सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत ‘राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशना’स प्रारंभ

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून अधिवक्ता गोविंद के. भरतन्, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, अधिवक्ता हरि शंकर जैन, अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

 

अधिवेशनामध्ये उपस्थित धर्मप्रेमी अधिवक्ता

अधिवक्त्यांनी न्यायक्षेत्रातील ‘फिदाईन’ बनून हिंदु
राष्ट्रासाठी प्रयत्न करावेत ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदू फ्रंट फॉर जस्टिस

अधिवक्ता हरि शंकर जैन

रामनाथी (गोवा), २ जून (वार्ता.) – देशाची फाळणी होऊन देश स्वतंत्र झाल्यावर वर्ष १९५० मध्ये संविधान कार्यान्वित करण्यात आले. त्या वेळी ‘सर्वांना समान न्याय मिळेल’, असे सांगितले गेले. त्यामुळे सर्व अत्याचार विसरून हिंदूंनी ते स्वीकारण्याची सिद्धता दर्शवली; मात्र प्रत्यक्षात निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना सुविधा दिल्या जात आहेत, तर हिंदूंचे दमन केले जात आहे. आज जिहादी हे त्यांच्या धर्मासाठी ‘फिदाईन’ (इस्लामसाठी प्राणार्पण करणारे आत्मघातकी) होऊन वेळप्रसंगी स्वतःचा जीव देण्यास सिद्ध होतात. असे असतांना आपण हिंदु अधिवक्त्यांनीही कायद्याचा अभ्यास करून, न्यायालयात ‘फिदाईन’ बनून हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी निःस्वार्थ वृत्तीने जीवापाड प्रयत्न करायला हवेत. देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत असून ते रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा होण्यासाठी अधिवक्त्यांनी प्रयत्न करावा. आपले भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी केले. ते गोव्यातील रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थानमधील श्री विद्याधिराज सभागृहामध्ये आयोजित केलेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत दोन दिवसीय ‘राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशना’च्या उद्घाटन सत्रात बोलत होते. या वेळी ८० हून अधिक धर्मप्रेमी अधिवक्ता उपस्थित होते. या अधिवेशनामध्ये राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठीचे कायदेशीर उपाय, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याची आगामी दिशा आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

अधिवेशनाच्या प्रारंभी सनातन पुरोहित पाठशाळेचे पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी ३ वेळा शंखनाद केला, तसेच ब्रह्मवृंद दामोदर वझे गुरुजी आणि श्री. अमर जोशी यांनी  वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, अधिवक्ता गोविंद के. भरतन्, अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता हरी शंकर जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवेशनासाठी दिलेल्या संदेशाचे हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी वाचन केले. या प्रसंगी सनातनच्या ३० व्या संत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचीही वंदनीय उपस्थिती होती. सूत्रसंचालन श्री. सुमीत सागवेकर आणि सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी केले.

अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

* ‘हिंदूंच्या विरोधात निर्णय झाले, तर तो न्याय आणि हिंदूंच्या बाजूने निर्णय झाला, तर तो अन्याय’, अशी विपरीत स्थिती आज निर्माण झाली आहे. ‘हिंदू प्रथम’ हा नारा आता द्यायला हवा. जे कायदे हिंदूंना न्याय देऊ शकत नाहीत, ते पालटण्याची आज आवश्यकता आहे.

* ‘हिंदू अप्रसन्न झाले, तर सत्ता मिळणार नाही’, हे राजकीय पक्षांना ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे.

* ‘धर्मनिरपेक्षता’ हा देशातील एक राक्षस आहे. तो गाडायला हवा !

* सच्चर आयोगानुसार जर मुसलमान गरीब आहेत, तर गल्लोगल्ली मशिदी बनवण्यासाठी पैसा कुठून येत आहे ?

* धर्मरक्षणासाठी कार्यरत असतांना कुणी हिंदूंना सांप्रदायिक म्हणले, तर अभिमानाने सांगा, हिंदू सांप्रदायिक आहेत !

* सध्या सर्वत्र मुसलमानी मानसिकता पहायला मिळते. ती मानसिकता पालटून आपल्याला ‘हिंदु विचार’ समोर ठेवायला हवेत.

* हिंदूंचे धर्मशास्त्र लहान मुलांपर्यंत पोहोचवायला हवे. लहान मुलाने इंग्रजी कविता म्हणून दाखवल्यावर कौतुक वाटणार्‍या पालकांना ‘मुलाने गायत्रीमंत्र, हनुमानचालिसा म्हणावी’,  असे वाटते का ?

* कैराना (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ‘अल्ला जिंकला, राम हरला’ असे नारे दिले गेले. असे नारे ऐकायचे नसतील, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्रासाठी प्रसंगी बलीदान देऊ ! – अधिवक्ता हरि शंकर जैन

देश, धर्म, संस्कृती वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्रासाठी आम्ही प्रसंगी बलीदान देऊ; पण हिंदु राष्ट्राच्या मागणीपासून मागे हटणार नाही.

अधिवक्त्यांनी प्रवाहाची दिशा पालटून धर्माधिष्ठित
हिंदु राष्ट्राची व्यवस्था निर्माण करावी ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

अधिवक्त्यांचा इतिहास हा पुरातन आणि आध्यात्मिक आहे. लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक अधिवक्त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेऊन एक आदर्श निर्माण केला. तोच आदर्श घेऊन धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतल्यास इतिहासात त्याची सुवर्णाक्षरात नोंद होईल. येथे जमलेल्या अधिवक्त्यांनी केवळ प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे अपेक्षित नसून, प्रवाहाची दिशा पालटून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची व्यवस्था निर्माण करायला हवी. स्वातंत्र्यलढ्यात स्वत:चे जीवन समर्पित करणार्‍या क्रांतीकारकांप्रमाणे आपण स्वत:ला समर्पित करण्याची आवश्यकता आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ या उक्तीप्रमाणे आज प्रत्येकाने शरीर, मन, बुद्धी यांसह सर्वस्वाचा त्याग करून राष्ट्रासाठी समर्पित व्हावे. धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या यज्ञात समिधा बनून समर्पित होण्याची आवश्यकता आहे.

अधिवक्त्यांकडे पक्षकार दु:ख आणि वेदना घेऊन येतात. त्यांना धर्माचरण करायला लावून आनंद प्राप्त करून द्यायला हवा. पापरूपी अर्थार्जन केल्याने जीवनात अशांती अनुभवायला मिळते. आपले ज्ञान, अभ्यास आणि अनुभव यांचे एकत्रीकरण करून खोटे गुन्हे प्रविष्ट होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना कायदेविषयक साहाय्य करून ज्वलंत विचारांची मशाल बनून या क्षेत्रात कार्य करावे. धर्माचे कार्य करत असतांना मनुष्यजन्माचे ध्येय ‘व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती करणे’ असून त्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

अधिवक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर पाठबळ
देण्याची आवश्यकता ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सुनील घनवट

हिंदुत्वाच्या कार्यात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची आवश्यकता स्पष्ट करतांना सुनील घनवट म्हणाले की,

१. संभाजीनगर येथे गेल्या मासात झालेल्या दंगलीत हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले. याचसमवेत मलकापूर (जिल्हा बुलडाणा) येथे झालेल्या दंगलीत २० धर्मांध अधिवक्त्यांनी धर्मांधांना साहाय्य केले; मात्र त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा प्रविष्ट करण्यात आला नाही.

२. कर्नाटक येथील गोरक्षकांनी गायी पशूवधगृहात घेऊन जाणार्‍या ट्रकला पकडून पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांनाच प्रश्‍न केला की, कोणत्या कलमाखाली यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करायला हवा ? यावर हिंदुत्वनिष्ठांनी उत्तर न दिल्याने पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवरच गुन्हे प्रविष्ट केले.

३. सातारा येथे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांना ४-५ घंटे पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. तक्रार प्रविष्ट करण्यास विलंब केला जात होता. तेव्हा अधिवक्त्यांना संपर्क केला. त्यांचे पोलिसांशी संभाषण झाले असता तात्काळ तक्रार नोंदवून घेण्यात आली.

हिंदुत्वनिष्ठांना कायद्याची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांना हिंदुत्वाचे कार्य करतांना अशा प्रकारच्या अनेक प्रसंगात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी हिंदुत्वनिष्ठांना धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करून साहाय्य करावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात