अनासक्त, देवावर दृढ श्रद्धा असणार्‍या आणि मुलांकडून कोणतीही अपेक्षा न करता त्यांना साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या सनातनच्या २९ व्या संत पू. कै. (सौ.) निर्मला होनप !

१. बालपण

‘आईचे वडील त्या काळचे मामलेदार होते. ते अतिशय शिस्तप्रिय आणि तापट स्वभावाचे होते. घरी सुबत्ता होती. पुणे जिल्ह्यातील बेल्हे या गावी त्यांचे गणपतीचे मंदिर होते. त्याची सर्व व्यवस्था ते पहायचे.

१ अ. आडात पडूनही कोणतीही दुखापत न होणे आणि ‘गणपतीनेच वाचवले’, अशी आईची दृढ श्रद्धा असणे

आई ११ – १२ वर्षांची असतांना आडाचे पाणी काढतांना पाय घसरून आडात पडली. आजी-आजोबांना वाटले, ‘मुलगी आडात पडून गेली असावी’; पण थोड्या वेळाने आईने ‘मी आडात आहे. बालदी सोडा. त्यात बसून मी वर येते’, असे मोठ्याने ओरडून सांगितल्यावर आजोबांनी बालदी आडात सोडली. आई त्यात बसली आणि आजोबांनी बालदी दोराने ओढून तिला वर काढले. आडात पडूनही आईला काहीही झाले नाही. ‘गणपतीनेच मला वाचवले’, अशी आईची दृढ श्रद्धा होती.

आई १२ वर्षांची असतांना तिची आई वारली. आई एकुलते एक अपत्य होते. त्यामुळे तिच्या आईच्या मृत्यूनंतर ती पुढील शिक्षणासाठी काकांच्या घरी नाशिकला आणि त्यानंतर पुण्याला राहिली.’ – कु. दीपाली होनप (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पू. कै. (सौ.) निर्मला होनप

२. संगीताची आवड असणे

‘आईला गायन आणि पेटीवादन यांची आवड होती. तिने गाण्याच्या काही परीक्षाही दिल्या होत्या. हा छंद तिने स्वतःपुरता जोपासला होता.

३. अनासक्त

घरासाठी नवनवीन वस्तू अथवा किंमती साड्या खरेदी करण्याची आईला हौस नव्हती. ती आहे त्या परिस्थितीत समाधानी असायची. आम्ही जुन्या वाड्यात रहात होतो, तरी तिने नवीन वास्तू खरेदी करण्याच्या संदर्भात वडिलांना कधीही आग्रह केलेला आम्ही पाहिलेला नाही.

४. काटकसरी

दुकानदाराने धान्याचे कागदी पुडे बांधण्यासाठी वापरलेले दोरे ती व्यवस्थित गुंडाळी करून ठेवत असे. कपड्यांची जुनी बटणे, जुने स्क्रू इत्यादी वस्तू टाकून न देता त्यांचा परत वापरण्याचा प्रयत्न करत असे.

५. क्षात्रवृत्ती

५ अ. वडिलोपार्जित संपत्तीत हक्क मिळवण्यासाठी आईने दीर्घकाळ न्यायालयीन लढा देणे आणि त्यानंतर तिला तिचा हक्क मिळणे

कु. दीपाली होनप

माझ्या आजोबांच्या निधनानंतर वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा हक्क आईचा असतांना त्याविरुद्ध आमचे एक नातेवाईक न्यायालयात गेले होते. त्यामुळे आईने नातेवाइकाशी तडजोड न करता न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले. पुणे येथील न्यायालयात ही केस चालली. यासाठी आईला अनेक वर्षे नाशिकहून पुण्याला हेलपाटे मारावे लागले. आई एकटी पुण्याला न्यायालयात जात असे. शेवटी वारसा हक्क सांगणार्‍या नातेवाइकाने केसमधून माघार घेतली आणि आईला तिचा वडिलोपार्जित संपत्तीत हक्क प्राप्त झाला.’ – श्री. राम (मुलगा) आणि कु. दीपाली

५ अ १. स्वतःच्या हक्कासाठी न्यायालयीन लढा देण्यामागे आईने ठेवलेला आध्यात्मिक दृष्टीकोन

‘आईने वडिलोपार्जित संपत्तीसाठी न्यायालयात जाण्याविषयी आम्ही तिला विचारले, ‘‘आई, आपल्याकडे तर सर्वकाही भरभरून आहे. मग तू का लढत आहेस ?’’ त्यावर आई म्हणाली, ‘‘असाच प्रश्‍न ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना त्यांच्या शिष्यांनी विचारला होता. महाराजांनीही त्यांचा वारसा हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. शिष्य महाराजांना म्हणाला, ‘‘तुम्ही रामाची भक्ती करता. मग भूमीसाठी का लढता ?’’ त्याविषयी ते शिष्याला म्हणाले, ‘‘मी माझ्या हक्काची भूमी मिळवीन; कारण तो माझा हक्क आहे आणि त्यानंतर मी ती धर्मकार्यासाठी अर्पण करीन.’’ महाराजांचा आदर्श माझ्यासमोर आहे.’’ – कु. दीपाली होनप

५ आ. त्रास देणार्‍या गुंड मुलांना आणि शेजार्‍यांना त्यांच्या चुकीची जाणीव क्षात्रवृत्तीने करून देणे

‘आम्ही नाशिकला ज्या घरी वास्तव्यास होतो, त्या ठिकाणी काही टारगट मुले मोठमोठ्याने आरडाओरड करत खेळायची. ती मुले दुपारी आई झोपलेली असतांना चेंडू-फळी (क्रिकेट) खेळायची. त्या वेळी त्यांचा चेंडू आमच्या घरात यायचा. त्यांचा आरडाओरडा ऐकून आईची झोपमोड व्हायची, तसेच ‘घरात आलेला चेंडू झोपेत असतांना लागेल कि काय ?’, याची भीती असायची. त्या मुलांचा आसपासच्या इतर लोकांनाही त्रास व्हायचा. शेजारचे काही लोक घरात कचरा टाकायचे. त्या वेळी आई एकटी असूनही त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव न घाबरता करून देत होती; परंतु ही गुंड मुले आणि शेजारचे लोक आईचे ऐकत नव्हते. त्यांच्या चुकीच्या कर्मांमुळे त्यांच्या घरात कलह निर्माण झाला.

६. साधना आणि आलेल्या विविध अनुभूती

६ अ. नियमित देवपूजा, पोथीवाचन इत्यादी करणे, श्रीरामाचा नामजप करणे आणि मुलांकडूनही तो करवून घेणे

आई घरात नियमित देवपूजा, पोथीवाचन, आरत्या, उपवास इत्यादी कर्मकांड नियमित करत असे. तसे ती आमच्याकडूनही करवून घेत असे. ती श्रीरामाचा नामजप करत असे. आम्हालाही ती नामजप करण्यास सांगत असे. त्यामुळे घरातील वातावरण सात्त्विक रहाण्यास साहाय्य झाले. ती आम्हाला सांगत असे, ‘‘कोणी काही कामाचे नाहीत. केवळ देवच आपला आहे.’’ – श्री. राम आणि कु. दीपाली होनप

६ आ. गरोदर असतांना नवव्या मासात गर्दीत श्रीरामाच्या दर्शनाच्या ओढीने देवळात जाणे आणि ‘श्रीरामाचे सतत स्मरण रहावे’, यासाठी मुलाचे नाव ‘राम’ ठेवणे

श्री. राम होनप

‘मी गर्भात असतांना आई नवव्या मासात रामनवमीच्या दिवशी देवळात प्रभु श्रीरामाच्या दर्शनाला गेली होती. तेथे पुष्कळ गर्दी होती. आईची अवघडलेली अवस्था पाहून अन्य स्त्रिया आईला अशा स्थितीत देवळात जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत होत्या; परंतु आईला प्रभु रामाच्या दर्शनाची ओढ लागली होती. त्यामुळे इतका त्रास सहन करून ती देवळात गेली होती. त्यानंतर दोन दिवसांनी माझा जन्म झाला. ‘प्रभु रामाचे सतत स्मरण रहावे’, यासाठी आईने माझे नाव ‘राम’ ठेवले.’ – श्री. राम होनप

६ इ. घराची भिंत पडण्याच्या अपघातातून देवाने वाचवल्याची अनुभूती येणे

‘आम्ही नाशिकला असतांना प्रतिदिन आई रस्त्याकडील भिंतीला लागून असलेल्या स्वयंपाकघरात उभी राहून पाणी भरायची. एके दिवशी तिच्या मनात विचार आला, ‘आज भिंतीच्या बाजूला उभे राहून पाणी न भरता दुसर्‍या बाजूला उभे राहून पाणी भरूया.’ त्याप्रमाणे ती दुसर्‍या बाजूला उभी राहून पाणी भरू लागली आणि थोड्याच वेळात ती भिंत वरच्या मजल्यापासून खालपर्यंत कोसळली. आई त्या ठिकाणी थांबली असती, तर भिंत तिच्या अंगावरच कोसळली असती. त्या दिवशी आम्हीही सकाळी लवकर उठलो नव्हतो. दुसर्‍या खोलीत झोपलो होतो. त्यामुळे आई आणि आम्हा सर्वांनाच देवाने वाचवल्याची अनुभूती आली.

६ ई. दासबोधाचा अभ्यास करून त्याच्या परीक्षा देणे आणि संपूर्ण दासबोध हाताने लिहून काढणे

ती प्रतिदिन दासबोधाचा एक समास आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातील एक पान वाचल्याविना झोपत नसे. आईने दासबोधाचा अभ्यास करून त्याच्या परीक्षा दिल्या होत्या. दासबोधाच्या परीक्षा दिल्यानंतर अनेक वर्षे तिने दासबोधाची समीक्षक म्हणूनही सेवा केली. तिने संपूर्ण दासबोध हाताने लिहून काढला होता. प्रसंगानुरूप दासबोधातील श्‍लोक सांगून ती आम्हाला मार्गदर्शन करत असे.’ – कु. दीपाली होनप

६ उ. कीर्तनात सांगितल्याप्रमाणे जेवतांना मौन पाळणे

‘आई देवळात नियमित कीर्तन ऐकायला जायची. पाऊस असो, थंडी असो, तिच्या या नित्यनेमात कधीही खंड पडला नाही. ‘कुणी समवेत असायला हवे’, असे नसायचे. रात्रीच्या वेळी ती एकटीच कीर्तनाला जात असे. एकदा राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. गंधे महाराज यांनी कीर्तनात श्रोत्यांना जेवतांना मौन पाळण्याचे महत्त्व सांगितले. हे सूत्र ऐकून आईने अनेक मास (महिने) जेवतांना मौन पाळून नामजप करण्याचा प्रयत्न केला.

६ ऊ. कीर्तनकारांचे आदरातिथ्य करून त्यांचे आशीर्वाद मिळवणे

आई देवळात कीर्तन ऐकायला जायची. त्या वेळी काही कीर्तनकार कीर्तन करण्यासाठी बाहेरगावाहून नाशिकला आलेले असायचे. बाहेरगावाहून आलेेले, तसेच स्थानिक कीर्तनकार यांना आई अधून-मधून घरी जेवायला बोलवायची. तेव्हा ती सण असल्याप्रमाणे जेवणाच्या ताटाभोवती रांगोळी काढून, उदबत्ती लावून, तसेच मिष्टान्न बनवून कीर्तनकारांना जेवू घालायची आणि त्यांना दक्षिणा द्यायची. त्यामुळे अनेक कीर्तनकार आईच्या सेवेने संतुष्ट होऊन तिला आशीर्वाद द्यायचे.

६ ए. आईच्या तळमळीमुळे समर्थभक्तांनी समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुका घरी आणणे

‘सज्जनगडावरील समर्थ रामदासस्वामींच्या पादुकांचे दर्शन दूरच्या भक्तांना मिळावे’, यासाठी ठराविक काही काळाने समर्थांच्या पादुका विविध शहरांत नेण्याची प्रथा आहे. या पादुका एका वर्षी नाशिक येथे एका देवळात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. ‘या पादुका आपल्या घरी याव्यात’, यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. समर्थभक्त पादुका संबंधितांकडे नेण्याचे नियोजन करतात.

आईला या पादुका स्वतःच्या घरी आणण्याची इच्छा होती. त्यासाठी तिने आयोजकांना याविषयी विचारणा केली; परंतु पादुका अनेक ठिकाणी नेण्याचे व्यस्त नियोजन असल्याने आईला ही संधी मिळत नव्हती. आईची तळमळ जाणून एका समर्थभक्ताने पादुका आमच्या घरी आणण्याचे निश्‍चित केले. पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूचे बरेच लोक घरी आले होते.

६ ऐ. चैत्रगौरी बसवल्यावर देवीसाठी ठेवलेल्या हळद-कुंकवात प्रतिवर्षी देवीच्या बोटांचे ठसे उमटणे

आई प्रत्येक वर्षी घरात चैत्रगौरीचे हळदीकुंकू करायची. गौरीपुढे तिने हळद- कुंकवाची कुयरी ठेवलेली असायची. एकदा सकाळी आईच्या लक्षात आले, ‘कुयरीतील हळदीत आणि कुंकवात बोटांचे दोन ठसे उमटलेले आहेत.’ तेव्हा आईने आम्हाला सांगितले, ‘‘देवी रात्री येऊन हळद-कुंकू लावून जाते.’’ त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी आई रात्री देवीसमोर कुयरी ठेवण्यापूर्वी  तिच्यातील हळदीचा आणि कुंकवाचा थर सपाट करून तो आम्हाला दाखवत असे. दुसर्‍या दिवशी ही कुयरी पाहिली, तर तिच्यातील हळद-कुंकवात प्रत्येकी दोन-दोन बोटे उमटल्याचे ठसे दिसायचे.’ – श्री. राम आणि कु. दीपाली होनप

७. मुले ३१ डिसेंबरला दूरचित्रवाणीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम बघत असतांना स्वतः मात्र देवघरासमोर नामजप करणे आणि मुलांना ‘आपले नववर्ष आज नसून गुढीपाडव्याला आहे’, असे सांगणे

‘भारतात पाश्‍चात्त्य विकृतीनुसार बहुतेक जण नववर्ष ३१ डिसेंबरला साजरे करतात. या दिवशी नववर्षाच्या निमित्ताने रात्री १२ पर्यंत दूरचित्रवाणीवर मनोरंजनात्मक कार्यक्रम असायचे. आम्ही ते पहात असायचो. त्या वेळी आई देवघरासमोर नामजप अथवा पोथीवाचन करत बसलेली असायची. ती आम्हाला सांगायची, ‘‘आपले नववर्ष आज नसून गुढीपाडव्याला आहे.’’ तेव्हा मला गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्याचे आध्यात्मिक महत्त्व ठाऊक नसल्याने माझ्या मनात ‘आई काहीतरी जुन्या गोष्टींना धरून बसली आहे’, असा विचार यायचा.’ – श्री. राम होनप

८. वाढदिवस दिनांकानुसार साजरे करणे

‘आईने लहानपणापासूनच आमचे वाढदिवस दिनांकानुसार साजरे न करता तिथीनुसार साजरे केले.’ – कु. दीपाली होनप

९. आईने सतत देवाच्या सान्निध्यात ठेवल्याने आध्यात्मिक उपाय होणे

९ अ. आईने देवासंबंधी विविध कृती करायला सांगणे, त्या केल्यावर आध्यात्मिक उपाय होणे आणि आध्यात्मिक त्रासामुळे चिडचिड होणे

‘मला लहानपणापासून आध्यात्मिक त्रास आहे; परंतु हे मला आणि आमच्या कुटुंबियांना मी सनातन संस्थेत आल्यानंतर समजले. आई मला लहानपणापासून प्रतिदिन आरती घ्यायला सांगायची, त्यानंतर तीर्थ आणि प्रसाद द्यायची. माझी मुंज झाल्यावर प्रतिदिन संध्या करायला लावायची. आई ‘संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यावर झोपू नये’, असे मला सांगायची.

या विविध कारणांमुळे माझ्यावर आध्यात्मिक उपाय व्हायचे; परंतु आध्यात्मिक त्रासामुळे आईने सांगितलेल्या देवासंबंधीच्या कृती मी मनापासून करत नव्हतो. तेव्हा माझ्या मनात प्रतिक्रिया यायची, ‘आईची काय ही रोजची कटकट आहे !’

९ आ. लहानपणापासून कीर्तन ऐकायला देवळात घेऊन जाणे

घरापासून काही अंतरावर असलेल्या देवळात प्रत्येक रात्री कीर्तन असायचे. प्रत्येक मासाला कीर्तन करणारे कीर्तनकार पालटायचे. असे १२ मास चालू असायचे. आई बाराही मास कीर्तनाला जायची आणि अधून-मधून आम्हा भावंडांना कीर्तन ऐकण्यासाठी देवळात न्यायची. ‘मंदिरात काही घंटे घालवल्याने आपोआप माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत होते’, हे मला नंतर समजले.

९ इ. तबलावादन शिकल्यावर देवळात कीर्तनात तबल्याच्या साथीला जाण्यास उद्युक्त केल्याने सत्संग मिळणे

पुढे मी काही वर्षे तबलावादन शिकलो. ज्या देवळात आई कीर्तन ऐकायला जायची, तेथे कीर्तनात साथ करणारे तबलजी काही कारणास्तव येत नव्हते. तेव्हा आईने मला कीर्तनात तबल्याची साथ करण्यासाठी देवळात नेले. त्यानंतर मी अनेक मास कीर्तनात तबल्याची साथ केली. या निमित्ताने माझ्या हातून देवाची सेवा घडली आणि सत्संगात राहिल्याने माझ्या मनावर चांगले संस्कार झाले, तसेच माझ्यावर आध्यात्मिक उपायही झाले.

पुढे माझा आध्यात्मिक त्रास वाढला. तेव्हा घरी दूरदर्शनसंचावर चित्रपट पहाण्यात माझे मन अधिक रमू लागले. त्यामुळे ‘रात्री चित्रपट पहाण्याऐवजी देवळात जावे लागेल’, या विचाराने माझ्या मनाचा संघर्ष व्हायचा. तेव्हा मी देवळात तबला वाजवण्यासाठी जाण्यास टाळाटाळ करायचो किंवा मधेच दांडी मारायचो. अशा वेळी आई मला देवळात जाण्यासाठी वारंवार आग्रह करायची. त्यामुळे मला देवळात जावे लागायचे. हे करतांना माझी चिडचिड व्हायची; परंतु तसे केल्याने मला आध्यात्मिक लाभच झाला.’ –  श्री. राम होनप

१०. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा

‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला आरंभ केल्यावर तिने श्रीरामाचा नामजप बंद करून कुलदेवीचा नामजप करण्यास आरंभ केला, तसेच उपवास इत्यादी कर्मकांड  बंद करून सेवेला प्रारंभ केला. ती अधूनमधून ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेला जात असे आणि त्या सेवेतील साधकांसाठी चहा अन् खाऊ घेऊन जात असे.’ – कु. दीपाली होनप

१० अ. मुलांना पूर्णवेळ साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य करणे

१० अ १. मुलांकडून कोणतीही व्यावहारिक अपेक्षा न करणे

‘अनेक वर्षांत कधीही ‘आम्ही भरपूर पैसे मिळवावेत अथवा विवाह करावा’, याविषयी आई कधीही आमच्याशी बोलली नाही. कलियुगात असे घडणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘तिची मूळ प्रकृती आध्यात्मिक स्वरूपाची असल्याने तिने व्यावहारिक गोष्टींविषयी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही’, असे वाटते.’ – श्री. राम

१० अ २. मुले पूर्णवेळ साधना करू लागल्यावर आनंद होणे

‘आईला विवाह न करता एखाद्या आश्रमात जाऊन साधना करायची होती; पण तिच्या वडिलांच्या आग्रहाखातर तिला विवाह करावा लागला. त्यानंतर आता मी आणि राम पूर्णवेळ साधना करायला लागल्यावर आई म्हणाली, ‘‘देवाने तुमच्या माध्यमातून माझी इच्छा पूर्ण केली.’’

१० अ ३. ‘आजारपणात किंवा सणा-वारालाही मुलांनी घरी यावे’, अशी पूर्णवेळ साधना करणार्‍या मुलांकडून अपेक्षा न करणे

मी आणि राम रामनाथी आश्रमात असतांना आई-बाबा घरी नाशिकला होते. त्या वेळी आईच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाले, तसेच तिला मधुमेहही झाला. शस्त्रकर्माच्या कालावधीत किंवा मधुमेहामुळे त्रास होत असतांनाही ‘घरी साहाय्याला या’, असे तिने आम्हाला सांगितले नाही. सणा-वारालाही आम्ही घरी येण्यासाठी तिने आम्हाला आग्रह केला नाही.’ – कु. दीपाली होनप

११. पूर्णवेळ साधना

११ अ. आश्रमात पूर्णवेळ साधनेस प्रारंभ केल्यावर आश्रमजीवनाशी लगेच जुळवून घेणे आणि पालट म्हणूनही घरी जाण्याचा विचार मनात न येणे

‘वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर वर्ष २००६ मध्ये आई-वडील पूर्णवेळ साधनेसाठी रामनाथी आश्रमात रहाण्यासाठी आले. घरचे जीवन जगण्याचा अनेक वर्षांचा संस्कार असतांना दोघांनी आश्रमजीवनाशी लगेच जुळवून घेतले, तसेच त्यांच्या मनात पालट म्हणून घरी जाण्याचा विचार कधीही आला नाही. त्या वेळी आई प्रसाद भांडारात सेवा करत असे.

११ आ. देवळात दर्शनाला गेल्यावर अध्यात्मप्रसार करणे

आईचा देवळात जाण्याचा संस्कार दृढ असल्याने ती अधून-मधून आश्रमाच्या जवळील मंदिरात देवदर्शनासाठी जात होती. तिने फुले विकणार्‍या स्त्रियांशी जवळीक साधून त्यांना नामजप करण्यास सांगितला आणि त्यांच्या घरात लावण्यासाठी सनातन-निर्मित देवतांच्या नामपट्टया दिल्या.’- श्री. राम आणि कु. दीपाली होनप

१२. आजारपण आणि आंतरिक साधना

१२ अ. रुग्णाईत असतांना आणि स्मृतीभ्रंश झालेल्या अवस्थेत अखंड नामजप करणे अन् केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच ओळखणे

‘वर्ष २००८ मध्ये आईला अर्धांगवायूचा झटका आला, तसेच पार्किन्सस हा आजार झाला. त्यामुळे आईचे शरीर लुळे पडून तिला स्वतःचे काही करता येत नव्हते. स्मृतीवर परिणाम झाल्याने आईला इतरांना ओळखता येत नव्हते, तसेच शब्दांचे उच्चारही स्पष्ट करता येत नव्हते. त्यामुळे तिने काही सांगितल्यास आम्हाला ते कळत नसे. तिच्याशी मी काही वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती केवळ ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ३ – ४ वेळा मोठ्याने करायची. यावरून तिची आंतरिक साधना सातत्याने चालू असून त्यामुळे तीव्र शारीरिक त्रासात ती आनंदी असल्याचे आम्हाला जाणवायचे. त्या काळात ती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच ओळखत असे.’ – श्री. राम होनप

१२ आ. आजारपणात हात थरथर कापत असतांनाही सेवा करणे आणि स्वभावदोष-निर्मूलन सारणी लिहिणे

‘त्या कालावधीत आजारपणापणे तिचा हात थरथर कापायचा; पण त्या थरथरणार्‍या हातांनी ती प्रसाद भांडारात सेवा करायची आणि स्वभावदोष-निर्मूलन सारणीही लिहायची. त्याविषयी विचारल्यावर ती म्हणायची, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे ना ! मग सारणी लिहायलाच हवी.’’ – कु. दीपाली होनप

१२ इ. झोपलेल्या अवस्थेत हातांच्या मुद्रा करणे

‘रुग्णाईत असल्याने आई बराच वेळ झोपून असायची. त्या वेळी तिच्या हातांची बोटे मुद्रा केल्याप्रमाणे एकमेकांशी जोडलेली दिसायची.’ – श्री. राम आणि कु. दीपाली होनप

१२ ई. मुलाला आध्यात्मिक प्रगतीचा आशीर्वाद देणे

‘आईची स्मृती आणि बोलणे अत्यल्प झालेे होते. एकदा मी खोलीत एकटा होतो. त्या वेळी आई ज्या दिशेने पलंगावर झोपली होती, त्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे तिच्या दृष्टीआड मी बसलो होतो. अशा स्थितीत ती मोठ्याने म्हणाली, ‘‘राम, तुझी पुढे खूप खूप (आध्यात्मिक) पातळी वाढेल.’’ हे ऐकून मला आश्‍चर्य वाटले; कारण त्या काळात तिचे बोलणे जवळजवळ बंदच झाले होते.

१३. जीवनाडीपट्टीत आई-वडील संत असल्याचा उल्लेख असणे

वर्ष २०१२ मध्ये श्री. मुदलियार यांनी अत्रि जीवनाडीपट्टीनुसार माझे भविष्य सांगितले. त्यात त्यांनी पुढील सूत्र सांगितले, ‘तुमचा जन्म चांगल्या घरात, म्हणजे आई-वडील संत असलेल्या घरात झालेला आहे.’’ (वर्ष २०११ मध्ये ११.६.२०११ या दिवशी वडील आणि वर्ष २०१३ मध्ये २९.४.२०१३ या दिवशी आई संत झाल्याचे घोषित करण्यात आले. यावरून ‘जीवनाडीपट्टीतील भविष्यकथन किती योग्य असते’, हे लक्षात येईल.)

१४. आईच्या देहत्यागानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवसांनी आईने कुंकवावर विशिष्ट ठसा उमटवून आणि रिकाम्या डबीत दैवी गंध निर्माण करून ती आल्याची साक्ष देणे

१२.८.२०१० या दिवशी आईने देहत्याग केला. देहत्यागाच्या वेळी आईची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के होती.

आईने देहत्याग केल्यानंतर आमची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आई महर्लोकात गेली असली, तरीही देहत्यागानंतर १२ दिवस त्यांचा पृथ्वीशी संबंध असतो. त्या काळात असे जीव कुटुंबियांना भेटायला येऊ शकतात.’’ त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘आई भेटायला आली’, हे आम्हाला कसे कळणार ?’ यासाठी मी खोलीत एका डबीत कुंकू सपाट करून ठेवले आणि सूक्ष्मातून आईला सांगितले, ‘तू आम्हाला भेटायला आलीस, हे आम्हाला कळण्यासाठी या डबीतील कुंकवावर काहीतर खूण दे.’ ही संकल्पना मी त्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितली. तेव्हा त्यांनी कुंकवाच्या डबीच्या समवेत एक रिकामी डबीही ठेवण्यास सांगितली. ‘आईच्या अस्तित्वामुळे या डबीत गंध येऊ शकतो’, असे त्यांनी सांगितले. मी त्याप्रमाणे कृती केली.

आईच्या देहत्यागानंतर साधारण १० दिवसांनी खोलीत ठेवलेल्या कुंकवाच्या डबीत श्रीकृष्णाच्या पायाची अढी असल्याप्रमाणे पावलांची आकृती उमटलेली दिसली, तसेच त्या समवेत ठेवलेल्या रिकाम्या डबीत दैवी गंध येऊ लागला. त्यावरून आई आम्हाला येऊन भेटल्याची साक्ष मिळाली आणि तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त झाली.’  – श्री. राम होनप

१५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘आमच्यावर साधनेचे संस्कार करणारे आणि आमच्याकडून कोणतीही व्यावहारिक अपेक्षा न करता आम्हाला साधना करण्याची प्रेरणा देणारे संत माता-पिता आम्हाला लाभले. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता ! ‘त्यांच्याप्रमाणे साधना करता येण्यासाठी आम्हाला शक्ती आणि बुद्धी द्यावी’, अशी गुरुचरणी प्रार्थना !! – श्री. राम आणि कु. दीपाली होनप (९.७.२०१८)