‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥’ या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांना सर्वथा घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे पू. सौरभदादांना (पू. सौरभ जोशी यांना) क्षणोक्षणी कसे घडवत आहेत’, हे मी गेली २२ वर्षे अनुभवत आहे. यासाठी त्यांच्या चरणी प्रत्येक श्‍वासासहित कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच ठरेल. आधुनिक वैद्यांच्या मतानुसार मतीमंद असणार्‍या विकलांग सौरभला गुरुदेवांनी ‘पूजनीय सौरभ’ बनवून आदर्श बनवले. ‘ईश्‍वराचे सगुण रूप असणार्‍या गुरूंना अशक्य असे काहीच नसते’, हे मी अनुभवत आहे. प.पू. गुरुदेवांनी पू. दादांना आध्यात्मिक स्तरावर सामर्थ्यवान बनवून त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सामावून घेतले आहे. पू. सौरभदादा एका खोलीत असूनही केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘त्यांचे प.पू. गुरुदेवांंशी सतत अनुसंधान असते’, हे त्यांच्या बोलण्यातून अनुभवास येते. पू. सौरभदादांच्या बोलण्यातून, हसण्यातून आणि स्पर्शातून प्रीतीची अनुभूती येते. पू. सौरभ यांची देहबुद्धी अल्प आहे. ते पलंगावर सतत झोपून असूनही अखंड आनंदावस्थेत असतात. आपल्याला आजारपणामुळे थोडा वेळ जरी झोपावे लागले, तरी आपली चिडचिड होते; परंतु पू. सौरभदादा अखंड आनंदात राहून इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्याच्या संदर्भातील काही वेचक प्रसंगांवरून संत तुकारामांचा अभंग आठवतो, ‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ।’

(पू. सौरभदादांच्या मते ‘श्री’ म्हणजेच ‘हरि’ आणि ‘श्री’ म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’) ‘परात्पर गुरुदेवांनी पू. सौरभदादादांना अप्रत्यक्षपणे बोलायला कसे शिकवले’, हे प्रस्तुत लेखात मांडण्याचा परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच प्रयत्न केला आहे.

१. जन्मापासून वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत क्वचित कानावर पडणारे शब्द म्हणणे

‘सौरभदादा अपूर्ण दिवसाचे बाळ म्हणून जन्मल्याने विलंबाने बोलतील’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते. साधारण दोन वर्षांनी त्यांनी ‘आई, बाबा’ म्हणायला आरंभ केला. त्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत (एप्रिल २००८ पर्यंत) क्वचित कानावर पडणारे शब्द ते म्हणायचे.

२. वयाच्या १२ व्या वर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘मी कोण ?’, हा
प्रश्‍न विचारणे आणि त्या प्रश्‍नाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अतिशय आनंद होणे

वयाच्या १२ व्या वर्षी (एप्रिल २००८ मध्ये) त्यांच्या वाढदिवसाला आम्ही गोवा आश्रमात येत असतांना आश्रमापासून अर्धे अंतर शिल्लक असतांनाच ते ‘मी कोण ? मी कोण ?’, असे म्हणू लागले. ‘सोनू’ असे सांगूनही त्यांचा ‘मी कोण ?’, हा प्रश्‍न विचारणे चालूच होते. (त्या वेळी आम्ही त्यांना लाडाने ‘सोनू’ म्हणायचो.) आश्रमात आल्यावर गुरुदेव भेटण्यासाठी आल्यावर पू. सौरभदादांनी त्यांना ‘मी कोण ?’, असे विचारले. हे ऐकून गुरुदेवांना अतिशय आनंदून आम्हा साधकांना म्हणाले, ‘‘पहा, आपल्यालासुद्धा असा प्रश्‍न पडत नाही ना ? ‘आपले नाव म्हणजेच आपण’, असे आपल्याला वाटते. अशा स्थितीत असा प्रश्‍न विचारणे अलौकिक आहे.’’ (त्या वेळी पू. सौरभदादांची शारीरिक स्थिती अतिशय नाजूक होती. शरिराची सर्व हाडे आणि बरगड्या दिसायच्या. ते चालू-फिरू शकत नव्हते.) त्या वेळी तेथे सद्गुरु अप्पाकाका (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (बालरोगतज्ञ)), सद्गुरु बिंदाताई (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ), सद्गुरु गाडगीळकाकू (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आणि इतर साधक उपस्थित होते. हा प्रसंग सद्गुरु अप्पाकाकांच्या लक्षात होता. माझे त्यांच्याशी एकदा भ्रमणभाषवर बोलणे झाले. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘पू. सौरभदादांनी अधिकारी व्यक्तीला योग्य प्रश्‍न विचारला होता.’’

३. वयाच्या बाराव्या वर्षी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे, तेव्हापासून त्यांना आवश्यक ते बोलता येऊ लागणे आणि अल्प शब्दांत समोरच्या व्यक्तीशी संवाद साधून त्याच्याशी जवळीक निर्माण करणे

वयाच्या बाराव्या वर्षी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पहिले दैवी बालक म्हणून सौरभदादांना प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून परात्पर गुरुदेवांच्या कृपेने त्यांना आवश्यक ते बोलता येऊ लागले. शेजारच्या व्यक्तींची नावे उच्चारून दादा त्यांना आपलेसे करायचे. घरी येणार्‍यांना ते ‘या, बसा’, असे म्हणू लागले. त्या वेळी सौरभदादा संत नसतांनाही घरी येणार्‍या सर्वांना आनंद व्हायचा. मंदिरात आल्याप्रमाणे काही जण घराच्या उंबरठ्याला नमस्कार करून आत यायचे. काही जण आपल्याकडे पिकणारे धान्य, फळे, भाजी प्रथम दादांसाठी आणायचे. एखादे मंगलकार्य असल्यास आठवणीने आमंत्रण द्यायचे. आजही दादा रामनाथी आश्रमात असले, तरीही अनेक जण येऊन त्यांना भेटून जातात.

४. वयाच्या १६ व्या वर्षी रामनाथी आश्रमात वास्तव्यास
आल्यावर आश्रमातील चैतन्यामुळे दादांचे उच्चार स्पष्ट होणे

वयाच्या १६ व्या वर्षी, म्हणजे २२.२.२०१२ या दिवशी सौरभदादा रामनाथी आश्रमात वास्तव्यास आले. तेव्हापासून त्यांचे बोलण्याचे प्रमाण वाढले. त्यांचे बोलणे पूर्वी घरातल्या व्यक्तींनाच कळायचे. आता आश्रमातील सर्वच साधकांना त्यांचे बोलणे कळते. त्यांचे उच्चार पूर्वीच्या तुलनेत अधिक स्पष्ट झाले आहेत. यावरून ‘आश्रमातील चैतन्य कार्य कसे करते’, हे आम्हाला अनुभवायला मिळाले.

५. संत म्हणून घोषित केल्यानंतर विविध भाषा समजू आणि बोलता येऊ लागणे

वयाच्या १७ व्या वर्षी, म्हणजे ३१.८.२०१३ या दिवशी पू. सौरभदादांचा संत म्हणून सत्कार झाला. त्या वेळी त्यांनी उपस्थित साधकांना आनंदी पाहून ‘नाईस’ म्हणून सर्वांना आनंद दिला. आश्रमात विविध भाषा बोलणारे साधक भेटीला आल्यावर पू. दादा त्यांच्या भाषेत एखादा शब्द बोलतात. जर्मन भाषिक एक साधिका आश्रमात आल्यावर ती बोलत असतांना त्यांनी तिला जर्मन भाषेत एक शब्द उच्चारून प्रतिसाद दिला. पू. लोलाआजींनी पू. सौरभदादांना प्रथम पाहिले. तेव्हा आजींना पुष्कळ आनंद झाला. पू. आजींना खोलीतून जावेसे वाटत नव्हते. तेव्हा पू. सौरभदादा त्यांना कळावे; म्हणून प्रथमच संपूर्ण वाक्य इंग्रजीत बोलले. ते म्हणाले, ‘‘कम अगेन. नाईस टू मीट यू.’’ पू. सौरभदादांच्या अकस्मात उत्तराने आम्हा सर्वांनाच अतिशय आनंद झाला.

५ अ. कन्नड भाषिक साधिकेच्या प्रश्‍नाला पू. सौरभदादा यांनी कन्नडमधून उत्तर देणे

‘मी रामनाथी आश्रमात असतांना २८.९.२०१४ या दिवशी पू. सौरभदादांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी मी चेष्टेने म्हणाले, ‘‘पू. सौरभदादा माझ्यावर रुसले आहेत कि काय ?’’ तेव्हा पू. सौरभदादा म्हणाले, ‘‘इल्ला !’’ (कन्नड भाषेत इल्ला म्हणजे ‘नाही.’) ते कन्नड भाषेत बोलल्यामुळे मला आश्‍चर्य वाटले.’ – कु. कनकमहालक्ष्मी देवकर (१७ वर्षे), विशाखापट्टणम् (५.१०.२०१४)

६. पू. सौरभदादांचे मोजक्या शब्दातील अचूक
बोलणे ऐकून सर्वांना ‘गुरुकृपा कार्य कशी करते’, हे लक्षात येणे

पू. सौरभदादा सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे पुष्कळ बोलत नसले, तरीही ते मोजक्याच शब्दांत योग्य ते सर्व सांगतात. पू. सौरभदादा सतत अनुसंधानात असल्याने ‘श्री गुरुकृपेने त्यांना सर्व ज्ञान कसे होते’, हे पुढील काही प्रसंग वाचल्यावर लक्षात येईल.

अ. डिसेंबर २०१३ मध्ये प्रथम भेटायला आलेल्या एका वकिलांना खोलीचे दार उघडताच ‘कम लॉयर’, असे म्हणून पू. दादांनी त्यांचे स्वागत केले. ‘ते वकील आहेत’, हे मला नंतर समजले.

आ. वर्ष २०१४ पासून पू. दादा सेवेत असणार्‍या साधकांशी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रेमाने बोलतात. त्यांच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात.

इ. जून २०१४ मध्ये एक साधिका पू. सौरभदादांशी मराठी, हिंदी, तेलगू अशा विविध भाषांत बोलून पू. दादांना बोलण्याचा आग्रह (परीक्षा घेण्याच्या उद्देशाने) करत होती. तिने ‘साधनेसाठी कोणते प्रयत्न करू ?’, असे विचारल्यावर बराच वेळ शांत असणार्‍या पू. दादांनी लगेच ‘अहंनिर्मूलन’ असे स्पष्ट आवाजात सांगितले.

ई. वर्ष २०१५ पासून एखाद्या साधकाला आपल्या एखाद्या नातलग व्यक्तीची काळजी वाटत असल्यास पू. दादा त्याविषयी त्या साधकाला विचारतात.

उ. वर्ष २०१६ पासून एखाद्या साधकाला त्याच्या घरी लाडाने ज्या नावाने संबोधतात, त्याच नावाने पू. सौरभदादा त्याला हाक मारतात. असे अनेक साधकांच्या संदर्भात घडले आहे.

ऊ. वर्ष २०१६ पासून एखादा साधक किंवा साधिका यांना गाण्याची आवड असल्यास पू. सौरभदादा ते अचूक ओळखून त्यांना गाणे म्हणायला सांगतात.

ए. डिसेंबर २०१६ मध्ये एका साधकाने ‘त्याची आई आज कुठे सेवेला गेली आहे ?’, हे सांगत असतांनाच पू. दादा ‘अक्कलकोट’ असे म्हणाले. म्हणायला अवघड असणारा शब्द पू. दादांनी स्पष्ट आणि अचूक उच्चारल्यावर आम्हाला आनंद झाला. पू. दादाही आनंदाने पुन्हा तो शब्द म्हणू लागले.

ऐ. वर्ष २०१७ पासून पू. सौरभदादांना भेटायला आलेले साधक किंवा पाहुणे यांच्यापैकी एखादे बाळ किंवा वृद्ध व्यक्ती खोलीत येऊ शकली नसेल, तर पू. दादा न आलेल्या त्या व्यक्तीची विचारपूस करतात.

ओ. वर्ष २०१७ मध्ये एक साधक ‘आज वेगळे काहीतरी खावेसे वाटते’, असे मला सांगत असतांना पू. सौरभदादा लगेच त्याला म्हणाले, ‘‘चायनीज, पनीर.’’ तेव्हा तो साधक आनंदून म्हणाला, ‘‘पू. दादा, तुम्हाला सर्व कळते.’’

७. भविष्यात होणार्‍या घटनांविषयी थोडक्यात शब्द उच्चारणे

पू. दादा भविष्यात होणार्‍या घटनांविषयी पूर्वसूचना देतात.

७ अ. ‘कु. स्वाती खाडये सनातनच्या ३४ व्या संत होणार’, असे पू. सौरभदादांनी २ मासांपूर्वीच सांगणे

‘पू. सौरभदादा ३०.८.२०१३ या दिवशी संत झाले. त्या वेळी कु. स्वाती खाडये आणि श्री. शंकर नरुटे पू. दादांना भेटायला खोलीत आले होते. त्या वेळी पू. सौरभदादांनी स्वातीताईचा हात धरून आनंदाने ‘स्वाती संत ३४’ असे म्हटले. तेव्हा सगळेच जण आनंदाने हसायला लागले. हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे लिहून ठेवा. स्वाती संत झाल्यावर तिच्या वृत्तात घेता येईल.’’

७ आ. ३.१.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या शारीरिक स्थितीविषयी लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाला. त्या दिवशीचे दैनिक मिळण्यापूर्वी ‘श्री, हाऽऽ’, असे म्हणून पू. दादा उदास झाले.

७ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्पर्श अचूक ओळखणे

३.१.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी खुणा करण्यासाठी एक ग्रंथ पाठवला. सकाळी पू. सौरभदादा झोपले होते; म्हणून मी तो वाचण्यासाठी घेताच पू. दादांनी डोळे उघडले आणि ‘आई दे’, असे म्हटले. ग्रंथ हातात देताच त्यांनी उलट बाजूने ग्रंथाचे पान उघडून पापी घेतली आणि ‘गोड गोड’, असे म्हटले. हे पाहून मी त्यांनी पापी घेतलेल्या ठिकाणी पाहिले, तर तिथे परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिले होते, ‘सौरभच्या आईला ग्रंथ देणे.’ ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा स्पर्श दादा अचूक ओळखतात’, हे यावरून माझ्या लक्षात आले.

७ ई. सनातन संस्थेवरील बंदीच्या संदर्भात वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून येण्यापूर्वीपासून ‘श्री, ॐ, नमः, दत्त’ असे म्हणणे आणि एकदा ‘बंदी येणार नाही’, असे स्पष्ट म्हणणे

३.१.२०१४ या दिवशी सनातन संस्थेवरील बंदीच्या संदर्भात वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून येण्यापूर्वीपासूनच पू. सौरभदादा ‘श्री, ॐ, नमः, दत्त’ असे म्हणायचे. कधी हाताच्या मुठी घट्ट आवळून त्वेषाने ‘ऊठ’, ‘आऊट’ असे म्हणायचे. या वेळी त्यांच्या दोन्ही हातांच्या मुठीही योग्य पद्धतीने, म्हणजे हाताचा अंगठा आत न घेता घट्ट आवळलेल्या असायच्या. अशा वेळी शरिराचे बळ एकवटून ते हात ताठ करायचे. एरव्ही त्यांचे हात ताठ आणि सरळ होत नाहीत. काही वेळाने ते आनंदाने ‘आऊट’ म्हणायचे. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहून जणू धर्मासंबंधी लढाई जिंकल्यासारखे जाणवते. इतके ते आनंदी असते. मनातील हे विचार त्यांना सांगितल्यास ते अधिक हसतात. एकदा त्यांनी ‘बंदी येणार नाही’, असे स्पष्ट म्हटले.

७ उ. साधकांच्या हातातील गाणगापूरचे तीर्थ असलेली बाटली घेण्यासाठी हात पुढे करून ‘दत्त, दत्त’ असे म्हणू लागणे

३.१.२०१४ या दिवशी श्री. आणि सौ. दामले गाणगापूर येथील श्री दत्तपादुकांवर केलेल्या अभिषेकाचे तीर्थ घेऊन आले होते. ते दारातून आत येताच काही बोलण्यापूर्वी त्या उभयतांकडे पाहून पू. सौरभदादा मोठ्याने आनंदात हसून तीर्थ असलेली बाटली घेण्यासाठी हात पुढे करून ‘दत्त, दत्त’ असे म्हणू लागले. त्यांचे ते बोलणे आणि आनंदी होणे पाहून तिथे उपस्थित सर्वांना पू. सौरभदादांच्या साधनेतील प्रगतीचा प्रत्यय आला.

७ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा भ्रमणभाष आल्यावर हातांनी नमस्काराची मुद्रा करण्याचा प्रयत्न करणे

एके दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा भ्रमणभाष आला होता. तेव्हा पू. दादांनी हातांनी नमस्काराची मुद्रा करण्याचा प्रयत्न केला. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘पापी घेतो’, असे म्हणताच पू. दादांनी ‘गोड गोड’ असे म्हणून गोड चव लागल्यासारखे तोंड केले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आनंदाने हसून म्हणाले, ‘‘सौरभला आता सारे कळते.’’ – सौ. प्राजक्ता जोशी

७ ए. पू. सौरभदादांनी ‘आऊट’ असा शब्दोच्चार करणे, घरी आल्यावर आईच्या मेंदूचा रक्तपुरवठा बंद झाल्याचे समजणे आणि ‘अशा बिकट स्थितीत तिला जीवदान मिळणे’, हे केवळ आश्‍चर्य असल्याचे जाणवणे

‘२७.९.२०१४ या दिवशी पू. सौरभदादांच्या भेटीच्या वेळी त्यांनी ‘आऊट’ असा शब्दोच्चार केला. त्या वेळी मला त्या शब्दाचा अर्थ समजला नाही. नंतर त्यांनी बसायला सांगितले आणि ते हसले. आम्ही थोडा वेळ बसून त्यांच्या सत्संगाचा लाभ घेतला. पू. सौरभदादांनी ‘आऊट’ म्हणण्यामागील अर्थाचा उलगडा मला घरी आल्यावर झाला. घरी आल्यावर मला समजले, ‘आम्ही ज्या दिवशी आणि ज्या वेळी पू. सौरभदादांच्या दर्शनासाठी गेलो होतो, त्याच वेळी घरी माझ्या आईच्या मेंदूचा रक्तपुरवठा बंद झाला आणि श्‍वासही थांबला होता.’ ‘अशा बिकट स्थितीत तिला जीवदान मिळणे’, हे केवळ आश्‍चर्य आहे. या प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टर कुटुंबियांचीसुद्धा काळजी कशी घेतात’, याची मला प्रचीती आली.’ – श्री. मेघश्याम खानोलकर, खानोली, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.

७ ऐ. पू. सौरभ जोशी यांनी अकस्मात ‘वाराणसी’ असा उच्चार करणे आणि वाराणसी सेवाकेंद्रात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे आगमन झाल्याचे कळल्यावर त्याचा उलगडा होणे

‘१६.१२.२०१४ या दिवशी दुपारी २.३० वाजता पू. सौरभदादा अकस्मात आनंदाने ‘वाराणसी, वाराणसी’ असे म्हणू लागले. प्रारंभी मला ‘ते असे का म्हणतात ?’, याचा उलगडा झाला नाही; मात्र नंतर साधकांकडून योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे वाराणसी सेवाकेंद्रात शुभागमन झाल्याचे मला समजले. त्यामुळे ‘पू. सौरभदादा ‘वाराणसी’ असे का म्हणत होते ?’, याचा मला उलगडा झाला. ते दिवसभर आनंदात होते आणि आनंदाने नखशिखांत हलत होते.’

७ ओ. परात्पर गुरु डॉ. आठवले पू. सखदेवआजींना भेटायला आले असतांना त्याच वेळी स्वतःच्या खोलीतून पू. सौरभदादांनी ‘आजी, श्री आले’, असे म्हणणे

एके दिवशी पू. सखदेवआजींना अतिशय तीव्र शारीरिक त्रास होत असतांना सलग दोन दिवस चित्रीकरण करतांना त्या स्थिर होत्या. त्यांच्या तोंडवळ्यावर कुठेही त्रासाचा लवलेश नव्हता. परात्पर गुरु डॉक्टरही अत्यल्प प्राणशक्ती असतांना पू. आजींना भेटायला आले. सकाळी ११ वाजता पू. सौरभदादांंनी ‘आजी, श्री आले’, असे म्हटले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर पू. आजींना भेटायला आले असणार’, असे मला वाटले. प्रत्यक्षातही त्याच वेळी परात्पर गुरु डॉक्टर पू. आजींना भेटायला आले होते.

७ औ. गुरुपादुकांचे दर्शन घडण्यापूर्वी आदल्या दिवशी पू. सौरभ यांनी ‘श्री, श्रींचे श्री, श्रींचे श्री…’, असे म्हणणे आणि दैनिकातील वृत्त वाचल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा अर्थ उमगणे

सौ. प्राजक्ता जोशी

४.१.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभात हातात घेऊन पू. सौरभदादांंनी मला ‘आई, बघ’, असे म्हणून पहिल्यांदा दैनिक माझ्याकडे दिले. (पू. सौरभ यांनी सकाळी पूर्ण दैनिक पाहिल्यावरच मला ते वाचायला मिळते. यासाठी त्यांना १५ ते २० मिनिटे लागतात.) मी दैनिक पाहून ‘गुरुपरंपरेचे एकत्रित पादुकादर्शन घडणार’, हे वाचून आनंदाने पू. सौरभ यांना म्हणालेे, ‘‘श्रींचे श्री येणार ना !’’ त्यावर पू. सौरभदादांनी जलद गतीने, ‘श्री, श्रींचे श्री, श्रींचे श्री श्री…’, असे म्हटले. (त्यांनी अतीजलदपणाने म्हटल्यामुळे मला हे सारे कळले नाही.); परंतु दैनिकातील वृत्त वाचल्याने मला पू. सौरभ यांच्या बोलण्याचा अर्थ थोडाफार उमजला. तो असा, ‘श्री’ म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर, ‘श्रींचे श्री’ म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज, ‘श्रींचे श्री श्री’ म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या गुरूंचे गुरु श्री अनंतानंद साईश आणि प.पू. रामानंद महाराज.’ असे गुरुपरंपरेचे एकत्र दर्शन घडण्याचा अलभ्य, दुर्मिळ योग आता ‘श्रीं’च्या कृपेमुळे सफल होणार’, असे जणू पू. सौरभदादा आनंदाने सांगण्याचा प्रयत्न करत होते. – सौ. प्राजक्ता जोशी (पू. सौरभदादांची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०१८)

७ क. पू. तनुजा ठाकूर यांना ‘माँ’ असे म्हणणारे पू. सौरभदादा हे चौथे संत असल्याचे पू. तनुजा यांनी सांगणे

२.७.२०१६ या दिवशी पू. दादांच्या भेटीच्या वेळी पू. तनुजाताई (पू. तनुजा ठाकूर) म्हणाल्या, ‘‘या पूर्वी मला सर्व जण पू. तनुजादीदी या नावाने हाक मारत होते; परंतु तीन संतांनी सांगितले की, आता तुम्हाला ‘माँ’ ही उपाधी लावा. तेव्हापासून साधक मला ‘माँ’ या नावाने हाक मारू लागले. त्या तीन संतांनंतर पू. सौरभदादा हे चौथे संत आहेत, ज्यांनी मला ‘आई (माँ)’ अशी हाक मारली.’’

७ ख. पू. (सौ.) गाडगीळकाकूंशी भ्रमणभाषवर बोलतांना पू. सौरभदादांनी ‘या काकू, ऋषी, ऐंशी’, असे आनंदाने उच्चारणे आणि त्यानंतर पू. काकूंना सद्गुरु म्हणून घोषित करण्यात येणे

एका सेवेनिमित्त गुरुपौर्णिमेच्या आदल्या, म्हणजे १८.७.२०१६ या दिवशी मी पू. (सौ.) गाडगीळकाकूंशी भ्रमणभाषवर बोलत असतांना पू. सौरभदादाही त्यांच्याशी आनंदाने बोलू लागलेे. पू. सौरभदादा पू. काकूंना, ‘नमस्कार, या काकू, ऋषी, ऐंशी, श्री, खाऊ’, असे म्हणाले. पू. सौरभदादांचे स्पष्ट उच्चार ऐकून त्या वेळी पू. काकूंनाही अतिशय आनंद झाला. त्यानंतर पू. (सौ.) गाडगीळकाकूंना सद्गुरु म्हणून घोषित करण्यात आले. त्या वेळी ‘पू. दादांचे बोलणे, म्हणजे त्याविषयीची पूर्वसूचनाच होती’, हे माझ्या लक्षात आले.’

– सौ. प्राजक्ता जोशी (पू. दादांची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

७ ग. पू. सौरभदादांनी पू. (सौ.) सखदेवआजींच्या देहत्यागाची पूर्वसूचना देणे आणि त्यांनी सांगितलेली वेळ अचूक असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

‘१७.८.२०१६ या दिवशी पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केला. त्यांच्या प्रत्यक्ष देहत्यागाची वेळ कळली नव्हती. आधुनिक वैद्यांनी तपासणी केल्यानंतर ‘पू. आजींनी देहत्याग केला आहे’, हे सांगणारी वेळ सायं. ५.१९ ही होती. प्रत्यक्षात त्या आधीच पू. आजींनी देहत्याग केलेला असणार. सौ. प्राजक्ता जोशी यांना पू. आजींच्या देहत्यागाविषयी कळवल्यावर त्यांनी पू. सौरभदादांना पू. आजींच्या देहत्यागाविषयी मिळालेल्या पूर्वसूचनेविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘दुपारी पू. सौरभदादा दीर्घ श्‍वास सोडत होते. त्यांनी नंतर ‘आजी, टाटा’, असे म्हणून दीर्घ श्‍वास सोडला आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहिले. त्याचे चित्रीकरण केले आहे आणि ती वेळ सायं. ५.१० अशी आहे. त्यामुळे ‘पू. आजींच्या देहत्यागाची वेळ सायंकाळी ५.१० अशी असावी’, असे वाटते. देहत्यागाच्या वेळेची निश्‍चिती करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले असता त्यांनी ‘सायंकाळी ५.१० हीच वेळ योग्य आहे’, असे सांगितले. यावरून ‘पू. सौरभदादांनी पूर्वसूचनेद्वारे अचूक वेळ सांगितली’, हे माझ्या लक्षात आले.’ – कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०१६)

७ घ. पू. सौरभदादांनी ‘ना ना ना ना’, असे म्हणणे आणि प.पू. नानांनी देहत्याग केल्याचे कळल्यावर पू. दादा ‘नाना’ म्हणत असल्याचे लक्षात येणे

‘अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांनी देहत्याग करण्यापूर्वी ९.१०.२०१६ या रात्री ८.०५ वाजता पू. सौरभदादा अकस्मात ‘पाऊस, पाऊस’, असे म्हणून हात जोडून नमस्कार करण्याचा प्रयत्न करू लागले. नंतर काही वेळाने पाऊस चालू झाला. १०.१०.२०१६ या दिवशी हळू आवाजात ‘ना ना ना ना’, असे म्हणून आणि दुपारी ४.४० वाजता श्री. अनिकेत भोळे यांनी उचलून घेतल्यावर मोठ्याने सलग तीन वेळा ओरडले. प.पू. नानांनी देहत्याग केल्याचे कळल्यावर पू. दादा ‘नाना’ म्हणत असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘प.पू. नानांमुळेच या वर्षी पाण्याचे संकट निवारण झाले’, हेच जणू पू. सौरभदादांना सुचवायचे होते. सकाळी पाऊसही जणू नादाच्या माध्यमातून प.पू. नाना काळेगुरुजींना नमस्कार करत होता.

७ च. पू. सौरभदादांनी एका साधिकेला ‘हस, हस’, असे म्हणून भावजागृतीचे प्रयत्न करायला सांगणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला तोंडवळ्यावर स्मितहास्य ठेवण्यास सांगितले असल्याचे तिने सांगणे आणि त्या वेळी तिची भावजागृती होणे

वर्ष २०१६ मध्ये एकदा एका साधिकेला पू. सौरभदादांनी ‘हस, हस’, असे म्हणून भावजागृतीचे प्रयत्न करायला सांगितले. त्यानंतर त्या साधिकेने मला सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझा तोंडवळा गंभीर असल्याने मला तोंडवळ्यावर स्मितहास्य ठेवण्यास सांगितले आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘भावावस्थेत राहिले की, गांभीर्य उरतच नाही. दोन्ही कसे जुळून येते ना !’’ त्यामुळे तिचा भाव जागृत झाला आणि पू. सौरभदादा यांच्याप्रती तिला कृतज्ञता वाटली.

८. साधकांशी गंमतीने बोलणे आणि त्यांना हसवणे

पू. दादा बालसाधकांशी लहान असल्याप्रमाणे बोलतात. गंमती करतात. त्यांना हसवतात. खाऊ देतात. चुकीचे वागल्यास त्यांना चुकीची जाणीव करून देतात. बालसाधकांना पू. दादा आपलेसे वाटत असल्याने महत्त्वाच्या प्रसंगी पू. दादांना भेटल्याविना त्यांना रहावत नाही.

अ. वर्ष २०१६ मध्ये पू. दादांना भेटण्यासाठी तीन-चार बालसाधिका आल्या. प्रत्येकीने स्वतःचे नाव सांगितल्यावर पू. दादा ते नाव उच्चारायचे. त्यांतील एका बालसाधिकेने आपले नाव ‘मानसी’ सांगितल्यावर पू. दादांनी आपला हात मानेजवळ नेला आणि ‘सी (see)’ म्हणाले. हे पाहून सर्व बालसाधिकांना आनंद झाला.

आ. ऑगस्ट २०१६ मध्ये पू. दादा मला प्रेमाने त्यांना ‘बाळ, सोनू’ (पू. दादांना आम्ही पूर्वी सोनू म्हणायचो), असे म्हणायला सांगत होते. तेव्हा मी पू. दादांना म्हणाले, ‘‘पू. दादा तुम्ही आता मोठे झालात ना ! तुम्हाला आता मिशी आली. दाढी आल्यावर तुम्ही कसे दिसाल ?’’ त्यावर लगेचच त्यांनी ‘ऋषि’, असे सांगितले !

इ. वर्ष २०१७ मध्ये एक साधक आणि त्यांची मुलगी पू. दादांना भेटायला आल्यावर उपस्थित एका साधकाने विचारले, ‘‘ताई अभ्यास करते का ?’’ तेव्हा पू. दादा ‘नाही’ म्हणाले. तेव्हा त्या साधकाने पुन्हा विचारले, ‘‘ताई दंगा करते का ?’’ तेव्हा पू. दादा लगेच ‘हो’ म्हणाले. त्यानंतर पू. दादांनी ‘खाऊ’ द्यायला सांगितले. पुन्हा त्या साधकाने विचारले, ‘‘ताई दंगा करते, तरी खाऊ द्यायचा का ?’’ तेव्हा पू. दादा हसत-हसत ‘हो’ म्हणाले. तेव्हा तो साधक म्हणाला, ‘‘ताई आता शहाण्यासारखी वागावी; म्हणून ताईला खाऊ द्यायचा का ?’’ त्यावर पू. दादा ‘हो’ म्हणाले. त्या वेळी त्या बालसाधिकेनेही यापुढे ‘मी चांगले वागण्याचा प्रयत्न करीन’, असे सांगितले.

ई. जानेवारी २०१८ मध्ये एका साधिकेने पू. दादांचे खेळणे हातात घेऊन ‘छुम छुम’ असा आवाज येत असल्याचे सांगितले. त्यावर पू. दादा ‘नाही’ म्हणाले. तेव्हा त्या साधिकेने विचारले, ‘‘मग कसा आवाज येतो ?’’ तेव्हा पू. दादा म्हणाले, ‘‘श्री, श्री …’’ (श्री म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर.) ‘पू. दादांचे खेळणेसुद्धा ‘श्री’ असाच नाद करते, म्हणजे नामस्मरण करते’, असे पू. दादांनी सांगितले. यावरून ‘प्रत्येक कृती भावाशी कशी जोडायची’, हे भाववृद्धी सत्संगात शिकवलेले सूत्र पू. दादा साधकांना कृतीतून शिकवत असल्याचे माझ्या लक्षात आले.

उ. एप्रिल २०१८ मध्ये एक साधिका आजारी असल्याने उदास होती. तिला हसवण्यासाठी पू. दादांनी तिला खेळणे दिले आणि म्हणाले, ‘‘सायली स्मायली.’’ त्या खेळण्यावर ‘स्मायली’ होती. तिला पाहून ती साधिका हसली.

९. इतरांच्या बोलण्यातील गंमती ओळखणे

जानेवारी २०१७ मध्ये श्री. वैभव साखरे या साधकाला चिकू दिल्यावर मी त्याला सहज विचारले, ‘‘वैभव, साखरेसारखा गोड आहे ना चिकू ?’’ वैभवने ‘हो’ सांगितले. त्याच वेळी पू. दादा गंमत झाल्याप्रमाणे हसले. तेव्हा वाक्यातून होणारी गंमत आमच्या लक्षात आली. त्या वाक्यात ‘वैभव साखरे’सारखा गोड आहे ना चिकू ?’ अशी गंमत झाली होती.

१०. व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द उच्चारणे

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने पू. सौरभदादा केवळ शब्द उच्चारतात, बोलतात, एवढेच नाही, तर इतरांच्या बोलण्यात व्याकरणदृष्ट्या अयोग्य शब्द लक्षात आल्यास योग्य शब्द सांगतात.

अ. वर्ष २०१६ मध्ये एक साधिका पू. सौरभदादांची माहिती सांगत असतांना म्हणाली, ‘‘पू. दादांचे पाय गुळगुळीत झाले आहेत.’’ तेव्हा पू. दादांनी ‘मऊ’ हा शब्द अशा प्रकारे उच्चारला की, तो केवळ त्या साधिकेला आणि मला ऐकू आला. यातून त्यांनी त्या साधिकेला योग्य ते सांगितले; परंतु ‘ती चुकली’, हे इतरांना कळू दिले नाही.

आ. सप्टेंबर २०१६ मध्ये एकदा माझी एक इतर भाषिक मैत्रीण पू. दादांशी भ्रमणभाषवर मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत होती. ती क्रियापद म्हणतांना ‘येतो, जेवलो’, असे पुरुषवाचक म्हणत होती. तेव्हा पू. दादा तिला ‘येते, जेवले’, असे म्हणायला सांगत होते.

११. विविध प्रसंगांतील पू. दादांचे विविध भाव दर्शवणारे बोलणे आणि हावभाव

गुरुदेवांच्या कृपेने पू. दादांना बोलता येऊ लागल्याने प्रगतीचे सारे श्रेय ते श्री गुरुदेवांना अर्पण करण्याविषयी बोलतात. प्रत्येक वेळी बोलतांना सारे श्रेय ते ‘श्रीं’ना अर्पण करतात.

११ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतांची क्षमा मागण्याविषयीची दैनिक सनातन प्रभातमधील चौकट पाहिल्यावर पू. सौरभ जोशी यांचा तोंडवळा गंभीर होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळणे

‘१४.११.२०१३ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व संतांची क्षमा मागितल्याविषयीची चौकट प्रसिद्ध झाली होती. पू. सौरभदादा दैनिकातील ती चौकट असलेले पान पहाताच गंभीर झाले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्या वेळी ‘त्यांचे मनोगत पुढीलप्रमाणे होते’, असे मला जाणवले, ‘श्री, ‘केवळ आपल्या कृपेनेच साधनेत पुढे गेलेल्या; परंतु स्वतःच्या अल्पसंतुष्टतेमुळे मागे राहिलेल्या संतांची आपण क्षमा मागितली’, हे वाचून त्यांच्या मनाला पुष्कळ यातना झाल्या.’ – सौ. प्राजक्ता जोशी

११ आ. पू. सौरभदादांना पू. बिंदाताईंच्या ठिकाणी ‘आई’चे म्हणजे ‘श्रीं’चे दर्शन झाल्याचे जाणवणे

‘वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. सौरभदादांना ‘श्रीं’ची आठवण आली होती. त्यामुळे मी प.पू. गुरुदेवांना भ्रमणभाष करून ‘पू. सौरभदादांना बोलायचे आहे’, असे सांगितले. प.पू. गुरुदेवांनी बोलण्यास आरंभ करताच पू. सौरभदादांनी त्यांना ‘आई, आई’, अशी हाक मारली. त्यानंतर ते पू. बिंदाताईंशी बोलले. पू. बिंदाताई गुरुदेवांशी तत्त्वरूपाने एकरूप झाल्याने पू. सौरभदादांना पू. ताईंच्या ठिकाणी आईचे, म्हणजे श्रींचे दर्शन झाले अन् त्यांनी ‘श्री, श्री’ म्हटले’, असेे मला जाणवले. – श्री. संजय जोशी (पू. दादांचे वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

११ इ. पू. सौरभ जोशी यांनी उलगडलेेले संत होण्याचे गमक !

११ इ १. साधकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना पू. सौरभदादांनी ‘श्री’ असे एकच उत्तर देणे

‘३०.८.२०१३ या दिवशी पू. सौरभदादा संत झाल्यावर त्यांना अनेक साधकांनी काही प्रश्‍न विचारले, उदा. ‘अध्यात्मात वेगाने उन्नती होण्यासाठी काय करू ?’, ‘माझे स्वभावदोष जाण्यासाठी काय करू ?’, ‘आनंद आणि चैतन्य तुमच्यासारखे सातत्याने कसे अनुभवायचे ?’ इत्यादी. या सर्व प्रश्‍नांवर पू. सौरभदादांचे एकच उत्तर असते, ते म्हणजे ‘श्री !’

११ इ २. पू. सौरभदादांनी ‘मी नाही, श्री’ या उद्गारांतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच प्रयत्न करवून घेतल्याचे सूचित करणे

काही साधकांनी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही कसे प्रयत्न केले ?’’ त्यावर पू. सौरभदादा म्हणायचे, ‘‘मी नाही.’’ त्यावर ‘मग कुणी केले ?’, असे विचारल्यावर लगेचच ते ‘श्री’, असे म्हणायचे. त्यांच्या ‘श्री’ या उत्तरातून मला जाणवले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुकृपायोगानुसार साधनेत वेगाने प्रगती करण्याविषयी सर्व तात्त्विक भाग सांगितला आहे आणि तेच आपल्याकडून सर्व करवून घेत आहेत.’

११ इ ३. पू. सौरभदादांनी सतत अनुसंधानात रहाण्यासाठी ‘श्री बघ’, असे सांगितल्यावर भजनाची आठवण होऊन भावजागृती होणे

‘सतत अनुसंधानात कसे रहाता ?’, या प्रश्‍नावर पू. सौरभदादांनी ‘श्री बघ’, असे सांगितले. यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘नेत्री सदा रूप श्रींचे’ या भजनाची आठवण होऊन माझी भावजागृती झाली.’

११ ई. पू. सौरभदादांना त्यांच्या शारीरिक अन् आध्यात्मिक स्थितीच्या रहस्याविषयी विचारल्यावर त्यांनी ‘श्री… ए, बी, सी, डी, ई’, असे सांगणे आणि ‘आनंद, भक्तीभाव, चैतन्य, दैवी शक्ती अन् ईश्‍वरी तत्त्व’, असा त्याचा अर्थ साधिकेला उमगणे

श्री. संजय जोशी

६.९.२०१३ या दिवशी मी पू. दादांना विचारले, ‘‘साधकांनी तुमच्या शारीरिक आणि आध्यात्मिक स्थितीचे रहस्य विचारल्यावर त्यांना काय सांगायचे ? सांगा ना !’’ तेव्हा पू. दादांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे हसून पाहिले आणि म्हणाले, ‘‘श्री… ए, बी, सी, डी, ई’’ आणि हसले. ही आद्याक्षरे म्हणजे सर्व जीवनसत्त्वे आहेत, जी पू. सौरभदादांमध्ये पुष्कळच अल्प आहेत. असे असतांना ‘ते या जीवनसत्त्वांचा उच्चार करण्यामागे काय कारण असावे ? त्यांना यातून काय सुचवायचे असेल ?’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. तेव्हा पू. दादा माझ्याकडे पाहून हसले. त्यांच्या हसण्यातून ‘त्यांना मला वरील अक्षरांचा अर्थ सांगायचा आहे’, असे मला जाणवले. ‘ए म्हणजेे आनंद, बी म्हणजे भक्तीभाव, सी म्हणजे चैतन्य, डी म्हणजे दैवी शक्ती आणि ई म्हणजे ईश्‍वरी तत्त्व’, असा त्यांचा अर्थ मला जाणवला. तेव्हा पू. दादा अजून छान हसले. जणू त्यांना तोच अर्थ अभिप्रेत होता. खरंच, परात्पर गुरु डॉक्टर पू. सौरभ यांनाच नाही, तर सर्व साधकांना ही सगळी आध्यात्मिक जीवनसत्त्वे देत असतात; परंतु पू. सौरभदादांना याची सतत जाणीव असते. ‘सर्व यशाचे श्रेय परात्पर गुरु डॉक्टरांना, श्रीकृष्णाला कसे द्यावे ?’, हे पू. सौरभदादांकडून सर्वांनाच शिकता येईल.’

११ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना तीन जिने चढून यायला त्रास होऊ नये; म्हणून त्यांना भेटण्यासाठी स्वतःला त्यांच्याकडे नेण्यास पू. दादांनी सांगणे

४.३.२०१८ या दिवशी सद्गुरु सौ. बिंदाताई पू. दादांना भेटल्यावर म्हणाल्या, ‘‘मी ‘श्रीं’ना तुम्हाला भेटायला सांगते.’’ त्यावर पू. दादांनी त्यांना ‘नको’, असे सांगून ‘नेणार ?’, असे विचारले. त्यानंतर ११.५.२०१८ या दिवशी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू पू. दादांना भेटल्यावरही त्यांच्यात वरीलप्रमाणे संवाद झाला. हे ऐकून दोन्ही सद्गुरु मला म्हणाल्या, ‘‘पू. दादा महान आहेत. त्यांच्यात केवढी लीनता आहे ! परात्पर गुरु डॉक्टरांना जिने चढायला त्रास होऊ नये, याची ते काळजी घेतात. परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच असे महान संत आपल्याला मिळाले.’’ या दोन प्रसंगांत गुरुतत्त्व एकच असल्याने दोन्ही सद्गुरूंचे समान संभाषण झाले आणि दोन्ही वेळा पू. दादांनी एकच उत्तर दिले.

१२. प्रीतीमय बोलणे आणि कृती

पू. सौरभदादा सर्वांशी प्रेमाने बोलतात. त्यांच्या बोलण्यातून प्रीती अनुभवायला मिळते. साधकांना त्रास होत असल्यास ते त्यांना नामजप करण्यास सांगतात. स्वतःही माळेने ‘श्री श्री…’ असा परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहून जप करतात.’ – सौ. प्राजक्ता जोशी

१२ अ. ‘भेटायला आलेल्या संतांनी जाऊ नये’, असे वाटून पू. दादांनी त्यांना रागावणे

प्रत्येक वेळी त्यांना भेटून झाल्यावर ‘मी निघतो’, असे म्हटल्यावर ते काहीच बोलायचे नाहीत, हसायचेही नाहीत, माझ्यावर रागवायचे. त्यांनी हसावेे; म्हणून मी थोडा वेळ तेथे थांबायचो; पण ते हसायचे नाहीत. ‘मी जाऊ नये’, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे मला नेहमी त्यांची आठवण येते. – (पू.) श्री. सदानंद (बाबा) नाईक, मंगळूरू आश्रम, कर्नाटक. (२८.९.२०१३)

१२ आ. पू. सखदेवआजींना श्‍वास घेण्यास होणार्‍या त्रासाचा कालावधी अचूकपणे ओळखून पू. सौरभदादांनी त्यानुसार तितके दिवस त्यांच्यासाठी जप करणे

‘पू. सखदेवआजींना श्‍वास घ्यायला त्रास होत असल्याने पू. सौरभदादांनी त्यांच्यासाठी ११.८.२०१४ या दिवसापासून जप करणे चालू केले. १५.८.२०१४ या दिवशी पू. दादांच्या आईने त्यांना विचारले, ‘‘आणखी किती दिवस जप करणार ?’’ त्यावर त्यांनी ‘तीन’, असे उत्तर दिले. म्हणजे ते १७.८.२०१४ या दिवसापर्यंत पू. आजींसाठी जप करणार होते. १८.८.२०१४ या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. त्या दिवशी पू. आजींना काहीच त्रास झाला नाही. ’ – कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१२ इ.  पू. पिंगळेकाकांना खाऊ देण्यास आणि तो खाण्यास प्रेमाने सांगणारे पू. सौरभदादा !

‘१६.६.२०१५ या दिवशी पू. पिंगळेकाका पू. सौरभ यांना भेटायला आले असता पू. सौरभ यांनी पू. काकांना खाऊ देण्यास सांगितला. त्यानंतर त्यांना प्रेमाने ‘खा ना !’, असे म्हणून खाण्यास सांगितले. पू. काकांनीही त्यांना ‘मला आवडीचा खाऊ मिळाला’, असे सांगून आनंद दिला.

१२ ई. पू. सौरभ यांनी ‘काकू’ असे म्हणून सौ. पिंगळेकाकूंचीही पू. काकांकडे विचारपूस केली.

१२ उ. पू. सौरभदादांच्या छायाचित्रातूनही प्रीतीचे प्रक्षेपण होत असल्याने त्यांचे छायाचित्र गुलाबी झाल्याचे पू. पिंगळेकाकांनी सांगणे

या वेळी छायाचित्र काढले. तेव्हा त्यातील पू. सौरभ यांचे छायाचित्र गुलाबी आल्याचे पू. काकांनी लक्षात आणून दिले. पू. काका म्हणाले, ‘‘पू. सौरभदादांच्या छायाचित्रातूनही प्रीतीचे प्रक्षेपण होत असल्याने छायाचित्र गुलाबी आले.’’ पू. काकांनी भ्रमणभाषमध्ये ते छायाचित्र घेतले आणि ते पू. सौरभ यांना म्हणाले, ‘‘आता तुम्ही आमच्या समवेत सूक्ष्मातून प्रसाराला येणार.’’ हे ऐकताच पू. सौरभ यांना आनंद झाला आणि ते म्हणाले, ‘‘श्री नेणार.’’

१२ ऊ. पू. सौरभ जोशी आणि पू. (सौ.) सखदेवआजी यांच्यातील आगळेवेगळे आध्यात्मिक नाते !

ऑगस्ट २०१६ मध्ये पू. आजींना जेव्हा त्रास होत असेल, तेव्हा पू. सौरभदादा आजींची आठवण काढायचे. पू. आजींना श्‍वास घ्यायला त्रास होत असेल, तेव्हा पू. सौरभदादांनाही श्‍वास घेण्यास त्रास होत असे. पू. आजींचे नातलग किंवा मुलगी कु. राजश्रीताई पू. सौरभदादांना भेटायला आल्यावर ते पू. आजींची विचारपूस करायचे. वर्षभरापूर्वी पू. आजींना तीव्र त्रास होत होता. त्या वेळी पू. सौरभदादांनी त्यांना भेटण्याचा आग्रह केला होता. तेव्हा पू. आजी म्हणाल्या होत्या, ‘‘माझा थांबलेला श्‍वास पू. सौरभनीच चालू केला.’’ पू. आजी न विसरता पू. सौरभदादांना खाऊ पाठवायच्या आणि पू. सौरभदादाही पू. आजींना खाऊ पाठवायचे. पू. आजींना त्यांचा जन्मदिनांक ठाऊक नव्हता. त्या वेळी पू. आजींचा जन्मदिनांक आणि त्यांच्या शेवटच्या श्‍वासाची वेळ पू. सौरभदादांनी अचूक सांगितली.

१३. ‘समष्टी कार्याची वृद्धी व्हावी’, यासाठी प्रयत्नरत होण्याविषयीचे बोलणे

पू. दादा बहुविकलांग असले, तरीही ते समष्टी सेवेत मग्न असल्याचे अनेक संतांनी सांगितले आहे.

१३ अ. पू. सत्यवानदादांशी बोलतांना ‘मी येतो’, असे म्हणून उठण्याचा प्रयत्न करणे

२२.५.२०१५ या दिवशी पू. सत्यवानदादा पू. दादांना भेटायला आले होते. त्या वेळी पू. सौरभदादांमध्ये झालेले पालट पाहून पू. सत्यवानदादांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी पू. सौरभदादांच्या चरणांना स्पर्श करून पाहिले, तसेच त्यांनी पू. सौरभदादांच्या छातीवरील ज्योतीचा आकार पाहिला. थोड्या वेळाने पू. सौरभदादा त्यांना ‘मी येतो’, असे म्हणून उठण्याचा प्रयत्न करू लागले. (‘पू. सौरभदादांना पू. सत्यवानदादा यांच्यासमवेत जायचे होते’, असे मला वाटले.) ‘पू. सत्यवानदादांशी पुष्कळ बोलावे’, अशा पद्धतीने पू. सौरभदादा बोलण्याचा प्रयत्न करत होते.

१३ आ. पू. पिंगळेकाका समष्टी कार्याविषयी सांगत असतांना पू. सौरभदादांनी आनंदाने ‘वा !’ असा प्रतिसाद देणे

१६.६.२०१५ या दिवशी पू. पिंगळेकाका म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच आज सर्वत्र आपल्या कार्याला साहाय्य होत आहे. सेवेसाठी जागा मिळत आहेत.’’ अशा प्रकारे पू. काका संस्थेच्या समष्टी कार्याविषयी सांगत असतांना पू. सौरभ अतिशय शांतपणे सर्व ऐकून घेत होते. त्यानंतर त्यांनी पू. काकांना आनंदाने ‘वा !’, असा प्रतिसाद दिला.

१३ इ. पू. पिंगळेकाकांनी ‘माझ्या समवेत प्रसाराला येणार का ?’, असे पू. सौरभ यांना विचारताच क्षणाचाही विलंब न करता पू. सौरभ यांनी ‘आताच’ असे उत्साहाने आणि आनंदाने सांगितले.

१४. खोली दुरुस्त करण्यासाठी पू. दादांना दुसर्‍या खोलीत नेण्यात येणे, तेथे पू. दादांनी इंग्रजी
बोलायला आरंभ करणे आणि त्या खोलीत पूर्वी इंग्रजी भाषिक साधक रहात असल्याचे लक्षात येणे

नोव्हेंबर २०१७ मध्ये पू. दादा रहात असलेली खोली दुरुस्त करण्यासाठी त्यांना वरच्या मजल्यावरील दुसर्‍या खोलीत नेल्यावर पू. दादांनी त्या खोलीतील स्पंदनांवरून इंग्रजीत बोलायला आरंभ केला. त्या खोलीत इंग्रजी भाषिक साधक (विदेशातून साधनेसाठी येणारे साधक) रहायचे. ‘पू. दादांना खोलीत नेल्यावर साधकांना प्रतिदिन दादांच्या सेवेत येण्यासाठी अधिक पायर्‍या चढाव्या लागतील’, असे म्हटल्यावर पू. दादा लगेच ‘एटीन’ म्हणाले. साधकांनी कुतूहलापोटी पायर्‍या मोजल्या, तर त्या १८ होत्या. त्यानंतर पू. दादा ‘शॉन सी’ म्हणू लागले. तेव्हा आम्हाला काही कळले नाही. त्या खोलीत पूर्वी ‘शॉन सी’ म्हणजे ‘शॉन क्लार्क’ हे साधक रहात होते. खोलीतील दीड मासाच्या वास्तव्यात पू. दादा अनेक इंग्रजी शब्द न शिकवता वापरत होते, उदा. बाथ, स्ट्रेचिंग, बाय-बाय, यस, नो, हॅलो इत्यादी अनेक इंग्रजी शब्दांचे उच्चारही ते त्या पद्धतीचे करायचे. साधकांना असे ऐकतांना आनंद होत असे.

१५. परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना !

‘परात्पर गुरु डॉक्टर, केवळ आपल्या कृपेमुळेच आम्हाला पू. सौरभदादांना रामनाथी आश्रमात आणता आले. पू. सौरभदादा घरी असते, तर त्यांना कुणी संत म्हणून ओळखलेच नसते. सर्व लोकांनी सामान्य व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले असते. त्यांच्यात होणारे पालटही मला वेळेअभावी लिहिता आले नसते. पू. दादा आश्रमात (समष्टीत) असल्यामुळे देश-विदेशातून आलेले विविध जिज्ञासू, धर्माभिमानी आणि साधक यांना त्यांचे दर्शन मिळते अन् त्यांच्या दिव्यत्वाच्या अनुभूती घेता येतात. तुम्ही घडवलेले साधक निरपेक्ष भावाने मला पू. दादांच्या सेवेत साहाय्य करतात. अर्थासाठी (पैशासाठी) स्वार्थी झालेली माणसे मी पाहिली आहेत. ‘समाजातील विकलांग व्यक्ती आणि तिचे पालक विशेषतः आई किती यातना भोगते’, हे मी अनुभवले आहे. परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही माझ्या जीवनात आलात आणि ‘पू. सौरभदादांची शिष्यभावात राहून सेवा कशी करावी’, याचे वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे मी आनंदाने साधना करण्याचा प्रयत्न करू शकते. स्वतःला साधनारत ठेवल्यामुळे माझे मन स्थिर राहून मला आनंदात रहाता येते. पू. सौरभदादा बहुविकलांग असूनही केवळ तुमच्या कृपेमुळेच माझ्या साधनेत कुठेही व्यत्यय येत नाही. परात्पर गुरुमाऊली, ‘तुम्हाला अपेक्षित साधना माझ्याकडून अखंड भावपूर्ण घडू दे’, हीच तुमच्या कोमल चरणी प्रार्थना !’ – सौ. प्राजक्ता जोशी (पू. सौरभदादांची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०१८)

(१. ‘या लेखातील काही सूत्रांमध्ये ‘सौरभदादा’ असा उल्लेख केला आहे. ती सूत्रे ते संत होण्यापूर्वीची आहेत.

२. काही सूत्रांमध्ये ‘पू. बिंदाताई, पू. पिंगळेकाका, पू. सखदेवआजी, पू. गाडगीळकाकू’, असा उल्लेख केला आहे. ती सूत्रे हे सर्व जण सद्गुरुपदावर आरूढ होण्यापूर्वीची आहेत.’- संकलक)