लोकशाही राज्यव्यवस्थेने आजपर्यंत सुराज्य दिले नाही ! – अभय वर्तक, सनातन संस्था

गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेचा जागर !

मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, तसेच उत्तर महाराष्ट्र येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजर्‍या !

पू. (सौ.) संगीता जाधव

गुरुपौर्णिमा अर्थात गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु शिष्याला आत्मज्ञान देऊन त्याची जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका करतात. गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. आज देशाची परिस्थिती पहाता हिंदूंना कुणी वाली उरलेला नाही. साधनेसाठीही प्रतिकूल वातावरण आहे. त्यामुळे ही परिस्थिती पालटणे आणि हिंदूंना साधनेसाठी अनुकूल वातावरण सिद्ध करणे आज क्रमप्राप्त बनले आहे. यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनीही उपस्थित वक्त्यांच्या प्रबोधनपर मार्गदर्शनांतून हिंदु राष्ट्र स्थापनेचाच जागर करण्यात आला.

मुंबई –  मुलुंड आणि वसई, तसेच नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात सकाळच्या सत्रात साधकांना साधनेविषयक मार्गदर्शन करण्यात आले, तसेच गुणवंत विद्यार्थी आणि धर्मप्रेमी यांची सत्कार करण्यात आला, तर सायंकाळच्या सत्रात धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्याकरिता मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंड येथील गुरुपौर्णिमेला सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी चालू असलेले हिंदु संघटनाचे कार्य विषद करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. अंतिम सत्रामध्ये प्रथमोपचार आणि स्वरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

सत्कार

मुलुंड

१. इयत्ता दहावीत ८५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याविषयी बालसाधिका कु. संस्कृती गुरव हिचा सत्कार करण्यात आला.

२. धर्मकार्यात वेळोवेळी साहाय्य करणारे भाजपचे नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांचा सत्कार करण्यात आला.

वसई

१. धर्मकार्यातील उल्लेखनीय सहभागाविषयी भाजपचे अंधेरी शहर अध्यक्ष श्री. वसंत दहिफळे यांचा सत्कार करण्यात आला.

२. इयत्ता दहावीत ९४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याविषयी बालसाधक कु. सनत पेडणेकर याचा सत्कार करण्यात आला.

विशेष सहकार्य

१. श्री. प्रभानंद राणे यांनी गुरुपौर्णिमेसाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

२. भाजपचे नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी गुरुपौर्णिमेच्या प्रसारसेवेसाठी खोली विनामूल्य उपलब्ध करून दिली.

ग्रंथ प्रकाशन

सनातननिर्मित ‘रिमूव्हल ऑफ पर्सनॅलीटी डिफेक्ट्स थ्रू ऑटोसजेशन’ आणि ‘हाऊ टू आयडेंटीफाय पर्सनॅलीटी डिफेक्ट्स इन अवरसेल्फ’ या दोन इंग्रजी भाषेतील नूतन ग्रंथांचे, तसेच ‘गुरुपौर्णिमा महोत्सव स्मरणिका-२०१८’चे सनातनच्या पू. (सौ.) संगिता जाधव यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

उपस्थिती

मुलुंड येथील गुरुपौर्णिमेला ३२५ जिज्ञासू आणि धर्मप्रेमी, तसेच २०० साधक उपस्थित होते.

वसई येथील गुरुपौर्णिमेचा ४०० जणांनी लाभ घेतला.

खारघर येथील गुरुपौर्णिमेला ४०० साधक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

 

मार्गदर्शन

‘धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ या विषयावर खारघर येथे सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांनी, मुलुंड येथे सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी, तर वसई येथे हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे !  अधिवक्ता खुश खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल पार्टी युवा मोर्चा

खुश खंडेलवाल

भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केले, तर भारतीय लोकशाही धोक्यात येईल, अशा प्रकारचा अपसमज  सध्या समाजात पसरवला जात आहे. आजमितीला भारतात ७० टक्क्यांहून अधिक हिंदु आहेत, तरीही भारतीय लोकशाही शाबूत आहे, मग हिंदु राष्ट्रात ती धोक्यात कशी येईल ? आज हिंदूंना जातीयवादी म्हणून हिणवले जाते. मुसलमान आणि ख्रिस्ती शासक भारतात येण्यापूर्वी भारत हिंदु राष्ट्रच होते. अखिल मानवजातीचे कल्याण साधणारा एकमेव हिंदु धर्म आहे, हे जगाने ओळखले आहे, त्यामुळे अनेक जण आज हिंदु धर्माचा स्वीकार करू लागले आहेत. भारतीय धर्मशास्त्रावर विदेशी निर्मात्यांनी चित्रपट बनवले आहेत; मात्र आपल्या धर्माचे महत्त्व दुर्दैवाने आपल्यालाच अद्याप कळलेले नाही. राजा साधकप्रवृत्तीचा आणि इंद्रियनिग्रह केलेला असला, तरच प्रजा खर्‍या अर्थाने सुखी होते. आज परिस्थिती तशी नाही. गीतेत सांगितल्याप्रमाणे पांडवांचा विजय निश्‍चित होता; कारण भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमवेत होते. त्यामुळे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे; कारण भगवान श्रीकृष्ण आज आपल्यासमवेत आहेत.

खारघर

एकाच जागी स्थिर रहाणार्‍या सायकलीसारखी व्यवस्था इंग्रजांनी
हा देश सोडतांना निर्माण केली ! – शिवकुमार पांडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

शिवकुमार पांडे

काही सायकली अशा असतात, की कितीही पॅडल मारले, तरी त्या पुढेच जात नाहीत. इंग्रजांनी भारत सोडतांना तशाच प्रकारची व्यवस्था भारतात निर्माण केली होती. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र निर्माण करणे हा एकमेव पर्याय आहे. पूर्वी योद्धा रणभूमीवर लढतांना दिसला की लोक म्हणायचे की हा अमूक एका गुरूंचा शिष्य लढतो आहे. जसे परशुरामांचा भीष्म, द्रोणाचार्यांचा अर्जुन ही त्या शिष्यांची ओळख होती. इंग्रजांनी धूर्तपणे काँग्रेसची स्थापना केली. धर्मनिरपेक्षतेच्या आडून आमची शिक्षणपद्धती कह्यात घेतली. येथील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी राष्ट्रवाद आणि धर्मवाद शिकवला नाही. तो शिकवल्यास पुढे मुले शिवाजी महाराजांप्रमाणे निर्माण होतील.

लोकशाही राज्यव्यवस्थेने आजपर्यंत सुराज्य दिले नाही ! – अभय वर्तक, सनातन संस्था

अभय वर्तक

येथील राज्यव्यवस्थेने आजपर्यंत कोणतेही सुराज्य दिलेले नाही. धर्मनिरपेक्ष व्यवस्था ही मुळात भारतातील नसून युरोपातील आहे. तेथील राजसत्तेविरुद्ध लोकांनी बंड करू नये यासाठी ती निर्माण केली होती. आज देणगी दिल्याविना येथील शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही. स्वातंत्र्यापूर्वी देशात असलेली गुरुकुल शिक्षणपद्धती आदर्श शिक्षण व्यवस्था होती. भारत हे अनादी काळापासून स्वयंभू हिंदु राष्ट्र होते. आपल्या शेकडो सम्राटांनी, ऋषीमुनींनी निर्माण केलेली न्यायव्यवस्था, राज्यव्यवस्था, नगररचना शास्त्र, अर्थशास्त्र यांनुसार ४ युगांपासून यशस्वी शासन यंत्रणा चालवली गेेली आहे. आम्ही त्यानुसार हिंदु राष्ट्र चालवू. धर्मनिरपेक्षतेचे बाळकडू राज्यकर्ते, बुद्धिवादी, प्रसारमाध्यमे यांनी हिंदूंना पाजले. त्यामुळे हिंदूंनी आपली संस्कृती, शास्त्र, परंपरा यांचा त्याग केला आहे. ते सर्व पुनरुज्जीवित करण्यासाठी आता हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे.

वसई

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या आज्ञेने हिंदु राष्ट्रासाठी कार्य करून
प्रत्येक हिंदूने स्वतःचेही कल्याण करून घ्यावे ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

विश्‍वात केवळ हिंदु धर्मच स्वयंभू आहे. हिंदु धर्माएवढी व्यापकता, सर्वसमावेशकता, विश्‍वकल्याणाची भावना अन्य कोणत्याही धर्मात किंवा पंथात नाही. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या आज्ञेने हिंदवी स्वराज्य स्थापन केले, स्वामी विवेकानंदांनी गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या आज्ञेने हिंदु धर्माची पताका विश्‍वभरात फडकवली, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आज्ञेने हिंदु राष्ट्रासाठी कार्य करून प्रत्येक हिंदूने स्वतःचेही कल्याण करून घ्यावे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाने आम्हाला मिळालेल्या मार्गदर्शक गुरूंमुळे आणि त्यांनी सांगितलेल्या साधनेमुळे आम्हा सर्वांच्या जीवनात पुष्कळ पालट झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाने साधना करणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात