सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनास भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ

डावीकडून सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, महंत स्वामी संवित सोमगिरी महाराज, सद्गुरु नंदकुमार जाधव

रामनाथी (गोवा) – भारत वगळता विश्‍वातील सर्व देशांमध्ये बहुसंख्यांकांच्या धर्माला संविधानिक संरक्षण आहे. भारतात हिंदू बहुसंख्य असूनही हिंदूंच्या अधिकारांचे हनन होत आहे आणि केवळ अल्पसंख्यांकांचे हित पाहिले जात आहे. आणीबाणीच्या काळात संविधानात ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द घुसडण्यात आला; पण या शब्दाची आजपर्यंत व्याख्याच केली गेली नाही. धर्मनिरपेक्षतेचा मनाला वाटेल तो अर्थ लावून हिंदूंवर अन्याय केला जात आहे आणि मतपेढीसाठी राजकीय पक्ष त्यांची राजकीय पोळी भाजून घेत आहेत. संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द हटवून सनातन हिंदु धर्माला संविधानिक संरक्षण द्या, अशी एकमुखी मागणी आता देशभरातून करायला हवी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथ देवस्थान येथे आयोजित केलेल्या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

लोकशाहीने गेल्या ७० वर्षांत केवळ भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभार दिला आहे. लोकशाही नाही, तर विफलशाही ठरलेल्या व्यवस्थेमध्ये सामाजिक दुष्प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. समाजात सुव्यवस्था निर्माण करायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे. त्यासाठी आगामी काळात ग्रामस्तरीय हिंदु राष्ट्र जागृती सभा, हिंदु राष्ट्र जागृती परिसंवाद, हिंदु राष्ट्र संपर्क अभियान, युवा शौर्यजागरण शिबीर, हिंदु राष्ट्र वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा, हिंदु राष्ट्र सामाजिक प्रसारमाध्यम (सोशल मीडिया) कार्यशाळा, असे उपक्रम आयोजित केले जातील, असेही सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी स्पष्ट केले.

बिकानेर (राजस्थान) येथील श्री लालेश्‍वर महादेव मंदिराचे महंत स्वामी संवित सोमगिरी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून हिंदू अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला. आरंभी सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला. पुरोहित सर्वश्री दामोदर वझे, अमर जोशी आणि पंकज बर्वे यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी अधिवेशनाचा उद्देश सांगितला. या अधिवेशनाला भारतासह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांमधील १५० हून अधिक संघटनांचे ३५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.

 

ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत झाल्यास विश्‍वात
हिंदु राष्ट्र्र स्थापन होईल ! – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

संत, ऋषि, वेद, पुराणे यांच्या, तसेच भगवान शिवाच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे. आज अन्य पंथीय त्यांचा पंथ मानतात; पण हिंदू मात्र स्वधर्म मानत नाहीत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येकाचे चिंतन आणि आत्ममंथन होऊन बौद्धिक सुस्पष्टता असणे, तसेच धर्माची अवधारणा स्पष्ट असणे आवश्यक आहे. देशातील हिंदू कूपमंडूक वृत्तीचे झाले आहेत. देशांतर्गत आणि देशाबाहेरून अशा सर्वच मार्गांनी आक्रमणे होत असतांना सर्वांमध्ये अध्यात्माद्वारे क्षात्रतेज जागृत व्हायला हवे. त्यासाठी हिंदूंनी स्वकर्तेपणा त्यागून अधर्माच्या विरोधात कार्य करायला हवे. स्वतःतील तेज जागृत करून पुढे गेल्यास अंधःकार नष्ट होऊ शकतो. त्यामुळे हिंदूंनी ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत केल्यास भारतासह विश्‍वात सर्वत्र हिंदु राष्ट्र स्थापन होईल, असे मार्गदर्शन श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर (राजस्थान) येथील महंत स्वामी संवित सोमगिरीजी महाराज यांनी केले.

 

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन
होणारच, अशी श्रद्धा वाढत आहे  ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

स्वप्नवत वाटणारे ‘हिंदु राष्ट्र’ साकार होईल, अशी श्रद्धा ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’मुळे आता देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये निर्माण होत आहे. धर्माभिमान्यांचे प्रयत्न आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प यांमुळे हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. त्यासाठी नियोजित उपक्रमांमध्ये कृतीशील होण्याचे आवाहन सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

उद्घाटनसत्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवेशनानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन झारखंड राज्याचे धर्मप्रसारक श्री. प्रदीप खेमका यांनी केले. पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये, प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, परात्पर गुरु परशराम पांडे महाराज, प.पू. दास महाराज यांनी अधिवेशनासाठी दिलेल्या संदेशांचे वाचन करण्यात आले.

 

अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी सनातनच्या ग्रंथांचे प्रकाशन !

डावीकडून सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, स्वामी संवित् सोमगिरी महाराज आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातनचे हिंदी भाषेतील ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र के स्थापना हेतू हिंदूओ का संघटन करें’ आणि ‘स्वभावदोष (षड्रिपू) निर्मूलनका महत्त्व एवं गुण-संवर्धन प्रक्रिया’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
अधिवेशनाला उपस्थित संतांची मांदियाळी १. सद्गुरु सत्यवान कदम, २. पू. नीलेश सिंगबाळ, ३. पू. अशोक पात्रीकर, ४. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, ५. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, ६. पू. (सौ.) उमा रवीचंद्रन् आणि त्यांच्यामागे धर्मप्रेमी

 

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने हिंदुत्वनिष्ठांची दमदार वाटचाल !

आरोग्य साहाय्यता समिती आणि उद्योगपती परिषद यांची स्थापना !

१. आरोग्य साहाय्यता समिती

[email protected]

२. उद्योगपती परिषद

[email protected]

दोन्हींसाठी संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

रामनाथी (गोवा) – हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढचे पाऊल म्हणून वेगवेगळ्या व्यासपिठांची निर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आपत्तींत सापडलेल्या हिंदूंना साहाय्य करण्यासाठी ‘आरोग्य साहाय्यता समिती’ आणि हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्यात साहाय्य करण्यासाठी ‘उद्योगपती परिषद’ यांची स्थापना करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी या दोन्ही संघटना स्थापन झाल्याची घोषणा केली, तर स्वामी संवित सोमगिरी महाराज यांच्या शुभहस्ते या दोन्ही संघटनांच्या बोधचिन्हांचे अनावरण करण्यात आले.