हिंदूंनी संघटित होऊन त्यांची संघटनशक्ती दाखवावी ! – शंभू गवारे, प्रवक्ते, सनातन संस्था

मुंबई येथील सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरात उत्सव मंडळांचा निर्धार

मुंबई – सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु धर्माचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्य व्यक्तीला आनंद देणे, हा उत्सवांमागील प्रमुख उद्देश आहे. आजमितीला मात्र हा आनंद काहीसा उणावला आहे. सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवांच्या अनुमतींपासून ते प्रत्यक्ष उत्सव साजरे करेपर्यंत अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. हिंदूंच्या उत्सवांवर प्रशासनाकडून जाचक अटी लादल्या जातात. प्रसिद्धी आणि प्रसार माध्यमांकडूनही हिंदूंच्या उत्सवांना नकारात्मकरित्या सादर केले जाते. त्यामुळे जनसामान्यांमध्ये धार्मिक उत्सवांप्रतीचे प्रेम अल्प होत चालले आहे. उत्सव साजरे करण्यामागील मूळ उद्देश साध्य व्हावा, उत्सवांच्या निमित्ताने विधायक कामांना गती मिळावी, तसेच अधिकाधिक हिंदूंचे संघटन होऊन धर्मासाठी एकत्र येण्याची वृत्ती हिंदूंमध्ये निर्माण व्हावी, यासाठी रविवार, दिनांक १५ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० ते ९ या वेळेत मुंबईतील काळाचौकी येथील अभ्युदय एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या आरंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल पाटेकर यांनी शंखनाद केला. दीपप्रज्वलनाने शिबिराला आरंभ करण्यात आला. सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, बालमोहन उत्कर्ष समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र दळवी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, जनता सेवाभावी मंडऴाचे अध्यक्ष श्री. वसंत दहिफळे यांनी दीपप्रज्वलन केले. सनातनच्या धर्मप्रसारक पू. (सौ.) संगिता जाधव यांचीही वंदनीय उपस्थिती या शिबिराला लाभली. या वेळी ३२ मंडळांचे ५४ पदाधिकारी आणि २ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिराची आवश्यकता विषद करतांना हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार म्हणाले, ‘‘मूठभर मावळ्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्या नष्ट केल्या आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सार्वजनिक उत्सव मंडळे एकत्रित येऊन कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात, याविषयीचे विचारमंथन या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला करायचे आहे.’’

श्री. सागर चोपदार

 

कार्यक्रमस्थळाची वैशिष्ट्ये !

सार्वजनिक धार्मिक उत्सवांमध्ये काय असावे आणि काय नसावे यांविषयीची माहिती करून देणारी आणि विविध माध्यमांतून होणार्‍या देवतांच्या विडंबनाविषयी जागृती करणारी ध्वनीचित्रफीत मोठ्या पडद्याच्या माध्यमातून उपस्थितांना दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वश्री निलेश देशमुख आणि सतीश कोचरेकर यांनी केले. या वेळी श्रीगणेश पूजनाविषयी माहिती देणारे धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शन सभागृहात लावण्यात आले होते. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीही प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या वितरण कक्षाला भेट देऊन उपस्थित मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी त्याचा लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. दिवसभर मुसळधार पाऊस असूनही मुंबईच्या विविध भागांतून उत्सव मंडळांचे पदाधिकारी शिबिराला उपस्थित होते.

२. शिबिराला आरंभ होण्याच्या काही मिनिटे आधी सभागृहातील वीजपुरवठा खंडित झाला होता; मात्र सर्वांनी सामूहिक प्रार्थना केल्यावर काही मिनिटांतच वीजपुरवठा पूर्ववत झाला.

 

मान्यवरांनी मांडलेले विचार…

हिंदूंनी संघटित होऊन त्यांची संघटनशक्ती
दाखवावी ! – शंभू गवारे, प्रवक्ते, सनातन संस्था

समस्त उत्सव मंडळांनी एकत्र येऊन एक संघटन सिद्ध करावे. शासनाने हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर कोणतेही निर्बंध लादण्याआधी या संघटनेच्या प्रतिनिधींचे मत विचारात घेणे सरकारला अनिवार्य असले पाहिजे. हिंदु जनजागृती समिती मागील अनेक वर्षांपासून हिंदूंच्या संघटनाचे कार्य करत आहे. हिंदूंचे धार्मिक उत्सव जवळ आले, की प्रशासन विविध निर्बंध घालण्यास आरंभ करते. या वर्षी गणेशोत्सवाच्या १० दिवस आधी मंडप घालण्याची अनुमती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नेमून दिलेल्या खड्ड्यांपेक्षा एक जरी खड्डा अधिक खणला, तर प्रशासन प्रतीखड्डा दोन सहस्र रुपये दंड आकारणार आहे. ३ दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे २ नागरिकांचा नाहक बळी गेला. या खड्ड्यांचे दायित्व असणार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट व्हायला नको का ? कलियुगात संघटनाला महत्त्व आहे. अन्य धर्मीय त्यांच्या उपासनेच्या वाराला संघटित होतात त्यामुळे प्रशासन त्यांची नोंद घेते. हिंदु युवकांनीही विविध उपक्रमांच्या निमित्ताने सातत्याने संघटित व्हायला हवे. धर्मशिक्षण घेऊन सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देण्यास सिद्ध झाले पाहजे. हिंदू संघटित होत असल्याचे पाहून प्रशासनालाही आपले मत विचारात घेणे भाग पडेल.

माहिती अधिकाराचा वापर करून उत्सवांवरील अन्याय्य निर्बंधांचा वैध मार्गाने विरोध करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

प्रतिवर्षी हिंदूंच्या उत्सवांवर शासकीय निर्बंध लादले जातात. कधी पर्यावरणरक्षणाचे, कधी प्रदूषण नियंत्रणाचे, तर कधी अन्य धर्मियांच्या भावना दुखावण्याचे कारण देत मतपेटीसाठी सरकार हिंदूंच्या उत्सवांवर टाच आणते. मुळात सहिष्णू असलेला हिंदु निमूटपणे ते सहन करत करतो. अन्य धर्मियांच्या उत्सवांवर मात्र असे कोणतेही निर्बंध घातले जात नाहीत.

मागील काही वर्षांच्या गणेशोत्सवातील शासकीय आदेशांची माहिती ‘माहिती अधिकार कायद्या’च्या अंतर्गत घेतली असता ‘पर्यावरणासाठी कागदी लगद्यापासून मूर्ती बनवा’, ‘विसर्जन कृत्रिम तलावात करा’, यांसारख्या आदेशांचा फोलपणा लक्षात आला. जे पोलीस गणेशोत्सव आणि नवरात्री यांमध्येच कायद्याचा धाक दाखवून ध्वनीक्षेपक बंद करण्यास भाग पाडतात तेच पोलीस न्यायालयाचा आदेश असतांनाही मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवत नाहीत. आपले सण आणि उत्सव टिकवायचे असतील, तर समस्त उत्सव मंडळांनी संघटित होऊन, माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा आणि अन्यायाचा वैध मार्गाने विरोध करावा.

कायद्याचा बडगा केवळ हिंदूंच्या उत्सवांवरच का ? – नरेश
दहीबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

गेल्या १५-२० वर्षांपासून गणेशोत्सवाला व्यावसायिक स्वरूप आले आहे. ज्यामुळे उत्सवांतील धार्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदूंच्या उत्सवांच्या एक-दोन महिने आधी अशासकीय संस्थाकडून हिंदूंच्या उत्सवानिमित्त उभारल्या जाणार्‍या मंडपांमळे वाहतुकीला अडथळा होतो, मिरवणुकांमुळे आणि ध्वनीक्षेपकांमुळे ध्वनीप्रदूषण होते अशी कारणे देऊन न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्या जातात. प्रशासनाकडूनही हिंदूच्या धार्मिक उत्सवांवर निर्बंध आणले जातात. पारंपरिक वाद्ये वाजवण्यावरही बंदी घातली जाते. ध्वनीक्षेपकाच्या वापराविषयी प्रशासनाकडून केवळ हिंदूंना कायदा दाखवून कारवाई केली जाते. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून अन्य धर्मियांच्या लोकांनी लावलेल्या धवनीक्षेपकांवर कारवाई करणे जाणीवपूर्वक टाळले जाते. कायदा सर्वांसाठी समान आहे, तर कारवाई केवळ हिंदूंवरच का होते ?

श्री. नरेश दहीबावकर यांना काही कारणास्तव शिबिराला उपस्थित रहाता न आल्याने त्यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी श्री. दहीबावकर यांनी उत्सव मंडळांना श्रीगणेशमूर्तीची उंची मर्यादित ठेवण्याचे आणि भरतीच्या वेळी मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले.

राष्ट्र आणि धर्म यांप्रती समस्त हिंदूंनी सतर्क
रहावे ! – वसंत दहिफळे, अध्यक्ष, जनता सेवाभावी मंडळ

आपल्यावर आपल्या आई-वडिलांनी चांगले संस्कार केले, म्हणून ज्याप्रमाणे आपण एकत्र येऊन धार्मिक उत्सव आनंदाने साजरे करतो, त्याप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीमध्ये हिंदु संघटनाची आणि धार्मिक उत्सव एकत्रितपणे साजरे करण्याची आवड निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मंडळांनी धर्म आणि राष्ट्र प्रेम निर्माण करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या उत्सवांमध्ये आयोजित करावेत. लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे, तरीही आज आपल्याला आपल्या धर्माप्रती आणि राष्ट्राप्रती सातत्याने सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.

उत्सवाचा मूळ उद्देश सफल होणे म्हणजेच
आदर्श उत्सव ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

धार्मिक उत्सव हे शास्त्रानुसारच साजरे होणे आवश्यक आहे. देवतेची मूर्ती अवाढव्य नव्हे, तर लहान असावी, आरती मोठमोठ्याने नव्हे, एकाग्रतेने आणि भावपूर्ण करावी, मोठ्या आवाजात चित्रपटातील गीते, नृत्य यांसारख्ये कार्यक्रम नको, तर धर्म, समाज आणि राष्ट्र यांविषयक जागृती निर्माण करणारे उपक्रम राबवण्यात यावेत. नामस्मरण आणि भजन करत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करावे, अशाप्रकारे उत्सवांमागील मूळ उद्देश लक्षात घेऊन ते साजरे केले, तरच ते आदर्शरित्या साजरे होतील. आदर्श उत्सव साजरे करून राष्ट्र आणि धर्म कार्यासहित भक्तांनी त्यांची वैयक्तिक उन्नती करून घ्यावी.

 

सार्वजनिक उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेले मनोगत

हिंदूंच्या भावनांना हात घातला की हिंदू
संघटित होतात ! – राजेश राणे, त्रिमूर्ती मित्र मंडळ, शिवडी

मुंबईतील शिवडी येथील पुरातन मंदिर महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत ठरवून तोडण्याचा घाट घातला होता. सामाजिक प्रसारमाध्यमांतून आम्ही आंदोलनाचा प्रसार केला, तेव्हा दुसर्‍या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास ८ ते १० सहस्र हिंदू संघटित झाले. पुरातन मंदिर तोडले जाणार नाही, असा शासनाचा आदेशही आम्हाला मिळाला. हिंदूंच्या भावनांना हात घातला, की हिंदू किती मोठ्या प्रमाणात संघटित होतात याची प्रचीती आम्हाला आली. अशीच संघटन शक्ती हिंदूंनी सर्वच मंदिरांच्या संदर्भात दाखवायला हवी.

उत्सव आदर्शरित्या साजरे करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे
मार्गदर्शन घ्यावे ! – संघटन शर्मा, अध्यक्ष, हिंद सायकल गणेशोत्सव मंडळ

गेल्या ६ वर्षांपासून आमचे मंडळ हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनानुसार आदर्शरित्या गणेशोत्सव साजरा करत आहे. उत्सव मंडळांना प्रोत्साहन देऊन उत्सवात नेमके काय असावे आणि काय नसावे याविषयी हिंदु जनजागृती समिती पुष्कळ चांगल्या रितीने मार्गदर्शन करते. याचा सर्वच मंडळांनी लाभ घ्यावा. आमच्या मंडळाच्या उत्सवात अफझलखानवधाचे चित्र पोलिसांनी काढायला लावले. त्या वेळी हिंदूंनी संघटन दाखवले असते, तर तसे घडले नसते.

उत्सव मंडळांना एकत्रित करण्याचे कार्य
कौतुकास्पद ! – राजेश पवार, बाळगोपाळ मित्र मंडळ, प्रभादेवी

‘उत्सवात काय असावे आणि काय नसावे’ या विषयीचा समितीचा फ्लेक्स फलक प्रतिवर्षी आम्ही आमच्या मंडळात लावतो. समस्त उत्सव मंडळांना संघटित करण्याचे मोठे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहेत. यांतून नक्कीच भक्कम असे संघटन निर्माण होईल. मंडळाच्या वतीने आम्ही सर्वांना श्रीमद्भगवद्गीतेचे वाटप केले.

प्रतिसाद

या वेळी घेण्यात आलेल्या गटचर्चेमध्ये सर्वच मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अशा प्रकारचे शिबीर नवी मुंबईतही घेण्याची विनंती एका मंडळाने केली, तर एका मंडळाने प्रत्येक उत्सवाच्या आधी अशाच प्रकारे सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांनी एकत्र येऊन विचार विनिमय करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. उत्सवाच्या काळात हिंदु जनजागृती समितीने प्रत्येक मंडळात जाऊन धर्माचरण आणि धर्मजागृती विषयक उपक्रम राबवावेत, अशी सूचना एका मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केली.

आभार

१. शिबिरासाठी ‘अभ्युदय बँक सभागृहा’चे व्यवस्थापक सर्वश्री अभय पाटील आणि तुळसीदास भोजने यांचे सहकार्य लाभले.

२. परशुराम क्रीडा मंडळाचे श्री. अतुल कुरणकर यांनी विनामूल्य अल्पाहार उपलब्ध करून दिला.

३. धर्मप्रेमी श्री. निशांत घाडी यांनी ध्वनीयंत्रणा आणि व्यासपिठावरील साहित्य उपलब्ध करून दिले.

४. धर्मप्रेमी श्री. बिपीन कुलकर्णी यांनी प्रोजेक्टर उपलब्ध करून दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात