हिंदुत्वनिष्ठांसाठी आयोजित एक दिवसीय साधना शिबिरात हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग !

हिंदुत्वाचे कार्य करतांना साधना केली, तर आध्यात्मिक बळ मिळेल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु नंदकुमार जाधव

रामनाथी (गोवा) – युद्धकाळात अर्जुनाने सैन्य नव्हे, तर भगवान श्रीकृष्णाचा पक्ष निवडला. त्याप्रमाणे आपणही हिंदुत्वाचे कार्य करतांना साधना केली, तर आध्यात्मिक बळ मिळेल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘हिंदुत्वाच्या कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान असावे’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जून या दिवशी रामनाथ देवस्थान येथे एक दिवसीय साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. भारताच्या विविध भागांतून ६० हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने साधना करण्याचे महत्त्व’, ‘आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’, ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासांवरील उपाय आणि आध्यात्मिक उपचार’, ‘काळानुसार आवश्यक नामजप’, ‘प्रार्थनेचे महत्त्व’ आदी विषयांवर या वेळी मार्गदर्शन करण्यात आले.

 

मनात उमटणार्‍या अपेक्षा, तसेच
नकारात्मकता यांविषयी मोकळेपणाने सांगणारे हिंदुत्वनिष्ठ !

१. साधनेविषयी जाणून घेण्यात हिंदुत्वनिष्ठांमध्ये उत्साह !

‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन नेमके कसे करायचे’ याविषयी दुपारच्या सत्रात गटचर्चा घेण्यात आली. त्या वेळी, तसेच संपूर्ण शिबिरात साधना शिकण्याविषयी हिंदुत्वनिष्ठांमध्ये उत्साह जाणवत होता. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी हिंदुत्वाचे कार्य करतांना मनात उमटणार्‍या अपेक्षा, काही प्रसंगात येणारी नकारात्मकता यांविषयीचे प्रसंग मोकळेपणाने सांगून ‘त्यावर साधनेच्या दृष्टीने कसे प्रयत्न करायला हवेत’, याविषी जाणून घेतले.

२. मनातील नकारात्मकता मनमोकळेपणाने सांगून
‘त्यावर साधना म्हणून काय प्रयत्न करायचे’, ते हिंदुत्वनिष्ठांनी जाणून घेणे !

बांगलादेशातील बांगलादेशी मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष आणि बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष, केरळमधील श्री. पी.टी. राजू, बंगालमधील ‘हिंदु एक्झिस्टन्स’चे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांनीही साधनेविषयी जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच मनमोकळेपणाने स्वभावदोषांच्या संदर्भातील प्रसंग सांगितले. हे सर्व जण ज्या ठिकाणी हिंदू हालाखीचे जीवन जगत आहेत, अशा ठिकाणी पुष्कळ जोमाने आणि सकारात्मतेने कार्यरत आहेत. तरीही कार्य करतांना त्यांच्या मनात कधीकधी येणारी थोडीशी नकारात्मकता त्यांनी मोकळेपणाने सांगून त्यावर साधना म्हणून काय प्रयत्न करायचे, ते जाणून घेतले.

प्रयाग येथील हिंदुत्वनिष्ठ नीरा सिंह यांनीही स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेविषयी आयोजित सत्रात सक्रीय सहभाग घेतला. ‘मी अनेक ठिकाणी फिरले आहे; पण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया मी कुठेच पाहिली नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.