साधकांसह धर्माभिमानी हिंदूंनाही आध्यात्मिक दृष्टीकोन सांगून त्यांना साधनेत कृतीशील करणार्‍या सनातनच्या ७ व्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

‘१.११ ते ३०.११.२०१७ या कालावधीत मला सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या समवेत रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

 

१. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या सहवासात जाणवलेली सूत्रे

१ अ. प्रेमभाव

सद्गुरु स्वातीताईंसमवेत जातांना ‘मला हे जमेल का ?’, असा भीतीयुक्त विचार माझ्या मनात येत होता; परंतु त्यांच्या सहवासात असतांना मला त्यांच्याशी बोलण्याची भीती वाटली नाही. पहिल्या दिवशी पहाटे मी आणि सहसाधिका सातारा येथे पोहोचलो. मी वैयक्तिक आवरण्यासाठी सकाळी ६.३० वाजता उठले होते. तेव्हा सद्गुरु स्वातीताई म्हणाल्या, ‘‘रात्री जागरण झाले आहे. आता थोडे झोपा. मी तुम्हाला नंतर उठवते.’’

१ आ. गुरुकार्याची तळमळ

त्यांना गुरुकार्याची तळमळ प्रचंड असल्याने त्यांना स्वतःला होणार्‍या त्रासाचे काहीच वाटत नाही. त्या प्रत्येक कार्यक्रमात आरंभापासूनच जातीने लक्ष घालतात आणि शेवटी सर्व आवरल्यावर सर्वांसमवेत बाहेर पडतात. त्या इतरांवर अवलंबून न रहाता स्वतःच पुढाकार घेतात.

१ इ. प्रभावी दृष्टीकोन

सद्गुरु ताईंनी दिलेले दृष्टीकोन प्रभावी असतात. ‘आपण सतत शिकत रहायला हवे. आपण आपली प्रतिमा जपायला नको. आपण गुरुदेवांचे सेवक आहोत’, हा भाव आपल्यात सतत असायला हवा’, असे त्या नेहमी सांगतात.

१ ई. आदर्श गृहिणीप्रमाणे व्यवस्थापन पहाणे

सद्गुरु स्वातीताई केवळ प्रसारसेवाच नाही, तर सेवाकेंद्रांतील सेवांचे नियोजनही करतात. त्या ‘सेवाकेंद्रांत कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे’, याचा विचार करून त्या मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सेवाकेंद्रातील सर्व सूत्रांची माहिती असते.

एकदा सद्गुरु ताईंनी नवीनच चालू झालेल्या सेवाकेंद्रासाठी लागणार्‍या बारीक-सारीक सर्व साहित्याविषयी विचारणा करून सर्व गोष्टी सुरळीत झाल्याची निश्‍चिती होईपर्यंत पाठपुरावा केला होता. त्या स्वतः भांडी आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी आदर्श संसार करणार्‍या एका आदर्श गृहिणीच्या रूपात गुरूंचा आश्रम चालवणार्‍या सद्गुरु ताईंच्या कृती आम्हाला पहाण्यास मिळाल्या.

१ उ. समवेत असलेल्या साधकांची काळजी घेणे

सद्गुरु ताईंचे सेवेसाठी समवेत असलेल्या साधकांकडेही लक्ष असते. एकदा माझी चप्पल तुटली होती. सद्गुरु ताईंना हे कळल्यावर त्यांनी चपलेच्या दुकानाजवळ गाडी थांबवून मला नवीन चपला विकत घेण्यास सांगितले. एकदा माझ्या भ्रमणभाषचे आच्छादन तुटले होते. तेव्हाही सद्गुरु ताईंनी स्वतः दुकानात जाऊन मला ते घेऊन दिले. ‘साधकांची काळजी घेणे, त्यांना हवे-नको ते पहाणे’, हे सर्व त्या स्वतः जातीने पहातात. त्या कधीच साधकांची गैरसोय होऊ देत नाहीत.

१ ऊ. वेळेचे बंधन पाळणे

त्या सेवेचे नियोजन करतांना ‘सेवा समय-मर्यादेत पूर्ण व्हावी’, असाच विचार करतात आणि प्रत्येक सेवा वेळेतच पूर्ण करून नंतर इतर सेवा करतात.

 

२. आयोजनातील बारकावे शिकवणे

सद्गुरु स्वातीताई साधकांना साधनेत कृतीशील ठेवण्यासाठी सतत कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यामुळे त्यांच्या समवेत असतांना ‘आपण कुठे उणे आहोत आणि अजून काय शिकायला हवे ?’, हे आम्हाला शिकायला मिळाले. आम्ही त्यांच्या सहवासात असतांना आम्हाला पुढील कार्यक्रमांचे आयोजन शिकायला मिळाले.

अ. त्यांनी साधकांसाठी शिबिरे घेऊन व्यष्टी साधनेचे मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृती करून घेतल्या.

आ. त्यांनी धर्माभिमान्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करणार्‍या ५ सत्संग आणि युवा शिबिरातील मुलांसाठी ३ सत्संग घेतले.

इ. पुणे येथे हिंदु धर्मजागृती सभांमध्ये निमंत्रण देण्यासाठीचे अभ्यासवर्ग झाले.

ई. या व्यतिरिक्त त्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे वर इतर जिल्ह्यांतील साधकांचे सत्संग, हिंदुत्ववाद्यांना भेटणे इत्यादी सेवांचे आयोजन केले.

या सगळ्यांतून आम्हाला पुष्कळ शिकता आले.

 

३. धर्माभिमान्यांना जोडून ठेवण्याची कला

३ अ. धर्माभिमान्यांना भेटण्याची तळमळ असल्याने स्वतःच भेटीसाठी पुढाकार घेणे

सौ. संगीता लोटलीकर

१.११.२०१७ या दिवशी सद्गुरु (कु.) स्वातीताई यांचे धर्माभिमान्यांना भेटण्याचे नियोजन होते; पण त्यामध्ये काही अडचणी येत होत्या. तेव्हा सद्गुरु ताईंनीच धर्माभिमानी मुलांना मार्ग सुचवून भेटीचे नियोजन करवून घेतले. तेव्हा मला वाटले, ‘धर्माभिमान्यांना भेटणे आणि त्यांना साधना सांगून पुढे नेणे याची तळमळ सद्गुरु ताईंनाच अधिक होती.’ तेव्हा मला माझ्या संदर्भात लक्षात आले की, ‘उत्तरदायी साधकांनी नियोजन केले, तरच मी अशा सत्संगांना जात असे. मी स्वतःहून काही नियोजन करायला हवे’, असे माझ्या कधी लक्षात आले नव्हते.’

आता मात्र आपणच प्रसाराचे नियोजन करायला हवे, हे लक्षात आले आणि ‘धर्माभिमानी कसे जोडले जातील ?’ याचे चिंतन झाले.

३ आ. धर्माभिमान्यांच्या विनंतीला प्राधान्य देणे

सद्गुरु ताईंचे एका धर्माभिमान्यांना भेटण्याचे नियोजन होते. तेथून निघत असतांना त्या धर्माभिमान्यांनी सद्गुरु ताईंना सांगितले, ‘‘माझी आई साधना करते. तुम्ही आमचे देवघर पाहून जाल का ?’’ वास्तविक त्या धर्माभिमान्यांच्या घरात स्त्रियांनी पुढे येण्याची पद्धत नव्हती; परंतु ‘सद्गुरु ताईंची कुटुंबियांशी भेट घडवायला हवी’, असे त्यांना वाटल्यामुळेच त्यांनी तसे सांगितले होते. त्या वेळी सद्गुरु ताईंचे पुढील नियोजन असूनही त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे देवघर पाहिले. ते धर्माभिमानी म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्या आईला साधना सांगाल का ?’’ तेव्हाही त्यांनी लगेच ‘‘हो’’ म्हटले आणि त्यांच्या आईला साधना सांगितली. त्या वेळी सद्गुरु ताईंना अन्य तातडीच्या सेवा होत्या, तरीही त्यांनी कोणतेही कारण न सांगता त्या धर्माभिमानी व्यक्तीला प्राधान्य दिले.

३ इ. सद्गुरु (कु.) स्वातीताईंचे धर्माभिमान्यांशी वर्तन पाहून स्वतःच्या वागण्याचे चिंतन होणे

‘इतरांनी सांगितलेले ऐकणे आणि धर्माभिमान्यांना कसे जोडायचे ?’ हे सद्गुरु स्वातीताईंकडून मला शिकता आले. आतापर्यंत माझ्याकडून धर्माभिमान्यांना आपल्याशी जोडून ठेवण्यास तितकेसे प्राधान्य दिले जात नव्हते. सद्गुरु ताईंच्या कृतीवरून धर्माभिमान्यांना जोडण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. ‘धर्माभिमान्याला जोडून ठेवणे, त्याला घडवणे आणि तो स्वतःहून आपल्याकडे आल्यावर त्याला आपल्यात सामावून घेणे’, हे सर्व मला सद्गुरु ताईंच्या कृतींवरून शिकता आले.

 

४. बार्शी येथील प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे

४ अ. प्रत्येक सूत्राचा स्वतः अभ्यास करणे

नोव्हेंबर २०१७ मध्ये बार्शी येथे आयोजित केलेल्या प्रांतीय हिंदू अधिवेशनातील सेवांमध्ये सद्गुरु ताईं सर्वत्र जातीने लक्ष घालत होत्या. प्रत्येक लहान-सहान सेवेत स्वतः सहभागी होत होत्या. त्या प्रत्येक विषयाचा अभ्यास करत. त्या साधकांचा आढावा घेत. ‘माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या ?’, असे इतरांनाही विचारून घेत आणि त्यांच्या अन् इतरांच्या लक्षात आलेल्या स्वतःच्या चुकांविषयी क्षमायाचना करत. त्या आश्रमात सर्वांशी प्रेमाने बोलत. या सर्व कृती त्या स्वतःची व्यष्टी साधना म्हणून करत असल्याचे लक्षात आले.

४ आ. सर्वांवर प्रेम करणे

आम्ही सनातनच्या संत पू. मंगळवेढेकर आजींना भेटायला गेलो असतांना सद्गुरु ताई त्यांच्याशी पुष्कळ प्रेमाने बोलत होत्या. त्या वेळी ‘वयस्कर साधकांची काळजी कशी घ्यायची’, हे माझ्या लक्षात आले. तेथे चि. अर्णव नावाचा ४ वर्षांचा बालसाधक आहे. सद्गुरु ताईं त्याला कधी चॉकलेट द्यायच्या, तर कधी खेळणे आणून द्यायच्या.

४ इ. साधक, धर्मप्रेमी आणि धर्मशिक्षणवर्गातील
साधक साधनेत कृतीशील व्हावेत, यासाठी प्रयत्न करणे

सद्गुरु ताईंचा साधक, धर्मप्रेमी, धर्मशिक्षणवर्गातील साधक यांना भेटण्याचे नियोजन करून त्यांना साधनेत कृतीशील करण्याचा आटोकाट प्रयत्न असतो. त्यासाठी त्या ४ – ५ घंट्यांची लहान कार्यशाळा आयोजित करायच्या. त्यामुळे त्यांना या सर्वांना समष्टी साधना करतांना येणार्‍या अडचणी, होणारा आध्यात्मिक त्रास आणि त्याचे निवारण करणे इत्यादी गोष्टींची पूर्वकल्पना येत असे.

४ ई. प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या कालावधीत जाणवलेली अन्य सूत्रे

४ ई १. साधकांमधील संघटितपणा

बार्शी गावापासून अधिवेशनाचे स्थळ पुष्कळ लांब होते. तेथे साधकांचा संघभाव पुष्कळ प्रमाणात जाणवत होता. तेथील साधक प्रत्येक सेवा सद्गुरु स्वातीताईंना विचारून करत होते. कु. दीपाली मतकर वयाने लहान असून त्यांना प्रसारातील अनुभव अल्प आहे, तरीही त्या सर्व सेवा शांतपणे आणि सहज हाताळत होत्या. त्यांच्या तोंडवळ्यावर कोणताच ताण जाणवत नव्हता. तेथील एका साधिकेला पुष्कळ आध्यात्मिक त्रास आहे, तरीही त्यांनी प्रसारसेवा, अधिवेशनाचे नियोजन करणे, विषयांची पूर्वसिद्धता करणे, या गोष्टी चांगल्या प्रकारे केल्या.

४ ई २. आयोजनातील बारकावे

अधिवेशनाच्या ठिकाणी अधिक लोकवस्ती नसल्याने साधिकांना त्रास होऊ नये; म्हणून सद्गुरु ताईंनी त्यांची निवासव्यवस्था ३ साधकांच्या घरी केली होती. ताईंचे नियोजनातील हे कौशल्य पाहून ताईंना सद्गुरुपदप्राप्ती लवकर होण्यामागचे कारण लक्षात आले. तसेच ‘सतत इतरांचा विचार करणे’ आणि ‘गुरुदेवांना काय आवडेल ?’ हा त्यांचा ध्यास जवळून अनुभवता आला.

४ ई ३. साधकांचा भाव

बार्शीतील साधकांचा भाव पुष्कळ चांगला आहे. ते सर्व सेवा भावाच्या स्थितीत राहून करत होते. बार्शी येथे आम्ही ज्यांच्याकडे उतरलो होतो, त्यांनी त्यांचे घर बांधताना साधकांचा विचार करूनच ते बांधले आहे. त्यामुळे आम्ही १५ – १६ साधक त्यांच्याकडे वास्तव्यास राहू शकलो. त्या घरातील काकूंनाही कोणताच ताण नव्हता. त्या शांतपणे सर्व करत होत्या.

 

५. कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभा

अ. कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेपूर्वी झालेल्या एका सत्संगात २ घंट्यांत सद्गुरु ताईंनी सेवांचे सहजतेने नियोजन करून घेतले. येथील साधकांचा उत्साह दांडगा होता. ‘कोण कुठले दायित्व घेणार ?’ असे विचारले असतांना तेथील साधक उत्साहाने पुढाकार घेत होते.

आ. अधिवेशनानंतर सर्व आवरून साधकांची शेवटची गाडी गेल्यावर सद्गुरु ताई तेथून निघाल्या. तेव्हा ‘चैतन्याच्या स्तरावर साधकांना सेवेचा लाभ व्हावा आणि त्यांचा त्रास टळावा’, हा त्यांचा उद्देश लक्षात आला.

 

६. अन्य सूत्रे

अ. सद्गुरु स्वातीताई जेथे जातात, तेथे त्या सभागृह, निवासव्यवस्था इत्यादी सर्व गोष्टी विनामूल्य मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येक ठिकाणी अनेक धर्माभिमानी जोडलेले असल्याने त्यांना कोणत्याच कार्यक्रमाला अडचण येत नाही.

आ. त्या हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वी मैदानात जाऊन हातात झाडू घेऊन स्वतः स्वच्छता करण्यास आरंभ करतात. त्या प्रत्यक्ष सद्गुरुपदावर असूनही सामान्य साधकाप्रमाणे वागतात.

इ. एकदा सभेच्या वेळी साधकांसाठी जेवण अल्प पडले. तेव्हा ताई स्थिर होत्या. त्यांनी साधकांना त्यांच्या चुकीची जाणीव त्याच वेळी करून देऊन त्यांना निरुत्साही केले नाही. त्यांनी सभेनंतर ‘असे का झाले असावे ?’, याचा अभ्यास करण्यास साधकांना सांगितले.

ई. साधकांना त्रास होऊ नये; म्हणून सद्गुरु ताई प्रवासात भाजी आणि पाव इत्यादी घेऊन गाडीत बसून जेवतात.

 

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

हे दयाळू गुरुमाऊली, तुझ्या परम कृपेने आम्हाला सद्गुरु (कु.) स्वातीताई यांच्यासोबत राहून शिकण्याची संधी मिळाली. यासाठी आम्ही तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत. ‘सद्गुरु ताईंसारखे आध्यात्मिक गुण आम्हा साधकांमध्येही शीघ्रतेने येवोत आणि प्रत्येक साधकाची जलद आध्यात्मिक उन्नती होऊन हिंदु राष्ट्र जलद येवो’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. संगीता लोटलीकर, रायगड (नोव्हेंबर २०१७)

 

सनातन संस्थेत येण्यापूर्वी प.पू. गुरुदेवांनी अनेक वेळा जीव
वाचवून पुनर्जन्म दिल्याची अनुभूती घेणार्‍या ७ व्या सद्गुरु कु. स्वाती खाडये !

१. बालपणी पुष्कळ ताप येऊन बेशुद्ध पडल्यावर ‘मृत्यू झाला’, असे वाटून
सर्व जण रडू लागणे आणि आईने शिवाचा धावा केल्यावर काही वेळातच शुद्धीवर येणे

‘मी ३ वर्षांची असतांना एकदा पुष्कळ ताप येऊन बेशुद्ध पडले. सर्वांना वाटले, ‘माझा मृत्यू झाला’; म्हणून सर्वजण रडू लागले. आईने सांगितले, ‘‘तुम्ही रडू नका. माझी मुलगी जिवंत आहे.’’ घराजवळ शिवाचे मंदिर आहे. आई शिवाची उपासना करायची. ती शिवाचा धावा करू लागली. काही वेळातच मी शुद्धीवर आले.

२. ओढ्याची लाट वेगाने डोक्यावरून जाऊनही वाचणे

मी ९ वर्षांची असतांना एकदा पावसाच्या दिवसांत बहिणीसमवेत ओढ्यावर गेले होते. ओढ्याला थोडेच पाणी असल्याने मी ओढ्याच्या मध्यभागी खडकावर उभी राहिले. काही वेळाने ओढ्याच्या वरच्या भागातून वेगाने पाण्याची लाट येऊन माझ्या डोक्यावरून गेली. ‘मला कुणी पकडले, मी कशी वाचले ?’, ते कळलेच नाही.

३. नदीवर अंघोळ करतांना खोल पाण्यात ओढले जाणे आणि भावाने जीव वाचवणे

मी १० वर्षांची असतांना घराजवळील नदीवर मैत्रिणींसह आंघोळीला गेले होते. त्या दिवशी माझा काळ आला होता; पण वेळ आली नव्हती. मी अंघोळ करतांना अकस्मात खोल पाण्यात गेले. मला कुणीतरी खालच्या दिशेने ओढत होते आणि मी खेचली जात होते. माझ्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. अंगात ओरडायचेही त्राण नव्हते. अशा स्थितीत अंगात कुठूनतरी बळ आले आणि मी किंचाळले. तेव्हा माझ्या भावाचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्याने मला वाचवले. (त्या भागात आधी काहीजण बूडून मृत्यू पावले होते.)

४. अंगणात आसंदीवर झोपल्यावर पायाजवळ नागीण
दिसणे आणि ती पाहून पोस्टमन ओरडल्यावर नागीण निघून जाणे

मी १२ – १३ वर्षांची असतांना मैत्रिणींसह दुपारी झाडांवरचे आंबे पाडायला गेले. आंबे पाडतांना माझ्याकडून एखादा दगड नागावर पडला असावा; कारण नंतर मी घरी येऊन अंगणातील आसंदीवर झोपल्यावर माझ्या पायाजवळ एक नागीण होती. तेथून जाणारा पोस्टमन ते पाहून मोठ्याने ओरडला. त्यामुळे मला जाग आली आणि नागीणही निघून गेली.

लहानपणी मला गणपति पुष्कळ आवडत असल्याने मी सर्वकाही त्यालाच सांगायचे. मला एवढेच कळत होते की, देवच आपले रक्षण करतो. मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यावर लक्षात आले, ‘गुरुदेवांना मला साधनेत आणायचे होते; म्हणून त्यांनी मला अनेकदा जीवदान दिले. ‘गुरुदेव, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी शब्द अपुरेच आहेत !’

– (सद्गुरु) कु. स्वाती खाडये (२६.७.२०१७)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या महान गुरूंचा सहवास देणार्‍या सृष्टीच्या निर्माणकर्त्या ईश्‍वराप्रती कृतज्ञता  !