हिंदूंच्याच सण-उत्सवांत न्यायालय, प्रशासन आणि राज्यकर्ते यांचे अडथळे येत असतील, तर या देशाचे भविष्य काय ? – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मुंबई – बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजा आणि दुर्गामूर्तीची मिरवणूक यांत कायदेशीर अडथळे आणले; म्हणून ज्यांनी शिमगा केला, त्यांचे राज्य आज महाराष्ट्रात आहे. ममता बॅनर्जी यांना तेव्हा देशद्रोही, हिंदुद्रोही ठरवून राजकीय तांडव करणार्‍यांनी राज्यातील गणेशोत्सवात अडथळे आणणार्‍या नोकरशाहीचे कान उपटू नयेत, याचे आश्‍चर्य वाटते. गणेशोत्सवात विशेषत: हिंदूंच्याच सण-उत्सवांत न्यायालय, प्रशासन आणि राज्यकर्ते यांचे अडथळे येत असतील, तर या देशाचे भविष्य काय ?, असा प्रश्‍न उपस्थित करत अन्य धर्मियांविषयी गुळमुळीत धोरण स्वीकारणारे; मात्र गणेशोत्सवाला कायद्याचा बडगा दाखवणारे न्यायालय, प्रशासन आणि राज्यकर्ते यांना ८ ऑगस्टच्या दैनिक सामनामधील अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी  फटकारले आहे.

‘गिरगावचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपासाठी अनुमती घेतली नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिक आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. या पार्श्‍वभूमीवर सामनामधून हा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. असे प्रकार हिंदूंची, देव-धर्म यांची रक्षणकर्ती शिवसेना घडू देणार नाही, अशी चेतावणीही श्री. ठाकरे यांनी या अग्रलेखातून दिली आहे.

या अग्रलेखात श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे की,

१. महाराष्ट्रात फडणवीस आणि केंद्रात मोदी यांचे राज्य येताच ‘हिंदुत्वनिष्ठांना त्यातल्या त्यात बरे दिवस येतील’, असे वाटले होते; पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ होत आहे. आजही केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांवरच बंधने येत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत अशी मुस्कटदाबी हिंदूंविषयी व्हायची, असे आरोप तेव्हा झाले; मात्र आता भाजपच्या राज्यात ती जरा अधिकच होतांना दिसत आहे.

२. गणेशोत्सव, नवरात्री यांसारखे सण आले की, नवीन ‘फर्मान’ सुटत असतात. देवादिकांच्या मूर्तींना फूटपट्ट्या लावल्या जातात. उत्सवांचे मंडप घालायचे कि नाहीत, घातले तर किती आकाराचे घालायचे वगैरे कायदे केले जातात आणि गणरायांच्या आगमनाच्या आनंदावर विरजण टाकले जाते. हे सर्व प्रकरण कुणीतरी न्यायालयाच्या दारात घेऊन जाते आणि न्यायालयेही आपणच राज्यकर्ते असल्याच्या थाटात सण-उत्सव यांंच्या विरोधात ‘फर्मान’ काढतात. जणू न्यायालयांच्या पटलावरील सर्व प्रकरणे संपली आहेत आणि हिंदूंचे, सण-उत्सव साजरे करणार्‍या आयोजकांचे कान उपटणे अन् त्यांना ‘फर्मान’ सोडणे इतकेच काम उरले आहे.

३. जे न्यायालय राममंदिराविषयी मागील २५ वर्षांत निर्णय देऊ शकले नाही, जे न्यायालय महाराष्ट्राच्या सीमा प्रश्‍नाविषयी निर्णय देऊन कानडी जोखडाखालील मराठी बांधवांना न्याय देऊ शकत नाही, ते न्यायालय हिंदूंच्या सण-उत्सव यांविषयी मार्गदर्शक नियमावली सिद्ध करते आणि त्या नियमावलीची भेंडोळी नाचवत नोकरशाही गणेशोत्सवाला आडवी जाते. हा एक प्रकारे ‘अ‍ॅट्रॉसिटी’चाच प्रकार आहे.

४. दुर्गापूजा रोखू पहाणार्‍या ममता बॅनर्जी या भाजपच्या दृष्टीने हिंदुद्रोही ठरल्या, मग गणेशोत्सव रोखू पहाणार्‍यांना आता कोणती उपाधी द्यावी ? ज्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याचा जागर व्हावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले तो गणेशोत्सव अडचणीत आला, तरी हे गप्प बसले आहेत. काँग्रेसी राजवटीत हिंदूंच्या सण-उत्सव यांचे असे धिंडवडे कधी निघाले नव्हते, असे आता दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.

५. छत्रपती शिवराय यांच्या महाराष्ट्रात हे चालू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा कारभार गतीशील आहे, अशी विज्ञापने करणार्‍यांनी गणेशोत्सवात दंडेली करणार्‍यांना रोखण्याची गतीशीलता दाखवावी. नाहीतर देश, देव आणि धर्म यांसाठी शिवसैनिकांना भगव्याचे तेज दाखवावे लागेल. कायद्याची भीती आम्हाला दाखवू नका.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात