परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘भव्य हिंदू एकता दिंडी’चे आयोजन

कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने कोल्हापूर शहरात १३ मे या दिवशी दुपारी ४ वाजता ‘भव्य हिंदू एकता दिंडी’चे आयोजन केले होते. दिंडीला समाजातील धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा असलेली पालखी, रणरागिणी पथक, शौर्य जागरण करणारे मर्दानी खेळ, राष्ट्र-धर्म यांविषयीचे उद्बोधक फलक, चित्ररथ, बालपथक आदींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिंडीमध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते ‘एक हिंदू’ म्हणून सहभागी झाले होते. या दिंडीला सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात