माझा’ या वाहिनीवरील संध्याकाळच्या सत्रात ‘पुन्हा भगवा दहशतवाद ?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. ‘कसाब, बुरहान वाणी, अफझल यांना अटक झाल्यावर कधीही आतंकवादाचा निषेध नोंदवण्यात येत नाही; मात्र हिंदू सापडले की, लगेचच निषेधाची भाषा चालू होते’, असेही ते या वेळी म्हणाले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन ‘एबीपी माझा’च्या नम्रता वागळे यांनी केले.

या चर्चासत्रात हिंदु गोवंश रक्षा समितीचे समन्वयक श्री. दीप्तेश पाटील, निवृत्त पोलीस सहआयुक्त वाय्.सी. पवार, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, मालेगाव स्फोटात कायदेशीर साहाय्य केलेले गुलझार आझमी उपस्थित होते.

श्री. घनवट यांची एबीपी माझा वाहिनीला विनंती !

‘भगवा आतंकवाद’ अशा प्रकारचे मथळे चर्चासत्रांसाठी देऊ नयेत, अशी मी विनंती करतो; कारण ही संकल्पना अस्तित्वातच नाही.

 

मान्यवरांनी मांडलेली मते

संविधानिक मार्गांचा अवलंब करणारे श्री. वैभव राऊत निर्दोष ! – दीप्तेश पाटील, हिंदु गोवंश रक्षा समिती

१. श्री. वैभव राऊत यांनी आतापर्यंत नालासोपारा येथे झालेल्या गोवंशहत्यांच्या विरोधात ३७ तक्रारी दिल्या होत्या. प्रत्येक वेळी संविधानिक मार्गांचा अवलंब करणारे श्री. वैभव असे काही अवैधरित्या करतील, असे वाटतच नाही.

२. त्यांच्या घरी आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी, पोलीस आले; परंतु तेथे कोणताही पंचनामा करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

श्री. दीप्तेश पाटील यांची रोखठोक विधाने !

१. चर्चासत्रात श्री. पाटील बोलत असतांनाही वाय्.सी. पवार त्यांना म्हणाले, ‘‘एवढ्या रात्री पोलीस तिकडे आले असतांनाही तुम्ही तेथे काय करत होता ?’’ यावर श्री. पाटील यांनी प्रत्युत्तर दिले, ‘‘विदेशातील मुसलमानांवर अत्याचार झाल्याने आझाद मैदानात मुसलमानांनी एकत्र येऊन दंगल घडवली, म्हणजे जरी तेथे अत्याचार झाले, तरी भारतात मुस्लिम बांधव संघटित झालेच ना ?’’

२. चर्चासत्रात निवृत्त पोलीस सहआयुक्त श्री. पवार यांनी विधान केले की, पोलीस खात्यातील मूठभर अधिकारी चांगलेही आहेत. यावर श्री. दीप्तेश पाटील म्हणाले, ‘‘तेच मूठभर चांगले अधिकारी नालासोपार्‍यात आले होते कशावरून ?’’

संपूर्ण व्यवस्था हिंदुविरोधी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

संपूर्ण व्यवस्थाच हिंदुविरोधी बनवण्यात आली आहे. याचा आम्ही आतापर्यंत अनुभव घेत आहोत. त्यामुळे ही मालेगावचीच पुनरावृत्ती आहे’, असे आम्हाला वाटते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात