‘आतंकवाद्यांचे समुपदेशन करणे नव्हे; तर कठोर शिक्षा करणे आवश्यक !’ -ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन

स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आतंकवादी कारवायांमुळे जम्मू-काश्मीरच्या रहिवाशांचे आणि सैन्याचे लचके तोडले जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवण्यास प्रारंभ केला आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले; मात्र त्याच वेळी आतंकवाद्यांचे समुपदेशन करणेही शून्य उपयोगाचे असल्याचे आढळून आले. त्याविषयी उहापोह करणारा (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी लिहिलेला लेख प्रसिद्ध करत आहोत.

 

१. भारतीय सैन्याच्या कामगिरीमुळे आतंकवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

‘जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रणरेषेवरील घुसखोरीविरोधी अभियान, हिंसाचाराचा सामना, यांविषयी भारतीय सैन्याने चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीर खोर्‍यात नेहमीच अशांतता असते.

१ अ. हिजबुल मुजाहिदीनचे कंबरडे मोडले !

दोन वर्षांपूर्वी हिजबुल मुजाहिदीनचा ‘पोस्टरबॉय’ (फलकांवर झळकणारा तोंडवळा) कमांडर बुरहान वानीला कंठस्नान घातल्यानंतर काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार उफाळून आला होता; मात्र या दोन वर्षांत भारतीय सैन्याने बुरहानच्या संघटनेतील सर्वच सदस्यांना संपवले आहे. जुलै २०१६ मध्ये बुरहान वानीच्या ११ आतंकवादी साथीदारांची छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर आली होती. त्यातील १० जण मारले गेले आहेत, तर उरलेला तारिक पंडित कारागृहात आहे.

१ आ. सहा आतंकवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या विरोधातील संघर्षाच्या इतिहासात ६.५.२०१७ हा दिवस नक्कीच स्मरणात राहील. सद्दाम पद्दार, तौसीफ शेख, आदिल मलिक आणि बिलाल उपाख्य मौलवी दुर्दात या ५ आतंकवाद्यांना शोपियांच्या बोदागाममध्ये सुरक्षादलांनी कंठस्नान घातले. या चकमकीत काश्मीर विद्यापिठात समाजशास्त्र विषयाचा सहप्राध्यापक असणारा मोहम्मद रफी भट हाही मारला गेला. ही गोष्ट सुरक्षादले आणि काश्मिरी जनता यांच्यासाठी नक्कीच आश्‍चर्याची होती. मोहम्मद रफी भट हा काही दिवसांपूर्वी; किंबहुना काही घंट्यांपूर्वीच हिजबूल मुजाहिदीनमध्ये सामील झाला होता. दुसरीकडे सद्दाम पद्दार मारला जाणे हा शोपियां आणि त्या लगतच्या परिसरामध्ये कार्यरत असणार्‍या हिजबुल मुजाहिदीनच्या संपर्क यंत्रणेला दिलेला मोठा धक्काच म्हणावा लागेल.

 

२. आतंकवाद्यांची पार्श्‍वभूमी

२ अ. पोलीस आणि सैन्याधिकारी यांना धमकावणारा अन् नव्या आतंकवाद्यांची भरती करणारा सद्दाम पद्दार

सद्दामच्या आतंकवादी कारवायांचा प्रारंभ लष्कर-ए-तोयबामधून झाला. वर्ष २०१५ मध्ये तो हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला. बुरहान वानीच्या जवळच्या मानल्या जाणार्‍या विशेष लोकांमध्ये त्याची गणना होत होती. त्याने दक्षिण काश्मीरच्या विशेषत: शोपियामधील पोलीस आणि सैन्य अधिकारी यांच्या नातेवाइकांना धमकावणे आणि मारणे अशा आतंक माजवणार्‍या कारवाया चालू केल्या होत्या. गेल्या वर्षी त्याने इरफान नावाच्या सैनिकाला घरी बोलावून मारले होते. या व्यतिरिक्त एक प्राध्यापक आणि सैन्याचे जुने भूमीगत कर्मचारी यांची  अवंतीपोरा परिसरात हत्या केल्याच्या प्रकरणातही त्याचे नाव आले होते. वानीला मारल्यानंतर आणि झाकिर मुसा हिजबुलमधून वेगळा झाल्यानंतर शोपिया, पुलवामा, अवंतीपोर येथे हिजबुलचे ‘कॅडर’ (गट) सांभाळतांना नव्या तरुणांची भरती आणि नवी ठिकाणे निर्माण करण्यात त्याने भूमिका निभावली होती. सद्दामने गेल्या दोन वर्षांत किमान दोन डझन (२४) आतंकवादी कारवाया केल्या होत्या. त्याला पकडण्यासाठी १५ लाख रुपयांचे बक्षिसही ठेवण्यात आले होते. अखेर त्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षादलांना यश आले आहे.

२ आ. आठवीतून शालेय शिक्षण सोडून आतंकवादी झालेला समीर टायगर

३०.४.२०१७ या दिवशी पुलवामाच्या द्राबगामध्ये समीर टायगर उपाख्य समीर अहमद भट मारला गेला. सुरक्षा दलांसाठी हेही मोठे यश होते. नोव्हेंबर २०१७ मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये एका बागेत काढलेल्या छायाचित्रात भट हातात ‘अमेरिकन एम्-४ कार्बाईन बॉम्ब’ घेतलेला दिसून आला होता. इयत्ता आठवीतून शालेय शिक्षण सोडून दिलेला भट जुलै २०१६ मध्ये बुरहान वानीच्या मृत्यूनंतर हिजबुल मुजाहिदीनचा ‘पोस्टर बॉय’ म्हणून प्रसिद्धीस आला. हे आतंकवादी सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होतात; पण त्यांची लढण्याची क्षमता तितकीशी नसते; म्हणूनच ‘आयएस्आय’चा (पाकिस्तानची गुप्तचर संस्था) काश्मिरी आतंकवाद्यांवर विश्‍वास राहिलेला नाही.

 

३. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधून ‘ऑपरेशन
ऑल आऊट’द्वारे दीड वर्षात २८० आतंकवाद्यांना कंठस्नान

ताज्या कारवाईमध्ये सुरक्षा दलांसह झालेल्या चकमकीत आतंकवादी आणि त्यांचे नेते यांना ‘समर्पण करा किंवा मारले जा’ हे दोनच पर्याय असल्याचा स्पष्ट संदेश दिला गेला होता. सुरक्षा दलांच्या आतंकवादविरोधी कारवाईमध्ये ज्या पद्धतीचा ताळमेळ या वेळी पहायला मिळाला, तसा पूर्वी कधीही पहायला मिळालेला नाही. सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ चालू केले, तेव्हा त्याला एवढे यश मिळेल, अशी कल्पना कुणीही केली नव्हती.

‘ऑपरेशन ऑल आऊट’ म्हणजे संपूर्ण जम्मू-काश्मीर आतंकवादमुक्त करणे ! गेल्या वर्षी सैन्याने या उपक्रमाच्या अंतर्गत २१८ आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले होते. चालू वर्षी आतापर्यंत ६२ आतंकवादी मारले गेले आहेत. त्यामध्ये किमान ४० जिल्हास्तरीय किंवा त्यावरील कमांडर्सचा समावेश आहे. त्यामुळे सैन्याला  एवढे यश कसे मिळत आहे, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर समन्वयामध्ये आणि सैन्याला दिलेल्या स्वातंत्र्यामध्ये आहे. आज सैन्य, सीआर्पीएफ् (केंद्रीय राखीव पोलीस दल) आणि जम्मू-काश्मीर पोलीस या तीनही दलांचे प्रमुख आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण कारवाईचे समीक्षण करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही ‘ऑपरेशन’साठी कागदपत्रांची पूर्तता करत बसावी लागत नाही. कोणतीही ‘खबर’ मिळल्यास लगेच कारवाई केली जाते. हेच सुरक्षा दलांच्या यशाचे रहस्य आहे.

 

४. सुटका झाल्यानंतर आतंकवादी पुन्हा आतंकवादाच्याच वळणावर

४ अ. सुटका झाल्यावर पुन्हा आतंकवादी झालेला सद्दाम पद्दार

या यशाचा दुसरा पैलू चिंताजनक आहे. सद्दाम पद्दार प्रारंभी दगडफेक करणारा आतंकवादी होता. वर्ष २०१४ मध्ये तो राष्ट्राविरुद्ध निदर्शने करतांना पकडला गेला. सुटका झाल्यानंतर काही दिवस घरी राहिला; पण पुन्हा अचानक ‘गायब’ झाला. ६-७ मासांनंतर (महिन्यांनंतर) लोकांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर त्याचे छायाचित्र पाहिले. म्हणजेच ‘सुटका झाल्यानंतर घरीच राहणारी व्यक्ती आतंकवादी होऊ शकणार नाही’, असे नाही.

४ आ. समुपदेशनानंतर शिक्षण चालू करणार असल्याचे सांगून ‘गायब’ होणारा समीर भट

समीर भटचेच उदाहरण पाहूया. मार्च २०१६ मध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरक्षादलावर दगडफेक केली; म्हणून त्याला अटक केली. दोन आठवडे त्याचे समुपदेशन केले. त्याने ‘पुन्हा शिक्षण चालू करणार’, असेही सांगितले. त्यानंतर काही दिवस तो ‘गायब’च होता.

४ इ. आतंकवादाचे प्रशिक्षण घेतांना पकडलेला आणि
कुटुंबियांनी लक्ष ठेवूनही आतंकवादी झालेला डॉ. रफी अहमद बट

डॉ. रफी अहमद बटची कथा, तर अजून निराळीच आहे. तब्बल १५ वर्षांपूर्वी काही तरुणांसह पाकिस्तानात आतंकवादाचे प्रशिक्षण घ्यायला जातांना सैन्याने त्याला पकडून नातेवाइकांच्या कह्यात दिले होते. डॉ. बट ४ मे या दिवशी ‘गायब’ झाला होता. चकमक चालू झाल्यानंतर तो आतंकवादी झाल्याचे सुरक्षा दलांना कळले. त्याचे दोन चुलत भाऊ वर्ष १९९० च्या दशकाच्या प्रारंभी आतंकवादी झाले होते आणि सुरक्षा दलांसह झालेल्या चकमकीत मारले गेले होते. त्याचे वडील फैयाज अहमद बट यांच्या म्हणण्यानुसार, तो आतंकवादाच्या मार्गाला लागू नये, यासाठी कुटुंबीय सतत लक्ष ठेऊन होते. मरण्यापूर्वी त्याने वडिलांना भ्रमणभाष केला आणि ‘मी तुमचे मन दुखावले असेल, तर मला क्षमा करा. मी अल्लाला भेटायला जात आहे’, असेही सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सोडून दिल्यानंतर आणि कुटुंबाने लक्ष ठेवूनही आतंकवादी बनण्याची ही प्रवृत्ती कशी रोखायची, हा आज काश्मीरमधील एक गंभीर प्रश्‍न बनला आहे.

 

५. आतंकवाद्यांची निर्मिती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक !

५ अ. मनोवैज्ञानिक कारवाया वाढवणे

मनोवैज्ञानिक कारवाईचे उद्दिष्ट अतिरेक्यांमधील लढण्याची इच्छाशक्तीच मोडणे, हे आहे. आपल्या समाजातील अपमार्गावर चाललेल्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आई-वडील, नातेवाइक, सामाजिक प्रसारमाध्यमे यांचा उपयोग केला पाहिजे. अतिरेक्यांच्या परिचितांना अतिरेकातील संकटे समजावून अतिरेक्यांवर दबाव आणण्यासाठी त्यांच्या परिचितांचा वापर करून घेतला पाहिजे, तसेच स्थानिक लोक, छुप्या युद्धाचे समर्थक यांना सक्रीय आधार देण्यापासून निवृत्त करणे आवश्यक आहे. त्यासह सरकारच्या समर्थकांमध्ये सरकार आणि सुरक्षादले यांविषयीचा आत्मविश्‍वास वाढवणे आवश्यक आहे.

५ आ. आतंकवादाच्या प्रतिकूल परिणामांविषयी जागृती आवश्यक

अतिरेक्यांना स्थानिक पाठबळ मिळण्यापासून रोखण्यासाठी स्त्रियांचे शोषण, गरिबांची अडवणूक, अतिरेक्यांना आधार देण्यासाठी नागरिकांचा करण्यात येणारा छळ यांकडे सामान्यांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे, तसेच आतंकवादाचे अर्थव्यवस्था आणि इतर महसुली उत्पन्न-सामर्थ्य यांवर होणारे प्रतिकूल परिणामही सामान्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत. यामध्ये पर्यटन, शेती-उपज-निर्यात, हस्तकला आणि त्यांचे स्वत:चे भवितव्य यांवर आतंकवादाचा होणारा विपरीत परिणामही समाविष्ट व्हावा.

५ इ. युद्धाच्या अपप्रचाराने प्रभावित झालेल्यांवर लक्ष ठेवावे !

श्रीनगर, अनंतनाग, पुलवामा आणि बडगाम या मुख्य चार जिल्ह्यांत, तसेच अंतर्भागातील बारामुल्ला, कुपवाडा आणि दोडा जिल्ह्यांत रहाणारे लोकच छुप्या युद्धाच्या प्रारंभी अपप्रचाराने प्रभावित झालेले आहेत. सध्या हे लोक अतिरेकी आणि त्यांच्या पाकिस्तानी म्होरक्यांसह दूर होतांना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

५ ई. सहनशील वृत्तीने सातत्यपूर्ण मनोवैज्ञानिक युद्धप्रयत्न महत्त्वाचे !

मनोवैज्ञानिक युद्धप्रयास प्रभावी ठरण्यासाठी ‘गिमिक्स’चा (अभिनव पद्धत) सोपा मार्ग टाळावा; कारण चुटकीसरशी कुठल्याही गोष्टी होत नसतात. छोट्या-छोट्या पायर्‍या-पायर्‍यांनीच प्रगती साधली जाऊ शकते. दीर्घकाळानेच लक्षात येण्यायोग्य परिणाम दिसून येऊ शकतात. मनोवैज्ञानिक युद्धप्रयास प्रभावी ठरण्यासाठी सहनशीलता आणि सातत्य महत्त्वाचे आहे.

 

६. सुरक्षेच्या उपायांसह पर्यटकांच्या रक्षणाविषयीची सजगता महत्त्वाची !

पर्यटन हा काश्मीरमधील अर्थकारणाचा कणा आहे. आतंकवादाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये अशांतता पसरवून हा कणा मोडण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आला आहे. त्यामुळेच या नंदनवनात शांतता प्रस्थापित होणे आवश्यक आहे. त्यासाठी आतंकवादासह दगडफेकीच्या घटनांनाही पायबंद बसणे आवश्यक आहे. यासंदर्भातील प्रयत्नांना यश येत असतांनाच नुकत्याच झालेल्या दगडफेकीत एका पर्यटकाचा मृत्यू झाला. अशा घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचा संदेश जाईल. त्यातूनच पर्यटकांची संख्या   घटू शकते आणि आतंकवादी अन् फुटीरतावादी यांना तेच हवे आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना करतांना पर्यटकांच्या रक्षणाविषयी अधिक सजग रहाणे आवश्यक आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन (दैनिक ‘तरुण भारत’, १३.५.२०१८)