सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला असणार्‍या ईश्‍वरी अधिष्ठानाचा अधिवेशनातील वक्त्यांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ, तसेच त्या वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हिंदुत्वनिष्ठांवर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

(संतांनी केलेल्या मार्गदर्शनाचा परिणाम चैतन्याच्या स्तरावर होत असल्याने त्याचा श्रोत्यांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे चाचणीतूनही दिसून आले.)

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथी, गोवा येथे ४ ते ७ जून २०१८ या कालावधीत ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत झालेल्या ६ अधिवेशनांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, विचारवंत, अधिवक्ता, उद्योगपती अशा विविध क्षेत्रांतील लोक ‘हिंदु राष्ट्राच्या’ स्थापनेच्या महान कार्यात सहभागी झाले होते. प्रत्येक अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्राच्या’ स्थापनेसाठी कार्य करणे, ही आपली साधना कशी आहे’, याचे मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यामुळे सहभागी झालेल्या सर्वांवर साधनेचे महत्त्व बिंबत आहे. या प्रत्येक अधिवेशनातून ते पुढील कार्यासाठीची दिशा घेऊन आपापल्या क्षेत्रात झोकून देऊन धर्मकार्य करत आहेत. ‘साधना, म्हणजे ईश्‍वरी कार्य’ हा दृष्टीकोन असल्याने या प्रत्येक अधिवेशनाला ईश्‍वरी अधिष्ठान असते. त्यामुळे तेथील वातावरणात पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता असते. सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, अधिवक्ता आदींनी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन केले. ‘सप्तम अधिवेशनात मार्गदर्शन करणार्‍या वक्त्यांवर अधिवेशनातील सात्त्विक वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, तसेच ‘अधिवेशनातील वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हिंदुत्वनिष्ठांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ७.६.२०१८ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीतील अधिवेशनात मार्गदर्शन करणारे ३ वक्ते आणि त्या वक्त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ हे या चाचणीमध्ये सहभागी झाले होते. तिन्ही वक्त्यांच्या त्यांनी मार्गदर्शन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. तसेच त्या वक्त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांच्या त्यांनी तिन्ही वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यापूर्वी आणि ऐकल्यानंतर केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या सर्व केलेल्या मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. अधिवेशनातील वक्ते आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे विषय यांच्या संदर्भातील माहिती

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

३. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

३ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ अ १. एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अध्यक्षांनी अधिवेशनात मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा अल्प होणे

अधिवेशनात मार्गदर्शन करणार्‍या एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अध्यक्षांमध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ २.३८ मीटर होती. त्यांनी अधिवेशनात केलेल्या मार्गदर्शनानंतर त्यांच्यातील त्या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ०.८५ मीटर घट होऊन ती १.५३ मीटर झाली. याचा अर्थ त्यांच्यातील त्या नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प झाले.

हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अध्यक्षांमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा मार्गदर्शनापूर्वी आणि नंतरही आढळली नाही.

३ अ २. श्री. रमेश शिंदे आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे

अधिवेशनात मार्गदर्शन करणारे श्री. रमेश शिंदे आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्यामध्ये मार्गदर्शनापूर्वी आणि नंतरही ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळल्या नाही.

३ अ ३. तिन्ही वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर अधिवेशनात उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ त्यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा अल्प होणे

अधिवेशनाला उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांच्यामध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. त्यांनी तिन्ही वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यांच्यातील ती नकारात्मक ऊर्जा अल्प झाली, हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांच्यामध्ये वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यापूर्वी आणि नंतरही ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

३ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ आ १. सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. अधिवेशनात मार्गदर्शन करणार्‍या एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अध्यक्षांमध्ये मार्गदर्शनापूर्वी आणि नंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

३ आ २. अधिवेशनात मार्गदर्शन करणारे वक्ते श्री. रमेश शिंदे आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्यामध्ये मार्गदर्शनापूर्वीही सकारात्मक ऊर्जा असणे आणि मार्गदर्शनानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

अधिवेशनात मार्गदर्शन करणारे वक्ते श्री. रमेश शिंदे आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्यामध्ये मार्गदर्शनापूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती. त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अनुक्रमे ५.८९ मीटर अन् १०.९० मीटर होती. त्यांनी अधिवेशनात मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत अनुक्रमे २.६६ मीटर अन् ०.५७ मीटर वाढ होऊन ती ८.५५ मीटर आणि ११.४७ मीटर झाली.

३ आ ३. अधिवेशनात उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांच्यामध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा नव्हती आणि त्यांनी तिन्ही वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतरही त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही.

३ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ इ १. अधिवेशनात मार्गदर्शन केल्यानंतर तिन्ही वक्त्यांची एकूण प्रभावळ वाढणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. अधिवेशनात मार्गदर्शन करणार्‍या तिन्ही वक्त्यांची आरंभी मोजलेली एकूण प्रभावळ सामान्य व्यक्तीच्या एकूण प्रभावळीच्या तुलनेत अधिक आहे. हे पुढील सारणीवरून लक्षात येते.

३ इ २. तिन्ही वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर अधिवेशनाला उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांची एकूण प्रभावळ वाढणे; पण सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर ती सर्वाधिक वाढणे

अधिवेशनात उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांनी तिन्ही वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ झाली, हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

४. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला ईश्‍वरी अधिष्ठान असल्याने तेथे पुष्कळ प्रमाणात दैवी स्पंदने आकृष्ट होणे

अखिल भारतीय हिंदू अधिवेनशनाचे आयोजन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला दिशा देण्यासाठी करण्यात येते. ‘अधिवेशन आध्यात्मिक स्तरावर व्हावे’, यासाठी सनातनचे सद्गुरु आणि संत कार्यरत असतात. तसेच सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अधिवेशनातील सर्व सेवा भावपूर्ण करतात. यांमुळे या अधिवेशनाला ईश्‍वर, महर्षी, गुरु आणि संत यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात. अधिवेशनाला असलेल्या ईश्‍वरी अधिष्ठानामुळे तेथे पुष्कळ प्रमाणात दैवी स्पंदने आकृष्ट झाली. त्यामुळे तेथील वातावरण अतिशय सात्त्विक बनले.

४ आ. अधिवेशनातील वक्त्यांना त्यांनी मांडलेल्या विषयांनुरूप आवश्यक तेवढी शक्ती (चैतन्य) ईश्‍वराकडून मिळणे

ईश्‍वरी कार्यात सहभागी झालेल्या व्यक्तींना आपोआपच ईश्‍वरी चैतन्य मिळते, तरीही ईश्‍वर काटकसरी आहे. तो प्रत्येकाला ज्याचा-त्याचा भाव, तळमळ आणि आवश्यकता यांनुसार कार्यासाठी बळ देत असतो. या चाचणीतही याचाच प्रत्यय आला. वक्त्यांच्या विषयानुसार त्यांना ईश्‍वराकडून ऊर्जा मिळाली आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अन् त्यांची एकूण प्रभावळ त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर वाढली. याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘तिसरे महायुद्ध’ या संदर्भातील विषय अधिवेशनात मांडला. ते मांडत असलेल्या विषयाची व्याप्ती पुष्कळ मोठी होती. त्यासाठी त्यांना ईश्‍वराकडून अधिक प्रमाणात चैतन्य मिळून त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २.६६ मीटर आणि त्यांची एकूण प्रभावळ २.५५ मीटर वाढली. या तुलनेत एका हिंदुत्ववादी संघटनेच्या अध्यक्षांनी मार्गदर्शनात मांडलेला विषय ‘कार्यक्षेत्रातील अनुभवकथन’ हा व्यक्तिगत स्वरूपाचा असल्याने मार्गदर्शनानंतर त्यांच्या एकूण प्रभावळीमध्ये ०.९२ मीटर, म्हणजे अल्प प्रमाणात वाढ झाली.

२. सद्गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे हे ‘सद्गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांच्यात मुळातच पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची एकूण प्रभावळ सर्वसाधारण व्यक्तीच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे. सद्गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे यांनी हिंदुत्वनिष्ठांना ‘कार्याची आगामी दिशा कशी असणार ?’ याविषयी मार्गदर्शन केले. हा विषय हिंदुत्वनिष्ठांना पुढील कार्यासाठी दिशा देणारा असल्याने तो त्यांना योग्य प्रकारे आकलन होणे आवश्यक होते. अशा कार्यामध्ये आसुरी शक्ती अडथळे आणतच असतात; कारण हे एक सूक्ष्मातील धर्मयुद्ध आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी ईश्‍वराने सद्गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे यांना आणखी ऊर्जा पुरविली. त्यामुळे मार्गदर्शनानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची एकूण प्रभावळ थोडी वाढल्याचे चाचणीतून दिसून आले.

यावरून विषयानुरूप आवश्यक तेवढी शक्ती ईश्‍वराकडून वक्त्यांना मिळाली, हे लक्षात येते. तसेच ईश्‍वराचे नियोजन किती काटेकोर असते, हेही लक्षात येते. ईश्‍वर आवश्यकतेनुसार त्याची शक्ती धर्मकार्य करणार्‍यांना देऊन त्यांच्याकडून ते कार्य कशा प्रकारे करवून घेतो, हेही लक्षात येते.

४ इ. एका हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष आणि अधिवेशनात उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांना लाभ होण्याचे कारण

अधिवेशनात मार्गदर्शन करणारे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष आणि अधिवेशात उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा होती. अधिवेशनातील चैतन्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली. त्यामुळे त्यांची एकूण प्रभावळ वाढली.

४ ई. साधनेचे बळ असल्यास वक्त्याच्या बोलण्याचा इतरांवर अधिक परिणाम होत असणे

४ ई १. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठांनी साधना करण्याची आवश्यकता !

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांनी ‘दासबोध’ ग्रंथात लिहिले आहे,

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।

परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥

– दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६

अर्थ : कर्मामध्ये सामर्थ्य आहे. जो जो कर्म करील त्यास सामर्थ्य प्राप्त होईल; परंतु त्या कर्मास भगवंताच्या अनुसंधानाचा आधार पाहिजे.

समर्थांची वरील उक्ती हिंदू धर्माभिमान्यांसाठी उद्बोधक आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भात कार्य करतांना बर्‍याचशा हिंदुत्वनिष्ठांना साधनेचा पाया नसल्यामुळे त्यांच्या मनात हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील विचार आणि तळमळ असूनही ते केवळ मानसिक स्तरावर कार्य करतात. तसेच त्यांच्यामध्येच नकारात्मक स्पंदने असल्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा श्रोते आणि हिंदुत्वनिष्ठ यांवर फारसा सकारात्मक परिणाम होत नाही. याउलट साधक आणि संत अनेक वर्षे साधना करत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनामुळे श्रोते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येते अन् त्यांच्या मनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात खरा धर्माभिमान निर्माण होऊन समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे हित साधण्यासाठी अध्यात्मिक स्तरावर प्रयत्न होतात. तसेच अशा वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या वाणीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे हिंदुत्वनिष्ठांवर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्या मनात साधनेचे आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाचे बीज रोवले जाते. साधनेचे बळ असणार्‍या हिंदुत्वनिष्ठांमुळे हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊ शकते, नाहीतर त्यासाठी अधिक कालावधी लागू शकतो. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केवळ शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर होऊ शकत नाही, तर त्यासाठी धर्मशक्तीचे बळ, म्हणजेच ईश्‍वराचा आशीर्वाद आवश्यक असतो. तो केवळ साधनेनेच प्राप्त होतो. दुष्टांकडून भक्तांचा छळ झाला, तरच ईश्‍वर अवतार घेतो; म्हणून आपण साधना करून ईश्‍वराचे भक्त झालो, तरच आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्‍वराचे पाठबळ मिळणार आहे.

४ ई २. अन्य दोन्ही वक्त्यांच्या तुलनेत संतांनी (सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी) केलेल्या मार्गदर्शनामुळे अधिवेशनात उपस्थित असलेले ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांना अधिक प्रमाणात लाभ होण्यामागील कारण

अधिवेशनातील तिन्ही वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे चाचणीतील ‘एक हिंदुत्वनिष्ठ’ यांना ‘त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प होणे आणि त्यांची एकूण प्रभावळ वाढणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले; पण संतांच्या मार्गदर्शनामुळे ते सर्वाधिक प्रमाणात झालेे. याचे कारण म्हणजे संतांच्या अस्तित्वाने आणि त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातील सूत्रे उपस्थितांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचतात. त्यामुळे ते कृतीप्रवण होतात.

थोडक्यात सांगायचे, तर संतांनी केलेल्या मार्गदर्शनाचा परिणाम चैतन्याच्या स्तरावर होत असल्याने त्याचा परिणाम सर्वाधिक झाल्याचे चाचणीतूनही दिसून आले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (८.६.२०१८)

ई-मेल : [email protected]