भारत स्वतंत्र होण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – श्री. रमेश शिंदे

२ जून या दिवशी शेवटच्या सत्रात झालेले श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन

भारत स्वतंत्र होऊनही सध्या भारतात स्वतःचे (हिंदूंचे) असे कुठलेच तंत्र नाही. न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था, राज्य करण्याची व्यवस्था काहीच जर आपले नाही, तर भारत स्वतंत्र कसा ? भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. अखिल भारतीय अधिवक्ता अधिवेशनाच्या प्रथम दिवसाच्या अंतिम सत्रात हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर ते बोलत होते.

श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे

१. मौर्य, गुप्त, पांडियन, चोल, सातवाहन, पल्लव, कदंब, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, विजयनगर, वड्डियार, भोसले अशी हिंदूंची अनेक पराक्रमी राजघराणी आणि साम्राज्ये भारतात होऊन गेली; मात्र आमचा इतिहास तुघलक, खिलजी, घोरी, बाबर, अकबर, जहांगीर, औरंगजेब आणि नंतर ब्रिटीश यांच्यापुरताच मर्यादित झालेला आहे.

२. ज्या गणराज्याविषयी बोलले जाते, त्या गणराज्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये ४० वेळा, तर अथर्ववेदामध्ये ९ वेळा केलेला आहे.

३. जसे मानवाच्या जीवनात आत्म्याचे स्थान आहे, तसेच राष्ट्राच्या जीवनात धर्माचे स्थान मानले गेले आहे. हे राष्ट्र नष्ट करण्यासाठी त्यातून त्याचा प्राण, म्हणजेच धर्म काढून टाकण्याचे षड्यंत्र केले गेले. खरे तर धर्मनिरपेक्षता हिंदूंनी नव्हे, तर शासनाने स्वीकारणे अपेक्षित होते.

 

प्राचीन हिंदु राष्ट्र विकसित होते !

अँगस मेडिसन या अर्थतज्ञाने २००१ या वर्षी प्रकाशित केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमी

ए मिलेनियल पर्स्पेक्टिव्ह या ग्रंथात इसवी सन १ मध्ये भारताचा जीडीपी जगाच्या ३४ प्रतिशत होता आणि तो क्रमांक १ वर होता, असे सखोल अभ्यासासह मांडले आहे. वर्ष १९४७ च्या पूर्वी भारतात ५६२ राजे-संस्थाने होती; परंतु स्वातंत्र्य देत असतांना इंग्रजांनी भारतात त्यांच्या पाश्‍चात्त्य विचारांवर आधारित लोकशाही भारतावर लादली आणि पंतप्रधान-मंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या नेत्यांनी ती स्वीकारली.

 

जस्टिसिया नाही, तर शनिभगवान हे हिंदूंचे न्यायदेव !

न्यायदेवतेची मूर्ती म्हणून आपण जी डोळ्यावर कापड बांधलेली आणि एका हातात तराजू अन् दुसर्‍या हातात तलवार असलेली मूर्ती पहातो, ती रोमन राज्याच्या जस्टिसिया देवतेची मूर्ती आहे. ती हिंदूंची न्यायदेवता नाही. शनिभगवान हे हिंदूंचे
न्यायदेव आहेत. दर्शनशास्त्रांपैकी न्यायदर्शन हे एक दर्शन आहे. त्यामध्ये ४ विद्यांचा समावेश आहे. त्यांपैकी सध्या केवळ दंडनीतीचा अवलंब केला जातो.

 

क्रांतीकारकांना शासन करण्यासाठी इंडियन पीनल कोडची निर्मिती

इंग्रजांनी १८६० मध्ये बनवलेला इंडियन पीनल कोड हा कायदा स्वातंत्र्य मिळूनही लागू आहे. हा कायदा इंग्रजांनी भारतीय क्रांतीकारकांना शासन करता यावे, यासाठी बनवला. वर्ष १८५७ मध्ये जेव्हा मंगल पांडे आणि अन्य क्रांतीकारक यांनी उठाव
केला, तेव्हा त्यांना शिक्षा देता यावी; म्हणून कायद्याची निर्मिती केली गेली.

 

कोणत्याही उदात्त हेतूने नव्हे, तर पोपचा आदेश मानावा लागू नये; म्हणून इंग्लंडमध्ये धर्मनिरपेक्षता !

इंग्लंडने वर्ष १८५१ मध्ये धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केला. राजा हेन्री (आठवा) याला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा होता. त्यासाठी पोपची अनुमती आवश्यक होती; मात्र पोपने अनुमती दिली नाही. हेन्री स्वतः राजा असूनही पोप त्याला हवा
असणारा आदेश देत नाही; म्हणून हेन्री (आठवा) याने त्याचे राज्य धर्मनिरपेक्ष (म्हणजे चर्चचा आदेश न मानणारे) असे घोषित केले. आपण त्याच इंग्रजांचे अंधानुकरण करत आहोत.