अधिवक्ता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र !

कायद्यांविषयीच्या ज्ञानाचा उपयोग अत्याचारित हिंदूंना न्याय देण्यासाठी करा ! – अधिवक्त्यांना आवाहन

रामनाथी (विद्याधिराज सभागृह), २ जून (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’, दंगल, अवैध मशिदी, गोरक्षण यांच्या संदर्भात प्रत्यक्ष कृती करतांना आलेले अनुभव विविध अधिवक्त्यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करतांना अधिवक्त्यांना व्यक्तीगत स्तरावर आलेले अनुभव’ या सत्रात सांगितले. हे कार्य करतांना कशा प्रकारे अडचणी आल्या, त्यासाठी वेळोवेळी ईश्‍वराचे साहाय्य कसे लाभले, हिंदु विधीज्ञ परिषद कशाप्रकारे दिशादर्शन करत आहे, हे अधिवक्त्यांनी सांगितले. यामुळे उपस्थित अधिवक्त्यांना त्यांच्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

या सत्रात अधिवक्ता निरंजन चौधरी, अधिवक्ता वासुदेव ठाणेदार, अधिवक्ता नीरज जैन, अधिवक्ता मोती सिंह राजपुरोहित, अधिवक्ता अवधेश राय, अधिवक्ता रणजीत नायर, अधिवक्ता विवेक भावे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘अधिवक्त्यांनी स्वतःच्या ज्ञानाचा वापर हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी करावा’, असे आवाहन सर्वांनीच केले. सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि सनातन अध्ययन केंद्राचे समन्वयक श्री. संदीप शिंदे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.