‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे झालेला ‘एक अभियंता’ ते ‘संत’ असा साधनेचा प्रवास !’ – पू. अशोक पात्रीकर

२७ जुलै २०१८ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये …

‘संतांचा साधनाप्रवास वाचल्यावर त्यांच्याविषयी जवळीक वाटते’, असे जे मी म्हणतो, त्याची अनुभूती हा लेख वाचून येईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

सनातनचे संत केवळ संत नाहीत, तर गुरुच आहेत !

‘गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. सनातनमध्ये ७० हून अधिक साधक संत झाले आहेत. आपण त्यांना ‘संत’ म्हणत असलो, तरी ते त्यांच्या संपर्कातील साधकांना साधनेसंदर्भात मार्गदर्शन करतात, अगदी देहत्याग होईपर्यंत करतात, म्हणजे त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून गुरुपौर्णिमेला त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि त्यांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांची माहिती ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत त्यांच्या साधनेतील वाटचालीचीही माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल जवळीक वाटायला साहाय्य होईल.

संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे सार्थक होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. अशोक पात्रीकर यवतमाळ येथे शासनाच्या ‘जीवन प्राधिकरण’ या विभागात ‘शाखा अभियंता’ या पदावर कार्यरत असतांना वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्यांचा ‘साधक ते संतपदा’पर्यंतचा प्रवास त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.

१. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी करत असलेली साधना !

१ अ. देवपूजा करणे, भजने म्हणणे, तसेच आईसह एका संतांच्या दर्शनाला जाणे

‘मला लहानपणापासून देवाची पूजा करणे, तसेच भजने म्हणणे आवडत असे; पण मी देवभक्त नव्हतो. ‘माझा जन्म तीन बहिणींच्या नंतर एका संतांच्या आशीर्वादाने झाला’, असे आई मला सांगत असे. ती मला प्रतिवर्षी रामदास नवमीला त्या संतांच्या दर्शनाला घेऊन जात असे, तरीही मला त्या संतांची महती कळली नव्हती.

१ आ. विवाह झाल्यावर कधी कधी पत्नीसमवेत देवळांत जाणे आणि नोकरी करत असतांना कुटुंबीय अन् कार्यालयीन मित्रमंडळी यांच्यासह सहलीला जाण्याची आवड निर्माण होणे

मी शासनाच्या ‘जीवन प्राधिकरण’ या विभागात ‘शाखा अभियंता’ या पदावर कार्यरत असल्याने मला सतत बाहेर जावे लागत असे. त्या काळात मला देवाची ओढ तीव्रतेने वाटत नव्हती. माझा विवाह झाल्यावर पत्नीला देवधर्माची आवड असल्याने मी तिच्यासमवेत कधीतरी देवळांत जात असे. नोकरी करत असतांना माझ्या कुटुंबीय आणि कार्यालयीन मित्रमंडळी यांच्यासह सहलीला जाण्याची आवड निर्माण झाली. आम्ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले. तेव्हा मी साधनेत नसल्याने सगुण, निर्गुण, भाव आदी शब्दही मला ठाऊक नव्हते.

२. सनातन संस्थेशी संपर्क

२ अ. परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाकांनी सांगितल्यावर कुलदेवाचा ‘श्री रामाय नमः’ हा जप अधिकाधिक करू लागणे

मी नोकरीच्या काळात यवतमाळ येथे असतांना वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेशी माझा संबंध आला. त्या वेळी मी रहात होतो त्या बालाजी वसाहतीच्या भागातच परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाकांचे घर असल्याने माझ्या पत्नीच्या आग्रहामुळे ते आमच्या घरी येऊन मला साधनेविषयी सांगत. मी त्यांचे बोलणे ऐकून घेत असे; मात्र त्याप्रमाणे कृती करत नसे. ते मला ‘कुलदेवतेचा नामजप करा. नामजपाला स्थळ, काळ आणि वेळ यांचे बंधन नाही’, असे सांगत. तोपर्यंत मला ‘देवाचे काही करायचे, तर देवासमोर बसायलाच हवे’, असे वाटत असे. त्यामुळे सनातनने सांगितलेली ही गोष्ट मला वैशिष्ट्यपूर्ण वाटली. त्यांनी कुलदेवतेच्या नामाचे महत्त्व सांगितल्यावर ‘आमचे कुलदैवत श्रीराम आहे’, हे ठाऊक असल्याने मी ‘श्री रामाय नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न केला.

२ आ. नोकरीतील व्यस्ततेमुळे स्वतःला सत्संगाला जायला न मिळणे, त्या वेळी ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना’ हा ग्रंथ वाचणे

आमच्या शेजारच्या घरात सनातनचा साप्ताहिक सत्संग होत असे. त्या सत्संगाला माझी पत्नी सौ. शुभांगी, मुली कु. तेजल आणि कु. मीनल (आताची सौ. अनघा जोशी) जात. ‘मीही  सत्संगाला यावे’, असा पत्नीचा नेहमी आग्रह असायचा; पण नोकरीमुळे मला ते शक्य होत नसे. माझ्या पत्नीने ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना’ हा पहिला ग्रंथ विकत घेऊन मला वाचायला दिला. त्याच वेळी साप्ताहिक सनातन प्रभात चालू झाले होते. मी वेळ मिळेल, तसे त्याचे वाचन करत असे. ‘तोही एक सत्संग होता’, हे मला नंतर कळले.

२ इ. यवतमाळहून अमरावती येथे स्थलांतर झाल्यावर बाहेरगावी जाऊन काम करण्याऐवजी कार्यालयीन कामकाज करण्याचा प्रस्ताव नकळत स्वीकारला जाणे आणि त्यामुळे ठराविक वेळी काम अन् उर्वरित वेळी साधना करता येणे

वर्ष १९९८ मध्ये यवतमाळ येथील माझ्या नोकरीचा ८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे माझे स्थलांतर होणे क्रमप्राप्त होते. यवतमाळ येथे असतांना माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी (कार्यकारी अभियंत्यांनी) माझ्याकडून एक नाविन्यपूर्ण बांधकाम करवून घेतले होते. तशाच पद्धतीचे बांधकाम अमरावती जिल्ह्यात एका ठिकाणी करायचे निश्‍चित झाले. तेच वरिष्ठ अधिकारी अमरावती येथे ‘अधिक्षक अभियंता’ या पदावर रुजू झाल्याने त्यांनी ‘तेथे माझे स्थानांतर व्हावे’, असे वरिष्ठांना (मुख्य अभियंत्यांना) सांगितले. त्यानुसार माझे स्थानांतर अमरावती येथे त्यांच्या कार्यालयात करण्याचे ठरले. त्या कामासाठी पुन्हा मला बाहेरगावी जावे लागले असते. मला काम करायची आवड असल्याने मी त्यांचा निर्णय आनंदाने स्वीकारला. अकस्मात अमरावती येथील मुख्य अभियंत्यांनी ‘त्यांच्या कार्यालयातील काम मी करावे’, असा प्रस्ताव मांडला. ‘या प्रस्तावाचा स्वीकार करायचा कि नाही’, हा निर्णय त्यांनी माझ्यावरच सोपवला. मी त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांनी माझी स्वीकृती विचारली आणि त्या क्षणी देवाने माझ्या मुखातून ‘होकार’ वदवून घेतला. हाच तो कलाटणीचा क्षण होता. त्या क्षणी मी नकार दिला असता, तर मी साधनेत येऊ शकलो नसतो. ‘मला साधनेत आणण्यासाठी देवाने हे सर्व घडवले’, हे आता लक्षात येते. त्यासाठी मी देवाच्या, म्हणजेच प.पू. गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञ आहे.

या कार्यालयात मी केवळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत उपस्थित रहाणे अपेक्षित होते. त्यामुळे उर्वरित वेळ मी साधनेसाठी देऊ शकलो.

३. सेवेला आरंभ आणि पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय

३ अ. आरंभी कुटुंबातील सदस्यांना साहाय्य करता करता स्वतःही विविध सेवा करू लागणे

आरंभी कुटुंबातील सदस्यांना सत्संगासाठी दुचाकीने पोहोचवणे आणि आणणे, असे मी करायचो. नंतर स्वतः सत्संगात बसू लागलो. असे करत करत मला जिल्ह्याच्या ग्रंथसाठ्याची सेवा मिळाली. आरंभी उत्तरदायी साधकांनी मला या सेवेविषयी विचारल्यावर मी त्यांना ‘नंतर सांगतो’, असे सांगितले. नंतर मला पत्नी आणि मुली यांनी सांगितले, ‘‘अध्यात्मात कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणायचे नसते. तुम्ही ‘हो’ म्हणा. गुरु एखादी सेवा करायला सांगतात. तेव्हा ते ती सेवा करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आणि शक्तीही देतात. आम्ही तुम्हाला साहाय्य करू !’’ तेव्हा देवाने माझ्याकडून ‘हो’ म्हणवून घेतले. या काळात मी साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार करणे, वितरण करणे, तसेच ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी सेवा करणे या सेवाही करत होतो. याच कालावधीत संस्थेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात लहान सभांचे आयोजन करण्यात येत होते. सभांच्या प्रत्येक ठिकाणी ग्रंथसाठा नेऊन सेवा करण्याची संधी मला मिळाली. ही सेवाही मी आनंदाने स्वीकारली. मला प्रत्येक सेवा करतांना अनुभूती येत होत्या आणि देवाच्या कृपेने हळूहळू माझा अध्यात्माकडील कल वाढत होता.

३ आ. दैनिक सनातन प्रभातशी संबंधित सेवा करणे

वर्ष १९९९ मध्ये ‘दैनिक सनातन प्रभात’ चालू झाले आणि त्याची विदर्भ आवृत्ती काढायचेही निश्‍चित झाले. या सेवेसाठी विदर्भातील साधकांना विचारणा होत होती. मला चारचाकी वाहन चालवायला पुष्कळ आवडत असे. त्यामुळे मी ‘वाहनचालक’ या सेवेसाठी माझे नाव दिले. नंतर मला संपादकीय विभागात सेवा करण्यासाठी विचारल्यावर मी त्यालाही होकार दिला. मुंबई येथील दैनिक सनातन प्रभातच्या आवृत्तीची सिद्धता चालू असतांना मला मुंबईला प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. तिथे चार मास सेवा केल्यानंतर मी काही दिवस अमरावतीला जाऊन आलो. नंतर मला मिरज येथील दैनिक सनातन प्रभातच्या सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली.

३ इ. स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाला घरातील व्यक्तींनी पाठिंबा देणे

कालावधीत मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या कु. तेजल आणि मीनल अन् ७ वर्षांचा निखिल यांचे दायित्व होते अन् निवृत्तीवेतनाविना अन्य आर्थिक स्रोत नाही, अशा अवस्थेतही घरचे सर्व सदस्य साधनेत असल्याने मला कुणाकडूनही विरोध झाला नाही. आईचा थोडा विरोध होता; पण मी निर्णय घेतल्यावर तिने काही म्हटले नाही. मी स्वेच्छानिवृत्ती घेतांना माझ्या मुख्य अभियंत्यांनी मला पूर्ण सहकार्य केले. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावून ‘मी कोणती साधना करतो ?’, हे विचारून मला साधनेसाठी प्रोत्साहित केले. मी त्यांना सनातनने प्रकाशित केलेले अध्यात्म’, ‘गुरुकृपायोग’, तसेच ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना’ हे ग्रंथ भेट म्हणून दिले. त्यांनी माझी स्वेच्छानिवृत्ती लगेच स्वीकारून मला निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पुष्कळ साहाय्य केले. तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला कधीही आर्थिक टंचाई जाणवली नाही. मला आर्थिक साहाय्याची आवश्यकता असल्यास देवाच्या कृपेमुळे कुठूनतरी तेवढी रक्कम माझ्या अधिकोषातील खात्यावर जमा होते.

४. अमरावती येथील नवीन घर सनातन संस्थेच्या
कार्यासाठी अर्पण करण्याचा विचार एकाच वेळी सर्व कुटुंबियांना येणे

४ अ. सनातनच्या प्रसारासाठी बाहेरगावाहून आलेल्या साधकांना घर भाड्याने देण्याविषयी विचारणा झाल्यावर त्याला नकार देणे

अमरावती येथे माझी आई रहात होती, ते आमचे वडिलोपार्जित घर आणि मी बांधलेले घर, अशी दोन घरे होती. मी यवतमाळ येथे असतांना अमरावती येथे बांधलेले एक घर रिकामे होते. अमरावतीच्या माझ्या मित्रांनी मला विचारले, ‘‘काही धर्मप्रसारकांना (सनातनच्या प्रसारासाठी बाहेरगावाहून आलेल्या साधकांना) तुमचे घर भाड्याने देणार का ?’’ मी त्या वेळी याला नकार दिला होता. नंतर मी अमरावती येथे स्थानांतर केले आणि साधनेत आलो; पण तोपर्यंत त्या घरासाठी भाडेकरू मिळाले नव्हते. मी आईजवळ आमच्या जुन्या घरातच रहात होतो.

४ आ. नवीन घर गुरूंच्या चरणी अर्पण करण्याचा विचार सर्वांच्या मनात एकाच वेळी येणे

मी अमरावती येथे आल्यानंतर विदर्भात दैनिक सनातन प्रभात चालू करण्याचे नियोजन चालू होते आणि सनातन प्रभातच्या कार्यालयासाठी जागा हवी होती. याविषयी आमच्या घरीच चर्चा चालू होती. मी अमरावती येथे बांधलेले घर रिकामेच असल्याने आम्ही (मी, माझी पत्नी आणि मुली) केवळ एकमेकांकडे पाहिले. त्या वेळी ‘आमच्या प्रत्येकाच्या मनात ‘आपल्या घरीच दैनिक कार्यालय चालू करूया’, हा एकच विचार होता. मी उत्तरदायी साधकांना घराच्या अर्पणाविषयी सांगितले. यावरून लक्षात आले, ‘देवाने कोणतीही चर्चा करून न घेताच आमची मने जुळवली होती. नवीन घर गुरूंच्या चरणी अर्पण व्हायचे होते’; म्हणून आतापर्यंत ते रिकामे राहिले होते.’

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !

५ अ. आईचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर अमरावती येथे जाण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘टॅक्सी’ पाठवून आधुनिक वैद्य असलेली साधिका आणि एक चालक साधक यांना समवेत पाठवणे

मी मिरज येथे असतांना वर्ष २००२ मध्ये माझ्या आईचा मृत्यू झाल्याचे मला दुपारी बारा वाजता समजले. मला चार बहिणी आणि मी एकटाच मुलगा असल्याने मला अमरावती येथे लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक होते. तेव्हा मिरजेहून अमरावतीला जाणारी एकच गाडी होती आणि तीही दुसर्‍या दिवशी दुपारी अमरावती येथे पोहोचणार होती. अन्य पर्याय म्हणून मी पंढरपूर येथे जाऊन तेथून थेट अमरावतीला सकाळी अकरा वाजता पोहोचणार्‍या बसने जाण्याचा निर्णय घेतला. मी बसने पंढरपूर येथे दुपारी पोहोचलो आणि मला ‘तुम्हाला ‘टॅक्सी’ने अमरावतीला जायचे आहे’, असा निरोप मिळाला. थोड्याच वेळात टॅक्सी आली. त्यात एक डॉक्टर साधिका अन् एक गाडी चालवू शकणारे साधकही होते. ‘मला उच्च रक्तदाबाचा थोडासा त्रास आहे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक होते. त्यांनी प्रवासात मला काही त्रास झाल्यास वैद्यकीय साहाय्य मिळावे, यासाठी डॉक्टर साधिकेला पाठवले होते. परम दयाळू गुरूंनी ही सोय केल्यामुळे मी अमरावती येथे सकाळी ६ वाजता पोहोचू शकलो.

६. मिळेल ती सेवा करणे

६ अ. कुटुंबियांसमवेत राहून साधनेची संधी देणे आणि विविध प्रकारच्या सेवा करणे

माझी आई असेपर्यंत अन्य सर्व जण सेवेसाठी बाहेर गेले, तरी निखिल (मुलगा) तिच्या समवेत रहात असे. माझ्या आईचे निधन झाल्यानंतर मात्र मला अमरावती येथे रहायला सांगण्यात आले. वर्ष २००२ ते २००६ या कालावधीत मी अमरावती येथे टंकलेखन, विदर्भ झोनची ग्रंथसाठ्याची सेवा, दैनिकासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून वार्ता मागवून त्या पाठवणे, नागपूरच्या विधीमंडळात वृत्त संकलनासाठी जाणे, अशा आणि मिळेल त्या सेवा करत होतो. वर्ष २००५ मध्ये मला अमरावती जिल्ह्याची सेवा बघण्याचे दायित्व देण्यात आले.

६ आ. प्रतिदिन सकाळचा अल्पाहार बनवण्यापासून अनेक प्रकारच्या सेवा करणे आणि देवाच्या कृपेने प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येणे

त्यानंतर एक वर्षाने दैनिक सनातन प्रभातची ‘जळगाव आवृत्ती’ चालू करण्याचा निर्णय झाला. मला दैनिकाच्या सेवेसाठी जळगाव येथे जाण्याची संधी मिळाली. ही सेवा करत असतांना मला साधनेतील पुष्कळ बारकावे शिकायला मिळाले. वार्ताहर, दैनिक छपाई, वितरण, वसुली, तसेच दैनिक वितरण करणे आदी सेवा मी केल्या. काही वेळा प्रतिकूल परिस्थिती असतांनाही मला देवाच्या कृपेने त्यावर मात करता आली. त्या काळात मला प्रतिदिन सकाळी अल्पाहार, तसेच क्वचित् प्रसंगी स्वयंपाकही करावा लागत असे. काही काळासाठी मला जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांचे प्रसारकार्यही अन्य एका साधकासमवेत करण्याची संधी मिळाली. त्या वेळी कुणी रामनाथी आश्रमातून आल्यास परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासाठी खाऊ पाठवायचे. त्यांच्याकडून खाऊ मिळेपर्यंत त्यांनी आधी पाठवलेला खाऊ मला पुरत असे.

७. वर्तमानकाळात रहायला शिकवणे

माझ्या साधनाप्रवासाच्या आरंभीच्या टप्प्यात मी परात्पर गुरु डॉक्टरांपासून १ सहस्र ६०० किलोमीटर दूर अमरावती येथे होतो. नंतर त्यांनी मला जळगाव येथे सेवा करण्यास सांगून ते अंतर ३०० किलोमीटरने न्यून केले. नंतर त्यांनी मला देवद आश्रमात बोलावून ते अंतर ७०० किलोमीटर एवढे न्यून केले आणि ऑक्टोबर २०१२ पासून ते अंतर केवळ ७ मीटर (मी सेवा करत असलेल्या ठिकाणापासून परात्पर गुरु डॉक्टरांची खोली यांतील अंतर) एवढेच ठेवले. त्यांनी मला एवढ्या समीप आणून नंतर पुन्हा मला १ सहस्र ६०० किलोमीटर दूर सेवेला पाठवून मला वर्तमानकाळात रहायला शिकवले.

८. उन्नतांनी मार्गदर्शन केल्याने टप्प्याटप्प्याने झालेली आध्यात्मिक उन्नती !

८ अ. आध्यात्मिक पातळी ६० ते ६४ टक्क्यांपर्यंतचा प्रवास

आतापर्यंतच्या सेवांची फलनिष्पत्ती आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा यांमुळे त्यांनी १०.९.२००९ या दिवशी माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित केली. माझ्या आजपर्यंतच्या साधनेतील मोठा कालावधी मी जळगावला व्यतीत केला. मी तिथे असेपर्यंत माझी आध्यात्मिक पातळी ६४ टक्के झाली. जळगावमध्ये मी आणि श्री. लोटलीकरकाका असे दोघेच जण ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक होतो. माझ्यातील अहं वाढल्याने आणि माझ्याकडून झालेल्या समष्टी चुकांमुळे वर्ष २०११ मध्ये माझी पातळी तेवढीच राहिली.

८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे लाभलेले मार्गदर्शन !

१. त्यानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे जळगाव येथे आले असतांना त्यांनी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची मला कठोर शब्दांत जाणीव करून दिली.

२. नंतर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी माझ्यात कृतज्ञताभाव अल्प असल्याची जाणीव करून दिली आणि प्रत्येक नामानंतर ‘कृतज्ञता’ या शब्दाचा जप करायला सांगितला.

या दोन्ही संतद्वयींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले.

३. त्यानंतर काही काळ मला निराशा आली होती. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मी काय करावे ?’, असे विचारले असता त्यांनी मला ‘व्यष्टीसाठी भाव आणि समष्टीसाठी प्रेमभाव’ हा कानमंत्र दिला. त्यांच्या कृपेने माझ्याकडून प्रयत्न झाले.

८ इ. आध्यात्मिक पातळी ६४ टक्के ते संतपदापर्यंतचा प्रवास !

फेब्रुवारी २०१२ मध्ये सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी मला देवद आश्रमात जायला सांगितले. तिथे मी ग्रंथांच्या संबंधित संकलनाची सेवा केली. त्या वर्षी माझी आध्यात्मिक पातळी ६६ टक्के झाली.

ऑक्टोबर २०१२ पासून मी रामनाथी आश्रमात ग्रंथांशी संबंधित सेवा करत होतो. वर्ष २०१३ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६७ टक्के झाली. परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि साधकांची प्रीती यांमुळे १०.५.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी मी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले. तेव्हापासून ऑक्टोबर २०१७ पर्यंत मी रामनाथी आश्रमात सेवारत होतो.

९. सध्या करत असलेली सेवा

त्यानंतर मला ‘विदर्भात प्रसारसेवेसाठी जावे’, असा निरोप मिळाला. ती प.पू. डॉक्टरांची आज्ञा समजून मी सध्या विदर्भातील आणि छत्तीसगड राज्यातील प्रसारसेवेचे दायित्व सांभाळत आहे.

१०. कुटुंबीय आणि साधक यांनी केलेले साहाय्य !

या साधनाप्रवासात माझे कर्तृत्व शून्य आहे. मला जे काही मिळाले, ते केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मिळाले. या वाटचालीत मला माझी पत्नी सौ. शुभांगी, कन्या कु. तेजल आणि सौ. अनघा जोशी (पूर्वाश्रमीची कु. मीनल) अन् मुलगा श्री. निखिल यांचे अनमोल साहाय्य मिळाले. मी अजूनही आवश्यक वाटल्यास साधनेत त्यांचे साहाय्य घेतो. मी जिथे सेवेला होतो, त्या ठिकाणच्या साधकांनीही मला साधनेत साहाय्य केले. त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञ आहे.

११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या
‘तुमची निर्गुण रूपाची साधना आहे’, या बोलाची आलेली प्रचीती !

आजपर्यंत माझी पात्रता नसतांनाही गुरुमाऊलीने मला सर्वकाही दिले. एकदा मी गुरुमाऊलींना विचारले, ‘‘मला स्वप्नात कधी तुमचे किंवा देवतांचे दर्शन होत नाही. मला नामजप करतांना काही अनुभूतीही येत नाहीत.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमची निर्गुण रूपाची साधना आहे.’’ नंतर मला दोन प्रसंग आठवले.

११ अ. तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलो असतांना गर्दीत मूर्तीच्या समोरून जाऊनही दर्शन न होणे

आम्ही एकदा साधनेत नसतांना तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलो होतो. गर्दी असल्याने आणि मंदिरात सर्वत्र अंधार असल्याने प्रत्यक्ष बालाजीच्या मूर्तीसमोरून जातांनाही मी दर्शन न घेताच पुढे गेलो. मला हे कळलेही नाही. नंतर पत्नीने मला विचारले, ‘‘दर्शन झाले का ?’’ तेव्हा मी तिला ‘नाही’ म्हणालो. तिने सांगितले, ‘‘आपण पुढे आलो आणि मूर्ती तर मागे राहिली.’’ गर्दी असल्याने मंदिरातील स्वयंसेवक भाविकांना पुढे ढकलत होते. त्यामुळे आता दर्शनासाठी परत मागे फिरणे अशक्य होते; पण मला त्याचे काहीच वाटले नाही.

११ आ. हनुमान जयंतीच्या दिवशी हितचिंतकाने भाविकांना ‘हनुमानचालीसा’ छापलेला कागद पाकिटात घालून देणे; मात्र स्वतःला दिलेले पाकीट रिकामे आढळणे

दुसर्‍या प्रसंगात जळगाव येथे असतांना एका हितचिंतकाने हनुमान जयंतीला बोलावलेे. ते आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ‘हनुमानचालीसा’ छापलेला एक कागद खिशात मावेल, एवढ्या आकाराच्या पाकिटात घालून देत होते. त्यांनी मला दिलेले पाकीट मी उघडून पाहिल्यावर त्यात काहीच नसल्याचे मला आढळले.

१२. कृतज्ञता

माझी व्यष्टी प्रकृती आहे आणि शरीर-प्रकृतीही नाजूक आहे. परात्पर गुरु डॉक्टर या धावपळीच्या सेवेतही प्रत्येक क्षणी माझी काळजी घेत आहेत. त्यांच्या कृपेनेच आज आमचे पूर्ण कुटुंब साधनेत आहे. जावई श्री. शशांक जोशी हेही देवद आश्रमात साधनेत आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांनी एका रजोगुणी आणि मायेत पूर्णपणे गुंतलेल्या एका अभियंत्याला त्याच्या वयाच्या ४८ व्या वर्षी साधनेत आणले आणि तेव्हापासून ते माझे बोट धरून मला चालवत आहेत. त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे. ‘या देहाचा अंतही गुरुमाऊलींच्या चरणांवरच व्हावा’, हेच त्यांच्या चरणी मागणे आहे.

– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, अमरावती (२.७.२०१८)