सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा समर्पणभाव शिकण्यासारखा ! – श्री. जितेंद्र ठाकूर, अखिल भारतीय हिंदू महासभा

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ युवकांचे संघटन या विषयावर मान्यवरांनी मांडलेले विचार

डावीकडून श्री. अतुल जेसवानी, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश, श्री. जितेंद्र ठाकूर, प्रदेश महामंत्री, अखिल भारतीय हिंदू महासभा, मध्यप्रदेश, सरदार कृणाल श्रीवास्तव, श्रीराम युवा सेना, मनसौर, मध्यप्रदेश, अधिवक्ता दिनेश सिंह, वाराणसी, उत्तरप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या शिबिरामुळे युवकांचे प्रभावी संघटन शक्य ! – श्री. अतुल जेसवानी, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश

श्री. अतुल जेसवानी, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरे आयोजित केली पाहिजेत. यातून त्यांच्यात राष्ट्रभक्ती, धर्मप्रेम, नेतृत्वगुण निर्माण होतो. त्यामुळे संघटनेचे कार्य अनेक पटींनी वाढण्यास साहाय्य होते, तसेच संघटनाही अधिक मजबूत होते. साधना शिकवल्यामुळे आध्यात्मिक बळ मिळून कार्य करण्यास ऊर्जा मिळते. हिंदु सेवा परिषदेने युवकांसाठी अशा शिबिरांचे आयोजन केले होते. त्यामुळे युवकांचे संघटन होऊन परिषदेच्या गदायात्रेत १५ ते २० सहस्र युवक सहभागी झाले होते.

काही गोशाळाच बनल्या आहेत गोतस्करीचे अड्डे ! – अधिवक्ता दिनेश सिंह, वाराणसी, उत्तरप्रदेश

अधिवक्ता दिनेश सिंह, वाराणसी, उत्तरप्रदेश

गायींना हत्येपासून वाचवल्यानंतर (गोरक्षण केल्यानंतर) त्यांना गोशाळेमध्ये सोडले जाते; मात्र काही गोशाळाच गोतस्करीचे अड्डे बनल्याचे आढळून आले आहे. या गोशाळांमधून गायी पुन्हा कसायांना विकल्या जातात. माहिती अधिकारात पूर्वांचलमधील एका मोठ्या गोशाळेची माहिती मागितली, तेव्हा लक्षावधी गायी गोशाळेतून गायब झाल्याचे आढळून आले. त्यामुळे गोरक्षकांनी गोशाळांमध्ये सोडलेल्या गायींचे पुढे काय होते, याकडेही लक्ष द्यायला हवे. अधिवक्ता दिनेश शहा यांनी लव्ह जिहादमध्ये फसलेल्या युवतींना कोणकोणत्या युक्त्या वापरून सोडवले, याविषयीचे अनुभवही सांगितले.

हिंदु राष्ट्राची स्थापना केली, तर हिंदूंच्या सर्व समस्या सुटतील ! –  विनोद यादव, भोपाळ, मध्यप्रदेश.

विनोद यादव, भोपाळ, मध्यप्रदेश

हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे राज्य आले, म्हणजे रामराज्य आले असे नाही. त्यासाठी राज्यातील लोक सात्त्विक असायला हवेत. सात्त्विक समाजाच्या निर्मितीसाठी त्यांना साधना सांगणे आवश्यक आहे. सात्त्विक समाज निर्माण झाला, तर हिंदु राष्ट्र येईल. एक एक समस्या सोडवण्यापेक्षा हिंदु राष्ट्राची स्थापना केली, तर हिंदूंच्या सर्व समस्या सुटणार आहेत.

शत्रूसमोर असतांना आत्मबळाहून अधिक मोठे बळ नाही ! – सरदार कृणाल श्रीवास्तव, श्रीराम युवा सेना, मनसौर, मध्यप्रदेश

हिंदूंना संघटित करणे, हे देशाचे मोठे कार्य आहे. हिंदू संघटित झाले, तर राष्ट्र संघटित होईल. त्यामुळे संपूर्ण जगात हिंदूंचा डंका वाजेल. सद्यःस्थितीत हिंदुत्वाचे कार्य करतांना सर्वप्रथम पोलीस आणि प्रशासन अडथळा निर्माण करतात. आम्ही आमच्याच देशात ६ डिसेंबरला भगवा दिवस साजरा करू शकत नाही. पोलीस हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे नोंदवण्याची धमकी देतात. त्यामुळेच आपण आपापसात लढणे सोडून संघटित झाले पाहिजे, आत्मबळ वाढवले पाहिजे. शत्रूसमोर असतांना आत्मबळाहून अधिक दुसरे बळ नाही. हिंदू संघटित झाले, तर हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही.

सनातन हिंदु धर्माला आसुरी शक्तींचा विरोध होतोच. सनातन धर्माच्या विरोधात कितीही षड्यंत्र केले, तरी सनातन धर्माचा कधीही पराजय होऊ शकत नाही. धर्मरक्षणासाठी आपण केवळ साधना म्हणून प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन शिवणी (मध्यप्रदेश) येथील श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. शुभमसिंह बघेल यांनी केले.

धर्मावर होणार्‍या आघातांविषयी अवगत करून युवकांचे संघटन करायला हवे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याची सवय लावून घ्यायला हवी, असे प्रतिपादन मध्यप्रदेश येथील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश महामंत्री श्री. जितेंद्र ठाकूर यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी गौरवोद्गार !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा समर्पणभाव शिकण्यासारखा आहे. त्यांच्यासारखे प्रत्येकाने स्वतःचे दायित्व पार पाडले, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा दिवस दूर नाही. – श्री. जितेंद्र ठाकूर, प्रदेश महामंत्री, अखिल भारतीय हिंदू महासभा, मध्यप्रदेश

या वेळी नांदेड येथील अधिवक्ता जगदीश हाके आणि जळगाव येथील अधिवक्ता निरंजन चौधरी यांनीही त्यांचे अनुभव सांगितले.