स्वत:मधील स्वभावदोष आणि अहं दूर करणे म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकास ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या
अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशना’स प्रारंभ !

डावीकडून पू. (सौ.) संगीता जाधव, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, दीपप्रज्वलन करतांना पू. अशोक पात्रीकर आणि पू. नीलेश सिंगबाळ

रामनाथी – हिंदु जनजागृती समिती आयोजित सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशना’स रामनाथी, गोवा येथे भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या वेळी सनातनच्या पश्‍चिम महाराष्ट्र धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, विदर्भ आणि छत्तीसगड राज्य धर्मप्रसारक पू. अशोक पात्रीकर, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात राज्य धर्मप्रसारक पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘स्वत:मधील स्वभावदोष आणि अहं दूर करणे म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकास आहे’, असे प्रतिपादन सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करतांना केले. सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. अमर जोशी यांनी केलेल्या शंखनादाने कार्यशाळेचा आरंभ झाला. त्यानंतर पाठशाळेचे श्री. दामोदर वझेगुरुजी, श्री. अमर जोशी यांनी वेदमंत्रपठण केले.

या कार्यशाळेला १३ राज्यांतून १४० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. ही कार्यशाळा ९ जून ते १२ जून पर्यंत चालणार आहे. ‘चांगले संघटक निर्माण करणे’, ‘धर्मबंधूभाव निर्माण करणे’, ‘समविचारी कर्महिंदूंचे संघटन करणे’ हा या अधिवेशनाचा उद्देश आहे. या अधिवेशनात ‘हिंदूंना संघटित कसे करावेे?’, ‘हिंदूंमध्ये जागृती कशी निर्माण करावी?’, ‘हिंदूंना संघटित करण्यासाठी कोणते उपक्रम राबवावेत ?’, ‘समाजातील अधिवक्ता, संपादक, पत्रकार, लेखक, विविध संप्रदायांचे प्रतिनिधी यांना कसे संघटित करावे ?’, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

समष्टी साधनेसमवेत व्यष्टी साधनेकडेही लक्ष देणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

‘हिंदु राष्ट्र हे घटनेला धरून आणि आदर्श असेल’, हे समाजाला पुढील काळात पटवून देण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य पेलण्यासाठी निर्णयक्षमता, नियोजन कौशल्य, नेतृत्वगुण या गुणांची वृद्धी करणे, ‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून प्रभावी प्रचार-प्रसार  करणे आवश्यक आहे. समष्टी साधनेसमवेत व्यष्टी साधनेकडेही लक्ष द्यायला हवे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, ‘भारतरत्न मिळाला नाही, तरी चालेल; मात्र माझा परिचय ‘हिंदु राष्ट्र संघटक’ म्हणून व्हायला हवा’. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हिंदु राष्ट्र स्थापनेची तळमळ होती. त्यातील एक तरी अंश कृतीत आणण्याचा या अधिवेशनाद्वारे प्रयत्न करूया !’, असे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी भाषणात सांगितले.