आध्यात्मिक स्तरावरील नेतृत्वक्षमतेचा विकास कसा करावा ?

९ ते १२ जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथे पार पडलेल्या हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशनात केलेले मार्गदर्शन

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्यासाठी सक्रीय झालेल्या हिंदु समाजाचे नेतृत्व करण्याचे दायित्व हिंदु राष्ट्र-संघटकांचे आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र-संघटकांमध्ये केवळ संघटनकुशलता नको, तर त्यांनी त्यासह नियोजनक्षमता, निर्णयक्षमता आणि नेतृत्वक्षमता यांचा विकास करायला हवा. सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायला हवे की, आपली नेतृत्वक्षमता व्यावहारिक स्तरावर नाही, तर आध्यात्मिक स्तरावर विकसित व्हायला हवी; कारण आध्यात्मिक स्तरावर नेतृत्वाचा विकास केल्याने स्वतःची आणि आपले नेतृत्व स्वीकारणार्‍यांची आध्यात्मिक उन्नतीही होते.

वक्ते : सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था

१. नेतृत्व म्हणजे काय ?

नेतृत्व म्हणजे समुहाच्या ध्येयपूर्तीसाठी समुहातील विविध व्यक्तींच्या क्रिया-प्रक्रियांचे संचालन, मार्गदर्शन, नियंत्रण आणि समन्वय करणे होय. नेतृत्वामध्ये ४ महत्त्वाच्या घटकांना प्राधान्य आहे.

१ अ. समुहातील विविध व्यक्तींच्या क्रिया-प्रक्रियांचे संचालन

यामध्ये आपले नेतृत्व स्वीकारणार्‍या समुहातील व्यक्तींनी कोणती कार्ये पार पाडायची ?, याची दिशा ठरवणे, त्या संदर्भात नियोजन करणे, ती वेळेत होण्यासाठी त्याचे व्यवस्थापन पहाणे आदी कृती करणे अपेक्षित असते.

यासाठी नेतृत्व करणार्‍याने नियोजक्षमता हा गुण वृद्धींगत करणे आवश्यक आहे.

१ आ. मार्गदर्शन

यामध्ये आपले नेतृत्व स्वीकारणार्‍यांना निश्‍चित केलेल्या कार्यात येणार्‍या व्यावहारिक, कौटुंबिक, आध्यात्मिक आदी अडचणींविषयी मार्गदर्शन करणे अपेक्षित असते.

यासाठी व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनांचा विकास करणे आवश्यक असते. व्यावहारिक दृष्टीकोन व्यावहारिक अनुभवाने, तर आध्यात्मिक दृष्टीकोन योग्य मार्गाने साधना केल्यानंतर चिंतनातून विकसित होतात.

१ इ. नियंत्रण

यामध्ये आपले नेतृत्व स्वीकारणार्‍यांचे कार्य, कार्यातील अडचणींचे निवारण, कार्याची फलनिष्पत्ती आणि कार्य करणार्‍यांच्या कार्यक्षमतेचा विकास, नवीन योजनांवर कार्यवाही आदींवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित असते.

१ ई. समन्वय

यामध्ये ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने कार्याशी संबंधित घटकांशी समन्वय ठेवणे अपेक्षित असते.

समन्वयक्षमतेचा विकास करण्यासाठी दुसर्‍याचे आस्थेने ऐकणे आणि दुसर्‍याला प्रेमाने, सुस्पष्टपणे अन् योग्य वेळेत सांगता येणे अपेक्षित असते. विनम्रता असेल, तर समन्वयक्षमतेचा विकास लवकर होतो. अहं-निर्मूलनासाठी योग्य दिशेने प्रयत्न केल्याने नम्रता वाढते. सुस्पष्टपणा आणि वेळेचे भान असणे, हे गुण स्वभावदोष-निर्मूलन आणि गुणसंवर्धन प्रक्रियेमुळे वृद्धींगत होतात.

 

२. नेतृत्वाचे महत्त्व

सामाजिक, राजकीय, धार्मिक, औद्योगिक आदी कुठलाही समूह असला, तरी त्याला नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्वाविना समूह अस्तित्वहीन असतो; म्हणूनच कार्याच्या अंमलबजावणी आणि त्या संदर्भात दिशाहीन समुहाला दिशादर्शन, यांसाठी नेतृत्व महत्त्वाचे असते. यातही दोन घटक महत्त्वाचे आहेत.

२ अ. कार्याची अंमलबजावणी

ही पार पाडण्यासाठी व्यवस्थापन-कुशलता हा गुण असणे आवश्यक असते. व्यवस्थापन कुशलता आध्यात्मिक स्तरावर असेल, तर समुहातील व्यक्तींनी ते स्वीकारण्याची संभावना अधिक असते.

२ आ. दिशाहीन समुहाला दिशादर्शन

हे करण्यासाठी नेतृत्व करणार्‍याला स्वतःची दिशा असणे आवश्यक असते. दिशाहीन समुहाने कुठल्या मार्गाने जायचे ?, याचा निर्णय त्याला घेता आला पाहिजे; म्हणून नेतृत्व करणार्‍याने अध्ययन आणि चिंतनशीलता यांद्वारे स्वतःच्या ज्ञानशक्तीचा विकास करणे अपेक्षित असते. आध्यात्मिक स्तरावर नेतृत्व करणार्‍यांना पुढे ईश्‍वराकडून मिळणार्‍या ज्ञानातून दिशा प्राप्त करता आली पाहिजे.

 

३. नेतृत्वविकासाचे प्रकार

नेतृत्वाचा विकास ३ प्रकारे होतो.

३ अ. जन्मजात विकसित असलेले नेतृत्व

५ टक्के लोकांमध्ये पूर्वजन्माच्या कर्मांमुळे नेतृत्वाचे गुण जन्मतः विकसित झालेले असतात. ते लहानपणापासून विविधांगी समुहाचे नेतृत्व करतात.

३ आ. प्रयत्नपूर्वक विकसित केलेले नेतृत्व

८५ टक्के नेते हे त्यांच्यातील नेतृत्वगुण प्रयत्नपूर्वक विकसित करतात.

स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, गुणसंवर्धन आदींद्वारे प्रयत्नपूर्वक नेतृत्वगुण विकसित करता येतो. साधारणतः आपण सर्व या गटातील आहोत, असा विचार करून सर्वांनी प्रयत्नपूर्वक नेतृत्वगुण विकसित करायला हवा.

३ इ. आपत्कालीन परिस्थितीत उदयाला आलेले नेतृत्व

१० टक्के लोकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत नेतृत्वाचे पैलू उदयाला येतात, म्हणजे अशांमध्ये नेतृत्वाचे सुप्त गुण असतातच; पण विशिष्ट परिस्थितीत ते विकसित होतात, असे म्हणता येईल.

 

४. नेतृत्वाचे प्रकार

४ अ. वंशपरंपरागत पद मिळाल्यामुळे आलेले नेतृत्व

वंशपरंपरेने पद मिळाल्यास अनुवंशिक नेतृत्वाचे काही गुण जन्मजात मिळतात; पण अशा व्यक्तीने नेतृत्वाचे उर्वरित पैलू प्रयत्नपूर्वक विकसित करायला हवेत, अन्यथा ते समाजमान्य होत नाही किंवा समाजाला ते लादलेले नेतृत्व आहे, असे वाटते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संदर्भात आज असे म्हटले जात आहे.

४ आ. व्यक्तीगत स्तरावर केलेल्या लोकोत्तर कार्यामुळे लोकांनी स्वीकारलेले नेतृत्व

स्वतःमध्ये असलेली बौद्धिक क्षमता किंवा कौशल्य यांच्या बळावर एखाद्या व्यक्तीकडून लोकोत्तर कार्य होते. अशा व्यक्तीविषयी आदरभाव वाढून त्याच्या अनुभवाचा लाभ व्हावा, यासाठी लोक त्याचे नेतृत्व स्वीकारतात. अशा व्यक्तीलाही व्यक्तीगत स्तरावर अनुभव असला, तरी समुहाला दिशादर्शन करण्यासाठी प्रयत्नपूर्वक नेतृत्वगुण विकसित करावा लागतो. एक क्रिकेटपटू व्यक्तीगत स्तरावर उत्तम क्रिकेटपटू असूनही त्याला क्रिकेट संघाचा कर्णधार बनवल्यानंतर उत्तम नेतृत्व करता आले नाही.

४ इ. समूह स्तरावर तळागाळातून संघटनकार्य कुशलतेने केल्यामुळे समुहाने मान्य केलेले नेतृत्व

एखाद्या समुहामध्ये (संघटनेमध्ये) लहान-लहान स्तरावर लोकांमध्ये कुशलतेने कार्य केल्याने कालांतराने समूह त्याची नेतृत्वक्षमता मान्य करते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण यासाठी वापरता येईल.

४ ई. एखाद्या समुहाचे दायित्वाचे पद प्राप्त झाल्याने आलेले नेतृत्व

बर्‍याचदा चारित्र्य, कार्याचे ज्ञान, तळमळ किंवा आध्यात्मिक उन्नती यांमुळे समुहाच्या दायित्वाचे पद मिळते. अशा व्यक्तीलाही नेतृत्वगुणाचा विकास करावा लागतो.

४ उ. बळजोरीने प्राप्त केलेले नेतृत्व

सामर्थ्यवान दुष्ट लोक बळजोरीने एखाद्या समुहाचे नेतृत्व करू लागतात. अशा नेतृत्वामध्ये नेतृत्वाचे गुण नसतात. केवळ सामर्थ्याच्या प्रभावावर ते नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतात.

आदर्श नेतृत्वाचा विचार केला, तर अशा नेतृत्वाला नेतृत्व म्हणू शकत नाही; कारण नेतृत्वाचे तत्त्वच असे आहे की, नेतृत्वाशी संबंधित प्रभाव हा दबावयुक्त नसावा. दबाव केवळ नेतृत्व करणार्‍याच्या नैतिक प्रभावाचा असावा.

थोडक्यात नेतृत्वगुण आपोआप येत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

 

५. नेतृत्वक्षमतेचा विकास आध्यात्मिक स्तरावर होण्यासाठी करावयाचे प्रयत्न

नेतृत्वक्षमतेचा विकास आध्यात्मिक स्तरावर होण्यासाठी प्रयत्न केल्यास परिपूर्ण नेतृत्वक्षमता विकसित होते. धर्मनिष्ठ छत्रपती शिवाजी महाराज हे आध्यात्मिक नेतृत्वाचे एक उदाहरण आहे.

५ अ. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुणसंवर्धन प्रक्रिया राबवणे

आत्मप्रतीतिर्दृढता विरक्तिरिति त्रयं स्वात्मनि यो दधाति ।
नेता स एवास्ति समस्त शिष्ट-गुणाश्रयत्वान्निखिलप्रजानां ॥ – महासुभाषितसंग्रह

अर्थ : स्वकर्तृत्वावर विश्‍वास, दृढता आणि दोषविरक्ती (काम, क्रोध, लोभ, मोह आदी दुर्गुणांचे निर्मूलन केलेला) हे तीन गुण ज्या व्यक्तीमध्ये असतील आणि ती विनम्रता आदी अन्य गुणांनीही युक्त असेल, तर निश्‍चितच ती व्यक्ती समस्त प्रजेचे योग्य नेतृत्व करण्यात सक्षम असते.

थोडक्यात स्वभावदोष असतील, तर अशी व्यक्ती नेतृत्व करण्यास अपात्र ठरते. यासाठी स्वभावदोष-निर्मूलनाचे प्रयत्न महत्त्वाचे ठरते, तसेच नम्रता हा गुण विकसित होण्यासाठी अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करावे लागतात.

५ आ. वात्सल्यभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे

नेतृत्व करणार्‍याने समुहातील घटकांशी पितृभावाने वर्तन केले पाहिजे. आईसारखा वात्सल्यभाव (निरपेक्ष प्रेमभावाचा एक प्रकार) असेल, तरच असे वर्तन होते. साधनेमुळे प्राणीमात्रावर निरपेक्ष प्रेम करता येते. निरपेक्ष प्रेमामुळे समुहातील व्यक्तींकडून होणार्‍या चुका प्रेमाने दाखवून त्या सुधारण्यासाठी त्यांच्या पातळीला प्रयत्न केले जातात, तसेच निरपेक्षतेमुळे समुहातील व्यक्तींच्या अडचणी समजून घेऊन सातत्याने साहाय्य करण्याच्या स्थितीत रहाता येते.

५ इ. व्यष्टी साधना चांगली करणे

नामजप, प्रार्थना, स्वभावदोष-निर्मूलन आदी व्यक्तीगत साधना चांगला केली की, वाणीमध्ये चैतन्य निर्माण होते. वाणीमध्ये चैतन्य असेल, तर अनुयायी नेतृत्व करणार्‍याचे ऐकतात.

५ ई. तत्त्वनिष्ठता हवी

निर्णय घेतांना तत्त्वनिष्ठता असेल, तर तो निर्णय समुहातील व्यक्तींमध्ये सहज स्वीकारला जातो. तत्त्वनिष्ठतेमुळे समुहातील एक जवळचा वाटणे आणि दुसरा दूरचा वाटणे, असे होत नाही. नेतृत्व करणार्‍याला समुहातील सर्वांच्याच अयोग्य कृती आणि स्वभावदोष तत्त्वनिष्ठतेने सांगता आल्या पाहिजेत. साधनेमुळे ईश्‍वराला अपेक्षित तत्त्वाचे आचरण करणे सुलभ होते.

५ उ. सत्यनिष्ठा हवी

आपण समुहातील व्यक्तींशी खोटे बोलून संघटन करू शकत नाही. खोटेपणावर केलेले कार्य फार काळ टिकत नाही; कारण शेवटी सत्य बाहेर येते, तसेच नेतृत्व करणार्‍याने परिस्थितीतील सत्यता पडताळून कोणताही निर्णय दिला पाहिजे. सत्य न पडताळता एकाचेच ऐकून किंवा अपूर्ण माहिती घेऊन निर्णय दिल्यास तो निर्णय अयोग्य आणि अन्यायकारक ठरतो.

५ ऊ. मोकळेपणा हवा

नेतृत्व करणार्‍याला सर्वांशी जवळीक साधता आली पाहिजे. मोकळेपणाने जवळीक साधल्याने कार्य करणारे मोकळेपणाने नेतृत्व करणार्‍याकडे अडचणी मांडतात. मोकळेपणा असेल, तर नेतृत्व करणार्‍याला त्याच्या चुकाही अनुयायी सांगू शकतात. राजकीय पक्षांचे नेतृत्व करणार्‍यांमध्ये मोकळेपणा नसतो. परिणामी त्यांचे कार्यकर्ते त्यांना चुका सांगू शकत नाहीत.
यावरून लक्षात येईल की, साधना चांगली असेल, तर समष्टीचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करता येते. समष्टी स्तरावर कार्य करणारे संत म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या उत्तम नेतृत्व होय.

 

६. नेतृत्वक्षमतेच्या संदर्भात व्यावहारिक सूचना

अ. नेतृत्व करणार्‍याला समुहातील प्रत्येकाशी यथोचित आदर-सन्मान ठेवून बोलता आले पाहिजे.

आ. नेतृत्व करणार्‍याने समुहाकडून कार्य करवून घेतांना स्वतःही ते कार्य करण्याची आवश्यकतेनुसार शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता केली पाहिजे.
यामुळे समुहाला प्रशिक्षित करणे सुलभ होते, तसेच समुहाला नेतृत्वाविषयी आत्मविश्‍वास वाटतो.

इ. नेतृत्व करणार्‍याने नेहमीच डोक्यावर बर्फ आणि मुखात साखर ठेवली पाहिजे, म्हणजे शांतपणे सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यायला हवेत आणि मुखाने नेहमीच गोड संवाद साधला पाहिजे.

ई. नेतृत्व करणार्‍याने आवश्यकतेपेक्षा अधिक भावनिक, संवेदनशील आणि गतीमान होता कामा नये.

उ. नेतृत्व करणार्‍याने समुहाच्या सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत, तसेच समुहाशी तर्कपूर्ण पद्धतीने चर्चा करायला हवी.

ऊ. नेतृत्व करणार्‍याने कार्याचे उचित मूल्यांकन करून आवश्यकतेनुसार समुहातील घटकांना दंड करण्याची किंवा पारितोषिक देण्याची क्षमता ठेवली पाहिजे. नेतृत्वाने केलेली प्रशंसा हीही नेतृत्व स्वीकारणार्‍यासाठी पारितोषकासारखी असते.

ए. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुठलीही परिस्थिती स्वीकारण्याची सिद्धता केली पाहिजे. कठीण परिस्थितीतही न डगमगता समुहाला ध्येयप्राप्तीकडे घेऊन जाणारा खरा नेता असतो.

ऐ. नेतृत्व करणार्‍याने समुहातील घटकांनी मागितलेला वेळ दिला पाहिजे. त्यामुळे नेतृत्व करणार्‍याविषयी विश्‍वास निर्माण होतो.

ओ. नेतृत्व करणार्‍याने आपल्यानंतर नेतृत्व करू शकणार्‍या समुहातील व्यक्तींना प्रशिक्षण दिले पाहिजे. अनेक नेतृत्व सिद्ध करणारा सर्वांत चांगला नेता असतो, हे लक्षात ठेवा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात