पुणे येथील सनातनचे साधक श्री. मनोज महाजन यांचा रद्दीसंकलन उपक्रमातून धर्मप्रसार !

सेवाभावी संस्थांना सनातनचे ग्रंथ, वह्या आणि क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन यांचे वाटप

श्री. मनोज महाजन (उजवीकडे) यांच्याकडून सनातन ग्रंथांची भेट स्वीकारतांना श्री. अशोक देशमाने (मध्यभागी) आणि श्री.दत्तात्रय जाधव (डावीकडे)

पुणे, १७ मे (वार्ता.) – येथील सनातनचे साधक श्री. मनोज महाजन हे कोथरूड, सिंहगड रस्ता, कर्वेनगर परिसरातील रहिवाशांकडून नियमितपणे मासिक रद्दीसंकलन करतात. त्याच्या विक्रीतून मिळणार्‍या निधीतून ते प्रतीवर्षी सेवाभावी शैक्षणिक आणि अन्य संस्थांना अर्थसाहाय्य करतात. यंदाच्या वर्षी भोसरी येथील स्नेहवन संस्था आणि मावळ तालुक्यातील शिवली येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय यांना अर्थसाहाय्य करण्यात आले. १३ मे या दिवशी हॅपी कॉलनीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महाजन हे ए.आर्.ए.आय. पुणे या आस्थापनामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असून तेथील सीएस्आर् गटामध्येही कार्यरत आहेत. गेली ७ वर्षे सेवाभावाने ते हा उपक्रम राबवत आहेत.

या प्रसंगी स्नेहवन संस्थेचे श्री. अशोक देशमाने यांना १५० सनातनच्या वह्या, सनातन-निर्मित ग्रंथांचा संच, क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन आणि रोख रक्कम, तर श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक महाविद्यालयाचे श्री. दत्तात्रय जाधव यांना १ सहस्र २०० सनातनच्या वह्या, सनातनच्या ग्रंथांचा संच, क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन आणि रोख रक्कम देण्यात आली. दोन्ही संस्थांना जवळपास दीड लक्षाहून अधिक रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात आले. श्री. देशमाने यांनी ऊसतोडणी कामगार, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची मुले अशा ४० मुलांच्या शिक्षणाचे दायित्व स्वीकारले आहे, तर श्री. दत्तात्रय जाधव हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. सम्राट देशपांडे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि साधनेचे महत्त्व’ यावर प्रवचन केले. या वेळी अनुमाने ९० जण उपस्थित होते. येथील सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

क्षणचित्रे

१. चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानचे विश्‍वस्त श्री. विश्राम देव प्रवचन ऐकून म्हणाले, ‘‘प्रवचनातील विषय महत्त्वाचा आहे. बाहेरच्या देशातच काय, बिहार, बंगाल या राज्यांमध्येही हिंदूंची स्थिती वाईट आहे. काही ठिकाणी त्याची झळ बसत नाही इतकेच ! जीवनात साधना करणे आवश्यकच आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात