तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील पू. (श्रीमती) पुतळाबाई (माई) देशमुख (वय ७० वर्षे) ७६ व्या संतपदी विराजमान !

गुरुपौर्णिमेपूर्वी ‘संतरत्न’ देऊन श्रीगुरूंनी साधकांवर केली अपार कृपा !

संतपदी विराजमान जाहल्या आपल्या पूजनीय माई ।

आता सर्वांनाच झाली हिंदु राष्ट्र पहाण्याची घाई ॥

पू. (श्रीमती) पुतळाबाई (माई) देशमुख यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन सन्मान करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर – गुरुपौर्णिमेला शिष्य श्रीगुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो, पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सोलापूर येथील साधकांना गुरुपौर्णिमेपूर्वीच कृतज्ञता व्यक्त करण्याची सुवर्णसंधी लाभली. तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील सनातनच्या साधिका श्रीमती पुतळाबाई (माई) देशमुख (वय ७० वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ७६ व्या संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घोषित केले. या आनंदवार्तेने साधकांची भावजागृती झाली. पुष्कळ शारीरिक त्रास असूनही तळमळीने सेवारत असलेल्या पू. माईंचा सन्मान सोहळा साक्षात् वैकुंठलोकात चालू असल्याची अनुभूती साधकांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवली. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी पू. माई यांचे औक्षण केले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उल्का जठार यांच्यासमवेत अनेक साधक उपस्थित होते.

या मंगलप्रसंगी सद्गरु (कु.) स्वाती खाडये पू. माईंविषयी म्हणाल्या, ‘‘पू. माईंना तीव्र शारीरिक त्रास आहेत. असह्य वेदना सहन करत त्या धर्मप्रसाराची सेवा करतात. पावसात भिजत असतांनाही स्वत:च्या शरिराचा कोणताही विचार न करता त्या सेवा करतात. ‘देव भावाचा भुकेला आहे !’ पू. माईंसारखा भाव वाढवण्यासाठी आपणही प्रयत्न करूया !’’

या वेळी पू. माई म्हणाल्या, ‘‘मी पहाटे ३ वाजता उठून नामजप आणि प्रार्थना करते. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करते. कितीही शारीरिक त्रास होत असला, तरी सेवेला जाते. सेवेला गेल्यावर त्रास न्यून होतात. आपल्या सर्वांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व करत आहेत. मग त्यांना आनंद देण्यासाठी आपणही साधना वाढवण्याचे प्रयत्न करायला हवेत.’’

या वेळी भावसोहळ्याला उपस्थित साधकांनी पू. माई यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.

साधकांचे मनोगत

१. ‘पू. माई संत झाल्या आहेत’, असे मला स्वप्न पडले. ते आज सत्य झाले. गेले काही दिवस माझे पाय त्यांच्या घराकडे ओढले जात होते आणि त्यांची भेट झाल्यावर हलके वाटत होते.

– सौ. पुनाताई होरडे, तुळजापूर

२. पू. माईंच्या सहवासात असतांना ‘गुरुदेव त्यांच्या समवेत आहेत’, असे जाणवते. त्यांचे वय पुष्कळ असूनही त्या न थकता सेवा करतात. – सौ. दैवशीला भोसले, तुळजापूर

३. पू. माई त्यांना होणार्‍या शारीरिक त्रासांविषयी कधीच बोलत नाहीत. त्या सतत आनंदी असतात. आज या भावसोहळ्यासाठी पू. माईंसमवेत येतांना चारचाकी वाहनात प्रकाश जाणवत होता. – सौ. कांचन पुजारी, तुळजापूर

४. पू. माईंना साधकांविषयी पुष्कळ प्रेम आहे. त्यांच्या त्वचेत पालट होऊन ती आता तुकतुकीत झाली आहे. – श्री. संदीप बगडी, तुळजापूर

५. पू. माई म्हणजे वात्सल्याचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. केंद्रातील साधकांची स्थिती सुधारण्यासाठी त्या सतत चिंतन करून वेळोवेळी मार्गदर्शनही करतात.

– श्री. विलास पुजारी, तुळजापूर

६. पू. माईंना लिहिता येत नाही, तरीही त्या कौशल्याने भावाच्या स्तरावर सेवा करतात.

– श्री. सर्वोत्तम जेवळीकर, तुळजापूर

७. पू. माई संत झाल्याचे ऐकल्यावर भावजागृती झाली. – श्री. विनोद रसाळ, सोलापूर

८. पू. माई म्हणजे ‘तुळजापूरच्या आई’ आहेत. त्या वात्सल्यभावाने आम्हा सर्व साधकांना प्रेम देतात. मी आतापर्यंत त्यांच्याकडून एकही प्रतिक्रिया ऐकली नाही. त्यांच्या सहवासात उत्साह जाणवतो. – श्री. अमित कदम, तुळजापूर

९. ‘उत्कट भाव’ म्हणजे काय, तो पू. माईंकडून शिकायला हवा. पू. माईंना नकारात्मक विचार करतांना कधीच पाहिले नाही. त्यांच्या सहवासाचा लाभ करून घेण्यास आम्ही अल्प पडलो. – श्री. उमेश कदम, तुळजापूर

पू. माई यांना संत घोषित करताच साधिकेला सुचलेली कविता

कृपाप्रसादाचा आनंद देती आपली गुरुमाऊली आई ।

आज संतपदी पोहोचल्या आपल्या पूजनीय माई ॥

साधकांना दिसे त्यांच्यात दुसरी तुळजाभवानी आई ।

आज संतपदी पोहोचल्या आपल्या पूजनीय माई ॥

वात्सल्याची मूर्ती अखंड, जशी अथांग कृष्णामाई ।

आज संतपदी पोहोचल्या आपल्या पूजनीय माई ॥

या भावसोहळ्याचा आनंद साधकांसमवेत घेताहेत झेंडू, मोगरा, जुई अन् जाई ।

आज संतपदी पोहोचल्या आपल्या पूजनीय माई ॥

आता सर्वांनाच झाली हिंदु राष्ट्र (टीप १) पहाण्याची घाई ।

संतरत्न जाहल्या आज आपल्या पूजनीय कृष्णामाई ॥

आणि आम्हा साधकांचा आनंद ओसंडून वाही ।

जेव्हा एकत्र दर्शन देतात गुरुमाऊली, सद्गुरु ताई (टीप २) अन् पूजनीय माई ॥

– कु. सोनाली काळे, इंदापूर

टीप १ – ईश्‍वरप्राप्ती

टीप २ – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

संतपद गाठल्यानंतर पू. (श्रीमती) पुतळाबाई (माई) देशमुख यांची एक भावमुद्रा

१. प्रसन्न व्यक्तीमत्त्व

‘माई नेहमी व्यवस्थित असतात. त्यांची साडी नीटनेटकेपणाने नेसलेली असते. त्यांच्याकडे पाहून प्रसन्न वाटते.’ – श्री. संदीप बगडी, तुळजापूर

२. उत्साही

‘त्या नेहमी आनंदी आणि उत्साही असतात. मी या २ वर्षांत माईंना कधीच नकारात्मक स्थितीत पाहिले नाही.

३. आज्ञापालन करणे

सनातन प्रभातमध्ये वेळोवेळी साधकांसाठी सूचना प्रसिद्ध होतात. शारीरिक त्रास होत असतांनाही माई त्यांचे परिपूर्ण पालन करतात.

४. वेदनांकडे साक्षीभावाने बघणे

एकदा माईंच्या हाताची बोटे ‘मिक्सर’मध्ये अडकून बोटाला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीतही त्या स्थिर होत्या आणि बोटांकडे दुर्लक्ष करून साधनेविषयी बोलत होत्या.

५. निर्मळ मन

त्या कधीच कुणाविषयी वाईट बोलत नाहीत. त्यांना सहसाधक किंवा समाजातील व्यक्ती यांच्याविषयी पूर्वग्रह, राग किंवा नकारात्मक विचार नसतो.’ – श्री. उमेश कदम, तुळजापूर

६. प्रांजळपणा

अ. ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्यात त्या प्रांजळपणे स्वतःच्या साधनेची स्थिती सांगतात.’ – कु. दीपाली मतकर, सोलापूर

आ. ‘त्या स्वतःच्या आणि साधकांच्या चुका प्रांजळपणे सांगतात.

७. चुकीची खंत वाटणे

एकदा मी माईंना म्हणालो, ‘‘तुम्ही पावतीपुस्तक घेतले नाही का ?’’ त्या काही बोलल्या नाहीत. नंतर त्यांच्या घरी पाहुणे आले आणि त्यांना अर्पण द्यायचे होते; पण ‘पावतीपुस्तक नसल्यामुळे अर्पण घेता आले नाही’, याची माईंना जाणीव झाली. त्यांना खंत वाटली की, ‘गुरूंनी साधकाच्या माध्यमातून घरी येऊन पावतीपुस्तकाविषयी सांगितलेे; पण मी ते घेतले नाही. मी आज्ञापालन केले नाही.’ आम्ही भेटल्यावर त्यांनी कान पकडून क्षमा मागितली आणि खंत व्यक्त केली.’ – श्री. उमेश कदम

८. प्रत्येक गोष्ट विचारून करणे

‘त्या प्रत्येक गोष्ट विचारून करतात. समष्टीसाठी नामजप करायला सांगितल्यावर त्यांनी ‘तो कसा करायचा ?’, हे विचारून त्या कृतज्ञतेच्या भावाने नामजप करतात.’ – श्री. संदीप बगडी

९. साधनेची तळमळ

अ. ‘माईंना तीव्र शारीरिक त्रास आहे. त्यांना मूळव्याधीच्या त्रासामुळे एका जागी पुष्कळ वेळ बसणे शक्य होत नाही, तरी केंद्रसत्संग आणि भावसत्संग असतांना त्या पूर्णवेळ बसतात.

आ. केंद्रसत्संग झाल्यावर त्या मला विचारतात, ‘‘माझ्या काही चुका लक्षात आल्या का ? मी कोणते प्रयत्न करू ? मी उणी पडते.’’ ‘देव माझ्यासाठी किती करतो’, अशा विचाराने त्यांचा कृतज्ञताभाव दाटून येतो.

इ. ‘तुळजापूरच्या साधकांची प्रगती व्हायला हवी’, असे त्यांना सतत वाटत असते.’ – कु. दीपाली मतकर, सोलापूर

१०. सेवेची तळमळ

अ. ‘माईंना तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्या उत्साहाने सेवा करतात. त्या स्वतःचे त्रास किंवा सेवा यांविषयी कोणत्याच अडचणी सांगत नाहीत.’ – श्री. संदीप बगडी

आ. ‘त्यांच्या केंद्रात गुरुपौर्णिमेचा प्रसार चालू झाला नाही’, याची त्यांना पुष्कळ खंत वाटली. त्यांची शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही त्यांनी प्रसारसेवा चालू केली.’ – कु. दीपाली मतकर

इ. ‘सहसाधकांनी एखाद्या ठिकाणी जायला नको’, असे सांगितल्यास त्या म्हणतात, ‘‘गुरूंसाठी सगळीकडे जाऊया.’’ तेथील लोकांना ‘चैतन्यापासून वंचित ठेवायला नको’, असा त्यांचा भाव असतो.

११. परेच्छेने वागणे

माईंना ३ मुले आहेत. माईंना ‘स्वतःची अशी कोणतीच इच्छा राहिली नाही’, असे वाटते. मी एकदा माईंना म्हटले, ‘‘तुम्ही तुमच्या जुन्या घरी रहायला या. त्यामुळे तुमचा सहवास मिळेल.’’ तेव्हा माईंनी सांगितले, ‘मुले सांगतात, तिथे मी रहाते.’’

१२. अल्प अहं

माईंना समाजात मान आहे; पण त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मोठेपणा किंवा वेगळेपणा जाणवत नाही.’ – श्री. उमेश कदम

१३. माईंच्या सत्संगामुळे होणारे लाभ !

अ. ‘माईंतील प्रेमभावामुळे समाजातील व्यक्ती त्यांच्याकडे लोहचुंबकाप्रमाणे आकर्षिल्या जातात. प्रसाराला जातांना माई समवेत असल्यास समाजात चांगला प्रतिसाद मिळतो.

आ. त्यांच्यामुळे साधकांना आनंद मिळतो आणि उत्साह वाढतो.

१४. माईंमध्ये जाणवलेले पालट

अ. माईंचा तोंडवळा तेजस्वी दिसतो. माई शांत आणि स्थिर वाटतात. त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांच्या सहवासात शांत आणि स्थिर वाटून मला आनंद होतो.’ – श्री. उमेश कदम

आ. ‘माई सतत भावावस्थेत आहेत’, असे वाटते. त्यांच्या तोंडवळ्यावर दैवी पालट झाल्याचे जाणवते.’ – श्री. संदीप बगडी

१५. अनुभूती – लिखाण करण्यापूर्वी आपोआप प्रार्थना होऊन भावाश्रू अनावर होणे

‘हे लिखाण करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतांना ‘माईंच्या संदर्भात मला सूत्रे सुचू देत’, अशी प्रार्थना माझ्याकडून आपोआप झाली. लिखाण करण्यापूर्वीच माझा भाव जागृत होऊन अश्रू अनावर झाले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद जाणवत होता.’

– श्री. उमेश कदम

श्रीमती माई देशमुख यांनी ‘संतपद’ गाठण्याच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना !

१. ‘माईंच्या समवेत सेवेला जातांना त्यांच्या सहवासामुळे माझा नामजप आपोआप चालू झाला आणि माझा भाव जागृत होत होता.

२. माईंचा तोंडवळा पिवळसर झाल्याचे जाणवत होते.

३. एकदा माईंकडे बघतांना ‘त्या प.पू. (कै.) पेठेआजी आहेत’, असे मला जाणवलेे.

४. एकदा मला स्वप्नात ‘माई संत झाल्या आहेत आणि त्यांचा सन्मान होत आहे’, असे दिसलेे.’

– सौ. पुनाताई होरडे, तुळजापूर (जुलै २०१८)

(पू. माई देशमुख यांच्याविषयी साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये त्या संत व्हायच्या अगोदर लिहून दिल्याने त्यात ‘माई’ असा उल्लेख केला आहे. – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात