मुंबईतील १०० अशासकीय महाविद्यालयांमध्ये होणार भगवद्गीतेचे वाटप !

निर्णयाविषयी विरोधकांना पोटशूळ आणि त्यांची टीका

भाजप शासनाच्या स्तुत्य निर्णयाविषयी अभिनंदन ! आता शासनकर्त्यांनी केवळ भगवद्गीता वाटप करून न थांबता त्यातील अर्थ संतांकडून विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्यांच्याकडून धर्माचरण आणि साधना करवून घेतली पाहिजे !

मुसलमानांना कुराणाचे आणि ख्रिस्त्यांना बायबलचे म्हणजे त्यांच्या धर्मग्रंथांचे शिक्षण बालपणापासून दिले जाते; मात्र स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत बहुसंख्य हिंदूंच्या देशातच हिंदूंना धर्मशिक्षणाची कोणतीही व्यवस्था शासनकर्त्यांनी केलेली नाही. यासाठी हिंदूंना बालपणापासून शाळांमधूनच धर्मशिक्षणाची व्यवस्था करणारे शासनकर्ते हवेत !

मुंबई – नॅक मूल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील केवळ अशासकीय अन् अनुदानित १०० महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचे वाटप केले जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवद्गीतेच्या १०० संचांचे वाटप करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत; मात्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी महाविद्यालयात धार्मिक गोष्टी आणण्याची काही आवश्यकता नसल्याचे सांगत टीका करायला आरंभ केला आहे.

या निर्णयाविषयी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी  विधानसभेत सांगितले, ‘‘सरकार भगवद्गीतेचे वाटप करत नसून भिवंडीच्या भक्ती वेदांत संस्थेचा भगवद्गीतेचे निःशुल्क वाटप करण्याचा प्रस्ताव होता. उद्या कोणी कुराण आणि बायबल यांचे वाटप करण्याची मागणी केली, तर तेसुद्धा करू. ‘भगवद्गीता वाईट आहे’, असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी यांनी जाहीर करावे, तसेच श्रीकृष्ण खोटे बोलत होते, असे मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट करावे.’’

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले, ‘‘शाळांमध्ये धार्मिक ग्रंथ वाटण्याच्या चुकीच्या प्रथा सरकारने पाडू नये. आमचा भगवद्गीतेला विरोध नाही; मात्र ती महाविद्यालयात आणू नये.’’ (बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचा धर्मग्रंथ भगवद्गीतेच्या वाटपाला विरोध का ? यावरून काँग्रेस हिंदुद्वेषी आहे, हे सिद्ध होते. अशा काँग्रेसला देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का ? – संपादक) लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील यांनीसुद्धा ‘हा संघीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असून ‘जर धर्माचा प्रसार करायचाच असेल, तर मग सर्व धर्मांचे ग्रंथ वाटले पाहिजेत. बातम्यांमध्ये रहाण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा’, असे म्हटले.

भगवद्गीतेऐवजी भारतीय राज्यघटनेच्या प्रतींचे वाटप करण्याची मागणी

भीम आर्मी संघटनेला भगवद्गीतेविषयी पोटशूळ !

महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचे वाटप करण्याच्या सरकारच्या निर्णयाला भीम आर्मी या संघटनेने आक्षेप घेतला आहे. ‘या देशाला एका धर्माच्या ज्ञानाची आवश्यकता नसून गीतेऐवजी आदर्श नागरिक घडवणारे भारतीय राज्यघटनेचा (संविधानाचा) अभ्याक्रमात समाविष्ट करण्यात येऊन त्याच्या प्रतीचे वाटप करण्यात यावे’, अशी मागणी केली आहे. तसेच मागणी मान्य न केल्यास महाराष्ट्रभर उद्रेक होईल, अशी चेतावणी दिली आहे. (ही धमकी नव्हे का ? – संपादक)

‘गीतेचा २ ओळींचा श्‍लोक म्हणून दाखवा’, असे
पत्रकाराने विचारल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना घाम फुटला !

नागपूर – उच्च शिक्षण विभागाने मुंबईतील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत भगवद्गीतेचे वाटप करण्याची सूचना केली. याच्या विरोधात  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड वृत्तवाहिन्यांना प्रतिकिया देत असतांना एका पत्रकाराने ‘तुम्ही गीतेचे २ ओळी श्‍लोक म्हणून दाखवा’, असे आव्हान दिले; मात्र अचानकपणे दिलेल्या आव्हानामुळे आव्हाड यांना गीतेच्या २ ओळी श्‍लोक म्हणता न आल्याने त्यांना घाम फुटला. उच्च शिक्षण विभागाच्या परिपत्रकाविषयी सर्व वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘सर्व अशासकीय अनुदानीत महाविद्यालयांना गीता नव्हे, तर कुराण, बायबल यांचेही वाटप करावे. गीता मी मानतो. त्यातील सर्व श्‍लोकही मला पाठ आहेत.’’ प्रतिक्रिया दिल्यानंतर आव्हाड यांनी मात्र ‘गीतेचे पुस्तक केवढे मोठे आहे. त्यातील श्‍लोक मला कसे पाठ असतील’, असे सांगून त्यांनी गीतेचा श्‍लोक म्हणण्यास टाळाटाळ केली. हे सांगतांनाही आव्हाड यांना बराच घाम फुटल्याचे वाहिनीवर दिसत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात