(म्हणे) ‘संत तुकाराम महाराज यांचा खून करण्यात आला !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड

आव्हाड यांच्याकडून संतांचा एकेरी उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून संत तुकाराम महाराज यांचा घोर अवमान करत विखारी वक्तव्य !

सोलापूर – भिडेगुरुजी मनूचे समर्थन करत आहेत. तुकाराम, ज्ञानेश्‍वर यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असे ते सांगत आहेत. कर्मकांड धुडकावून लावले, जातीय विद्वेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परिणामी त्यांचा खून झाला. त्या तुकारामांपेक्षा मनु श्रेष्ठ असू शकत नाही, असे विखारी वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून बोलतांना केले. (असे वक्तव्य करून आव्हाड यांनी संत तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदाय यांचा घोर अवमान केला आहे. त्याविषयी शासनाने त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. – संपादक) ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतांना आव्हाड यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज यांसह अनेक संतांचा एकेरी उल्लेख केला. पुणे येथे ‘भक्ती-शक्ती संगम’ या कार्यक्रमात पू. भिडेगुरुजी यांनी ‘संतांनी अध्यात्मावर भाष्य केले, तर मनूने त्याही पुढे जाऊन अध्यात्मासह राष्ट्र टिकवण्याचा मार्ग सांगितला’, असे मार्गदर्शन केले होते. या वक्तव्याचा विपर्यास करत जितेंद्र आव्हाड यांनी संतांचा अवमान केला.

आव्हाड पुढे म्हणाले, ‘‘भिडेंचे डोके फिरले, असे मी म्हणणार नाही; पण त्यातून एका विशिष्ट समाजाची मानसिकता बोलून दाखवली जात आहे. (पू. भिडेगुरुजी यांचा एकेरी उल्लेख करून आव्हाड यांनी स्वतःची नैतिकताच स्पष्ट केली आहे. – संपादक) विधानसभेपासून त्याचे समर्थन होत आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासही सरकार कचरत आहे. समाजाला असा घाणेरडा इतिहास सांगणार्‍यांपासून सावध रहायला हवे. महाराष्ट्राला हे परवडणारे नाही. (पू. भिडेगुरुजींप्रमाणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याही इतिहासालाही विरोध करणारे आव्हाड यांना ब्राह्मणद्वेषाचा इतिहास अपेक्षित आहे का ? – संपादक) मनुस्मृति वर्ष १९५७ मध्ये जाळणारे बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श आहेत. आम्ही पुन्हा महाराष्ट्रात मनूचा पुनर्जन्म होऊ देणार नाही.

 

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा
वारकरी संत, महंत यांनी केला कडाडून निषेध

जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर क्षमा मागावी ! – ह.भ.प.
चैतन्य महाराज देहूकर, संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज

याविषयी ह.भ.प. चैतन्य महाराज पुढे म्हणाले, ‘‘आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे प्रत्येक वारकरी आणि संत तुकाराम महाराज यांच्यावर श्रद्धा असणारे भक्त यांच्या भावना दुखावल्या आहेत. ‘वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन झाले’, हे वारकरी संप्रदायाला ज्ञात आहे आणि मान्यही आहे, तसेच त्या रितीवर वारकरी संप्रदाय पुढे चालू आहे. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी जाहीर आणि लेखी क्षमा मागावी अन् त्यांनी वक्तव्य मागे घ्यावे. वारकरी संप्रदायाविषयीचा आचार-विचार समजून यापुढे वक्तव्य करावे.’’

…अन्यथा वारकरी संप्रदायाच्या प्रक्षोभाला
सामोरे जाण्याची सिद्धता ठेवावी ! – ह.भ.प. राणा महाराज वासकर, पंढरपूर

‘मानवदेहा घेऊन निज धामा गेले । निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥’, असा संत तुकोबारायांचा उल्लेख संत निळोबाराय यांनी केला आहे. ‘संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले’, असे वारकरी संप्रदाय निश्‍चितच मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संत तुकाराम महाराज आणि अन्य संत यांच्या संदर्भात जी भाषा वापरली, त्यासाठी त्यांचा जाहीर निषेध करतो; कारण एखाद्या सामाजिक नेत्याने संत तुकोबारायांसह सर्व संतांचा एकेरी भाषेत उल्लेख करणे, हा आव्हाड यांचा प्रथम अपराध आणि दुसरा अपराध म्हणजे संत चोखोबा महाराज यांचा जातीवाचक उल्लेख करणे, हा आहे.

आव्हाड यांनी अशोभनीय वक्तव्य केले आहे. ‘संत तुकाराम महाराज यांचा खून झाला’, असे दुराग्रहाने आणि दूषितपणाने सांगून आव्हाड यांनी सर्व वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. आव्हाड यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रक्षोभाला सामोरे न जाण्यासाठी वारकरी संप्रदायाची क्षमा मागावी अन्यथा वारकरी संप्रदायाच्या प्रक्षोभाला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवावी.

आव्हाड यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत
भूमिका आहे का ? – ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर, वारकरी संप्रदाय पाईक संघ

वारीचा आनंददायी सोहळा चालू असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संत तुकाराम महाराज यांच्याविषयीचे चुकीचे वक्तव्य आणि संत चोखोबा महाराज यांचा जातीवाचक उल्लेख जाहीरपणे केला. ‘संत तुकाराम महाराज यांचा खून झाला’, ही गोष्ट वारकरी संप्रदायाला कधीही मान्य होणार नाही. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेल्याची वारकर्‍यांची श्रद्धा तुम्हाला मान्य करायची नसल्यास ती मान्य करू नका; मात्र चुकीचा आरोप करून वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावनांचा दुखावण्याचा प्रकार केल्याविषयी वारकरी संप्रदाय पाईक संघ आव्हाड यांचा जाहीरपणे तीव्र शब्दांत निषेध करतो. ‘जितेंद्र आव्हाड यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का ?’, हे पक्षाच्या अध्यक्षांनी सांगावे, असे त्यांना जाहीर आवाहन आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात