हिंदूंचे राष्ट्रीय व्यासपीठ झालेले अखिल भारतीय हिंदू अधिवेशन !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आयोजित अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. वर्ष २०१२ मध्ये रामनाथी, गोवा येथे पार पडलेल्या प्रथम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य परंतु धर्म नि राष्ट्र यांप्रती अभिमान बाळगणारे हिंदू एकत्र येऊ लागले. प्रतिवर्षी होत असलेल्या या अधिवेशनांच्या माध्यमांतून देशभरातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटनही बघता बघता उभे राहिले. लव्ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर, गोहत्या, काश्मिरी हिंदूंचे विस्थापन, हिंदु देवी-देवतांचे विडंबन आदी हिंदूंवरील असंख्य आघातांपैकी एखाद-दोन आघातांच्या विरोधात लढणार्‍या शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्राची स्थापना या एकाच व्यापक नि सर्वसमावेशक ध्येयाने प्ररित झाल्या. हिंदुत्वनिष्ठ नेते अन् कार्यकर्ते यांच्यापुरतेच हे संघटन सीमित राहिले नाही, तर धर्माचार्य, संत, विविध संप्रदायांचे अनुयायी, निवृत्त न्यायाधीश, अधिवक्ते, संपादक, पत्रकार, उद्योगपती, विचारवंत, इतिहासतज्ञ, डॉक्टर्स, स्वरक्षण प्रशिक्षणतज्ञ इत्यादींचे म्हणजेच विविध क्षेत्रांशी निगडित जाणकारांचे अभेद्य संघटन निर्माण झाले. देशातील २२ राज्ये, तसेच बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया इत्यादी देशांतील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटनाची वज्रमूठ सिद्ध झाली. या संघटनाचे स्वरूप केवळ तात्कालिक नि वैचारिक स्तरावरच राहिले नाही, तर या संघटनास सातत्यपूर्ण कृतीशीलताही प्राप्त झाली.

जिहादी आतंकवादाच्या भयापोटी ९० च्या दशकात जेथे शेकडो नव्हे, सहस्त्रो नव्हे तर तब्बल साडे तीन लाख काश्मिरी हिंदु कुटुंबांना आपले घर-दार, पैसाअडका, सफरचंदाच्या बागा इत्यादींवर अक्षरश: तुळशीपत्र सोडून निर्वासित व्हावे लागले, तेव्हा त्यांच्या बाजूने बोलणारा एकही राजकीय पक्ष नव्हता नि राष्ट्रव्यापी काय, तर एखाद्या प्रांतातही अभावानेच आंदोलन झाले असावे. आजचे चित्र मात्र निराळे आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात कुठेही राष्ट्र नि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात प्रत्येक महिन्यात एकाच वेळी १० राज्यांतील ५० शहरांत राष्ट्रीय हिंदू आंदोलने होतात. या आंदोलनांच्या माध्यमांतून आपली जात, संप्रदाय, संघटना, प्रांत, राजकीय पक्ष इत्यादी बिरूदावल्या बाजूला सारून एकवटलेले देशभरातील हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना आपला आवाज परिणामकारकरित्या सरकारदरबारी पोहोचवीत आहेत. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचेच हे फलीत आहे, हे येथे अधोरेखित करण्याचे सूत्र ! ही सर्व आंदोलने सनदशीर मार्गाने होतात, हे विशेष !

लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय उराशी बाळगणार्‍या गेल्या ६ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांची फलश्रुती पुढीलप्रमाणे आहे –

– अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांतून प्रेरणा घेऊन भारतातील अनेक राज्यांत आतापर्यंत एकूण ८२ प्रांतीय अधिवेशनांचे यशस्वी आयोजन !

– हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमी अधिवक्तत्यांच्या सहभागाने हिंदूहितासाठी न्यायालयीन लढा !

– तिरुपति पवित्रता रक्षण आंदोलनास व्यापक राष्ट्रीय स्वरूप !

– बांगलादेशात होत असलेल्या गो-तस्करीच्या विरोधात बंगालच्या सीमावर्ती क्षेत्रांमध्ये हिंदुत्वनिष्ठांकडून संघटित प्रयत्न !

– उत्तराखंडच्या पूरग्रस्तांना तसेच नेपाळच्या भूकंप पीडितांना आपत्कालीन साहाय्य !

– विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी एक भारत अभियान – कश्मीर की ओर या मोहिमेअंतर्गत भारतातील १२ राज्यांत १५ जाहीर धर्मजागृती सभांचे यशस्वी आयोजन !

– भारतभरात क्रियाशील असलेल्या प्रमुख हिंदु संघटनांच्या नेत्यांच्या त्रैमासिक बैठकांचे आयोजन !

२ ते १२ जून २०१८ या कालावधीत होणार्‍या सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांतर्गत २ आणि ३ जून या दिवशी चतुर्थ धर्मप्रेमी अधिवक्ता अधिवेशन असेल. हिंदु धर्मरक्षणासाठी लढणार्‍या हिंदूंना आज विविध स्तरांवर अन्याय सोसावा लागत आहे. अशावेळी त्यांना कायदादृष्ट्या विनामूल्य साहाय्य मिळणे आवश्यक आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन अधिवक्ता अधिवेशनांतून भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे संघटन होत आहे. आता या चतुर्थ अधिवेशनातून अधिवक्ता संघटनाला अधिक बळकटी येईल. दुसरीकडे हिंदु राष्ट्राची स्थापना या व्यापक उद्देशाने कार्यतत्पर असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना कायद्याच्या मार्गाने आंदोलन कसे उभे करता येऊ शकते, यासाठी कायद्याचे आवश्यक शिक्षण देणे, जनहित याचिका प्रविष्ट कशी करावी, याविषयीचे ज्ञान देणे, माहितीच्या अधिकाराचा उपयोग कसा करावा, यांसारखी सूत्रे शिकवल्यास धर्मप्रसार, हिंदूसंघटन आणि धर्मरक्षण करण्याची हिंदुत्वनिष्ठांच्या कार्याची फलनिष्पत्ती मोठ्या प्रमाणात वृद्धींगत होऊ शकते. यासमवेतच न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारी प्रवृत्तींच्या विरोधातील न्यायालयीन लढ्यातही संघटितपणे सहभागी होणे या अधिवेशनातून शक्य होणार आहे.

४ ते ७ जून या कालावधीत सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडेल. या अधिवेशनाच्या माध्यमातून देश-विदेशांतील हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांसंदर्भात विचारांची देवाण-घेवाण होईल. यासमवेतच हिंदु धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी राष्ट्रीय स्तरावर परिणामकारक हिंदूसंघटनाला आणखी बळकटी कशी दिली जाऊ शकते, यावर विचार होईल. याच्या जोडीला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आगामी वर्षभराचा समान कृती आराखडा आखला जाणार आहे.

८ जूनला होणार्‍या प्रथम हिंदुत्वनिष्ठ साधना शिबिराच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांच्या मनावर आध्यात्मिक साधनेचे महत्त्व अंकित केले जाईल. सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जे करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे । या समर्थ रामदासस्वामी लिखित वचनानुसार कोणत्याही मोहिमेत यश संपादन करण्यासाठी ईश्‍वरी अधिष्ठान आवश्यक असते. यासाठी साधना करणे हे क्रमप्राप्त आहे. या अनुषंगाने सदर शिबिरातून उपस्थित हिंदुत्वनिष्ठांचे दिशादर्शन केले जाणार आहे.

हिंदूसंघटन हे हिंदु राष्ट्र स्थापनेचे गमक आहे. नेमक्या या कारणासाठीच ९ ते १२ जून या कालावधीत होणारे तृतीय हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशन महत्त्वाचे असणार आहे. आदर्श संघटकात कोणते गुण असावेत, कोणत्या दोषांवर मात केल्यास आपण कुशल संघटक बनू शकतो, गुणांना साधनेची जोड देणे का आवश्यक आहे, यांसारख्या विविध विषयांवर या अधिवेशनात ऊहापोह आणि दिशादर्शन केले जाणार आहे. यातून हिंदु राष्ट्राच्या ध्येयाने प्रेरित असणारे संघटक सिद्ध होतील.

गेल्या ७० वर्षांच्या राजवटीत हिंदूंचा एकही प्रश्‍न सुटला नाही. काश्मीरमधील कलम ३७०, राममंदिर, हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण, गोरक्षा, समान नागरी कायदा असे सर्व प्रश्‍न अनुत्तरितच राहिले. उलटपक्षी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर अत्याचार झाले. बंगाल, केरळ यांसारख्या राज्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या आजही चालूच आहेत. एकीकडे हज अनुदान बंद केले, तर दुसरीकडे हज यात्रेसाठी प्रवासखर्चात ५० टक्के सूट दिली. मात्र हिंदूंना १२ वर्षांतून येणार्‍या कुंभमेळ्याला जाण्यासाठी विशेष कर भरावा लागतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास, आज निधर्मीपणा म्हणजे बहुसंख्यांक हिंदूंसाठी कायदा आणि अल्पसंख्यांकांसाठी फायदा बनलेला आहे. हिंदूंचे सर्व प्रश्‍न जसे होते, तसेच आहेत. आजही हिंदूंच्या मनात असुरक्षिततेची भावना कायम आहे. सामाजिक पातळीवर हिंदूंची प्रतिमा आजही दुय्यम स्थानीच आहे. अवघ्या मानवजातीला आदर्श जीवनप्रणालीचा वस्तूपाठ घालून देणार्‍या हिंदु धर्मातील धर्मग्रंथ, धर्मशास्त्र, तीर्थक्षेत्र, मंदिरे यांची प्रतिष्ठा लयाला चालली आहे.

राजकीय पातळीवर हिंदूंचे हित जपणे आता अशक्य आहे. राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचे वास्तविक हित जपण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे. लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राचा आदर्श वस्तूपाठ घालून देणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज आपल्यासमोर आहेच ! भारतातील प्रतिष्ठित बुद्धीजीवी वर्ग (इलीट क्लास) मात्र हिंदु राष्ट्राच्या मागणीला अनैसर्गिक म्हणत हिणवतो. येथे हे सूत्रही लक्षात घ्यायला हवे की, जगाच्या कानाकोपर्‍यात कोणत्याही देशात तेथील बहुसंख्यांकांचे अस्तित्व सामाजिक आणि राजकीय पातळीवर दिसत नाही, असे कुठेही नाही. यामुळेच जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे स्वत:चे १ राष्ट्र आहे; परंतु जगातील ७०० कोटी लोकसंख्येपैकी १०० कोटी हिंदूंचे हित जोपासले जाईल, असे एकही राष्ट्र भूतलावर अस्तित्वात नाही. जगाचा हा नियम भारतात केवळ काँग्रेसमुळे डावलण्यात आला. त्यामुळे जगाचा हा नियम भारतात लागू करण्यासाठी म्हणजेच भारतास हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी वर्ष २०१२ मध्ये प्रथमच झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा ऐरावत आता सप्तम् अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्वप्न यथार्थ करण्याच्या अनुषंगाने आणखी एक आश्‍वासक पाऊल उचलेल, हे सुनिश्‍चित आहे.

श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती