सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित राहू न शकलेल्या हिंदुत्वनिष्ठांचा चलचित्राद्वारे हृद्य संवाद

गोवा शासनाने घातलेल्या प्रवेशबंदीमुळे कर्नाटक येथील श्रीराम सेनेेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक गेली ३ वर्षे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये सहभागी होऊ शकलेले नाहीत. श्री. मुतालिक यांनी अधिवेशनासाठी दिलेल्या संदेशाचे चलचित्र हिंदू अधिवेशनात दाखवण्यात आले.

 

हिंदुत्वनिष्ठांनी क्षात्रतेजाचे जागरण करावे ! – प्रमोद मुतालिक

श्री. प्रमोद मुतालिक

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आता क्षात्रतेजाचे जागरण करायला हवे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबूक यांपुरते हिंदुत्व मर्यादित न ठेवता ते आचरणात आणायला हवे. गोवा शासनाने गेली ३ वर्षे माझ्यावर अन्याय्य गोवा प्रवेशबंदी लादली आहे. घटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विहारस्वातंत्र्य दिले आहे. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना यांचे नाव घेत आहेत, तेच अशा प्रकारे मनमानी बंदी घालून घटनेचे उल्लंघन करत आहेत. याविषयी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांना पत्र पाठवले होते; पण त्याचे उत्तरही आले नाही.

अधिवेशनाचे हिंदूसंघटनाचे कार्य कौतुकास्पद !
तन-मन-धनाने समर्पित होऊन कार्याला साथ द्या ! – प्रमोद मुतालिक

कर्नाटकमध्ये दिवसाढवळ्या भर रस्त्यात २३ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. हत्या करणार्‍यांचा उद्देश स्पष्ट आहे. त्यांना इस्लामी राष्ट्र आणायचे आहे. सरकार आणि पोलीस हे इस्लामी राजकारणाने त्यांच्या मुठीत ठेवले आहेत. या इस्लामी दुष्ट शक्तीला हिंदुत्वनिष्ठ संघटनाच आळा घालत आहेत. टीका, अपकीर्ती करण्याचा प्रयत्न होऊनही या देशद्रोही शक्ती रोखण्यासाठी ज्या हिंदू संघटना कार्यरत आहेत, त्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांचे संघटन करण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. हे कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने या कार्याला बळ द्यायला हवे. तन-मन-धन देऊन साथ द्यायला हवी.

अधिवेशनात जे कार्य नेमून दिले जाईल, ते मी करीन ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

श्री. सुरेश चव्हाणके

‘भारत बचाव यात्रे’च्या अंतर्गत ‘हम दो, हमारे दो, तो सब के दो’साठीच्या कायद्यासाठी कार्यरत असल्याने अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो नाही. हिंदूंची संख्या झपाट्याने घटत असल्याने लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी एका सक्षम कायद्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. अधिवेशनात माझ्यासाठी जे कार्य नेमून दिले जाईल, ते मी करीन’’, असे श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले.

छत्तीसगडमध्ये ७० मंदिरांमध्ये सामूहिक आरतीद्वारे
हिंदूसंघटन करणारे हिंदु समूह पूजा समितीचे श्री. सुबोध श्रीनिवास !

हिंदु समूह पूजा समितीमध्ये कोणीही पदाधिकारी नसून सर्व सदस्य आहेत. या समितीद्वारे ७० मंदिरांमध्ये सामूहिक आरती करून हिंदूंचे संघटन करण्यात येत आहे. संघटनामुळे आमच्या भागातील धर्मांध आम्हाला घाबरून आहेत. प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आपल्या भागात युवकांचे संघटन करण्यासाठी एका मंदिरात साप्ताहिक महाआरती आठवड्यातून एकदा करावी.

सनातनच्या आश्रमांमध्ये अमर्याद उर्जा आणि सकारात्मकता ! – ज्योतिषाचार्य राजेंद्र शर्मा

मी उज्जैनला कुंभपर्वासाठी गेलो होतो. तेथेही जेवढी उर्जा मिळाली नाही, तेवढी उर्जा सनातनच्या आश्रमात अनुभवता आली. आश्रमातील सकारात्मकता मोजायची म्हटले, तर ‘मीटर’ही बंद पडेल. मी आयआयटी आणि एम्बीए शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतो. त्यांना सांगतो, ‘तुम्हाला व्यवस्थापन शिकायचे असेल, तर माझ्यासह सनातनच्या आश्रमांत या. तेथे कोणताही तणाव नाही. कुणावरही अविश्‍वास दाखवत नाहीत.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात