हिंदु राष्ट्राची मागणी करणे, त्याचा प्रसार करणे हा हिंदूंचा संवैधानिक अधिकार ! – सचिन वैद्य, सनातन संस्था

धुळे, १४ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील रानमळा या गावात १० मे या दिवशी ‘हिंदु राष्ट्रजागृती सभा’ पार पडली. सभेला सनातन संस्थेचे श्री. सचिन वैद्य आणि हिंदु जनजागृती समितीच्या धुळे आणि नंदुरबार समन्वयक कु. रागेश्री देशपांडे हे प्रमुख वक्ते होते.

सभेला १२५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. गावातील हिंदुत्वनिष्ठ, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोसेवा जिल्हासेवक श्री. बाळू गावडे यांनी सभेचे आयोजन केले. त्यांनी स्वत: ‘जय श्रीराम’ नावाच्या पट्टया छापून घरोघरी अन् वाहनांवर लावल्या. सभेच्या पूर्वसिद्धतेला त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सभेनंतर गावात धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याचे ठरवण्यात आले. मोहाडी येथील धर्मप्रेमी श्री. राजेंद्र खैरनार यांनी सूत्रसंचालन केले, तर श्री. नीलेश मिंड यांनी सभेच्या आयोजनाचे दायित्व स्वीकारले. या सभेला ग्रंथप्रदर्शन कक्षही उभारण्यात आला होता. त्याचा जिज्ञासूंनी लाभ घेतला.

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, त्याचा प्रसार करणे हा हिंदूंचा संवैधानिक अधिकार ! –  सचिन वैद्य, सनातन संस्था

आज जगात ख्रिश्‍चनांची १५७ राष्ट्रे आहेत, मुसलमानांंची ५२ हून अधिक राष्ट्रे आहेत. संख्येने अनुमाने ८५ लाख असलेल्या ज्यूंचे सुद्धा स्वत:चे असे एक राष्ट्र आहे. मग १०० कोटींहून अधिक संख्या असलेल्या हिंदूंचे हिंदु राष्ट्र का नको ? हिंदु राष्ट्राची मागणी ही संपूर्णत: संवैधानिक आहे. सूक्ष्मातीसूक्ष्म जीवांचा विचार करणारे प्रभु श्रीरामांच्या रामराज्यासारखे, शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासारखे आदर्श असे धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे काळानुसार आवश्यक आहे.’

फिलिपाईन्सप्रमाणे इसिसचा आतंकवाद संपवण्याची चीड भारतीय नेत्यांना का येत नाही ?- कु. रागेश्री देशपांडे, हिंदु जनजागृती समिती

सध्या जगभर ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवादी कारवाया चालू आहेत. छोट्याशा फिलिपाईन्सचा पंतप्रधान म्हणतो, ‘मी इसिसच्या आतंकवाद्याला खाऊन टाकीन’. तो राष्ट्राभिमान, ती चीड आमच्या एकाही भारतीय नेत्यांत का दिसत नाही ? भारतातील गावागावात ‘इसिस’चे समर्थक पकडले जात आहेत. यावर उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात