उत्तराखंडमध्ये १८ सहस्र सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजनापूर्वी मंत्र म्हणण्यात येणार !

भाजप सरकारच्या केंद्रातील आणि अन्य १८ राज्यांतील सरकारनेही असा निर्णय घ्यायला हवा !

देहराडून – उत्तराखंडमधील भाजप सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील १८ सहस्र सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजनापूर्वी भोजनासंदर्भातील मंत्र म्हणण्याचा आदेश दिला आहे. या शाळांमधून १२ लाख मुले शिक्षण घेत आहेत. आता ते संस्कृतमधील मंत्र म्हणणार आहेत. यासाठी शाळेतील भिंतींवर हा मंत्र लिहिण्यात येणार आहेे. उत्तराखंडचे शिक्षणमंत्री अरविंद पांडेय आणि अधिकारी यांनी या संदर्भातील प्रस्ताव काही दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षण मंडळाच्या बैठकीत मांडला होता. त्यावरून हा निर्णय घेण्यात आला; मात्र हा मंत्र कोणता असणार ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या व्यतिरिक्त अभ्यासक्रमामध्ये योगशिक्षण आणि राष्ट्रीय नेते यांची माहिती देणे, तसेच शाळेच्या प्रारंभी गायत्री मंत्र अन् सरस्वती वंदन करणे, यांचाही निर्णय घेण्यात आला आहे.

काँग्रेसची टीका

भाजप सरकारच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी टीका करतांना म्हटले की, उत्तराखंडमधील सरकारी शाळांची स्थिती पुष्कळ वाईट आहे. अशा वेळी भाजपने घेतलेल्या निर्णयांची आवश्यकता नाही; मात्र ते लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असे प्रयत्न करत आहेत. (भाजप सरकारच्या पूर्वी येथे काँग्रेसचे राज्य असतांना आणि रावतच मुख्यमंत्री असतांना सरकारी शाळांच्या या दयनीय स्थितीला तेच कारणीभूत आहेत. त्यांनी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ?, हे त्यांनी सांगायला हवे ! – संपादक)

भाजपचे प्रत्युत्तर

उत्तराखंड राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देतांना म्हटले की, अनेक शाळांमध्ये सरस्वती वंदन करून प्रारंभ केला जातच आहे. आम्ही मुलांना आपली संस्कृती आणि परंपरा यांची माहिती देत आहोत, तर त्यात चुकीचे काय आहे ?

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात