सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत ‘अधिवक्ता अधिवेशना’च्या द्वितीय दिवशी मान्यवरांनी केलेले ओजस्वी मार्गदर्शन आणि क्षणचित्रे !

धर्मरक्षणार्थ लढणार्‍या रणझुंजार अधिवक्त्यांना ब्राह्मतेजाची
शिदोरी पुरवणारे आणि आध्यात्मिक पाठबळ देणारे संत आणि सद्गुरु !

‘अधिवक्ता अधिवेशना’तील सत्राला उपस्थित असलेले डावीकडून सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, पू. नीलेश सिंगबाळ आणि पू. अशोक पात्रीकर

 

भ्रष्ट व्यवस्था दूर करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करणे म्हणजेच
‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रमेश शिंदे

देशाचे संविधान कितीही चांगले असले, तरी त्याची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते चांगले असणे आवश्यक आहे’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाविषयी म्हटलेले आहे; परंतु आज प्रशासकीय अधिकारी, राज्यकर्ते नि:स्वार्थी आहेत का, असा प्रश्‍न पडतो. भ्रष्ट व्यवस्था दूर करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करणे म्हणजेच ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केला. सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत ‘अधिवक्ता अधिवेशना’च्या द्वितीय दिनी ‘माहिती अधिकार कायद्याचा वापर करून सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन’, या विषयावरील उद्बोधन सत्रात ते बोलत होते.

श्री. शिंदे पुढे म्हणाले,

१. शिक्षण, पोलीस, संरक्षण, न्याय, वैद्यकीय आणि सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार मुरलेला आहे. याचा सर्वसामान्य व्यक्तीला प्रतिदिन अनुभव येत आहे. ‘मी एकटा काय करू ?’, या विचारांमुळे भ्रष्टाचाराला चाप बसत नाही आणि तो अधिक वाढतो. अधिवक्त्यांनी समाजाला आधार दिला, तर ‘हिंदु राष्ट्रा’च्या रूपात आदर्श राज्यव्यवस्था समाजासमोर उभी करता येईल. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ च्या वर्ष २०१७ च्या अहवालानुसार सर्वाधिक म्हणजे ६९ टक्के भ्रष्टाचार भारतात होतो. हेच प्रमाण पाकिस्तानमध्ये ४० टक्के, तर चीनमध्ये २६ टक्के आहे.

२. व्यक्तीने भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले असेल, तर त्या व्यक्तीची आणि त्याच्या परिवाराची माहिती ‘पोस्टर’द्वारे सर्वत्र लावायला हवी; जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल.

३. कर्मफलन्याय लागू होत असल्याने अधिवक्त्यांनी नेहमी सत्याच्या बाजूने लढायला हवे.

‘केंद्रीय अन्वेषण विभागाच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही !

पोलीस अधिकारी भ्रष्ट असतील, तर त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करता येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार केला, तर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे गार्‍हाणे नोंदवता येते; पण केंद्रीय अन्वेषण विभागातील अधिकार्‍यांनी भ्रष्ट कारभार केला, तर त्यांच्याविषयी तक्रार करता येईल अशी उत्तरदायी यंत्रणा नाही.

आतंकवाद्यांना शिक्षा ठोठावणार्‍या अधिवक्त्यांना ‘झेड सेक्युरिटी’ द्यावी लागणे दुर्दैवी !

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी आतंकवादी याकुब मेमन याला फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी ‘झेड सेक्युरिटी’ पुरवण्यात येत आहे. आतंकवाद्यांना शिक्षा ठोठावणार्‍या न्यायाधिशास सुरक्षाव्यवस्था पुरवावी लागण्याची वेळ येणे दुर्दैवी आहे.

स्वतःला दुसर्‍या खलिफाचा वंशज मानणार्‍या चेन्नई येथील प्रिन्स ऑफ अरकोट
याला सुविधा पुरवण्यासाठी वर्षाला ३ कोटी रुपयांची उधळपट्टी करणारे भारत सरकार !

‘भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतात अनेक राजे राज्य करत होते. त्या राजांना पूर्वीपासून काही स्टायपेंड, तसेच रेल्वेचे फर्स्ट क्लासचे विनामूल्य तिकीट अशा काही सुविधा मिळत होत्या. वर्ष १९७२ मध्ये इंदिरा गांधी यांनी या सर्व सुविधा बंद केल्या; पण चेन्नई येथील नवाब प्रिन्स ऑफ अरकोट याला अद्यापही या सुविधा मिळत आहेत. विशेष म्हणजे हा प्रिन्स असा दावा करतो की, तो दुसर्‍या खलिफाचा वंशज आहे. तो स्वतःला भारतमातेचा वंशज मानत नाही. माहितीच्या अधिकारात याविषयी अशी माहिती मिळाली की, या प्रिन्सच्या घराची देखभाल, तसेच अन्य कारणांसाठी भारत सरकार वार्षिक जवळपास ३ कोटी रुपये व्यय करत आहे.’ – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

 

धर्मकार्यासाठी एक पाऊल टाकल्यास
देव साहाय्य करतोच ! – अधिवक्ता प्रशांत गोरे, अकोला

अधिवक्ता प्रशांत गोरे

अधिवक्त्यांचे संघटन करतांना आलेले अनुभव सांगतांना अधिवक्ता प्रशांत गोरे म्हणाले, ‘‘अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम येथे अधिवक्त्यांसाठी अधिवेशन आयोजित करतांना ‘धर्मकार्यात एक पाऊल टाकल्यास देव साहाय्य करतोच’, अशी अनुभूती घेतली. अधिवेशनासाठी आलेल्या अधिवक्त्यांनी त्यांच्या भागांतही प्रांतीय अधिवेशन आयोजित करण्यासाठी प्रयत्न करावेत.’’

अधिवक्ता प्रशांत गोरे यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले
आणि रामनाथी येथील सनातनचा आश्रम यांच्याप्रती असलेला भाव !

अधिवक्ता प्रशांत गोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ करतांना विष्णुस्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून केला. त्यांच्या मार्गदर्शनात ते म्हणाले, ‘‘सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप आहे. या वैकुंठाची अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे. प.पू. डॉक्टर हे विष्णुस्वरूप गुरुमाऊली आहेत. कार्य करतांना साधकांना भेटल्यावर आनंद आणि चैतन्य यांची अनुभूती येते.’’

अधिवक्ता प्रशांत गोरे अत्यंत नम्रतेने बोलत होते. त्यांच्या बोलण्यात कृतज्ञता भाव जाणवत होता. सनातनचे संत पू. पात्रीकर यांच्याप्रतीही त्यांचा भाव आहे.

 

न्यायालयातून न्याय मिळतो कि निर्णय ? – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही न्यायव्यवस्थेतील सर्व कायदे, पोशाख, न्यायालयात लावली जाणारी छायाचित्रे हे सर्व ब्रिटीशकालीन आहे. अनेक वर्षांनी मिळणार्‍या निकालाला ‘न्याय’ म्हणायचे का ? ‘सध्या न्याय नाही, तर न्यायालयातून निर्णय मिळतो’, असेच अनुभवायला येते, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

अधिवक्ता सांगोलकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. चारा घोटाळ्यात लालुप्रसाद यादव यांना २१ वर्षांनंतर शिक्षा मिळाली. तोपर्यंत त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषवली. कोट्यवधी रुपयांच्या कोळसा घोटाळा प्रकरणी मधू कोडा यांना ३ वर्षे शिक्षा झाली आणि मद्रास येथे २१ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष चोरी करणार्‍यास ५ वर्षांची शिक्षा झाली. अल्प रुपयांच्या चोरीला मोठी शिक्षा आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्‍यांना अल्प शिक्षा, याला न्याय म्हणता येईल का?

२. न्यायालयात ब्रिटीश न्यायाधिशांची छायाचित्रे लावण्याऐवजी रामशास्त्री प्रभुणे, गोपीनाथ पंत यांची छायाचित्रे असायला हवीत.

३. कनिष्ठ न्यायालयात मिळालेल्या निर्णयात वरिष्ठ न्यायालयात पालट होतो; मात्र एखाद्या कनिष्ठ कर्मचार्‍याच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या वरिष्ठ समितीचा निर्णय अंतिम असतो, असे का ?

४. भ्रष्टाचार आणि राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप यांमुळे न्यायव्यवस्था बरबटली आहे.

एकच हात असूनही तळमळीपोटी अधिवेशनात सहभागी होणारे ६० वर्षीय श्री. रवी प्रकाश गोयल !

या अधिवेशनासाठी गोरखपूर, उत्तरप्रदेश येथून श्री. श्याम प्रभु आणि ‘श्री राणीसती दादी’चे संस्थापक-संचालक श्री. रवी प्रकाश गोयल (वय ६० वर्षे) हे सहभागी झाले आहेत. अपघातात त्यांना एक हात गमावावा लागला आहे. असे असतांना राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याची तळमळ असल्याने ते अधिवेशनात सहभागी झाले आहेत.

 

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने आगामी काळात निरनिराळ्या
उपक्रमांच्या माध्यमांतून राष्ट्र जागरण ! – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या आगामी उपक्रमांविषयी माहिती देतांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य संभाजीनगर येथील अधिवक्ता सुरेश कुलकर्णी म्हणाले, ‘‘आगामी काळात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना ‘माहिती अधिकार’ या कायद्याविषयी मार्गदर्शन करणे, ‘बार असोसिएशन’मध्ये ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, या विषयावर मार्गदर्शन करणे, अधिवक्ता महाविद्यालयांत सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात, तसेच ‘धर्म आणि राष्ट्र रक्षणार्थ करायच्या कृती’, या विषयांवर व्याख्याने आयोजित करणे, यांसह ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत अधिवक्त्यांच्या कार्यशाळांचे आयोजन करणे, अधिवक्त्यांचे तालुका, तसेच जिल्हास्तरीयशिबिरांचे आयोजन करणे, असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.’’

 

ढासळलेल्या समाजव्यवस्थेवर एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ ! – श्रीकांत पिसोळकर

धर्मनिरपेक्ष लोकशाहीमुळे समाजव्यवस्था ढासळली असून समाजाची सात्त्विकता खालावली आहे. अनेक राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या निर्माण होत असून यावर एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ ! अन्य धर्मियांना ज्याप्रमाणे धर्मशिक्षण मिळते, त्याप्रमाणे हिंदूंना मिळत नाही. त्यामुळेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजाला धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी देशभर धर्मशिक्षणवर्ग, धर्मजागृती सभा, राष्ट्रीय हिंदू आंदोलने यांचे आयोजन केले जाते. ‘उपस्थित अधिवक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या उपक्रमांना पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून अनुमती घेण्यासाठी साहाय्य करावे’, असे आवाहन श्री. पिसोळकर यांनी केले.

अधिवक्ता अधिवेशनाच्या ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे केलेल्या प्रसारणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

अधिवक्ता अधिवेशनाच्या प्रथम सत्राचे प्रक्षेपण ३ सहस्र ९०० हून अधिक जणांनी पाहिले, तसेच ३८ सहस्रहून अधिक लोकांपर्यंत अधिवेशनाचा विषय पोहोचला. हा ‘व्हिडिओ’ ६५० हून अधिक जणांनी शेअर केला. द्वितीय सत्राचे प्रक्षेपण ५ सहस्र ५००हून अधिक जणांनी पाहिले, तसेच २८ सहस्र ५०० हून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले. द्वितीय सत्रातील मार्गदर्शनांचा ‘व्हिडिओ’ ३७० हून अधिक जणांनी शेअर केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात