समष्टी तळमळीचे मूर्तीमंत रूप असलेले आणि व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून साधकांमध्ये भाव अन् चैतन्य यांचे बिजारोपण करणारे सनातनचे ८ वे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा परिचय

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे हे भारतीय रेल्वेमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. वर्ष १९९८ मध्ये ते सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागले. वर्ष २००३ मध्ये त्यांनी नोकरीचा त्याग केला आणि पूर्णवेळ साधना करू लागले. ठाणे येथे अध्यात्मप्रसाराची सेवा करता करता ते मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील सेवा दायित्व घेऊन करू लागले. त्यानंतर दक्षिण भारतातील प्रसारकार्याची घडी बसवतांना त्यांनी तेथील साधक, परिस्थिती आणि अडचणी यांचा उत्तम अभ्यास करून साधकांच्या साधनेलाही चालना दिली. जानेवारी २००९ मध्ये त्यांना महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि उत्तर भारत या ठिकाणीही सभांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले. त्या भाषा येत नसतांना, साधकांची ओळख नसतांनाही ते दायित्वही त्यांनी समर्थपणे सांभाळले. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते देवद आश्रमात आले. आताही ते तेथेच वास्तव्य करत आहेत. आरंभी त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास व्हायचे. त्यांची स्थितीही गंभीर होती. त्याही स्थितीत ते पलंगावर झोपून सत्संग, बैठका घेत होते. भारतभरातील, तसेच देवद आश्रमातील साधकांच्या साधनेची स्थिती सुधारावी अन् कार्याची घडी बसावी, यासाठी त्यांनी स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिया चालू केली. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या या सत्संगांना ‘शुद्धीकरण सत्संग’, असे संबोधले जात असे. सध्या ते देवद आश्रमातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणे आणि साधकांच्या त्रासांवर नामजपादी उपाय सांगणे आदी सेवा करतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप आणि आध्यात्मिक उपाय केल्यावर अनेक साधकांना आध्यात्मिक त्रास अल्प कालावधीत न्यून झाल्याच्या अनुभूतीही आल्या आहेत.

साधक ते संत अशी वाटचालही त्यांनी गुरुकृपेमुळे केवळ १२ वर्षांत साध्य केली. त्यांच्यातील आज्ञापालन, गुरूंवरील श्रद्धा, भगवत् अनुसंधान ठेवून कार्य करणे, चिकाटी, तळमळ, जिद्द, समर्पण वृत्ती या गुणांमुळे ते लवकर संत झाले. उत्कृष्ट संघटनकौशल्य, आदर्श नियोजनपद्धत, साधकांशी जवळीक साधून त्यांच्याकडून सहजतेने सेवा करवून घेणे आणि साधकांना अचूक हेरणे या गुणांमुळे ते गुरूंचे समष्टी कार्य वेगाने पुढे नेत आहेत.

अथक परिश्रम घेऊन हाती घेतलेले कार्य परिपूर्ण करणारे सद्गुरु राजेंद्रदादा !

  • सद्गुरु दादांना वर्ष २००७ मध्ये मुंबई येथे पहिली हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यास सांगितले होते, त्या वेळी त्यांनी पूर्वानुभव नसतांनाही रात्रीचा दिवस करून सभा आयोजित केली.

 

  • कार्यशाळेचे व्यवस्थापन असो, प्रसारकार्य किंवा हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृती सभा असोत, त्यांच्या नेतृत्वगुणामुळे सर्व गोष्टी यशस्वी झाल्या आहेत.

 

  • कर्नाटकमध्ये प्रसारकार्य करतांना अनोळखी प्रांत, अनोळखी साधक आणि भाषा यांची अडचण असूनही त्यांनी तेथे तळमळीने धर्मप्रसार केला. त्यांच्यामुळेच तेथे धर्मप्रसाराचे कार्य वाढले. साधकांच्या साधनेलाही गती मिळाली.

 

साधकांची प्रगती जलद व्हावी, अशी तळमळ असणारे सद्गुरु राजेंद्रदादा !

‘साधकांची प्रगती जलद व्हावी’, याची तळमळ आमच्यापेक्षा दादांनाच अधिक आहे. एखाद्या माऊलीचे बाळ तिला सोडून कुठेतरी गेले आहे, तर त्यासाठी तिचा जीव तळमळत असतो. अगदी तसेच सद्गुरु दादा ‘प्रत्येक साधक कुठे अल्प पडत आहे ? त्याला काय साहाय्य करायला हवे ?’, याच विचारांत सतत असतात. या प्रेमापोटीच ते आम्हाला आमच्या चुकांची जाणीवही करून देतात आणि एखादी चांगली कृती केल्यावर आमचे कौतुकही करतात.

– साधकांनी वेळोवेळी केलेल्या लिखाणातील सार

एका कार्यक्रमात जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे

व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या माध्यमातून
साधकांना प्रयत्नांतील आनंद अनुभवण्यास देणारे सद्गुरु दादा !

१. नियमितपणे व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची तळमळ

अ. सद्गुरु दादा गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे देवद आश्रमातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. यामध्ये कितीही अडचणी आल्या, तरी सद्गुरु दादा त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. साधक सेवेमुळे अडचणी सांगत असल्यास सद्गुरु दादा त्यांना ‘नंतर कोणत्या वेळी जमू शकेल ?’, असे विचारून त्या वेळेत आढावा घेतात. एखादा साधक आजारी किंवा घरी गेला असल्यास ते साधकाला भ्रमणभाषवरून जोडायला सांगतात.

आ. एकदा सद्गुरु दादांची प्रकृती ठीक नसल्याने ते १ – २ मास (महिने) चिपळूण येथे उपचारासाठी गेले होते. तेव्हाही त्यांनी भ्रमणभाषवरून नियमितपणे साधकांचा आढावा घेतला. सद्गुरु दादांनी ‘साधकांना साधनेत लाभ होण्यासाठी प्रत्येक सप्ताहाला आढावा कसा होईल’, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. परिणामी साधकांच्या साधनेत सातत्य निर्माण व्हायला साहाय्य झाले. ते आढावा नेहमी वेळेतच चालू करतात.

इ. साधकांचा उत्साह टिकून रहावा, साधना सर्वांगाने परिपूर्ण व्हावी, यासाठी ते आढाव्यात विविध विषय घेतात. साधकांना पुढील सप्ताहातील प्रयत्न ठरवून देतात.

२. साधकांचा स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचा आढावा घेण्याची सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची आदर्श पद्धत

सद्गुरु दादा आढावा घेण्याच्या आदल्या दिवशी साधकांनी लिहिलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या सारण्या पडताळतात. ते साधकांनी लिहिलेले सर्व प्रसंग वाचतात. साधकांनी काही प्रसंगांत स्वभावदोष, दृष्टीकोन किंवा सूचना अयोग्य लिहिली असल्यास ते त्या ठिकाणी खुणा करतात. दुसर्‍या दिवशी आढाव्यात ते या प्रसंगांविषयी चर्चात्मक स्वरूपात अभ्यास घेतात. या चर्चेतून कधीच कुणाला ताण न येता प्रक्रियेचा आनंद मिळतो आणि पुष्कळ शिकायला मिळते. ते प्रत्येक साधकाला चुकीच्या मुळाशी घेऊन जातात.

३. सद्गुरु दादा सारणी पडताळत असल्याने साधकांना झालेले लाभ

अ. साधकांच्या सारणी लिखाणात सातत्य निर्माण झाले.

आ. काही साधकांचे अक्षर सुधारले.

इ. प्रसंग संदिग्ध न लिहिता समजेल असा संपूर्ण लिहिण्याची साधकांना सवय लागली.

ई. आधी काही साधकांकडून केवळ प्रसंग लिहिले जायचे. योग्य सूचना लिहिल्या जात नव्हत्या. आता त्यांच्याकडून योग्य सूचना पूर्ण लिहिल्या जातात.

उ. साधकांचे मनाचे निरीक्षण वाढले.