हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी गोवा येथे २ ते १२ जून या कालावधीत ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ !

  • लक्ष्मणपुरी (लखनौ) आणि धनबाद येथे पत्रकार परिषद
  • उत्तरप्रदेशातून ३२ हिंदु संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि २८ अधिवक्ते ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला येणार !
  • हिंदुत्वनिष्ठ नेत्यांसह माध्यमांतही हिंदू अधिवेशनाविषयी उत्सुकता !

हिंदु राष्ट्राची स्थापना या एका ध्येयाने प्रेरित झालेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदू अधिवेशन’ प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित केले जात आहे. यंदा या अधिवेशनाचे ७ वे वर्ष असून २ ते १२ जून २०१८ या कालावधीत सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. या अधिवेशनाला भारतातील १९ राज्यांसहित नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथून १५० हून अधिक हिंदु संघटनांचे ६५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. आतापर्यंत झालेल्या अधिवेशनांच्या परिणामस्वरूप देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटित होत आहेत. आजपर्यंत जात-पात, समुदाय किंवा विविध वैचारिक गटांमध्ये अडकलेल्या हिंदूंना अशाप्रकारे एका ध्येयाने प्रेरित करणे आणि संघटित करणे, हा हिंदु जनजागृती समितीचा अभिनव प्रयत्न आहे.

डावीकडून श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, पू. नीलेश सिंगबाळ आणि अधिवक्ता हरिशंकर जैन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) / धनबाद (झारखंड) – सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’साठी उत्तरप्रदेशातून ३२ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि २८ अधिवक्ते येणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी येथील उत्तरप्रदेश प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष अधिवक्ता हरिशंकर जैन आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी उपस्थित होते. १५ आणि १६ डिसेंबर २०१७ या दिवशी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करण्यासाठी वाराणसी येथे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील हिंदुत्वनिष्ठांचे राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या कार्याला गती देण्याचा प्रयत्न या सप्तम अधिवेशनाद्वारे केला जाणार आहे.

अधिवेशनातील मुख्य विषय

हिंदूंचे संरक्षण, मंदिरांचे रक्षण, संस्कृतीरक्षण, इतिहासाचे रक्षण, धर्मांतर, लव्ह जिहाद, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आदी समस्यांवर उपाययोजनात्मक चर्चेसह युवकांचे संघटन, संतांचे संघटन, हिंदु राष्ट्राची स्थापना आदी विषयांसाठीचा कृती आराखडा निश्‍चित करण्यात येणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या साहाय्यासाठी काय करू शकतो, यावर चर्चा केली जाणार आहे.

उत्तरप्रदेशातून उपस्थित रहाणारे काही मान्यवर

‘वर्ल्ड हिंदू फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजय सिंह, गोरखपूर येथील अखिल भारत ब्राह्मण महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेंद्रनाथ त्रिपाठी, वाराणसीचे ‘इंडिया विथ विस्डम’ समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अलाहाबाद उच्च न्यायालयातील अधिवक्ता अभिषेक शुक्ला

१. लक्ष्मणपुरी येथे प्रथमच पत्रकार परिषद होऊनही, तसेच परिषदेच्या दिवशी ४५ अंश सेल्सिअस तापमान असूनही ३९ पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले.

२. अधिवक्ता हरिशंकर जैन हे वयस्कर आहेत, तरीदेखील ते परिषदेला ४५ मिनिटे अगोदर उपस्थित राहून ‘मी कोणती सेवा करू’, असे विचारत होते. परिषदेच्या एक दिवस आधी त्यांनी स्वत: पत्रकारांना संपर्क केले. अधिकाधिक पत्रकारांना परिषदेसंदर्भात माहिती मिळण्यासाठी त्यांनी अनेक पत्रकारांचे संपर्क क्रमांक समितीच्या कार्यकर्त्यांना दिले.

३. पत्रकार परिषदेची निमंत्रणे एक दिवस अगोदर देतांना ‘आज’ या दैनिकाचे पत्रकार भेटले. ५ निमंत्रणे स्वत:हून मागून घेतली. ते समितीला साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी अन्य पत्रकारांपर्यंत निमंत्रणे पोहोचण्यासाठी अन्य एका व्यक्तीचाही संपर्क क्रमांक समितीच्या कार्यकर्त्यांना दिला.

४. ‘प्राईम न्यूज’चे अधिकारी श्री. अशोक मिश्र यांनी अनेक जणांचे संपर्क क्रमांक, पत्ते दिले. सर्वांना निर्धारित वेळेत भेटता येईल, यासाठी एक मार्ग ठरवून दिला. ‘मी तुम्हाला आणखी काय साहाय्य करू’, असे ते अनेकदा विचारत होते. मोठ्या पदावर असूनही त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी १ घंटा वेळ दिला. त्यांच्या समवेत असलेल्या अन्य पत्रकारांशी चर्चा करतांना ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची दिशा कशी योग्य आहे’, हे ते स्वत: पटवून देत होते.

५. पत्रकार परिषद झाल्यानंतरही ४-५ पत्रकार बराच वेळ बसून हिंदु राष्ट्राविषयी सकारात्मक चर्चा करत होते. धर्मावरील आघातांची उदाहरणे अभ्यासपूर्वक सांगत होते.

६. विविध वाहिन्यांवरील चर्चासत्रात सहभागी होण्याच्या दृष्टीने २ वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी समितीच्या प्रवक्त्यांचे संपर्क क्रमांक मागून घेतले.

अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठ आणि प्रसारमाध्यमे यांचे प्रतिनिधी अशा सर्वांनाच सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी उत्कंठा वाटत आहे, हेच दिसून आले.

धनबाद (झारखंड) येथे पत्रकार परिषदेला उत्तम प्रतिसाद !

व्यासपिठावर डावीकडून डॉ. नील माधव दास, श्री. चित्तरंजन सुराल आणि श्री. प्रदीप खेमका

धनबाद (झारखंड) – सप्तम अधिवेशनामध्ये झारखंड येथूनही ८ धर्माभिमानी सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि उत्तरपूर्व भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी धनबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेद्वारे उपस्थित पत्रकारांना दिली. या वेळी ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास आणि सनातन संस्थेचे श्री. प्रदीप खेमका उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात