सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे वेध !

श्री. रमेश शिंदे

१. ‘धर्मनिरपेक्षते’च्या आडून हिंदूंना विरोध !

स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकरगुरुजी आदी थोर पुरुषांनी हिंदु राष्ट्राचा विचार प्रखरपणे मांडला. दुर्दैवाने स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. जेथे ‘रामराज्य’ प्रत्यक्षात अवतरले, ते राज्य एक दंतकथा ठरवली गेली. छत्रपती शिवरायांनी स्थापिलेले ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ विस्मृतीत नेऊन त्याला ‘धर्मनिरपेक्ष राज्या’च्या नावाखाली ‘हिरवा रंग’ फासण्याचा खटाटोप केला गेला.

त्याहीपुढे जाऊन आज ‘हिंदु राष्ट्र म्हणजे धर्मांधता’, असा अपप्रचार हेतूपूर्वक केला जात आहे. हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडू पहाणार्‍यांवर अश्‍लाघ्य आरोप केले जात आहेत. असहिष्णू, बलात्कारी, ‘हिंदु तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’, ‘अल्ट्रा नॅशनलिस्ट’, ‘फ्रींज एलिमेन्ट्स’ अशा एक ना अनेक प्रकारे हिंदूंना हिणवले जात आहे. यासाठी केवळ राष्ट्रीय वृत्तवाहिन्याच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रथितयश वर्तमानपत्रेही कामाला लागली आहेत. हिंदूंना वेठीस धरून त्यांच्या विरोधात लेख लिहिले जात आहेत. वर्ष २०१५ मधील दादरी (उत्तरप्रदेश) हत्याकांड असो वा नुकतेच घडलेले कठुआ (जम्मू) प्रकरण असो, हिंदुविरोधी वातावरणाने संपूर्ण देशच ढवळून निघाला आहे.

 

२. राष्ट्रहिताची कळकळ !

प्रत्यक्षात सर्वांत सहिष्णू, सर्वांत सहनशील आणि सर्वसमावेशकता हे गुण असणार्‍यांना आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ची शिकवण प्रत्यक्ष आचरणातून जगासमोर आदर्श निर्माण करणार्‍या हिंदूंना असहिष्णू ठरवण्यात येणे, हे खचितच दुर्दैवी आहे. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेल्यांना हे लक्षात येत नाही की, ‘धर्मनिरपेक्ष राज्य’ कि ‘हिंदु राज्य’ हा खरा प्रश्‍न नसून ‘इस्लामी राज्य कि ‘हिंदु राज्य ?’, असा प्रश्‍न येत्या काही वर्षांत उत्पन्न होणार आहे. अशा परिस्थितीत केवळ हिंदुत्वनिष्ठ किंबहुना राष्ट्रनिष्ठ असणारी प्रामाणिक विचारधाराच या देशाचे रक्षण करू शकते. आतंकवादासारख्या देशाच्या मुळावर उठलेल्या समस्यांच्या विरोधात कधी पाकशी वैचारिक अथवा धार्मिकदृष्ट्या लागेबांधे असणारे बोलतात का ? अराजकाची बीजे रोवणार्‍या नक्षलवादाच्या विरोधात कधी साम्यवादाचा पुरस्कार करणारे बोलतात का ? ‘जेएन्यू’तील भारतविरोधी घोषणांच्या विरोधात अथवा सैन्यावर दगडफेक करणार्‍या नि देशाच्या अखंडतेला आव्हान ठरणार्‍या काश्मिरातील राष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात कधी सेक्युलर ब्रिगेड बोलते का, किंबहुना अशा प्रसंगांत या राष्ट्रद्रोह्यांची तळी उचलतांना ती धन्यता मानते; परंतु या आणि अशा अन्य राष्ट्रीय समस्या सुटाव्यात, याची कळकळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये का दिसून येते ? प्रामाणिक आणि तार्किकदृष्ट्या विचार करण्याची क्षमता असणार्‍या प्रत्येकाला याचे उत्तर आपसूकच मिळेल.

 

३. धर्माधारित हिंदु राष्ट्र अपेक्षित !

आता एखाद्याला वाटेल की, हिंदु राष्ट्राची स्थापना ही राजकीय स्तरावर होणार आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना खरेतर एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. तेथे केवळ सत्याला स्थान आहे. प्रत्यक्षात हे एक आध्यात्मिक कार्य असून धर्माधिष्ठित अर्थात् सत्यावर आधारित हिंदु राष्ट्र आम्हाला अभिप्रेत आहे. येथे त्याग, नि:स्वार्थ भाव, सत्शीलता या दैवी गुणांनी सुसंपन्न अशा लोकांची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राच्या आकांक्षा सफल होण्यासाठी हिंदु समाजाचा हिंदु राष्ट्राविषयीचा विचार, उच्चार आणि आचारही सर्वत्र एकसमान दिसला पाहिजे.

 

४. सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे वेध !

नेमक्या या कारणांसाठीच हिंदु जनजागृती समिती वर्ष २०१२ पासून अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचे आयोजन करून धर्माधिष्ठित राज्यप्रणालीच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत आहे. ‘हिंदु समाजातील विविध घटक, उदा. हिंदु संघटना, संप्रदाय, संत, अधिवक्ते, विचारवंत आदींनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत’, याचे दिशादर्शन या हिंदू अधिवेशनांतून होत आहे. याद्वारे शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सिद्ध झालेले अभेद्य संघटन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एक आश्‍वासक पाऊल ठरत आहे.

या अधिवेशनातून स्फूर्ती घेऊन आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर हनुमानाचा वाटा उचलण्याची प्रेरणा व्हावी आणि त्याने या कार्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक अन् आध्यात्मिक स्तरांवर अथक परिश्रम घ्यावेत, ही प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात