गणेशोत्सव मंडळांनी मनोरंजनात्मक कार्यक्रमांपेक्षा राष्ट्र-धर्म यांच्याविषयी जागृती करणारे कार्यक्रम राबवावेत ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, उत्तर महाराष्ट्र प्रसारसेवक, सनातन संस्था

नंदुरबार येथे ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’ चे आयोजन

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुनील सोनार, डॉ. नरेंद्र पाटील

नंदुरबार – काही गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते खंडणी गोळा केल्याप्रमाणे सण-उत्सवांसाठी वर्गणी गोळा करतात. सार्वजनिक उत्सवात गर्दीचा अपलाभ उठवत महिलांशी असभ्य वर्तणूक केली जाते. अशा समाजकंटकांना मंडळ कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कह्यात द्यायला हवे. श्री गणेशमूर्ती धर्मशास्त्रानुसार शाडूच्या मातीपासून बनवलेली, अल्प उंचीची असावी. चित्रपट गीतांपेक्षा प्रवचन, पोवाडे, कीर्तन, नामजप, श्री गणपति अथर्वशीर्ष पठण स्पर्धा यांसारखे राष्ट्र-धर्म जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. येथे आयोजित केलेल्या ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’त ते बोलत होते.

शिबिराचा आरंभ शंखनादाने झाला. सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या वेळी श्री बाबा गणपति मंडळाचे सुनील सोनार, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील उपस्थित होते. शिबिराचा उद्देश धुळे येथील समितीसेवक श्री. सचिन वैद्य यांनी मांडला. त्यानंतर डॉ. नरेंद्र पाटील यांनी ‘सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक दृष्टीने उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘उत्सवांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मंडळांचे योगदान’ याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी विषय मांडला.

शिबिरासाठी नंदुरबार, नवापूर, तळोदा, कोळदा येथील एकूण २८ मंडळे आणि एका संघटनेचे मिळून ७३ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदूसंघटन साध्य करणारे सार्वजनिक उत्सव असायला हवेत ! – डॉ. नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समिती

लोकमान्य टिळकांनी वर्ष १८९४ मध्ये आरंभलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातून हिंदूसंघटन झाले. पारतंत्र्यात देशात कशी हालाखीची परिस्थिती आहे, याची जाणीव झाली. दुभंगलेला समाज एकत्र येण्यास साहाय झाले. अशाच संघटनांची आज आवश्यकता आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे अनावश्यक
व्यय अल्प केला !  – सुनील सोनार, श्री बाबा गणपति मंडळ

एक शतकाची परंपरा असलेल्या बाबा गणपति मंडळात सर्व कार्यकर्ते शाडूच्या मातीची मूर्ती बनवतात. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे मंडळाकडून या आधी वाद्य, गुलाल यांवर होणारा अतिरिक्त व्यय अल्प करून त्याचा वापर विधायक आणि धार्मिक कार्यासाठी केला. आमच्या मंडळात पारंपरिक पद्धतीनेच लेझीम नृत्यावर श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक निघते. प्रत्येक मंडळाने धार्मिकदृष्ट्या आदर्श असा गणेशोत्सव साजरा करावा.

 

मंडळाच्या पदाधिकार्‍यांचे अभिप्राय

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे शाडूच्या मातीची
मूर्ती बसवण्यास प्रारंभ ! – दिनेश पाटील, अध्यक्ष, कुणबी पाटील युवा मंच

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे आम्ही गेल्या वर्षीपासून शाडू मातीची मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने बसवण्यास आरंभ केला आहे. आमचे मंडळ धार्मिक आणि सामाजिक देखावे करून समाजप्रबोधन अन् धर्मप्रसार यांचे कार्य मंडळाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करते. तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या आणि इतिहासातून लुप्त पावणार्‍या क्रांतीकारकांचा माहितीपट असलेले प्रदर्शन लावतो. सर्व मंडळांनी महाराष्ट्रात आपला जिल्हा आदर्श गणेशोसव साजरा करण्यात पुढे राहील, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

स्वयंशिस्तीमुळे पोलीस सुरक्षा नसतांनाही मंडळाची
मिरवणूक शिस्तबद्धरित्या पार पडते ! – प्रदीप माळी, क्षत्रिय गणेश मंडळ, तळोदा

आमच्या गणेश मंडळात स्वयंशिस्त पाळली जाते. त्यामुळे महिलांचा अधिक सहभाग असतो. पोलीस प्रशासनालाही मंडळाच्या स्वयंशिस्तीवर विश्‍वास असल्याने पोलीस सुरक्षा न देताही आमची मिरवणूक शिस्तबद्ध आणि निर्विघ्नपणे पार पडते.

१३ ऑगस्टला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार !

‘आदर्श गणेशोत्सव साजरा कसा करायचा ?’ याविषयी उपस्थितांची गटचर्चा घेण्यात आली. शेवटी मंडळाच्या पदाधिकार्‍यांंनी चर्चा करून येणार्‍या समस्यांवर १३ ऑगस्टला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्याचे सर्वानुमते निश्‍चित केले. श्री. जितेंद्र मराठे यांनी सूत्रसंचालन, तर श्री. राजू चौधरी यांनी आभार व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात