हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी २ जूनपासून ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ !

हिंदु जनजागृती समितीकडून मुंबई, पणजी,
बेंगळुरू आणि हुब्बळ्ळी येथे पत्रकार परिषद

पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. रमेश शिंदे, श्री. चेतन राजहंस, पत्रकार परिषदेला संबोधित करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, श्री. हनुमंत परब आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

पणजी, १ जून (वार्ता.) – सध्या विविध राज्यांत झालेल्या निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकांकडे लागले आहे. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत मिळणारी केंद्रातील राजकीय सत्ता म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना नव्हे, हे वर्ष २०१४ च्या निवडणुकीतील विजयानंतर मिळालेल्या सत्तेतून दिसून आले आहे. तरीही वर्ष २०१९ चे राष्ट्रीय राजकारण हिंदुहितवर्धक असेल का ?, हेही एकदा पहाणे महत्त्वाचे ठरेल; कारण आतापर्यंत ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ अल्पसंख्यांकांचे लाड पुरवले गेले. आता ते थांबवून हिंदूंना सन्मान आणि अधिकार मिळवून देणे, हा हिंदु राष्ट्र निर्मितीचा प्रारंभ असायला हवा. या पार्श्‍वभूमीवर गेल्या ६ वर्षांतील अधिवेशनांमुळे देशभरात ‘हिंदु राष्ट्रा’विषयी जागृती झाली आहे. आता हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. त्याचीच पुढील दिशा ठरवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात या वर्षीही २ ते १२ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते.

या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘या अधिवेशनाला भारतातील १९ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील १८० हून अधिक हिंदु संघटनांचे ६५० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. अधिवेशनात प्रामुख्याने हिंदूंचे संरक्षण, मंदिररक्षण, संस्कृतीरक्षण, इतिहासरक्षण, धर्मांतर, लव्ह जिहाद, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आदी समस्यांसह युवासंघटन, संतसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांंविषयी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम निश्‍चित करण्यात येणार आहेत. त्यासह पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदूंचे रक्षण अन् त्यांना साहाय्य करण्यासाठी कोणत्या माध्यमातून प्रयत्न करावेत, याचीही चर्चा होणार आहे. गेली ४ वर्षे केंद्रात, तसेच देशातील बहुतांश राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचा पक्ष असलेल्या भाजपची सत्ता आहे; मात्र काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, समान नागरी कायदा, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्याबंदी, धर्मांतरबंदी, श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण आदी हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता धर्मप्रेमी हिंदू आणि हिंदु संघटना यांच्याकडून पुढाकार घेऊन सनदशीर मार्गाने हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून दिशा आणि कृती कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे.’’

साधनावृद्धी शिबीर आणि ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण
अधिवेशन’ यांचेही आयोजन ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘कोणत्याही कार्यात यश संपादन करण्यासाठी ईश्‍वरी अधिष्ठानाची आवश्यकता असते. यासाठी काळानुसार योग्य साधना करणे हे क्रमप्राप्त आहे. या अनुषंगाने ८ जूनला होणार्‍या ‘हिंदुत्वनिष्ठ साधना शिबिरा’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवले जाणार आहे. दुसरीकडे भ्रष्टाचार, शासनाचा अनागोंदी कारभार आणि धर्मावर होणारे विविध आघात यांच्या विरोधात लढतांना हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना विविध अडचणी अन् समस्यांना सामोरे जावे लागते. या दृष्टीने त्यांचे प्रशिक्षण व्हावे; म्हणून ९ ते १२ जून या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा कसा द्यावा, माहिती अधिकार कायद्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा, सनदशीर मार्गाने आंदोलन कसे करावे, व्यक्तीमत्त्व विकास आदींचे प्रशिक्षण दिले जाईल’, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या वेळी दिली.

श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी सांगितले की, ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीच्या  www.facebook.com/HinduAdhiveshan यावरून प्रसारित करण्यात येणार आहे. हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा.

‘चाय पे चर्चा’ नव्हे, तर ‘गाय पे चर्चा’ झाली पाहिजे ! – हनुमंत परब, अध्यक्ष गोवंश रक्षा अभियान

‘पत्रकारांनी सनातन संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट देऊन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्य जाणून घेतले पाहिजे. हिंदु जनजागृती समिती गेली ६ वर्षे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील गोरक्षक एकत्र येतात आणि गोरक्षणावर या वेळी चर्चा होते. राष्ट्रीय स्तरावर गोरक्षणाला अनुसरून चिंतन करून कृती आराखडा या वेळी निश्‍चित केला जातो. गोव्यात गोरक्षणाच्या कार्यात १४ संघटनांचा सहभाग असून त्यात सनातन संस्थेचाही सहभाग आहे. केंद्रात नवीन सरकार सत्तेवर येऊन ना हिंदूंना ‘अच्छे दिन’ आले, ना गायीला ‘अच्छे दिन’ आले. केवळ स्वार्थी लोक, कार्यकर्ते आणि आमदार यांनाच ‘अच्छे दिन’ आलेले आहेत. ‘चाय पे चर्चा’ नव्हे, तर ‘गाय पे चर्चा’ झाली पाहिजे. गायीवर संसदेत आणि प्रत्येक गल्लीत चर्चा झाली पाहिजे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने बहुमताने सत्तेवर आल्यास गोहत्या बंदी कायदा आणण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र या आश्‍वासनाचे पालन केले नाही, तर उलट गोरक्षकांवरच कारवाई केली जात आहे. गोव्यात न्यायालयाचा आदेश असूनही अवैध पशूवधगृहांवर कारवाई केली जात नाही’, अशी खंत गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष श्री. हनुमंत परब यांनी व्यक्त केली.

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा देण्यासाठी २ आणि
३ जून या दिवशी अधिवक्ता अधिवेशन ! – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

‘सरकार बदलल्यानंतरही मद्य विकणारा विजय मल्ल्या, बँक लुटणारा नीरव मोदी आणि मेहूल चोकसी सहस्रो कोटी रुपयांचे घोटाळे करून विदेशात आरामात आहेत. भ्रष्ट प्रशासन आणि अकार्यक्षम शासनकर्ते यांमुळे जनतेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलन करावे लागते. जनलोकपाल, माहितीचा अधिकार हे कायदे तीव्र लोकमागणीनंतरच अस्तित्वात आले आहेत. त्याप्रमाणे हिंदु समाज संघटित झाल्यास या सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखून भारत हे आदर्श ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून निश्‍चित निर्माण होऊ शकेल. या पार्श्‍वभूमीवर धर्मप्रेमी अधिवक्त्यांचे संघटन होण्यासाठी २ आणि ३ जून या दिवशी ‘धर्मप्रेमी अधिवक्ता अधिवेशन’ होणार आहे. या अधिवेशनात १७ प्रांतांमधील १५० हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सहभागी होणार आहेत’, असे हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

अधिवेशनाला येणारे मान्यवर !

या अधिवेशनाला नेपाळचे माजी राजगुरु आणि तेथील राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष श्री. माधव भट्टराय, संयुक्त राष्ट्र संघातील श्रीलंकेचे निवृत्त अधिकारी श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन्, बांगलादेशमधील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष तथा अधिवक्ता रवींद्र घोष, तसेच श्री. नितीश सरकार, मध्यप्रदेश येथील प.पू. मुकुंददासजी महाराज, तेलंगण येथील प.पू. परिपूर्णानंद स्वामी, राजस्थान येथील स्वामी संवित् सोमगिरी महाराज, भोपाळ येथील धर्मपाल शोधपिठाचे निर्देशक प्रा. रामेश्‍वर मिश्र, भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, तमिळनाडू येथील ‘हिंदु मक्कल कच्छी’ (हिंदु जनता दल) पक्षाचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

गोवा येथे झालेल्या पत्रकार परिषदेचा फेसबूक लाइव्ह च्या माध्यमांतून मिळालेला प्रतिसाद

पत्रकार परिषद ७ सहस्रांहून अधिक लोकांनी पाहिली. पत्रकार परिषदेचा विषय ४० सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला, तसेच ७०० हून अधिक जणांनी ही परिषद ‘शेअर’ केली.

क्षणचित्र

पत्रकार परिषदेला विविध वृत्तपत्रांचे ११ प्रतिनिधी, तर वृत्तवाहिन्यांचे ८ प्रतिनिधी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेला प्रश्‍न

प्रश्‍न : भाजप सत्तेवर येऊन हिंदूंच्या पदरी निराशा आहे, तर अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणूक २०१९ ला अनुसरून राजकीय दृष्टीने दिशा निश्‍चित केली जाणार आहे का ?

उत्तर : राजकीय दिशा ठरवणे, हा अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा उद्देश नाही. गेली ७० वर्षे देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. हिंदूंच्या मनोभावना राजकीय पक्षांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या अधिवेशनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. राजकीय पक्षांकडून हिंदूंना दिलेल्या आश्‍वासनांचे पालन केले जात नाही. ‘आपल्या भावनांचा केवळ उपयोग केला जात आहे’, असे हिंदूंना वाटू लागले आहे. २०१९ या वर्षी केंद्रात येणारे शासन हिंदूंचे हित पहाणारे असावे, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. हिंदू आज संघटित होत आहेत आणि राजकीय पक्षांनाही आता याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी आता त्यांच्या धोरणांतही पालट केल्याचे अनेक उदाहरणावरून दिसून येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात