प्रेमभावाचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या आणि साधक, संत अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार कृतज्ञताभाव असणार्‍या सनातनच्या ६७ व्या संत पुणे येथील पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी

पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी

 

१. सुगरण

‘पू. आजी सुगरण आहेत. कुठलाही पदार्थ बनवतांना त्या वैखरीतून नामजप करतात. मराठेआजोबा नेहमी म्हणायचे, ‘‘कुणाचा एखादा पदार्थ करतांना बिघडला, तर तो दुरुस्त करण्यात पू. आजींचा हातखंडा आहे.’’ लाडू केल्यावर ते लाडूही त्या इतक्या चांगल्या पद्धतीने वळून ठेवायच्या की, ते पाहूनच भावजागृती होत असे.

 

२. मुलांवर साधनेचे संस्कार करणे

त्यांनी त्यांच्या मुलांवर पुष्कळ चांगले संस्कार केले आहेत. त्यांचा मुलगा श्री. प्रसाद मराठेदादा हेही नम्र असून त्यांच्यात साधकत्व जाणवते. पू. मराठेआजी आणि आजोबा यांना रामनाथीला जायचे होते; पण प्रकृतीमुळे ‘मोठा प्रवास झेपेल कि नाही ?’, असे त्यांना वाटत होते. तेव्हा श्री. प्रसाद मराठे यांनी त्यांना रामनाथीला नेऊन आणले. त्या वेळी त्यांना गुरुदेवांचे दर्शन झाले. हा सगळा सोहळा सांगतांना त्या प.पू. डॉक्टरांच्या विश्‍वात हरवून जातात. ‘श्री. प्रसाद मराठे म्हणजे श्रावणबाळच आहे’, असे त्या म्हणतात.’

– सौ. मनीषा पाठक (पुणे जिल्हासेविका), पुणे

 

३. सकारात्मकता

अ. ‘पू. आजी नेहमी सकारात्मकच असतात. त्यांना मी आजपर्यंत कधीही नकारात्मक बोलतांना आणि परिस्थितीला दोष देतांना बघितले नाही. त्यांना कितीही अडचणी असल्या, शारीरिक त्रासांमुळे बाहेर पडता येत नसले, तरीही त्या सतत सकारात्मक आणि आनंदी असतात. त्यांना भेटल्यावर माझ्या मनाची नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढल्याचे मला जाणवते.’ – कु. क्रांती पेटकर, पुणे

आ. ‘पू. आजींना ऐकायला अल्प येते. त्याचे त्यांना दुःख वाटत नाही. ‘आपल्याला जे आवश्यक आहे, ते देव सांगतो आणि ऐकायला अल्प येत असल्याने अनावश्यक काही कळत नाही’, असा त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन आहे.

इ. मला जेव्हा वाईट शक्तींचा त्रास व्हायचा, तेव्हा त्या मला सकारात्मक करायच्या. त्या मला सांगायच्या, ‘‘तू निराश होऊ नकोस. ते बघ, परात्पर गुरु डॉ. आठवले मला सांगत आहेत, ‘मी मनीषाला पुढे घेऊन जाणार आहे.’’ त्यांच्या सांगण्यात एवढा जिवंतपणा असायचा की, त्यामुळे मला आध्यात्मिक त्रासांशी लढण्याची प्रेरणा मिळायची.’ – सौ. मनीषा पाठक

 

४. मनाची निर्मळता

‘पू. आजींचे मन अतिशय निर्मळ आहे. त्यांच्या मनात कधीही कोणत्याही व्यक्तीविषयी राग, प्रतिक्रिया, पूर्वग्रह अशा नकारात्मक भावना निर्माण होत नाहीत. त्यांच्याशी कुणीही कसेही वागले, तरी त्यांच्या मनात त्या व्यक्तीविषयी कोणत्याही प्रतिक्रिया येत नाहीत, उलट त्या व्यक्तीच्या गुणांचे इतरांसमोरही त्या कौतुक करतात.’ – कु. क्रांती पेटकर

 

५. धर्मग्रंथांचा अभ्यास असणे

‘पू. आजींचा दासबोध, भगवद्गीता, अशा अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास असून त्यांचे पाठांतरही चांगले आहे. त्यांनी दासबोधाच्या परीक्षाही दिल्या आहेत. त्यांचे अक्षर सुंदर असून संस्कृतही चांगले आहे.

 

६. प्रेमभाव

६ अ. सर्वांचे प्रेमाने आदरातिथ्य करणे

त्यांच्या घरी गेल्यावर त्या केवळ साधकांचेच नाही, तर सर्वांचेच नेहमी हसतमुखाने स्वागत करून प्रेमाने विचारपूस करतात आणि प्रत्येकात गुरुरूप पहाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना भेटल्यावर जवळ बोलावून त्या मिठीतच घेतात. त्यांचा मायेचा हात पाठीवरून फिरला की, ‘आपण गुरुदेवांच्या सहवासातच आहोत’, असे मला जाणवते.’ – सौ. मनीषा पाठक

६ आ. पू. मराठेआजी म्हणजे कधी न आटणारा आणि सतत वाहणारा झराच !

त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला पुष्कळ आनंद मिळतो. त्यांना भेटायला गेल्यावर त्या आम्हाला प्रसाद घेतल्याविना कधीच जाऊ देत नाहीत. प्रसाद घेतल्यावर आम्हाला पुष्कळ चैतन्य मिळाल्यासारखे वाटते आणि आमचा कृतज्ञताभाव जागृत होतो. पू. आजींची आठवण आल्यावर ‘प्रेमभाव’ या त्यांच्या गुणाची प्रथम आठवण होते. त्या नेहमी प्रत्येकाशी अतिशय प्रेमाने आणि नम्रतेने बोलतात. त्यांच्या संपर्कात एखादी रागीट व्यक्ती आली, तरी ‘पू. आजींमधील प्रेमभाव आणि नम्रता पाहून तीसुद्धा शांत आणि नम्र होईल’, असे वाटते. पू. मराठेआजी म्हणजे प्रेमाचा निर्मळ झराच आहे, जो कधी आटत नाही, सतत वहातच असतो.’ – आधुनिक वैद्या (सौ.) चारुलता पानघाटे, सौ. मनीषा पाठक, श्री. महेश पाठक, सौ. अश्‍विनी ब्रह्मे आणि सौ. सुरेखा पेटकर, पुणे

६ ई. पू. मराठेआजी म्हणजे ‘सनातन आई’!

‘आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरात ग्रंथप्रदर्शन असले की, पू. आजी सर्व साधकांना प्रेमाने फराळाचे पदार्थ देत असत आणि सर्वांची आपुलकीने विचारपूस करत असत. आई तिच्या बाळांना ज्याप्रमाणे प्रेमाने सर्व देते, तसा पू. आजींचा भाव असायचा. ‘पू. आजी सर्वांच्या ‘सनातन आई’च आहेत’, असे वाटते.’ – सौ. अश्‍विनी ब्रह्मे, पुणे.

 

७. सेवेची तळमळ

७ अ. स्वतः तळमळीने सेवा करणे आणि इतरांनाही सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देणे

पू. आजी गुरुपौर्णिमेसाठी घरोघरी जाऊन अर्पण घेण्याची सेवा पुष्कळ तळमळीने करतात. राखीपौर्णिमा, दिवाळी यांनिमित्त त्या सर्व नातेवाइकांना सनातन पंचांग भेट देतात. पू. आजी बालसंस्कारवर्ग, सत्संग घेणे, साप्ताहिक सनातन प्रभातचे वितरण करणे, प्रसार करणे आदी सेवा पुष्कळ तळमळीने करत असत. मलाही पू. आजींकडून सेवेसाठी प्रोत्साहन मिळत असे. शनिवारी किंवा रविवारी पुण्यात आल्यावर मी पू. आजींकडे जात असे. तेव्हा पू. आजी म्हणायच्या, ‘‘थोड्या कालावधीसाठी का होईना, चल, प्रसाराला जाऊया. आज बालसंस्कारवर्ग आहे. खाऊची सेवा आहे. तू सतत सेवेत रहा, म्हणजे तुला आनंद मिळेल आणि तुझे प्रारब्ध न्यून होईल.’’ खरोखरच पू. आजींसमवेत सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळत असे.’ – सौ. अश्‍विनी ब्रह्मे

७ आ. उतारवयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने सेवा करणे

‘वयाच्या ७५ – ७६ व्या वर्षापर्यंत पू. आजी साप्ताहिक सनातन प्रभातचे वितरण करत असत. माझ्याकडे त्या वेळी साप्ताहिकाच्या वर्गणीदारांचे नूतनीकरण करायची सेवा होती. पू. आजी ज्या वर्गणीदारांना साप्ताहिक देत असत, त्यांना पू. आजी या वयातही करत असलेल्या सेवेचे पुष्कळ कौतुक होते. ‘पू. आजी उतारवयातही एवढी सेवा करत आहेत. आम्हाला तर केवळ वर्गणीच द्यायची आहे’, असे म्हणून वर्गणीदार लगेचच नूतनीकरण करत असत.’ – श्री. महेश पाठक, पुणे.

 

८. खर्‍या अर्थाने अध्यात्म जगणार्‍या पू. आजी !

‘दोन वर्षांपूर्वी पू. आजींच्या यजमानांचे निधन झाले. त्या वेळी त्या पुष्कळ स्थिर होत्या. मराठेआजोबांचीही ६० प्रतिशतहून अधिक आध्यात्मिक पातळी होती. ‘त्यांना तर महर्लोकात स्थान मिळाले आहे. दुःख कशाला करायचे ?’, असे म्हणून त्या इतरांना धीर द्यायच्या. हे पाहून ‘त्या प्रत्यक्ष अध्यात्म जगत आहेत’, असे जाणवायचे.

 

९. निरपेक्षता

वयस्कर व्यक्तींना साधारणपणे ‘कुणीतरी भेटायला यावे, विचारपूस करावी’, अशी अपेक्षा असते; पण आजोबांचे निधन झाल्यानंतर पू. आजी एकट्या होत्या, तेव्हाही त्यांना ‘कुणी भेटायला यावे’, अशी अपेक्षा नसायची. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समष्टी कार्याविषयी त्यांना पुष्कळ तळमळ आहे. ‘साधकांना सेवा असतात. ते सेवा सोडून मला भेटायला नाही आले, तरी चालेल. सेवेलाच प्राधान्य द्यावे’, असा त्यांचा भाव असायचा. त्यांना नातेवाइकांकडूनही कोणत्याही अपेक्षा नाहीत. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व दिले आहे. आता काहीच नको’, असा त्यांचा भाव असतो.’ – सौ. मनीषा पाठक

 

१०. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता

१० अ. साधकांची साधनेची स्थिती सूक्ष्मातून अचूक ओळखणार्‍या पू. मराठेआजी !

‘एकदा केंद्रातील ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांची अनौपचारिक बैठक आयोजित करण्यात आली होती. पू. आजीही त्या सत्संगाला उपस्थित होत्या. खरेतर पू. आजींना अल्प ऐकू येते; पण आवाज अल्प येत असल्याविषयी त्यांची काहीच तक्रार नव्हती. सत्संगामध्ये त्या तन्मयतेने सहभागी झाल्या होत्या. सत्संगाच्या शेवटी पू. आजींना ‘काय जाणवले ?’, असे विचारल्यावर त्यांनी सर्व साधकांनी सांगितलेली सूत्रे तंतोतंत सांगितली आणि ‘प्रत्येक साधकाच्या साधनेची स्थिती कशी आहे ?’, याचे अचूक वर्णन केले. सर्वच साधकांना त्याचे आश्‍चर्य वाटले. ‘पू. आजींना अल्प ऐकायला येत असले, तरी त्यांना अंतर्मनातून सर्व समजत आहे’, असेच त्या वेळी आम्हाला जाणवले.’ – सौ. राधा सोनवणे आणि श्री. अरविंद सहस्रबुद्धे.

१० आ. साधिकेला पाहिल्यावर तिची आध्यात्मिक पातळी अधिक असल्याचे ओळखणे

‘दीड ते दोन वर्षांपूर्वी मी पू. मराठेआजींना भेटायला गेले होते. त्यापूर्वी त्यांची आणि माझी तेवढी ओळख नव्हती, तरी मी भेटायला गेल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी माझा हात हातात घेतल्यावर त्यांचा स्पर्श मला अतिशय कोमल जाणवला. त्यांनी माझ्याकडे पाहून ‘तुझी आध्यात्मिक पातळी झाली आहे ना गं ?’, असे विचारले. (‘सौ. किरण नाईक यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आहे.’ – संकलक) त्यावरून त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता लक्षात आली. साधक भेटल्यावर आजींना पुष्कळ आनंद होतो.’ – सौ. किरण नाईक, पुणे.

 

११. भाव

११ अ. प्रत्येक कृती गुरुसेवा म्हणून करणे

‘गेल्या १० वर्षांपासून मी पू. आजींच्या सहवासात आहे. खरोखर पू. आजी म्हणजे गुणांचे भांडार आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत नम्रता अन् शरणागत भाव आहे. मला पू. फडकेआजी आणि पू. मराठेआजी यांच्यासमवेत सेवेची संधी मिळाली होती. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘त्या जीवनातील प्रत्येक कृती सेवा म्हणून करतात आणि कर्तेपणा गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करतात.’ त्या प्रत्येकामध्ये गुरुदेवांचे रूप पहातात आणि नेहमी आनंदी असतात.’ – सौ. मंगला सहस्रबुद्धे, पुणे

११ आ. ‘यजमान म्हणजे प्रत्यक्ष श्रीविष्णुच आहेत’, असा भाव ठेवून त्यांची सेवा करणे

मराठेआजोबांच्या आजारपणात पू. आजींनी त्यांची मनापासून सेवा केली. मराठेआजोबांचे नाव ‘व्यंकटेश’ होते. ‘मला स्थुलातूनही श्रीविष्णूची, म्हणजे व्यंकटेशाची सेवा करण्याची संधी मिळत आहे’, असे त्या म्हणायच्या. आजोबांचे मन लहान बालकाप्रमाणे निर्मळ होते. त्याचेही त्यांना कौतुक असायचे. पू. मराठेआजी आणि आजोबा आदर्श पती-पत्नी होते.’ – सौ. मनीषा पाठक

११ इ. ‘प.पू. गुरुदेव समवेत असून तेच प्रत्येक कृती करवून घेत आहेत’, असा भाव असणे

‘पू. आजी सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात. ‘प्रत्येक क्षणी प.पू. गुरुमाऊली माझ्यासमवेत आहे. मी कुणीच नसून प्रत्येक कृती गुरुमाऊलीच माझ्याकडून करवून घेत आहे’, असा त्यांचा भाव असल्यामुळे त्यांना जागेपणी आणि झोपेतही प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आवडेल’, अशी प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.’ – सौ. मंगला सहस्रबुद्धे

 

पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी यांची त्यांचा
मुलगा श्री. प्रसाद मराठे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. साधकांना भेटल्यावर आनंद होणे

‘आई आता केवळ आमची आई नसून सर्व साधकांची आई असल्याप्रमाणे वाटते. कुणीही साधक घरी आल्यावर आईच्या तोंडवळ्यावरील आनंद पहाण्यासारखा असतो. त्या वेळी ‘जणूकाही माहेरचे कुणी आले आहे’, असे तिला वाटते.

२. सर्व साधकांशी आपुलकीचे, निर्मळ आणि निःस्वार्थी संबंध असणे

आईला भेटायला अनेक जण येतात. कुणी आनंदाची वार्ता घेऊन, कुणी दुःख हलके करण्यासाठी, तर कुणी समादेश (सल्ला) घेण्यासाठी ! त्या सर्वांना आईला भेटल्यानंतर समाधानच झालेले मी पाहिले आहे. त्यांच्यात इतकी आपुलकी निर्माण होते की, त्या व्यक्तीसमवेत तिचे निर्मळ आणि निःस्वार्थी संबंध निर्माण होतात. ‘त्या व्यक्तीने मला परत भेटायला यायलाच पाहिजे. इतके दिवस झाले, तरी हा आला नाही, तो आला नाही’, असा अहंभाव मी आईमध्ये कधीच पाहिला नाही.

३. पू. आई म्हणजे कुटुंबातील वटवृक्षच !

आता वयोमानामुळे तिला प्रतिदिन बाहेर जाता येत नाही, तरीही ती तिच्या कामांमध्ये आमच्यापेक्षाही व्यस्त असते. ती आम्हा सर्वांचा एका वटवृक्षाप्रमाणे आधारच आहे.

४. सतत नामजप केल्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेमुळे मन स्थिर असणे

या वयात मन स्थिर ठेवणे खरेच अवघड असते; पण तिच्याकडून हे शिकण्यासारखे आहे. सतत नामस्मरणात असल्यामुळेच हे शक्य आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर तिचा पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळेच हे शक्य होत आहे’, यात शंकाच नाही. नुसते म्हणणे सोपे आहे; पण कृतीत आणणे खरोखरच सोपे नाही. मला तरी हे संतांचे लक्षण वाटते. एक संतच अशा पद्धतीने राहू शकेल.’

– श्री. प्रसाद मराठे (मुलगा), पुणे (३.५.२०१७)

पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजींची शिकवण

१. ‘प्रत्येकामध्येच स्वभावदोष आणि अहं असतात. आपण इतरांचे गुण पहायचे. आपल्या आजूबाजूचे लोक ‘आपल्यामध्ये काय न्यून आहे ?’, हे दाखवत असतात. त्यामुळे आपल्यात सुधारणा होते.

२. एखादी कृती करण्यापूर्वी, तसेच एखादा विचार मनात आल्यानंतर ‘परात्पर गुरु डॉक्टरांना तो आवडेल का ?’, याचा विचार करायचा.

३. ज्या कृती साधकत्वाच्या नाहीत, त्या करायच्या नाहीत.’

४. ‘संसार केला, तरी त्यात भक्ती असली पाहिजे, म्हणजे ती आपल्या अंतःकरणात येते आणि त्यामुळे देेवाचे अस्तित्व मनात सतत रहाते.’

 

पू. मराठेआजींचा कृतज्ञताभाव

१. उत्तरदायी साधकांविषयीचा उत्कट कृतज्ञताभाव

‘पू. आजी साधनेत आल्या, तेव्हा पुण्यामध्ये दाते कुटुंबियांनी सनातनचे कार्य आरंभले होते. दाते कुटुंबियांचे नाव काढले, तरी पू. आजींच्या मनात कृतज्ञताभाव निर्माण होतो. पू. दातेआजींविषयीही त्यांच्या मनात भाव असून त्यांनी त्यांची दोन्ही मुले आणि सुना यांना पूर्णवेळ साधना करू दिल्याचे त्यांना पुष्कळ कौतुक वाटते. पू. आजींच्या सन्मान सोहळ्याच्या आधी काही दिवस श्री. निरंजन दातेकाका काही साधकांसमवेत पू. आजींच्या घरी त्यांना भेटायला गेले होते, तेव्हा पू. आजी हात जोडून कृतज्ञताभावाने ‘आज अलभ्य लाभ आहे’, असे म्हणून उभ्या होत्या. ज्यांनी त्यांना साधना सांगितली, त्यांच्याप्रती पू. आजींच्या मनात कृतज्ञतेचा भाव आहे.

२. संतांविषयीचा कृतज्ञताभाव

सन्मान सोहळ्याच्या आधी काही दिवस त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेल्यानंतर सद्गुरु स्वातीताईंनी (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) त्यांचा हात हातात घेतला. सन्मान सोहळ्याच्या वेळी पू. आजी म्हणाल्या, ‘‘तुझा परिसस्पर्श झाल्यानेच मी संत झाले. यात माझे काहीच नाही.’’ – सौ. मनीषा पाठक

३. प.पू. गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव

‘पू. आजी संतपदी पोहोचल्याचे समजल्यावर मी त्यांना भेटले, तेव्हा ‘मी काहीच केले नाही. प.पू. गुरुदेवांनी केले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आपणा सर्वांकडे लक्ष आहे. ते आपली काळजी घेतातच’, असे त्या मला सांगत होत्या.’ – श्रीमती शीतल नेर्लेकर

शबरीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भक्ती करणार्‍या पू. आजी !

‘त्या प्रत्येक क्षणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनुभवतात. त्यांचे विश्‍वच परात्पर गुरु डॉक्टरमय आहे. त्यामुळे त्यांना कधीच एकटे वाटत नाही. एखादा पदार्थ त्या सूक्ष्मातून प्रथम परात्पर गुरु डॉक्टरांना देतात. चहा पितांना ‘हे काय येथे परात्पर गुरु डॉक्टर आहेत. त्यांना मी चहा दिला’, असे त्या इतके सहजतेने सांगतात की, ‘त्या ठिकाणी प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टर आले आहेत’, असे जाणवते. शबरी जशी प्रभु श्रीरामचंद्राची निस्सीम भक्त होती, त्याप्रमाणे ‘पू. मराठेआजी परात्पर गुरु डॉक्टरांच्या निस्सीम भक्त आहेत’, असे जाणवते.’ – सौ. मनीषा पाठक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात