परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय शिकवणीतून सिद्ध झालेले सनातनचे संत आणि सद्गुरु यांची वैशिष्ट्ये

 

साधकांना गुरुत्व प्रदान करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीगुरु परिसाहून श्रेष्ठ आहेत; कारण परिस जरी केवळ स्पर्शाने लोखंडाचे सोने करत असले, तरी ते लोखंडाला स्वतःचे परिसत्व देऊ शकत नाही. श्रीगुरु मात्र शिष्याला गुरुत्वही देतात. ‘देव पहावया गेलो । तव तो देवची होऊनी गेलो ॥’, अशी संत तुकाराम महाराजांची उक्ती आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीगत उन्नतीसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे सनातनचे साधक संतपद गाठून गुरुपदी विराजमान झाले आहेत. असे सद्गुरु आणि संत घडवणार्‍या परात्पर गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !!

 

उच्च आध्यात्मिक पातळीचे महत्त्व !

आध्यात्मिक पातळी जेव्हा ६० टक्के होते, तेव्हा ती व्यक्ती मायेपासून अलिप्त होऊ लागते. तिच्या मनोलयाला आरंभ होतो आणि तिला विश्‍वमनातील विचार ग्रहण होऊ लागतात. मृत्यूनंतर ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन तिला महर्लोकात स्थान प्राप्त होते. मनोलय झाला की, साधक संतपदाला, म्हणजे ७० टक्के पातळीला पोहोचतो. त्यांच्या वाणीत चैतन्य येते आणि ते ईश्‍वरेच्छेने वागू लागतात. ईश्‍वरच त्यांना मार्गदर्शन करत असल्याने असे संतच समाजोद्धाराचे समष्टी कार्य करू शकतात. त्यांचे ते दायित्व असते. यातूनच पुढे त्यांचा बुद्धीलय आणि अहंलय होऊन सत्-चित्-आनंदाकडे वाटचाल होते.’

‘जिज्ञासूंना सोप्या भाषेत अध्यात्म सांगून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणे’, हे सनातनचे प्रमुख कार्य आहे. कलियुगात सामान्य व्यक्तीलाही अध्यात्म बोजड न वाटता ईश्‍वरप्राप्तीची वाट सुलभ व्हावी, यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती केली. साधना करणार्‍यांसाठी ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘शिष्याचे परममंगल, म्हणजे मोक्षप्राप्ती त्याला केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ गुरुकृपा संपादन करणे, ही आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. सनातन संस्थेकडून स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृती, नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती या अष्टांग मार्गाने आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणते प्रयत्न करावे, याविषयी व्यक्तीगत मार्गदर्शन केले जाते. जिज्ञासू, साधक, शिष्य, संत, सद्गुरु, परात्पर गुरुपद हे ईश्‍वराशी एकरूप होण्याच्या या प्रवासातील टप्पे आहेत. निर्जीव वस्तू म्हणजे १ टक्का आणि ईश्‍वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी, असे गृहीत धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार तिची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्‍चित करता येते. अष्टांग साधनेने व्यष्टी अन् समष्टी साधना केल्यावर आध्यात्मिक उन्नती होऊन ते ७० टक्के आध्यात्मिक पातळीला पोहोचतात, तेव्हा त्यांना ‘संत’ म्हणून घोषित केले जाते. ८० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त झाल्यानंतर संत सद्गुरुपदी, तर ९० टक्के आध्यात्मिक पातळीला परात्पर गुरुपदी विराजमान होतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनमोल शिकवणीमुळे अल्प कालावधीत सनातनचे ११५७ साधक ६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले आहेत. ते संतपदाकडे वाटचाल करत आहेत. ६५ साधक संतपदावर, १४ साधक सद्गुरु पदावर, तर १ परात्पर गुरु पदावर विराजमान झाले आहेत.

साधकांनी अध्यात्मात उन्नती करून ‘गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास जलद उन्नती होते’, हे सिद्ध केले आहे. या साधकांच्या संतत्वाची अनुभूती इतरांना येते. हे साधक केवळ संत नसून ते ‘गुरु’च आहेत. ते अन्य साधकांना साधनेत पुढे पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात, तसेच आपापल्या प्रांतातील कार्यातील अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीनुसार साधना करून आता दायित्व घेऊन सेवा करत परात्पर गुरूंचा कार्यभार हलका करणारे हे संत आणि सद्गुरु एकप्रकारे गुरुदक्षिणाच अर्पण करत आहेत. त्यांची काही वैशिष्ट्ये आणि महत्त्व गुरुपौर्णिमेनिमित्त २७ जूनपासून दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या विशेषांकात समष्टीला दिशादर्शन करणार्‍या काही सद्गुरूंच्या गुणवैशिष्ट्यांचा परिचय वाचकांना करून देत आहोत. ती वाचून ‘साधकांची सद्गुरूंप्रती भाववृद्धी होवो आणि त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा लाभ करून घेण्याचीही सद्बुद्धी साधकांना होवो’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

 

सनातनचे संत आणि सद्गुरु यांची सामाईक वैशिष्ट्ये !

१. शिष्यभावात राहून ‘गुरुकृपा संपादन करणे’, हेच ध्येय संत झाल्यावरही असणे

‘उन्नती झालेले सनातनचे साधक ‘संत’ अथवा ‘सद्गुरु’ या पदाला पोहोचले, तरी ते शिष्यभावातच रहातात. त्यामुळे साधनेत पुढेही ‘गुरुकृपा संपादन करणे’, हेच त्यांचे ध्येय असते. बर्‍याच संप्रदायांमध्ये लक्षात येते की, एकदा एखादा साधक संत झाला की, ते ‘महाराजगिरीत’ अडकतात. भक्तांकडे जाणे, पाद्यपूजा करवून घेणे, समाजात मिरवणे इत्यादी गोष्टी करण्यातच त्यांचा सर्व वेळ जातो. त्यामुळे त्यांना स्वतःची साधना करायला वेळ मिळत नाही. तसेच त्यांचा अहंही वाढतो. याउलट सनातनचे संत ‘महाराजगिरी’ करत नसल्याने ते या धोक्यापासून दूर तर रहातातच; पण स्वतःची साधना करत रहात असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळीही जलदगतीने वाढते. म्हणजे ते गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु अशा टप्प्यांनी पुढे पुढे जातात.

२. सहजावस्थेत रहाणे

संत किंवा महाराज म्हटले की, दाढी आणि लांब केस असलेले, भगवे कपडे परिधान केलेले, असे चित्र बहुतेकांच्या डोळ्यांसमोर येते. सनातनचे संत आणि सद्गुरु अशा रूपात दिसत नाहीत. सनातनचे संत त्यांचे आहे तेच नाव वापरतात. ‘चैतन्यानंद’ इत्यादी नावे वापरत नाहीत ! त्यामुळे बर्‍याच जणांना ते ओळखता येत नाहीत. अर्थात हा सनातनच्या संतांचा दोष नाही, तर त्यांच्या सहजावस्थेतील रहाण्यामुळे इतरांना त्यांना ओळखता येत नाही. सूक्ष्मातील कळणार्‍या संतांना मात्र सनातनचे संत लगेच ओळखता येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

३. समाजाला मार्गदर्शन करू शकणे

‘समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी आवश्यक असलेली समष्टी साधना करणार्‍या सनातनच्या संतांचे मन सारासार विचारसरणीने कार्य करणारे असते, तर त्यांची बुद्धी तारतम्याने निर्णय देणारी असते. असे मन आणि बुद्धी असणारे संतच समाजाला योग्य-अयोग्यातील भेद (फरक) स्पष्ट करून देऊन कृती करण्यास प्रवृत्त करू शकतात. समष्टी साधना करणारे संत ईश्‍वराच्या व्यापक रूपाशी एकरूप झालेले असल्याने त्यांना समाजाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर मार्गदर्शन करणे शक्य होते. त्यामुळेच आज सनातनचे अनेक संत आणि सद्गुरु साधकांसह समाजालाही साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. समष्टी कार्य अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी संत आणि सद्गुरु स्वतः अहोरात्र कार्यरत असतात, तसेच साधकांच्या साधनेतील अडथळ्यांचा अचूक अभ्यास करून ते दूर करण्यासाठी साधकांना मार्गदर्शनही करतात.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.