प्रेमळ अन् शांत स्वभाव असलेले चिपळूण येथील श्री. श्रीकृष्ण आगवेकर ७९ व्या संतपदी विराजमान !

रत्नागिरी – उतारवयातही सेवा करणारे चिपळूण येथील साधक श्री. श्रीकृष्ण आगवेकर (वय ८२ वर्षे) हे सनातनच्या ७९ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या ७ व्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २९ जुलै या दिवशी रत्नागिरी आणि चिपळूण येथे झालेल्या भावसोहळ्यांत दिली. पू. श्रीकृष्ण आगवेकर यांचा सन्मान सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीफळ, प्रसाद आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन करण्यात आला.

पू. श्रीकृष्ण आगवेकर (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सद्गुरु सत्यवान कदम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून
अध्यात्मप्रसार केल्यास साधकांना संतपद प्राप्त होईल ! – पू. श्रीकृष्ण आगवेकर

‘मी संतपदी विराजमान होईन’, असे मला वाटले नव्हते. मला सतत श्रीकृष्णाची आठवण येत होती. माझी परात्पर गुरु डॉक्टरांवर पूर्ण श्रद्धा आहे. त्यांच्या कृपेमुळे मी संतपदावर पोहोचलो आहे. साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून अध्यात्मप्रसारादी सेवा केल्यास त्यांनाही संतपद प्राप्त होईल. तशी मी परमेश्‍वराच्या चरणी प्रार्थना करतो.’

पू. श्रीकृष्ण आगवेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मनोगत

१. श्री. रमेश आगवेकर (धाकटे बंधू) – ‘आमच्या घराण्यातील व्यक्ती संत होईल’, असे मला कधीही वाटले नाही. परात्पर गुरु डॉक्टरांच्या आशीर्वादाने हे प्राप्त झाले आहे. पू. श्रीकृष्ण आगवेकर सेवा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असत. सर्व सेवा, पूजा अन् नामजप नियमित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते नामस्मरण मंडळ येथे जाऊन वेळेत नामजप करत असत.’

२. सौ. सुशिला रमेश आगवेकर (धाकटी भावजय) – ‘त्यांनी मला नेहमी प्रेमाने वागवले आहे. ८२ व्या वर्षीसुद्धा ते सतत सेवा करतात. कुठेही असले, तरी ते नियमित २ घंटे नामजप करतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे त्यांना संतपद प्राप्त झाले आहे.’

३. श्री. श्रीकांत भागवत (भाचा) – ‘माझ्या लहानपणापासूनच त्यांच्या चांगल्या गोष्टी मला जवळून पहाता आल्या. ते माझी आठवणीने चौकशी करतात. त्यांच्यात सेवेची तळमळ पुष्कळ आहे.’

४. श्री. अजित आगवेकर (पुतण्या) – ‘पू. काका संतपदावर पोहोचल्यामुळे मला आनंद झाला. केवळ पू. काकांमुळे सनातन धर्माची सर्व माहिती आमच्या कुटुंबातील सदस्यांना मिळाली. पू. काका नेहमी शांत असतात. ‘समोरची व्यक्ती धर्मजागृती सभेला यावी’, असा विचार ठेवून ते धर्मजागृती सभेचा विषय प्रत्येकाला सांगत असत. आता आम्हीही साधना वाढवायला हवी.’

५. श्री. विनायक आगवेकर (पुतण्या) – रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून भ्रमणभाषवरून बोलतांना श्री. विनायक आगवेकर म्हणाले, ‘‘पू. काकांमुळेच मी सनातनच्या सत्संगाला जाण्यास प्रारंभ केला. त्यांनी सेवा करतांना कधीही आळस केला नाही. त्यांच्या क्षमतेनुसार शिकून ते सेवा करतात. त्यांना साधनेविषयी कधीही निराशा आणि विकल्प आला नाही. घरात अडचणी असल्या, तरी त्यांची गुरूंवर अखंड श्रद्धा आहे.’’

६. सौ. मंजिरी विनायक आगवेकर (सून) – सौ. मंजिरी आगवेकर म्हणाल्या, ‘‘काका संतपदावर पोहोचल्याचे समजल्यावर कृतज्ञता वाटली. ते स्थिर आणि शांत वाटत होते. त्यांच्या मनात कोणाविषयी काहीही नसायचे, तसेच त्यांनी इतरांकडून कधीही अपेक्षा केली नाही. कधी पाय सुजले, तरी ते त्याही स्थितीत सेवा करतात.’’

७. सौ. वसुधा विजय जोशी (मुलगी) – ‘माझे वडील संत झाल्याचे कळल्यावर मला आनंद झाला आहे.’

८. सौ. तृप्ती बापट (धाकटी मुलगी) – ‘पू. बाबा संत झाल्याविषयी मला पुष्कळ आनंद झाला आहे. मला त्यांचा अभिमान वाटतो’.

९. कु. वृषाली देवस्थळी (नात) – ‘ते संत झाल्यामुळे मला आनंद झाला. ते नियमितपणे माझ्याकडून साधना करवून घेतात.’

१०. श्रीमती विजया भागवत (बहीण) – ‘माझा भाऊ एवढा मोठा संत होईल, याची कल्पना नव्हती. आता ते संत झाल्याचे पाहून मला पुष्कळ आनंद झाला आहे.’

११. सौ. पल्लवी लांजेकर – ‘त्यांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर भावजागृती होते, तसेच त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर आणल्यानंतर चैतन्य मिळते.’

या वेळी चिपळूण येथील श्री. केशव अष्टेकर, लोटे येथील श्री. सुनील मोरे आणि लवेल येथील साधिका सौ. सरोज शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न असलेले आगवेकर कुटुंब !

 

सतत देवाच्या अनुसंधानात असलेले पू. श्रीकृष्ण आगवेकर !

१. श्री. विनायक आणि सौ. मंजिरी आगवेकर (पुतण्या आणि सून), सनातन आश्रम, गोवा.

१ अ. ‘काकांचे राहणीमान पुष्कळच साधे आहे.

१ आ. सेवेची तळमळ : काकांचे वय ८२ वर्षे आहे. त्यांचे गुडघे दुखतात, तरीही गुरुपौर्णिमेच्या वेळी त्यांनी समाजात जाऊन अर्पण घेण्याची सेवा केली.

१ इ. विचारण्याची वृत्ती : घरातील परिस्थिती प्रतिकूल असतांना ‘कोणत्या प्रार्थना करू ?’, असे त्यांनी मला विचारले आणि ‘सध्या मी जमेल तशी प्रार्थना करतो’, असे सांगितले.

१ ई. निरपेक्ष प्रीती : त्यांच्या मनात कुणाविषयी अपेक्षा किंवा रोष नाही. त्यांना सर्वांविषयी प्रेम वाटते.

१ उ. देवाशी अनुसंधान : ते सर्वांमध्ये असूनही नसल्यासारखे वाटतात. ‘त्यांचे आतून देवाशी अनुसंधान चालू आहे’, असे आम्हाला जाणवले.

१ ऊ. काकांच्या तोंडवळ्यावरील तेज वाढले असून ‘ते संत झाले आहेत’, असे वाटते.’

२. सौ. पल्लवी लांजेकर, रत्नागिरी

२ अ. आगवेकरकाकांना पाहिल्यावर स्वतःला चैतन्य मिळत असल्याचे जाणवून भावजागृती होणे, ‘त्यांचे रूप डोळ्यांत साठवावे’, असे वाटणे आणि ‘ते देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवणे

‘मी आगवेकरकाकांच्या घरी गेल्यावर त्यांनी हसून नम्रपणे मला बसायला सांगितले. त्यांच्याकडे पाहून मला पुष्कळ भरून आले. त्यांच्याकडे पहातांना ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘त्यांचे रूप डोळ्यांत साठवून ठेवावे आणि डोळे बंद करून ‘त्यांचे रूप आठवावे’, असे मला वाटत होते. मी त्यांच्याशी बोलत असतांना ते मोजकेच बोलत होते. काका वेगळ्याच विश्‍वात, म्हणजे ‘सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले. ते माझ्याशी ‘अधिक बोलले नाहीत’, तरी मला हे अनुभवता आले.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात