परिस्थितीला धैर्याने तोंड देणार्‍या, सतत इतरांसाठी झटणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या सनातनच्या पुणे येथील ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

 

१. बालपण

‘पू. दातेआजींचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. वयाच्या सहाव्या वर्षी पू. आजींची आई गेली. त्यानंतर ४ वर्षे त्यांना मोठ्या बहिणींनी सांभाळले. ९ बहिणी आणि २ भाऊ, यांमध्ये त्या सगळ्यात धाकट्या आहेत. त्यांनी लहान वयातच परिस्थिती स्वीकारली. त्यांच्या वडिलांचा देवावर पुष्कळ विश्‍वास होता. ते सतत देवाचे करायचे. त्यामुळे पू. आजींवर ते संस्कार झाले.

२. वैवाहिक जीवन

२ अ. यजमानांनी गुरुचरित्राचे पारायण करणे आणि त्या वेळी पू. आजींनी तेथे सेवा करणे

वयाच्या १९ व्या वर्षी पू. आजींचे लग्न झाले. यजमान कै. मोहनराव दाते हे दत्ताचे उपासक होते. ते वर्षातून ३ – ४ वेळा घरी गुरुचरित्राचे पारायण करायचे. पू. आजींना देवाची अत्यंत आवड होती. सासरी आल्यावर त्यांची अध्यात्माची ओढ वाढली. प्रत्येक वर्षी दत्तजयंतीच्या वेळी यजमान ७ दिवस स्वतःही पारायण करायचे आणि इतरांनाही एकत्र करून सामूहिक गुरुचरित्राच्या पारायणाचे आयोजन करायचे. हे पारायण २४ घंटे असे. तेथे पू. आजी सेवेला जायच्या. भाजी चिरून देणे, उपवासाचे पदार्थ आणि चहा-कॉफी बनवणे, अशा सेवा त्या करत असत.

२ आ. ‘मुलांवर संस्कार व्हावेत’, यासाठी त्यांना पारायणाच्या ठिकाणी घेऊन जाणे आणि तेथे सेवा करण्यास सांगणे

‘मुलांवर संस्कार व्हावेत’, या हेतूने त्या दोन्ही मुलांना (डॉ. नरेंद्र आणि श्री. निरंजन) सोवळे नेसवून प्रतीवर्षी पारायणाच्या ठिकाणी घेऊन जात. तेथे चहा-पाणी देण्याची सेवा करण्यास मुलांना सांगत. त्यामुळे मुलेही त्या वातावरणात वाढली. पू. आजी स्वतः धर्माचरण करत अन् त्या दृष्टीने सोवळे-ओवळे कडकपणे पाळत.

२ इ. पू. आजींचे माहेर कोकणात हर्णै येथे होते. परिस्थिती चांगली नसल्याने त्या १२ वर्षे माहेरी गेल्या नाहीत; पण त्यांनी त्याविषयी कधीच कुणाकडे तक्रार केली नाही.

२ ई. इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती 

एकदा आजींच्या यजमानांचे मित्र अडचणीत असतांना ते पैसे मागण्यास आले होते. त्यांना देण्यासाठी कुणाकडेही पैसे नव्हते. तेव्हा पू. आजींनी त्या व्यक्तीला स्वतःचा सोन्याचा हार दिला अन् तिला सांगितले, ‘‘तुम्ही हा हार गहाण ठेवून त्याचे पैसे घ्या आणि तुम्हाला जमल्यावर तो हार सोडवून आणून द्या.’’ त्या व्यक्तीने जवळजवळ ३ वर्षांनी तो हार परत केला; पण पू. आजींनी त्याविषयी कधीही चर्चा केली नाही.

२ उ. घरी येणार्‍या पाहुण्यांचे हसतमुखाने आदरातिथ्य करणे

स्वतःचे राहते घर दोन खोल्यांचेच होते; पण पू. आजींनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधीच केला नाही. घरात सतत पाहुणे, ओळखीचे, संघाचे कार्यकर्ते (यजमान संघात अत्यंत क्रियाशील होते.) यांचे येणे-जाणे चालू असायचे. पू. आजी त्या सगळ्यांचेच हसतमुखाने आणि उत्साहाने स्वागत करायच्या. ‘इतरांना साहाय्य करणे, सतत इतरांचा विचार करणे’, हे गुण पू. आजींमध्ये अगदी लहानपणापासून आहेत. ‘दुसर्‍यांसाठी सतत कसे करता येईल’, याचाच त्यांना ध्यास असतो.

२ ऊ. कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देणे

पू. आजींचे यजमान संघाचे कार्यकर्ते असल्याने आणीबाणीच्या काळात १८ मास (महिने) कारागृहात होते आणि घरात कमावणारे कुणीही नव्हते. मुलीचे नुकतेच लग्न झाल्याने जवळची पुंजी संपली होती आणि दोन्ही मुलांचे शिक्षण व्हायचे होते, तरी त्या परिस्थितीत हबकून न जाता त्यांनी परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. कारागृहात भेटायला जायचे, म्हणजे भाडे खर्च होणार; म्हणून पूर्ण १८ मासांत त्या यजमानांना कारागृहात भेटण्यास केवळ एकदाच गेल्या. ‘आपण किती त्याग करत आहोत’, असा कर्तेपणा त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठेही नव्हता.

३. सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना

पू. आजी सर्व व्रतवैकल्ये करत असत. श्रावणातील शनिवार, सोमवार अन् कार्तिकातील सोमवार, तसेच संकष्टी चतुर्थी इत्यादी उपवास त्या मनोभावे करत. श्री गजानन महाराजांच्या पोथीचे त्यांनी अनेकदा पारायण केले. श्रावणातील सत्यनारायण, अधिक मासात ३३ ब्राह्मण आणि सवाष्ण भोजन, श्राद्ध करणे, आश्‍विन मासात कुमारिका पूजन, अशी अनेक व्रतवैकल्ये प्रतिवर्षी न चुकता त्या नियमितपणे करत असत. पू. आजींनी एकदा पंढरपूरची वारीही केली आहे.

पू. आजींचे यजमान १५ वर्षे वारीला जातांना आणि येतांनाही चालत असत. त्यांच्या समवेतच्या वारकर्‍यांचे घरात सतत येणे-जाणे होत असे. त्या सर्वांचे अगत्याने करणे (आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना) पू. आजींना अत्यंत आवडायचे.

त्या नियमितपणे रामनाम घेत असत. प्रत्येक चातुर्मासात पू. आजी वेगवेगळे नेम करत असत, उदा. एखाद्या गरजूला पूर्ण चातुर्मासात भाजी देणे, लहान मूल असल्यास पाव आणि अर्धा लिटर दूध देणे. यांतून कर्मकांडाच्या माध्यमातूनही पू. आजींनी इतरांचाच विचार केला. गेली अनेक वर्षे पू. आजी रात्री झोपायच्या आधी दिवसभरात देवाने जे साहाय्य केले, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुढील वाक्य म्हणत झोपतात, ‘‘घेतो झोप सुखे, फिरून उठतो ही ईश्‍वराची कृपा !’’

४. सनातन संस्थेशी संपर्क

४ अ. पुण्यात आरंभी मोजकेच साधक असतांना घरी येणार्‍या साधकांचा अल्पाहार, भोजन इत्यादींचे दायित्व स्वतःकडे घेऊन ती सेवा उत्तमरित्या पार पाडणे

पू. आजींचे चिरंजीव डॉ. नरेंद्र दाते आधी सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि त्यांच्या माध्यमातून पू. आजीही सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्या. वर्ष १९९४ पासून पू. दातेआजी सनातनच्या संपर्कात आहेत. प्रारंभी पुण्यात जेव्हा संस्थेचे कार्य चालू झाले, तेव्हा दाते, फणसळकर, डॉ. कुलकर्णी अशी काहीच साधक कुटुंबे होती. त्यामुळे साहजिकच प्रसारानिमित्त आलेले अनेक साधक घरी बैठकीच्या निमित्ताने अथवा मुक्कामासाठी येत असत. त्या सर्व साधकांचा अल्पाहार, भोजन इत्यादींचे दायित्व पू. आजी स्वतःकडे घेऊन ती सेवा उत्तमरित्या पार पाडत. प्रत्येक साधकाच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे करण्याचा पू. आजींचा प्रयत्न असतो. एवढ्या वर्षांनीही पू. आजींना ‘साधकांना काय आवडते ?’, हे लक्षात आहे.

४ आ. सनातनच्या संपर्कात आल्यावर कर्मकांडानुसार साधना न्यून करणे

पू. आजी सनातनच्या संपर्कात आल्यावर त्यांना पुढच्या टप्प्याचे अध्यात्म समजले आणि त्यांनी आपणहून कर्मकांडानुसार साधना न्यून केली.

५. साधनेची वाटचाल

५ अ. नियमितपणे सत्संगाला जाणे, अंकांचे वितरण करणे आणि मुलगा अन् सून सेवेसाठी बाहेर गेल्यावर ‘घरी आलेल्या साधकांचे प्रेमाने करणे आणि नातीला सांभाळणे’, हे सर्व निरपेक्ष भावाने करणे

सनातनच्या संपर्कात आल्यापासून सांगितलेले जेवढे कृतीत आणता येईल, तेवढे आणण्याचा पू. आजींचा प्रयत्न असतो. प्रारंभी त्या सत्संगाला नियमितपणे जात असत. पू. फडकेआजींच्या समवेत अंकांचे वितरण करणे, फेरीत सहभागी होणे, असे त्यांच्या सेवेचे स्वरूप असे. त्या वेळी डॉ. दाते प्रसारासाठी बाहेर जात असत आणि मी (सौ. ज्योती दाते) सत्संग घेण्यास जात असे. तेव्हा घरी आलेल्या साधकांचे प्रेमाने करणे, माझ्या मुलीला सांभाळणे, हे सर्व त्या निरपेक्ष भावाने करत.

५ आ. पू. आजींनी मुलगा आणि सून यांचा व्याख्यानाचा सराव करवून घेणे आणि चुका सांगून साहाय्य करणे

काही वेळा प.पू. गुरुदेवांचे वास्तव्य घरी असे. तेव्हा प.पू. गुरुदेव आम्हाला सांगायचे, ‘‘तुम्ही घरात थांबू नका. प्रसाराला जा. आमचे बघायला दातेआजी घरात आहेत.’’ प्रसारात व्याख्याने घेण्याची सेवा आम्हाला (डॉ. दाते, श्री. निरंजन दाते आणि सौ. ज्योती दाते यांना) मिळाल्यावर पू. आजी आमचा सराव करवून घेत असत आणि लक्षात आलेल्या चुका सांगून व्याख्यान व्यवस्थित होण्यासाठी आम्हाला साहाय्य करत.

५ इ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या पंच्याहत्तरीला पू. आजी इंदूरला आल्या होत्या. तेव्हा लहान नातीला सांभाळून भाजी चिरणे, निवडणे, अशा सेवा त्यांनी ८ दिवस केल्या.

५ ई. दोन्ही मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी मनापासून अनुमती देणे

‘दोन्ही मुलांनी पूर्णवेळ साधक होणे’, हे पू. आजींनी आनंदाने आणि विनातक्रार स्वीकारले अन् मुलांना पूर्णवेळ साधना करण्यास मनापासून अनुमती दिली. नातेवाइकांनी याला बराच विरोध केला होता; पण पू. आजी खंबीरपणे त्याला सामोर्‍या गेल्या.

५ उ. संस्थेची नियतकालिके चालू झाल्यावर काही वर्षे पू. आजींनी त्यांच्या आजूबाजूला संपर्क करून आणि काही नातेवाइकांना सांगून अंकासाठी विज्ञापने आणली.

५ ऊ. समष्टीसाठी नामजप करणे

पहाटे ३.३० – ४ वाजता उठून पू. आजी जप करतात. असे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अखंड चालू आहे. दिवसभरातही अधिकाधिक जप करण्यावर त्यांचा भर असतो. त्या गेल्या अनेक वर्षांपासून समष्टीसाठी नामजप करत आहेत. संस्थेच्या एखाद्या कार्यात कोणते विघ्न आल्यास त्या श्रीकृष्णाला पुष्कळ तळमळीने प्रार्थना करतात.

६. भाव

६ अ. यजमानांच्या आजारपणात प.पू. गुरुदेवांनी त्यांना भेटण्यास येणे, त्यांच्या अंतकाळीही प.पू. गुरुदेवांनी आवर्जून येणे, त्यानंतर त्यांचे शांतपणे निधन होणे आणि त्यामुळे पू. आजींच्या मनात गुरुदेवांप्रती अत्यंत कृतज्ञतेचा भाव असणे

पू. आजींचे यजमान कै. मोहनराव दाते यांचीही प.पू. गुरुदेवांवर अतूट श्रद्धा होती. त्यांना गंभीर आजार होता. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने एका मासात (महिन्यात) ६ ते ८ वेळा डायालिसिस करावे लागत असे. त्या वेळी प.पू. गुरुदेव सतत दादांची (कै. मोहन दाते यांची) विचारपूस करत अन् त्यांना भेटण्यास येत. दादांच्या अंतकाळीही प.पू. गुरुदेव दादांना भेटण्यास मुद्दाम आले होते. त्यानंतर त्यांचे अतिशय शांत निधन झाले. याविषयी पू. आजींच्या मनात गुरुदेवांप्रती अत्यंत कृतज्ञतेचा भाव आहे.

६ आ. पू. आजी नातींना सांभाळण्यासाठी घरी थांबल्यावर मार्गदर्शनात सांगितलेली सूत्रे प.पू. गुरुदेवांनी पू. आजींना रात्री सांगणे आणि त्यामुळे पू. आजींची भावजागृती होणे

प.पू. गुरुदेवांचे जेव्हा पुण्यात मार्गदर्शन असे, तेव्हा पू. आजी नातींना सांभाळण्यासाठी घरी थांबत असत. प.पू. गुरुदेव आजींना मार्गदर्शनात सांगितलेली सूत्रे रात्री सांगत असत. तेव्हा पू. आजी नेहमी म्हणायच्या, ‘‘मला यायला जमले नाही, तरी परात्पर गुरु डॉक्टर माझा किती विचार करतात ! मला सर्व सूत्रे सांगतात.’’ हे सांगतांना त्यांची भावजागृती व्हायची.

७. श्रद्धा

७ अ. नातीला नोकरी न लागणे आणि त्या वेळी पू. आजींनी तिला ‘प.पू. गुरुदेव तुला चांगल्या वातावरणात पाठवतील, तू धीर धर’, असे सांगणे

पू. आजींची नात सौ. पूर्वा कुलकर्णी हिला लग्नापूर्वी नोकरी लागत नव्हती. तेव्हा ती पू. आजींजवळ रडायची. तेव्हा पू. आजी तिला समजावून सांगत असत. त्या म्हणत, ‘‘प.पू. गुरुदेवांना तुला रज-तमाच्या वातावरणात पाठवायचे नाही. जिथे चांगले वातावरण आहे, तिथेच तुला पू. गुरुदेव पाठवतील. तू धीर धर.’’

७ आ. ‘घराचे रक्षण परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण करतात’, अशी श्रद्धा असणे

कधी घर बंद करून जावे लागले, तर त्या परात्पर गुरु डॉक्टर / श्रीकृष्ण यांना प्रार्थना करतात, ‘घराचे रक्षण करा’ आणि घरी आल्यावर कृतज्ञता व्यक्त करतात. पू. आजींची श्रद्धा आहे की, ही वास्तू तेच सांभाळतात आणि तिचे रक्षण करतात.

७ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काही सांगितले की, ते होणारच आहे’, अशी दृढ श्रद्धा असणे

२ दिवसांपूर्वी पू. आजींना जरा बरे वाटत नव्हते. त्यांच्या छातीत थोडे दुखत होते. आधुनिक वैद्यांकडे जायला निघतांना त्यांनी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच माझे रक्षण करा. कोणताही दोष (आजार) नको निघू दे.’ प्रत्यक्षात पडताळणी झाल्यावर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘सगळे ठीक आहे.’’ यावर पू. आजी म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरच माझे रक्षण करत असतात’’ आणि त्यांची भावजागृती झाली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना काही सांगितले की, ते होणारच आहे’, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.

८. सनातनचे संत आणि सद्गुरु यांच्याविषयी पू. आजींच्या मनात अत्यंत आदरभाव असणे

सनातनचे सर्व संत आणि सद्गुरु यांच्याविषयी पू. आजींच्या मनात अत्यंत आदरभाव आहे. सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) यांच्यावरही त्यांचा अत्यंत जीव आहे. ‘सद्गुरु ताई घरी येणार’, असे समजले की, त्यांचा उत्साह वाढतो. त्यांच्यासाठी ‘काय करू आणि काय नको ?’, अशी त्यांची अवस्था होते. ‘त्यांना काय आवडते ?’, ते करण्याची पू. आजींची लगेच लगबग चालू होते.

९. पू. आजींमध्ये जाणवलेले पालट

९ अ. ‘काटकसरीपणा आणि इतरांचा विचार करणे’, या अंगभूत गुणांत वाढ होणे

मुळातच पू. आजींमध्ये असलेले काटकसरीपणा, इतरांचा विचार करणे, हे दैवी गुण साधनेमुळे मोठ्या प्रमाणात वाढले. त्यासाठी त्या सातत्याने आणि चिकाटीने प्रयत्न करतात.

९ आ. प्रेमभाव व्यापक झाल्याचे जाणवणे

केवळ घरातले, साधक, नातेवाईक यांच्यावरच त्या प्रेम करतात, असे नसून घराशेजारील वॉचमनची मुले, भांडी घासायला येणार्‍या ताई, दूध आणणारे काका, या सगळ्यांशी त्या अत्यंत प्रेमाने बोलतात अन् त्यांना साहाय्य करतात.

९ इ. अपेक्षांचे प्रमाण न्यून होणे

त्यांच्या घरातल्यांकडून असलेल्या अपेक्षा पुष्कळ न्यून झाल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट निरपेक्ष भावाने करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

९ ई. ‘स्वतःचे मन निर्मळ असायला हवे’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणे

आजी आमच्या चुका अत्यंत प्रेमाने सांगून आम्हाला त्यांची जाणीव करून देतात. ‘स्वतःचे मन निर्मळ असायला हवे. कुणाविषयी मनात किंतु नको’, यासाठी पू. आजी तळमळीने प्रयत्न करतात. कुणी पू. आजींच्या मनाविरुद्ध वागले किंवा कुणीही वाईट वागले, तरी त्या ते मनात न ठेवता त्याच्याशी चांगलेच वागतात. ‘समोरची व्यक्ती कशीही वागू दे. आपण ते मनात न ठेवता त्याच्याशी चांगलेच वागले पाहिजे’, ही त्यांची आम्हाला सतत शिकवण असते.

९ उ. चुका लगेच स्वीकारणे आणि चुका झाल्याविषषयी खंत वाटणे

आजींना त्यांच्या चुका सांगितल्या, तर पूर्वी त्या स्वीकारतांना त्यांचा संघर्ष व्हायचा; पण आता कोणतीही चूक सांगितली, तर त्यांना त्याची पराकोटीची खंत वाटते. ‘मी अशी कशी वागले ?’, असे वाटून त्यांना रडू येते.

एकदा आजी नातीला (सौ. पूर्वा कुलकर्णी यांना) म्हणाल्या, ‘तू हल्ली मला भेटायला का येत नाहीस ? तुला माझ्याशी बोलावेसे वाटत नाही का ?’ त्या वेळी नातीला वाईट वाटून रडू आले. तिचे रडणे पाहून पू. आजींना इतकी खंत वाटली की, त्यांनी पूर्वाची क्षमा मागितली आणि म्हणाल्या, ‘‘माझ्यामुळे तुला त्रास झाला. मी तुला असे वाक्य बोलायला नको होते.’’

९ ऊ. ‘पू. आजींची बुद्धी तीक्ष्ण होत आहे’, असे जाणवणे

‘दिवसेंदिवस पू. आजींची बुद्धी तीक्ष्ण होत आहे’, असे मला जाणवते. त्यांना कोणत्याही सूत्राचे पटकन आकलन होते आणि ‘त’वरून ताकभात’ असे ओळखता येते. त्यांना साधकांची नावे, त्यांच्या आवडी अगदी तंतोतंत आठवतात. कोणतेही सूत्र वहीत लिहिलेले नसतांना त्या नेमकेपणाने आणि वेळोवेळी एखाद्या सूत्राचा पाठपुरावा घेतात.

९ ए. स्वतःकडे न्यूनपणा घेऊन उत्तरे देणे

आजी पुष्कळ मार्मिकपणे, नेमकेपणाने आणि स्वतःकडे न्यूनपणा घेऊन उत्तरे देतात, उदा. एकदा त्यांची नात (सौ. सृष्टी) त्यांना एक सूत्र विचारत होती आणि ‘आजी, तू संत आहेस. तुला यायला पाहिजे’, असे ती म्हणाली. त्यावर पू. आजी म्हणाल्या, ‘‘मी ‘ढ’ संत आहे; म्हणून मला येत नाही.’’

९ ऐे. तोंडवळा निरागस दिसणे

पू. आजींचा तोंडवळा काही वेळा अत्यंत निरागस अशा लहान बाळासारखा दिसतो. एखाद्या बाळाप्रमाणेच त्या कधी कधी खुदकन हसतात.

९ ओ. त्यांची त्वचाही लोण्यासारखी मऊ झाली आहे.

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले साधनेविषयीचे दृष्टीकोन आणि त्याप्रमाणे करत असलेले प्रयत्न

अ. प.पू. गुरुदेव जसे सर्वांवर निरपेक्ष प्रेम करतात, तसे करण्याचा पू. आजींचा प्रयत्न असतो.

आ. पू. आजी नेहमी सांगतात, ‘‘प.पू. गुरुदेवांना तत्परता अपेक्षित असते.’’ यासाठी त्या स्वतः पुष्कळ प्रयत्न करतात. घरातील कोणतीही कृती किंवा सेवा तत्परतेने पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

इ. ‘प.पू. गुरुदेवांना काटकसर आवडते. तसे करण्यास आपण शिकले पाहिजे’, असे पू. आजी सांगतात. त्याप्रमाणे त्या स्वतः जिथे शक्य आहे, तिथे ‘काटकसरीपणा’ हा गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करतात.

ई. पू. आजी सतत सांगत असतात, ‘‘आपल्याकडून कुणी दुखावले जायला नको. तुम्ही बाहेर प्रसारात ज्यांच्याकडे जाता, त्यांना असे वाटले पाहिजे की, या साधकाने पुनःपुन्हा आपल्याकडे यायला हवे. असे तुमचे वागणे पाहिजे.’’

११. आलेल्या अनुभूती

११ अ. ६० ते ७० टक्के आध्यात्मिक पातळी असतांना आलेल्या अनुभूती

११ अ १. बाळकृष्णाच्या पितळी मूर्तीला अंघोळ घालतांना त्याचा स्पर्श जाणवणे

एकदा पू. आजी देवाची पूजा करत होत्या. देवघरात बाळकृष्णाची पितळी मूर्ती आहे. त्या मूर्तीला अंघोळ घालता-घालता त्या बाळकृष्णाला म्हणत होत्या, ‘तू लोण्याने किती माखला आहेस. आता तुला अंघोळीसाठी गरम पाणी घ्यायला हवे.’ अंघोळ झाल्यावर बाळकृष्ण म्हणाला, ‘बघ, आता मी किती स्वच्छ झालो ! आता माझी पापी घे.’ ‘हा बाळकृष्ण हातात घेतला आहे आणि त्याचा स्पर्श जाणवत आहे’, अशी अनुभूती पू. आजींना पुष्कळ वेळा आली आहे.

११ अ २. ‘देव लहानात लहान इच्छा पुरवतो’, अशी अनुभूती येणे

‘कोणतीही गोष्ट परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितली की, ती पूर्ण होतेच’, अशी मला नेहमी अनुभूती येते’, असे पू. आजींनी सांगितले. ‘देव लहानात लहान इच्छा पुरवतो’, अशी त्यांना अनुभूती येते, उदा. एकदा सकाळच्या वेळेत त्या सहज मला म्हणाल्या होत्या, ‘‘घरातील बेदाणे संपले आहेत. तू दुकानात जाशील, तेव्हा घेऊन ये.’’ त्याच संध्याकाळी पू. क्षत्रीयकाकांनी नाशिकहून बेदाण्याचे पाकीट पाठवले होते.

११ अ ३. कोणत्याही सत्संगानंतर आपण शेवटी ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ….’, ही प्रार्थना करतो. पू. आजींना नंतर ती परत-परत सुस्पष्टपणे ऐकू येत असते.

११ आ. संत झाल्यानंतर (७० टक्के आध्यात्मिक पातळीनंतर)

११ आ १. पू. आजी नियमितपणे पहाटे उठून जप करतात. तेव्हा त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून खोलीतून गेलेले दिसतात.

११ आ २. बागेमधील झाडांना फुले यायचे बंद झाल्यावर पू. आजींनी देवाला कळवळून प्रार्थना करणे आणि त्यानंतर झाडांना भरपूर फुले येऊ लागणे

२ मासांपूर्वी घराजवळील बागेमधील जास्वंद, कण्हेर, सोनचाफा या झाडांना फुले यायचे बंद झाले होते. तेव्हा पू. आजी देवाला कळवळून प्रार्थना करत, ‘देवा, आमचे काय चुकले ? तू आमच्यावर का रागावला आहेस; म्हणून या झाडांना फुले येत नाहीत ? चुकले असेल, तर आम्हाला क्षमा कर.’ तेव्हा अशी अनुभूती आली की, या सर्व झाडांना आता भरपूर फुले यायला लागली आहेत. ‘ही झाडे पू. आजींसाठीच फुलत आहेत. त्यात त्यांना पुष्कळ आनंद मिळत आहे’, असे आम्हाला जाणवते.

११ आ ३. बागेतील जुईच्या फुलांना दैवी सुगंध येणे

बागेत जुईच्या फुलांचे साधारण १० वर्षांपूर्वी लावलेले झाड आहे. या वर्षी हे झाड इतके बहरले आहे की, त्या झाडाला पानांपेक्षा फुले अधिक आहेत. सर्वसाधारणतः १० वर्षांच्या झाडाला एवढी फुले येत नाहीत. या फुलांचा सुगंध अत्यंत दैवी आहे आणि २० फुटांच्या अंतरावरूनही हा सुगंध येतो.

११ आ ४. शेजारच्या बंगल्यातील रामफळाच्या झाडाच्या फांद्या पू. आजींच्या घराच्या आगाशीत झुकणे, त्याला झाडाला ७ – ८ रामफळे लागणे आणि ‘पू. आजींना रामफळ आवडत असल्याने समर्पित होण्यासाठी ही फळे पू. आजींच्या घराच्या बाजूला लागली’, असे वाटणे

यंदाच्या मे – जून मासात शेजारच्या बंगल्यातील रामफळाच्या झाडाच्या फांद्या आमच्या घराच्या आगाशीत झुकल्या. झाडाला ७ – ८ रामफळे लागली. ती आगाशीतून सहज काढता येण्यासारखी होती. या रामफळांचा आकार पुष्कळ मोठा होता आणि त्याचे माधुर्यही अप्रतिम होते. पू. आजींना रामफळ पुष्कळ आवडते आणि ते खातांना त्यांना सतत प.पू. गुरुदेवांची आठवण येते. ‘त्यामुळेच ही फळे समर्पित होण्यासाठी आपल्या बाजूला लागली’, असे मला वाटले. ज्यांचे झाड आहे, त्यांच्या बाजूला एखाद-दुसरेच फळ लागले होते.

११ आ ५. पक्ष्यांचे घराजवळील झाडावर येण्याचे प्रमाण वाढणे

पू. आजींचे वास्तव्य असल्याने पक्ष्यांचे घराजवळील झाडावर येण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. भारद्वाज, कोकिळा, असे पक्षी, तसेच फुलपाखरेही दिसण्याचे प्रमाण वाढले आहे.

११ आ ६. पू. आजींच्या आसंदीत बसल्यावर उपाय होणे

पू. आजी नेहमी वेताच्या एका लहान आसंदीत बसलेल्या असतात. ‘त्या आसंदीत बसल्यावर उपाय होतात. नामजप चांगला होतो’, अशी अनुभूती साधकांना येते.

११ आ ७. पू. आजींच्या साडीचा स्पर्श मऊ आणि उबदार जाणवणे

पू. आजी सुती साड्या नेसतात. त्यांच्या साडीचा स्पर्श अतिशय मऊ आणि उबदार जाणवतो, तसेच त्यांच्या साडीला इस्त्री नसली, तरीही ती त्यांच्याकडून अगदी व्यवस्थित नेसली जाते. ती चुरगळलेली वाटत नाही.

१२. घरातील खोल्यांमध्ये जाणवलेले पालट

पू. आजींच्या वास्तव्यामुळे घरातील प्रत्येक खोलीत पालट जाणवतो.

अ. ‘प्रत्यक्षापेक्षा खोली पुष्कळ मोठी आहे’, असे अनेक साधकांना जाणवते.

आ. घरातील पहिल्या मजल्यावर जी खोली आहे (जेथे प.पू. गुरुदेव आणि अनेक संत यांनी वास्तव्य केले आहे), त्या खोलीत गेल्यावर उपाय होतात. त्या खोलीची लादी गुळगुळीत झाली आहे, तसेच इतर खोल्यांच्या तुलनेत या खोलीत गारवा आणि नीरव शांतता (गाभार्‍यात असते तशी) अनुभवायला येते.

१३. पू. दातेआजींच्या सान्निध्यात रहाण्याचे भाग्य लाभल्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता
आणि ‘पू. आजींच्या सत्संगाचा लाभ करून घेता येण्यासाठी प्रयत्न व्हावेत’, यासाठी केलेली प्रार्थना !

गुरुपौर्णिमेच्या या काळात मला भगवंताने ही भावाने ओथंबलेली सेवा दिली, याबद्दल कृपाळू गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. माझी काहीच पात्रता नसतांना केवळ आणि केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच पू. दातेआजींच्या सान्निध्यात रहाण्याचे, त्यांच्याकडून शिकण्याचे भाग्य मला लाभले आहे. ‘भगवंताने माझ्यावर अनंत उपकार केले आहेत; पण त्याचा लाभ करून घेण्यात मी अत्यल्प पडत आहे’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.

‘हे परम दयाळू गुरुमाऊली, ‘पू. आजींच्या सत्संगाचा लाभ कसा करून घेऊ ?’, हे आपणच मला शिकवा. पू. आजींमध्ये असलेले गुण, त्यांची तळमळ, भाव, श्रद्धा यांतून मला शिकता येऊ दे आणि त्याप्रमाणे माझे प्रयत्न होऊ देत’, अशी आपल्या पावन चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे. कृतज्ञ आहे गुरुदेवा !’

– सौ. ज्योती दाते (पू. दातेआजींची सून), पुणे (१२.७.२०१८)

पू. आजींविषयीची सूत्रे लिहितांना ‘प्रत्येक सूत्र स्वतःसाठीच लिहिले जात आहे’, असे वाटून भावजागृती होणे : ‘पू. आजींविषयीची ही सूत्रे लिहितांना मी एका वेगळ्याच भावविश्‍वात आहे’, असे मला जाणवत होते. प्रत्येक सूत्र लिहितांना ‘ते माझ्यासाठीच लिहिले जात आहे’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.’ – सौ. ज्योती दाते (पू. दातेआजींची सून), पुणे (१२.७.२०१८)