कुलाच्या, सभ्यतेच्या, शालिनतेच्या मर्यादा सांभाळणारे स्त्री जीवन भूषणास्पद ! – पू. स्वामी गोविंददेव गिरीजी

नगर – परंपरेप्रमाणे कुलाच्या, सभ्यतेच्या, शालिनतेच्या मर्यादा जोपर्यंत स्त्रीच्या जीवनात आहेत, तोपर्यंत त्यांचे जीवन भूषणास्पद असते. स्त्रीचे सबलीकरण व्हायला हवे; मात्र लज्जा, शालिनता हे तिचे सौंदर्य असल्याचे तिने ध्यानी घ्यावे, असे मार्गदर्शन पू. स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी केले. श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टने येथील नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉनमध्ये आयोजित केलेल्या ‘गीता महाभारत संदेश कथा’चे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.

स्वामी पुढे म्हणाले, ‘‘लज्जा हे मानवी जीवनाचे अत्यंत मोठे आभूषण आहे. स्त्रीचा सर्वात मोठा अलंकार लज्जा हाच आहे. लज्जा तिर्थात स्नान केलेल्या महिला जगाचा उद्धार करतात. आजच्या मुलींना उत्ताण कपडे घालायला, टॉक-टॉक करत चालायला काहीच वाटत नाही. मुली आणि मुले ‘स्मोकिंग’ तसेच ‘ड्रिंकींग’ करतात हे स्वातंत्र्य नव्हे, तर स्वैराचार आहे. यातून त्यांच्या जीवनाचा सत्यानाशच होणार आहे. स्त्रियांनी स्त्रीत्व जपून मोठे व्हावे, अशांचे पाय पूजायला आम्ही पुढे येऊ. अहिल्याबाई होळकर यांची शिवभक्ती, धार्मिकता पहा. आपल्या देशाच्या बहुतेक भागांमधील शिवमंदिरे त्यांनी उभारली. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना उभे केले. अशा थोर मातांचे आदर्श समोर ठेऊन आजच्या स्त्रियांनी स्वतःचे, घराचे, समाजाचे आणि राष्ट्राचे जीवन घडवण्याचे व्रत अंगिकारावे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात