तळमळीने सेवा करणारे राजापूर येथील श्री. चंद्रसेन मयेकर (वय ८० वर्षे) सनातनच्या ७८ व्या संतपदी विराजमान !

रत्नागिरी जिल्ह्याला गुरुपौर्णिमेनिमित्त
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची अनोखी भेट !

रत्नागिरी – भाव, तळमळ, प्रीती आदी गुण असलेले आणि उतारवयातही तरुणांना लाजवेल, अशी सेवा करणारे राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील साधक श्री. चंद्रसेन मयेकर (वय ८० वर्षे) हे सनातनच्या ७८ व्या, तर उतारवयातही सेवा करणारे चिपळूण येथील साधक श्री. श्रीकृष्ण आगवेकर (वय ८२ वर्षे) हे सनातनच्या ७९ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या ७ व्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २९ जुलै या दिवशी रत्नागिरी आणि चिपळूण येथे झालेल्या भावसोहळ्यांत दिली. पू. चंद्रसेन मयेकर आणि पू. श्रीकृष्ण आगवेकर यांचा सन्मान सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीफळ, प्रसाद आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन करण्यात आला.

पू. चंद्रसेन मयेकर (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सद्गुरु सत्यवान कदम

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही अनोखी भेट दिल्याने अनेक साधकांची भावजागृती झाली आणि सर्वांनीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. पू. चंद्रसेन मयेकर यांचा सन्मानसोहळा रत्नागिरी येथील भैरव मंगल कार्यालय येथे सकाळी ११ ते २ या वेळेत झाला.

भगवंताच्या लीलेमुळे संतपदी विराजमान झालो ! – पू. चंद्रसेन मयेकर

सन्मानानंतर मनोगत व्यक्त करतांना पू. चंद्रसेन मयेकर म्हणाले, ‘‘मला गुरुदेवांनी चरणांजवळ घेतल्यामुळे देवतांचे दर्शन झाले. गुरूंनी मला भरभरून प्रेम दिले. ‘मी संत होईन’, असे मला वाटले नव्हते. भगवंताची लीला असते. आपण काहीही करत नाही. भगवंत सर्व काही करून घेत असतो. ईश्‍वराशिवाय मोठे काही नाही. मायेतील इतर गोष्टी नाशवंत आहेत. ‘आपल्या मनातील विचार पूर्ण व्हावे’, असे वाटत असेल, तर आपण ईश्‍वराच्या बाजूने राहिले पाहिजे. जिल्ह्यातील सर्व साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठण्यासाठी खडतर साधना केल्यास प.पू. डॉक्टर साधकांना भरभरून देतील. साधकांनी प्रयत्न केल्यास त्यांचा ६१ टक्के आध्यात्मिक स्तर होईल !

साधकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ५ संतांचा
स्वतःच्या प्रगतीसाठी लाभ करून घ्यावा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये साधकांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, ‘‘रत्नागिरी जिल्ह्याला आता ५ संत मिळाल्याने हा जिल्हा भाग्यवान आहे. या संतांच्या चैतन्याचा जिल्ह्यातील साधकांनी पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे. पू. मयेकरकाका यांनी साधकांचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के होण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे साधकांनी त्या दिशेने प्रयत्न करावेत. एक सदस्य संत झाल्यानंतर घरातील इतर सदस्यही साधक, संत होतात. हे केवळ सनातनमध्येच होऊ शकते. ”

पू. चंद्रसेन मयेकर यांच्याविषयी त्यांचा मुलगा आणि साधक यांनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. महेश मयेकर (धाकटा मुलगा) : ‘असे वडील लाभले, हे मी परमभाग्य समजतो. बाबांनी मला वेळोवेळी साथ दिली आहे. हे ऋण मी कधीही फेडू शकत नाही. ‘बाबा संत होतील’, अशी मी कल्पना केली नव्हती. बाबांनी लहानपणापासून आहे त्या परिस्थितीत अडचणींशी झगडत वाटचाल केली. त्यांचे हे जन्मोजन्मीचे भाग्य आहे.’ या वेळी श्री. महेश यांचा भाव जागृत झाला होता.

२. पायाला जखम असतांनाही पू. मयेकरकाका दैनिक वितरणाची सेवा करायचे ! – सौ. पल्लवी लांजेकर, जिल्हासेविका

‘गतवर्षीपासून मला वाटत होते की, काका संत कधी होणार ? ते सतत आनंदी आणि स्थिर असतात. त्यांची भगवंतावर नितांत श्रद्धा आहे. साधकांना ते नेहमीच ‘साधना वाढवा आणि स्वभावदोष घालवा’, असे सांगत असतात. काकांच्या पायाला जखम झालेली असतांनाही ते तळमळीने दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाची सेवा करत असत. पू. मयेकरकाका यांच्याकडून आम्हाला भरपूर शिकायला मिळाले; मात्र ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यात आम्ही अल्प पडतो.’

३. श्री. प्रमोद लांजेकर – ‘पू. मयेकरकाका यांच्याकडे पाहिल्यावर पुष्कळ प्रमाणात चैतन्य जाणवते. ‘ते संत कधी होणार’, अशी मला उत्कंठा लागली होती.’

४. श्री. रविकांत शहाणे – ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. मयेकरकाका संत होतील’, असे वाटले होते. पू. मयेकरकाकांच्या मुखावर एकही सुरकुती नाही.’

क्षणचित्र

पू. चंद्रसेन मयेकर हे संत झाल्याचे घोषित होताच सभागृहाजवळ असलेल्या श्री भैरी देवाच्या मंदिरातील नगारा वाजला. जणूकाही ईश्‍वराच्या अस्तित्वाची अनुभूती साधकांना आली.

 

साधकांना साधनेत साहाय्य करणारे पू. चंद्रसेन मयेकर !

पू. चंद्रसेन मयेकर

१. ‘काकांमध्ये व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा आहे.

२. वेळेचे पालन करणे

काका वेळ तंतोतंत पाळतात. प्रत्येक सत्संगाला ते १० मिनिटे अगोदर उपस्थित रहातात.’

३. साधकांना साधनेत साहाय्य करणे

नियमित सेवा पूर्ण झाली की, ते माझ्या दुकानात येऊन बसतात. ‘साधकांच्या साधनेत त्यांना कसे साहाय्य करता येईल ?’, याचा ते विचार करत असतात.

४. आजारी असले, तरी त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंद न्यून होत नाही.’

५. साधकांचे आधारस्तंभ

‘मला साधनेत त्यांचे नेहमी साहाय्य झाले आहे. काका मला माझ्या चुकांची जाणीव करून देतात. प्रत्येक साधकाला त्यांच्याविषयी पुष्कळ आदर वाटतो.’

– श्री. विनोद गादीकर, लांजा, जिल्हा रत्नागिरी.

६. ‘साधकांनी साधना वाढवावी’, अशी तळमळ

‘ते नियमित भाववृद्धी सत्संग आणि शुद्धीकरण सत्संग ऐकतात. ‘केंद्रातील साधकांनी आपली साधना वाढवावी, तसेच व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवावेत’, असे त्यांना वाटते.’

७. सेवेची तळमळ

‘मयेकरकाकांचे वय ८० वर्षे असूनही त्यांची सेवा करण्याची पुष्कळ तळमळ आहे. ते नेहमी ‘आपण चांगल्या धर्माभिमानी युवकांचे संघटन करूया, म्हणजे आपल्याला सभा आणि आंदोलने घ्यायला अडचण येणार नाही. आपल्याकडे गुरुदेवांचे लक्ष आहे’, असे ते साधकांना सांगतात. नियमित २ घंटे समष्टी सेवा करणारे केंद्रातील ते एकमेव साधक आहेत. ते प्रत्येक सेवा समयमर्यादेत आणि परिपूर्ण करतात. त्यांच्या बॅगेत सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध असते.

८. भाव

‘ते नेहमी सांगत असतात, ‘‘आपण काय करतो ?’, हे देव पहात असतो.’’ ‘गुरुदेव आपल्यासाठी किती करतात ! आपणच न्यून पडतो.’ असा त्यांचा भाव असतो.

९. जाणवलेला पालट

काका आता पुष्कळ शांत आणि स्थिर झाले आहेत.’

पूर्वसूचना : ‘काका संत होतील’, असे काही दिवसांपासून मला वाटत होते. ‘गुरुदेवांच्या कृपेने लवकरच आणखी १ संतरत्न आम्हाला मिळेल’, असे वाटते.’

– सौ. पल्लवी लांजेकर, लांजा, जिल्हा रत्नागिरी.

श्री. महेश मयेकर (मुलगा) यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. ‘बाबा शांत असतात. ते अल्प बोलतात.

२. ते दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचन करतात.

३. ते दैनिक सनातन प्रभातचे वितरण करतात, तसेच समष्टीसाठी नामजप करतात.

४. भाव : ‘ऊन, पाऊस असतांना जर मी बाबांना सांगितले, ‘‘दैनिक सनातन प्रभातच्या अंकांचे वितरण करण्यासाठी आता जाऊ नका, संध्याकाळी जा’’, तर ते सांगतात, ‘‘देवाचा सेवारूपी प्रसाद आहे. जायलाच पाहिजे.’’ ‘कोण काय म्हणेल ?’, याकडे त्यांचे लक्ष नसते. ‘देव बघत आहे’, असा त्यांचा भाव असतो.

५. जाणवलेले पालट

अ. त्यांचा चिडचिडेपणा न्यून झाला आहे.

आ. पूर्वी कधी कुणाचे चुकले, तर ते बोलायचे. आता ते काहीच बोलत नाहीत.’

– श्री. महेश मयेकर (मुलगा), लांजा, रत्नागिरी.

(पू. चंद्रसेन मयेकर आणि पू. श्रीकृष्ण आगवेकर यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय अन् साधक यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये ते संत व्हायच्या अगोदर लिहून दिल्याने त्यांच्या नावापुढे ‘पूज्य’ असा उल्लेख केलेला नाही. – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात