नाशिक येथील श्रीमती यशोदाबाई नागरेआजी (वय ८७ वर्षे) संतपदी विराजमान !

‘सनातनने ओळखलेले समाजातील संतरत्न !’

नाशिक – ‘सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या आणि सर्वांवर प्रेम करणार्‍या येथील श्रीमती यशोदाबाई गंगाधर नागरेआजी (वय ८७ वर्षे) १५ जुलै २०१८ या दिवशी संतपदी विराजमान झाल्या. नाशिक येथे झालेल्या एका भावसोहळ्यात सनातनचे १३ वे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी श्रीमती नागरेआजी संत झाल्याचे घोषित केले. त्या वेळी उपस्थित सर्वच साधकांना पुष्कळ आनंद झाला. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पू. (श्रीमती) नागरेआजी यांचा सन्मान केला. या वेळी सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रिय यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पू. (श्रीमती) नागरेआजी या सनातनच्या साधिका सौ. सुनिता गीते यांच्या मातोश्री आहेत.

श्रीमती नागरेआजी या संत झाल्याचे सद्गुरु जाधवकाका यांनी घोषित केल्यावर वातावरणात चैतन्य जाणवत होते. सोहळ्यात पू. नागरेआजी साधकांशी संवाद साधतांना म्हणाल्या, ‘‘मला २ दिवसांपासून ईश्‍वराच्या जवळ जाण्याची ओढ लागली होती.’’

‘पू. आजी बोलत असतांना भावजागृती होत होती’, असे उपस्थित साधकांनी सांगितले. सनातनच्या साधिका श्रीमती शामला देशमुख आणि सौ. प्राची कुलकर्णी यांनाही अशीच अनुभूती आली.

या वेळी सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा भुरे म्हणाल्या, ‘‘पू. (श्रीमती) नागरेआजी यांचे ज्या वेळी सत्संगस्थळी आगमन झाले, तेव्हा चैतन्याचा थंड झोत आल्याचे जाणवले. जेव्हा त्या आसंदीमध्ये येऊन बसल्या, तेव्हा त्यांच्याकडे बघून पुष्कळ आनंद होत होता. चैतन्याच्या लहरी येत होत्या. सतत भावजागृती होत होती. त्यांचे प्रत्येक वाक्य हे केवळ साधनेच्या संदर्भात किंवा ईश्‍वराच्या संदर्भात होते. प्रत्येक वाक्यातून साधनेची सूत्रे सांगितली जात होती. त्यांच्या हातात नामजपाची माळ होती आणि त्यांचा नामजप अखंड चालू होता. त्या सर्व कर्तेपण ईश्‍वराला अर्पण करत होत्या.’’

सौ. रेवती भट यांनी सांगितले, ‘‘पू. आजी बोलत होत्या, तेव्हा त्यांचे प्रत्येक वाक्य सुवचन असल्याचे जाणवत होते. त्या ओव्या म्हणतांना आनंद जाणवत होता. त्यांच्या चरणांजवळून उठू नये, असे वाटत होते !’’

सौ. वंदना ओझरकर यांना मिळालेली पूर्वसूचना !

‘१५ जुलै या दिवशी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात सद्गुरु जाधवकाका स्वभावदोष-निर्मूलन सत्संग घेण्यासाठी आले होते. त्या वेळी मी मुलाला सांगितले, ‘‘आज तुझ्याजवळील कॅमेर्‍याची बॅटरी ‘चार्ज’ करून ठेव. छायाचित्रे काढण्यासाठी कॅमेर्‍याची आवश्यकता लागू शकते.’’ सत्संग चालू झाल्यानंतर सायंकाळी गंगापूर रोड या भागातील साधिका सौ. सुनिता गीते त्यांच्या आईंना घेऊन सत्संगस्थळी आल्या. त्यांना बघून आनंद वाटला आणि ‘आज त्यांचा सन्मान होईल’, असे वाटले.’ –  सौ. वंदना ओझरकर, नाशिक

 

मुलांवर चांगले संस्कार करणार्‍या
आणि सर्वांवर प्रेम करणार्‍या पू. (श्रीमती) नागरेआजी !

१. कष्टाळू

‘आईचे लग्न तिच्या वयाच्या दहाव्या वर्षी झाले. तेव्हापासून ती पहाटे उठून जात्यावर दळण दळणे, नदीवरून पाणी आणणे, शेण काढणे, धुणी-भांडी करणे, दिवसभर शेतात जाणे, अशी कामे न थकता आनंदाने करायची.

२. उत्साही

आता आईचे वय ८७ वर्षे आहे, तरी तिला कसलाही शारीरिक आजार नाही. ती कोणतेही औषध घेत नाही. ती नेहमी उत्साही असते. ती स्वतःची कामे स्वतः करते आणि नीटनेटकी रहाते.

३. पाककलेत निपुण

आई रुचकर स्वयंपाक करते. गावातील प्रत्येक व्यक्ती तिच्या पाककलेचे कौतुक करते. माझ्या भावाच्या सुना आईला कढी, अळूवडी, मेथीची भाजी करायला सांगतात. आई ते उत्साहाने करते.

४. भोळा स्वभाव

गावातील सर्वच लोक म्हणतात, ‘‘ती भोळी आहे.’’ मी आईला कधी कुणाशी भांडतांना पाहिले नाही. ती कधीच कुणाविषयी वाईट बोलत नाही.

५. साधना

ती चाळीस वर्षांपासून महानुभाव पंथानुसार साधना करत आहे. ती सतत जपमाळ घेऊन नामजप करते.

६. मुलांवर चांगले संस्कार करणे

आईने आमच्यावर लहानपणीच देवाधर्माचे संस्कार केले. तिने आम्हाला कधीच मारले नाही. ती आम्हाला प्रत्येक गोष्ट प्रेमाने सांगते. ती नेहमी म्हणते, ‘‘कुणाला त्रास होईल, असे वागू नये. खोटे बोलू नये. देव आपल्याकडे बघत असतो.’’ ती स्वतःही याप्रमाणे आचरण करते. आईने केलेल्या संस्कारामुळे माझे तीनही भाऊ आणि भाचे साधना करतात. घरात कुणालाही कसलेच व्यसन नाही. कुणीही मांसाहार करत नाही. भाऊ शांत स्वभावाचे आहेत.

७. कौटुंबिक दायित्व आनंदाने पार पाडणे

आईने माझ्या वडिलांच्या आध्यात्मिक त्रासात आणि आजारपणात न कंटाळता सर्व केले. तिने त्यांना साधनेला लावले. साधनेनेच आई-वडील शारीरिक त्रासांवर मात करू शकले. आईमध्ये नम्रता, सहनशीलता, माघार घेणे, हे गुण असल्यामुळे आमच्या घरात आई-वडिलांचे भांडण झालेले मी कधीच बघितलेले नाही. आईचे गावात चांगले संबंध आहेत. आईने तिच्या सासू-सासर्‍यांचे सर्व केले. त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळले. माझ्या वडिलांची आई १०२ वर्षांची होती. आजीचे सर्व अंथरुणावरच करतांना आईला कधी किळस वाटली नाही. आईच्या मनात कुणाविषयी पूर्वग्रह नाही.

८. सहनशील

आई घरात धाकटी सून होती. काकू आईला घालून पाडून बोलायची. तिला अधिक कामे सांगायची. काकू भावंडांमध्ये खाण्यात भेदभाव करायची; पण आईने कधीच तिला त्याचा जाब विचारला नाही. माझी आजीही आईला सासुरवास करायची. माझ्या आजोबांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनीच माझ्या काकांना आणि वडिलांना वेगवेगळे रहायला सांगितले. तेव्हाही काकूने आईला संसारोपयोगी वस्तू दिल्या नाहीत; पण तिने ते निमूटपणे सहन केले. आईवर करणी केली असल्यामुळे तिला आध्यात्मिक त्रास व्हायचा. ती एकदा झोपली की, अन्न-पाणी न घेता आठ दिवस झोपून रहायची.

९. प्रेमभाव

अ. आईचे वडील तिला चहा पावडर, साखर, गूळ, साबण इत्यादी देत. आई ते जावेलाही द्यायची. तेव्हा आई ‘जाऊ माझ्याशी अयोग्य वागते. मग तिला कशाला द्यायचे ?’, असा विचार करायची नाही.

आ. आई सर्वांवर प्रेम करते. ती सुनांना मुलींप्रमाणे वागवते. आम्ही माहेरी गेल्यावर ती आम्हाला त्यांना साहाय्य करायला सांगते. ती सुना आणि नातसुना यांना या वयातही भाज्या निवडणे, लसूण सोलून देणे, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करणे, भांडी लावणे अशा प्रकारे साहाय्य करते. ती इतरांना खायला देतांना कधीच भेदभाव करत नाही. ती घरातील व्यक्ती आणि कामाला येणारी माणसे यांच्यात भेदभाव करत नाही. तिच्या या स्वभावामुळे या वयातही तिच्या माहेरी भावांची नातवंडेही आईला त्यांच्या घरी रहायला बोलावतात. आईला तिचे भाऊ, भाचे भेटायला येतात. आईला राखी पौर्णिमा आणि भाऊबिजेला घरी घेऊन जातात.

१०. आसक्ती नसणे

आईला तिच्या माहेरचे पैसे देतात. ते ती लगेच नातवाकडे देते.  ती म्हणते, ‘‘मला पैसे काय करायचे ?’’

११. अपेक्षा नसणे

तिची कुणाकडून कसलीच अपेक्षा नसते. आम्ही मुली तिला कधीतरी भेटायला जातो; पण ती त्याविषयी कधी काही म्हणत नाही.

१२. साधनेचे कौतुक

मी सनातनच्या माध्यमातून साधना करते, याचे तिला कौतुक आहे.

१३. अल्प अहं

आईच्या माहेरची आर्थिक स्थिती उत्तम होती; पण त्याचा तिला कधीही अभिमान नव्हता. तिने सासरच्या साधारण परिस्थितीशी जुळवून घेतले. माझे वडील आईचे यासाठी नेहमी कौतुक करायचे. ते नेहमी म्हणायचे, ‘‘तुझी आई एवढ्या मोठ्या घरातील असूनही तिला त्याचे काही वाटत नाही.’’

१४. जाणवलेले पालट

अ. तिचा तोंडावळा तेजस्वी दिसतो.

आ. ‘ती अंतर्मुख झाली आहे’, असे वाटते.

इ.  ती म्हणते, ‘‘आता केवळ देवच हवा !’’

– सौ. सुनिता गिते (मुलगी), गंगापूर रोड, नाशिक.
‘एखादी व्यक्ती श्रीमती यशोदा गंगाधर नागरेआजींसारखी असू शकते, यावर विश्‍वासही बसत नाही. याचाच अर्थ त्या अद्वितीय आणि सर्वांसाठी आदर्श आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले