अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि रुग्णाईत असतांनाही कृतज्ञतेच्या भावात रहाणार्‍या श्रीमती सत्यवती दळवीआजी (वय ८३ वर्षे) ७७ व्या संतपदी विराजमान !

साक्षात संतमुखातूनच घोषणा झाली संतपदाची । कृतज्ञतेची भावमुद्रा अनुभवली सर्वांनी पू. दळवीआजींची ॥
पू. आजींच्या मुखावर कृतज्ञतेचे भाव दाटले । गुरुदेवांचा मान म्हणून पू. ताईंनी हार घातल्याचे पू. आजींनी स्वीकारले ॥
पू. अश्‍विनीताईंमध्ये श्रीगुरूंना पाहूनी । कृतज्ञतापुष्पे अर्पिली पू. दळवीआजींनी ॥
परात्पर गुरु पांडे महाराज वंदन करिती । कृतकृत्य झाल्याचा क्षण पू. दळवीआजीही अनुभवती ॥

संतद्वयींच्या आलिंगनाचा भावक्षण अनमोल । कृतज्ञता अंतरी, दाटले नयन ॥

पू. दळवीआजींची आध्यात्मिक सखी असलेल्या पू. मराठेआजी गळाभेट घेऊन आनंद व्यक्त करतांना

चैतन्यदायी सोहळ्याच्या प्रसंगी पू. (श्रीमती) दळवीआजी आणि पू. (श्रीमती) मराठेआजी यांनी घेतलेली एकमेकींची गळाभेट म्हणजे जणू निरपेक्ष प्रीतीचे मूर्तीमंत उदाहरणच !

गुरुभक्तीत रममाण असलेल्या गुरुभगिनी पू. (श्रीमती)
शालिनी नेनेआजी आणि पू. (श्रीमती) दळवीआजी यांच्या भावपूर्ण भेटीचा क्षण !

पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी आणि पू. (श्रीमती) दळवीआजी देवद आश्रमात एकाच खोलीत वास्तव्य करत आहेत. पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी या वयोमानामुळे संत सन्मान सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत; मात्र दोघींमध्ये असलेले आध्यात्मिक मैत्रीचे नाते या छायाचित्रातूनच जाणवते.

पू. (श्रीमती) दळवीआजी खोलीत गेल्यावर पू. (श्रीमती) नेनेआजी म्हणाल्या, ‘‘आता ही संतांची खोली झाली.’’ त्यावर पू. (श्रीमती) दळवीआजी म्हणाल्या, ‘‘ही इमारतच संतांची झाली.’’ (पू. (श्रीमती) दळवीआजी यांची खोली असलेल्या आश्रमाच्या इमारतीत त्या धरून १२ संत रहातात. – संकलक) या वेळी पू. (श्रीमती) नेनेआजी म्हणाल्या, ‘‘तुम्ही माळा बनवण्याची सेवा करता, आज गुरुदेवांनी तुमच्या गळ्यात माळ घातली.’’ (पू. (श्रीमती) दळवीआजी नामजपाच्या माळा बनवण्याची सेवा करतात. – संकलक)

सनातन परिवाराच्या सहवासात झाला संत सन्मान सोहळा ।

पू. दळवीआजींच्या कुटुंबियांनी आनंदीआनंद अनुभवला ॥

(डावीकडून उभे) सौ. विनया तावडे (नातसून), चि. सहर्ष तावडे (पणतू), सौ. वैदेही शितोळे (नातसुनेची बहीण), सौ. स्मिता तावडे (मुलगी), सौ. मंदा शिंदे (सुनेची आई), सौ. केतकी परब (नात) आणि कु. अद्वैत परब (पणतू), पू. दळवीआजींच्या शेजारी नातू कु. समय दळवी आणि नात कु. विधी दळवी, पू. आजींच्या पुढे बसलेला पणतू कु. देवस तावडे

 

देवद आश्रमात जमली संत-सद्गुरु यांची चैतन्यरूपी मांदियाळी ।

साधकजनांनी कृतज्ञतेची भावसुमनांजली त्यांच्या चरणी वाहिली ॥

(डावीकडून उभे असलेले) सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. सदाशिव (भाऊ) परब, पू. पद्माकर होनप, पू. (सौ.) अश्‍विनी पवार, पू. रमेश गडकरी, पू. महादेव नकाते आणि पू. उमेश शेणै, (डावीकडून बसलेले) पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा, पू. गुरुनाथ दाभोळकर, परात्पर गुरु पांडे महाराज, पू. (श्रीमती) दळवीआजी, पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी आणि पू. सुदामराव शेंडेआजोबा

…अशी झाली संतपदाची घोषणा !

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा चैतन्यदायी सोहळाही केवळ गुरूंच्या कृपेमुळेच सर्वांना अनुभवायला मिळत आहे’, असे सांगून सूत्रसंचालन करणार्‍या सौ. अनघा जोशी यांनी गुरूंची महती वर्णन केली. त्यानंतर त्यांनी अतिशय भावपूर्ण गायलेल्या ‘गुरुवीण नाही दुजा आधार’ या भावगीतामुळे सभागृहातील वातावरण चैतन्यमय होऊन साधक अधिकच भावविभोर झाले… त्यानंतर गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणाकडे शब्दच नव्हते ! सर्व जण या अवस्थेत असतांनाच ‘एका भक्ताचे भावगुपित भगवंताने आज उलगडले आहे’, असे सांगून पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी श्रीमती सत्यवती दळवीआजी ७७ व्या संतपदी विराजमान झाल्याची घोषणा केली. ती ऐकताक्षणीच श्रीमती दळवीआजींचा भाव दाटून आला. या वेळी उपस्थित असलेल्या आजींच्या कुटुंबियांचीही भावजागृती झाली.

प्रतीवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांच्या सत्काराचा अथवा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम सनातनच्या आश्रमामध्ये असतो. ‘या वेळीही काहीतरी कार्यक्रम असणार’, असे सर्व साधकांना आतून वाटत होते; परंतु आश्रमामध्ये कार्यक्रमाची पूर्वसिद्धता मुख्य सभागृहामध्ये दिसत नव्हती. आश्रमातील सर्वांचे मन सेवेमध्ये असूनही कार्यक्रमाच्या सिद्धतेचा कानोसा घेत होते ! सर्वजण कार्यक्रमाचा निरोप येण्याची वाट पहात होते; परंतु सर्वांनाच या सोहळ्याचा आनंददायी धक्का देण्याच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय पद्धतीने कार्यक्रमाची सिद्धता लहान सभागृहामध्ये करण्यात आली होती ! शेवटी हे गुपित आश्रमात सर्वांच्या कर्णोपकर्णी झाले आणि कार्यक्रम चालू झाल्याचे सर्वांना समजले. आरंभी श्रीमती पट्टणशेट्टीआजी ६१ टक्के झाल्याची आनंदवार्ता देण्यात आली… त्यानंतर भावपूर्ण वातावरणातच पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी गुरूंची महती वर्णन करत श्रीमती सत्यवती दळवीआजी संत झाल्याचे घोषित केले ! हे ऐकताच काही जण भावस्थितीत गेले, तर काहींच्या डोळ्यांत भावाश्रू तरळले ! जणू सर्व जण पू. (श्रीमती) दळवीआजींची आनंदवार्ता ऐकण्यासाठी या दिवसाची वाटच पहात होते… ! आनंदवार्ता ऐकल्यावर अनेकांना या कार्यक्रमाविषयी मध्यंतरी पूर्वसूचना मिळाली असल्याचे समजले.

कार्यक्रमाच्या आरंभी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु प्रत्येक साधकावर कशी कृपा करत आहेत, याची उदाहरणे दिली. त्या म्हणाल्या, ‘‘चैतन्यदायी आश्रमामध्ये आश्रय देऊन गुरुमाऊलींनी सर्वांवर अनंत उपकार केलेले आहेत. गुरुमाऊली ही आपली जन्मोजन्मीची माऊली आहे. साधकवत्सल गुरुमाऊली सर्व साधकांची साधना करून घेऊन त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करत आहेत. साधकाच्या जीवनात गुरु सर्वाधार असतात. साधक गुरूंचे ऋण कधीच फेडू शकत नाहीत.’’ पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या चैतन्यदायी वाणीतून गुरूंची ही महती ऐकतांना सर्वांच्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव दाटून येत होता !

पू. (श्रीमती) दळवीआजी यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांचे नातेवाईक, सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. मराठेआजी आणि आश्रमातील साधक यांनी पू. (श्रीमती) दळवीआजी यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

हा हार गुरुचरणांना घालूया ! – पू. (श्रीमती) दळवीआजी

पू. (श्रीमती) दळवीआजी यांचा सन्मान पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी केला. पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी सन्मानाच्या वेळी हार घालतांना पू. (श्रीमती) दळवीआजी म्हणाल्या, ‘‘हा हार मला घालायलाच हवा का ? हा हार गुरुचरणांना घालूया.’’ हार घालून घेतांना आजींचा भाव जागृत झाला होता. त्यांच्या अंतःकरणातील गुरूंप्रतीची कृतज्ञता त्यांच्या तोंडवळ्यावर दिसत होती. या कृतज्ञतेमुळे त्यांना ‘तो हार केवळ गुरुचरणांवरच जायला हवा’, असे पुष्कळ तीव्रतेने वाटत होते. पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी ‘‘हा हार गुरूंनीच तुम्हाला घालायचा मान दिला आहे’’, असे म्हटल्यावर पू. (श्रीमती) दळवीआजी यांनी हार घालून घेतला !

पू. (श्रीमती) दळवीआजी यांचा संदेश !

‘‘साधकांच्या प्रेमापोटीच मी आज या स्थितीला आहे. सर्वांनी व्यष्टी साधनेविषयीचे प्रयत्न गांभीर्याने करायला हवेत. दिवसभरामध्ये १० स्वयंसूचनांची सत्रे करायला हवीत. स्वतःमधील आळस या दोषाला दूर करून आज्ञापालन करायला हवे.’’ (या वेळी त्यांना भावाश्रू अनावर झाले.)

पू. (श्रीमती) दळवीआजी कणखर आणि खंबीर आहेत ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे

पू. (श्रीमती) दळवीआजींना हृदयविकाराचा झटका आला होता. या स्थितीतही त्या अतिशय शांत होत्या. मध्यतंरी त्या प्रसाधनगृहात पडल्यामुळे त्यांचा पाय मोडला होता. पायावर शस्त्रकर्म करून सळई बसवली होती आणि त्याला वजनही लावले होते. त्यांची स्थिती पाहिल्यानंतर कोणालाही घाबरायला होईल, असे होते; परंतु आजींनी शारीरिक स्थिती पूर्णतः स्वीकारली होती. या स्थितीतही त्या अनुसंधानात असायच्या आणि ‘गुरुदेव आपल्यासाठी किती करतात’ याविषयीच त्या बोलत असायच्या. पू. आजी कणखर आणि खंबीर आहेत. आजींची ही गुणवैशिष्ट्ये त्यांना साधनेत पुढे घेऊन जाणारी आहेत.

पू. (श्रीमती) दळवीआजी यांच्या कुटुंबियांचे मनोगत

पुष्कळ कठीण प्रसंगातही आई कधी खचली नाही ! – सौ. स्मिता तावडे (पू. आजींची मुलगी)

माझ्या भावाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्या वेळीही आई खचून न जाता नामजपामुळे स्थिर राहिली. आईवर पुष्कळ कठीण प्रसंग ओढावले आहेत; परंतु आई कधीच खचली नाही. आई साधना करते; म्हणून आईला नातेवाईक विरोध करतात. असे असले, तरीही आई आश्रमामध्ये राहून साधना करते. प्रत्येक प्रसंगात आई आम्हाला नामजप करण्यास सांगते. आज आई संतपदाला पोहोचली, हे ऐकून देवाविषयी कृतज्ञता वाटली. (हे सांगतांना त्यांचा भाव दाटून आला आणि त्यांना पुढे बोलताच आले नाही.)

आजीने साधनेचा संकल्प आज पूर्ण केला ! – सौ. केतकी परब (पू. (श्रीमती) दळवीआजी यांची नात)

आजीने साधनेचा ध्यास घेतला होता. तिने साधनेचा केलेला संकल्प आज पूर्ण केला. आजी कोणत्याही परिस्थितीत खचून जात नाही. आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आजीसारखे कणखर कोणीच नाही. आजपर्यंत तिने पुष्कळ सहन केले आहे. कठीण परिस्थिती आली की, आम्ही डगमगतो; परंतु आजी आम्हाला डगमगू देत नाही. मी मनाने अस्थिर झाल्यावर आजीला डोळ्यांसमोर आणते. वेळप्रसंगी आजीला भ्रमणभाषही करते. त्या वेळी तिच्याकडून मला प्रेरणा मिळते. तिने दिलेली प्रेरणा मला आयुष्यभर पुरणार आहे. (आजींविषयी सांगतांना सौ. केतकी परब यांचा कंठ दाटून येत होता.)

आजीने प्रत्येक कृती भाव ठेवून केली ! – कु. समय दळवी (पू. (श्रीमती) दळवीआजी यांचा नातू)

आजीने कधीच कोणत्या प्रसंगात हार मानली नाही. तिने प्रत्येक कृती भाव ठेवून केली. आजीने पुष्कळ कष्ट घेतले आहेत. ती लहानपणी आम्हाला भावसत्संगाला घेऊन जायची.

‘आमचे सर्व तिनेच केले. तिच्याविना काहीच नाही.’ – कु. विधी दळवी, पू. आजींची नात

पू. (श्रीमती) दळवीआजी यांची एक मुलगी सौ. स्नेहा सावंत या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. त्यांना ही आनंदवार्ता समजल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्या भारावून गेल्या आणि त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पू. (श्रीमती) दळवीआजी संतपदी विराजमान होण्याची पूर्वसूचना पू. (श्रीमती) प्रभा मराठे यांना मिळणे !

पू. (श्रीमती) दळवीआजी संतपदी विराजमान झाल्याची घोषणा झाल्यानंतर पू. मराठेआजींना पुष्कळ आनंद झाला. पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी गुणवैशिष्ट्ये सांगायला आल्यावर त्यांनी पू. (श्रीमती) दळवीआजींची गळाभेटच घेतली ! त्या म्हणाल्या, ‘‘पू. (श्रीमती) दळवीआजी संत होणार, याची मला पूर्वकल्पना मिळाली होती. देवद आश्रमामध्ये आल्यानंतर दळवीआजी भेटल्यानंतर ‘मला बालमैत्रिणच भेटली’ असे वाटले. दळवीआजींमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ‘मला प्रेमभाव शिकण्यासाठीच देवद आश्रमामध्ये पाठवले आहे’, असे आजींना भेटल्यावर वाटले.’’ हे सर्व सांगतांना पू. (श्रीमती) मराठेआजींच्या तोंडवळ्यावर पुष्कळ आनंद जाणवत होता. त्यांच्या बोलण्यातून खरोखरच या दोघी बालमैत्रिणीच आहेत, असे जाणवत होते. पू. (श्रीमती) मराठेआजी आणि पू. (श्रीमती) दळवीआजी या संतद्वयींमधील मैत्रीचे भावानुबंध पाहून सर्व जण आनंदाने भारावून गेले ! संतद्वयींमधील हा क्षण सर्वांच्या हृदयात कोरला गेला…!

पू. आजींसमवेत सेवा करणार्‍या साधिकांनी व्यक्त केलेले मनोगत

१. रुग्णाईत असतांनाही ७-८ घंटे सेवा करणे

पू. (श्रीमती) दळवीआजी रुग्णाईत असल्यावरही प्रतिदिन ७ – ८ घंटे सेवा करत होत्या. रुग्णाईत आहेत म्हणून त्यांच्या सेवेची गती कधीच अल्प झालेली नव्हती. एक दिवसही त्यांना सेवा नसेल, तर त्या अस्वस्थ होत होत्या. त्यांचे सर्व साधकांवर पुष्कळ प्रेम आहे.’ – सौ. स्मिता नाणोसकर

२. ‘प्रत्येक वस्तू गुरूंची आहे’, असा भाव असणे

पू. आजींची ‘सर्व वस्तू गुरूंनीच दिल्या आहेत’, असा भाव असतो. त्यामुळे त्या कोणतीच वस्तू ‘माझी आहे’, असे म्हणत नाहीत. मी एखादी सेवा करायला विसरले, तरी त्या मला त्याची आठवण करून देतात. पू. आजी स्वतः रुग्णाईत असल्या, तरी त्या पू. शालिनी नेनेआजींची काळजी घेतात. पू. नेनेआजी पू. (श्रीमती) दळवीआजी यांच्या खोलीत आहेत. मला स्वभावदोषांचा तक्ता लिहिणे, सत्र करणे आणि नामजप करणे यांसाठी आठवण करून देतात. त्या तत्त्वनिष्ठपणे चुका सांगतात.’ – कु. वैशाली बांदिवडेकर

क्षणचित्रे

१. सूत्रसंचालनामध्ये सांगितलेले भावप्रयोग, प्रार्थना, कृतज्ञता आणि गुरुमहती ऐकून सर्वांचा भाव जागृत होत होता.

२. कार्यक्रमाचा आरंभ श्रीकृष्णाचा श्‍लोक म्हणून पुढील पंक्तींनी करण्यात आला – ‘गुरुपौर्णिमेचा दिवस आला । गुरुतत्त्वाचा तो वर्षाव झाला । गुरुचरणी कृतज्ञतापुष्प अर्पण करण्या । सर्व साधकांना आनंद झाला ॥’

३. कार्यक्रमाला असणारी परात्पर गुरु, सद्गुरु आणि संत यांची उपस्थिती, तसेच भावपूर्णरित्या केलेले सूत्रसंचालन अन् आयोजन यांमुळे सभागृहामधील चैतन्य वृद्धींगत झाले होते. त्यामुळे या कृतज्ञता सोहळ्यात सर्वांचे अंतरंग चैतन्याने न्हाऊन निघाले.

या संतसन्मान सोहळ्याला देवद आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासह सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. सुदामराव शेंडेआजोबा, पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा, पू. गुरुनाथ दाभोळकर, पू. पद्माकर होनप, पू. सदाशिव (भाऊ) परब, पू. उमेश शेणै, पू. महादेव नकाते, पू. रमेश गडकरी आणि पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी अशी सनातनच्या संतांच्या मांदियाळीची वंदनीय उपस्थिती लाभली !

या वेळी पू. (श्रीमती) दळवीआजी यांच्यासमवेत सेवा करणारे साधक आणि पू. (श्रीमती) दळवीआजी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते !

आश्रमामध्ये गुरूंची महती वर्णन करणारी गीते लावल्यामुळे साधकांचा कृतज्ञतेचा भाव वृद्धींगत होण्यास साहाय्य झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात