सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा आगरा शहराचा दौरा

राज्यव्यवस्थेत धर्म आल्याविना यमुना नदीचे रक्षण अशक्य ! – चेतन राजहंस

यमुना नदीच्या तिरावर मार्गदर्शन करतांना १. श्री. चेतन राजहंस

आगरा – विद्यमान राज्यव्यवस्थेत धर्म नसल्यामुळे सामान्य नागरिकही स्वतःचा धर्म विसरले आहेत. गंगा, यमुना आदी पवित्र नद्या आज अस्तित्वाची लढाई देत आहेत. भारतात वर्ष १९८४ पासून गंगा कृती योजनेसारख्या शुद्धीकरणाच्या सरकारी योजना बनल्या आणि आजही नमामि गंगे नावाने गंगा शुद्धीकरणाचे अन् प्रबोधनाचे सरकारी अभियान चालू आहे; मात्र ही सर्व अभियाने अपयशी ठरली; कारण शासनकर्ते लोकांना पवित्र नद्यांचे रक्षण करणे हा सनातन धर्म आहे, हे धर्मशिक्षण देण्यात न्यून पडले. भारताची धर्मनिरपेक्ष व्यवस्था धर्माच्या आधारे जागृती करण्यास शासनकर्त्यांना प्रतिबंध करते; म्हणूनच राज्यव्यवस्थेत धर्म आणण्याची आवश्यकता आहे. राज्यव्यवस्थेत धर्म आल्याविना यमुना नदीचे रक्षण होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. आगरा येथील यमुना नदीच्या तिरावर प्रतिदिन होणार्‍या यमुना आरतीच्या नंतर आयोजित करण्यात आलेल्या कायर्क्रमात ते बोलत होते. या वेळी श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांनी यमुना नदीची आरती केली.

 

वर्तमान ‘धर्मनिरपेक्ष’ लोकशाही व्यवस्थेमध्ये
हिंदूंचे कल्याण अशक्य ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

कोसीकलान (उत्तरप्रदेश) येथे हिंदूसंघटन बैठक

कोसीकलान (उत्तरप्रदेश) – राजकीय परिवर्तन किंवा कोण्या एखाद्या राजकीय पक्षाचे सरकार यांमुळे हिंदु समाजाचे कल्याण आणि रक्षण होणार नाही. विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाहीची रचनाच मूळ हिंदुविरोधी आणि अल्पसंख्यांकप्रेमी आहे. भारतीय राज्यघटनेद्वारे अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या राज्यव्यवस्थेत योगी किंवा मोदी असे कोणी हिंदु नेते जिंकून आले, तरी ते हिंदूंचे कल्याण करू शकत नाहीत. हिंदूंचे कल्याण होण्यासाठी हिंदूंना ‘धर्मनिरपेक्ष’ लोकशाही नको, तर धर्माधारित हिंदु राष्ट्रच हवे आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे ‘दिनदयाळ उपाध्याय स्मृती मंचा’द्वारे आयोजित हिंदूसंघटन बैठकीत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांनी करून दिला. या बैठकीनंतर प्रत्येक १५ दिवसांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

 

प्राचीन काळापासून भारत हे हिंदु राष्ट्र होते !

श्री. चेतन राजहंस

आगरा – भारतात धर्मनिरपेक्ष शासनपद्धत कधीही नव्हती. त्रेतायुगातील राजा हरिश्‍चंद्र, प्रभु श्रीराम, द्वापरयुगातील महाराज युधिष्ठिर, कलियुगातील सम्राट चंद्रगुप्त, छत्रपती शिवाजी महाराज, विजयनगरचे कृष्णदेवराय, अफगाणिस्तानचा राजा दाहीर आणि राजस्थानचे महाराणा प्रताप आदी सारे धर्मनिरपेक्ष राजे नव्हते. या सर्व राजांची राज्ये हिंदु राष्ट्र होती. स्वातंत्र्याच्या वेळी ५६३ राजसंस्थाने हिंदु पद्धतीने राज्यव्यवहार करत होती. वर्ष १९४७ मध्ये भारत हिंदु राष्ट्र होते. वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधींनी भारताला धर्मनिरपेक्ष घोषित केले. या धर्मनिरपेक्ष लोकशाहीने भारताची आणि हिंदूंची मोठ्या प्रमाणात हानी केली असल्याने भारताला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी कृतीशील हिंदूंनी अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित कार्य करण्याची आज आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे आयोजित हिंदूसंघटन बैठकीमध्ये केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे आगरा समन्वयक श्री. ठाकूर सिंह यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके हेही उपस्थित होते. या बैठकीला आगरा येथील विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक १५ दिवसांनी हिंदु संघटनांनी हिंदूसंघटन बैठक घेण्याचे निश्‍चित केले.

 

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्या !

आग्रा (उत्तरप्रदेश) – हिंदूंच्या दुःस्थितीसाठी हिंदु समाजाला दोष देण्यापेक्षा वर्तमान धर्मनिरपेक्ष लोकशाहीला दोष द्या. हिंदूंची सर्वंकष हानी धर्मनिरपेक्ष लोकशाहीने केली आहे; म्हणून हिंदु समाजाच्या उत्कर्षासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्या, असे प्रतिपादन येथे आयोजित हिंदुजागृतीसाठीच्या बैठकीत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. या बैठकीनंतर येथे साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्‍चित करण्यात आले. बैठकीला उपस्थित जिज्ञासूंनी सनातनच्या ग्रंथांचा लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात